Articles 
मातीचा गंध हरवलेल्या मराठवाड्याच्या पावसाची गोष्ट !

मातीचा गंध हरवलेल्या मराठवाड्याच्या पावसाची गोष्ट !

मातीचा गंध हरवलेल्या

मराठवाड्याच्या पावसाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ४५)

 

मराठवाड्यातील जुनी खोड आजही ‘आम्ही तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत’, असेच म्हणतात; ‘मी तुझ्यापेक्षा चार दुष्काळ जास्त भोगलेत,’ असं कुणी म्हणल्याचे मी तरी ऐकलेलं नाही. यावरून मराठवाड्यात पावसाळ्यात पाऊस, पीक पाण्यापुरता पडत होता हे निश्चित! अगदी गेल्या दहा वर्षापर्यंत सारे काही आलबेल होतं. २००४-२००५ पर्यंत वर्षमानाप्रमाणे पाऊस पाणी पडायचं. निसर्गाचं चक्र शिस्तीत सुरू होतं. चैत्र महिन्यात गावोगावच्या जत्रा-यात्रा सुरू व्हायच्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील येडाई किंवा येडेश्वरीची यात्रा, त्यानंतर तेरच्या गोरोबा काकाची यात्रा भरायच्या. पाहुणेराऊळे जमायचे, देशी गावराण आंब्याचा रस-पोळ्या, कुरडई पापड्याचा बेत शिजायचा. दुपारी कडक ऊन अन् तिसर्‍या प्रहरी अचानक आभाळ भरून यायचं. वादळ वारे येणार्‍या  पावसाची वर्दी घेऊन आकाशवाणी म्हणजेच वीज कडकडायची. चार दोन रानात ही विद्युल्लता उतरायची. सोबत काही रानात मशागत करणार्‍या बाया बापड्यांचे जीवही न्यायची. अन् मग अवकाळी गाबन झाले की पुन्हा जमीन वैशाखात तव्यासारखी तापायची.

पावश्या अन् मृगाचा किडा

आभाळात मावळतीला एक विशिष्ट रंग दिसला की आता पावसाचं बी तयार झालं, असे शेतकरी त्यांच्या अनुभवाच्या ठोकताळ्यावरून पावसाचा अंदाज करायचे. ‘पावश्या... पावश्या...’ असा पक्षी आवाज द्यायला लागला की पाऊस अजून जवळ आला, याची खुण पटायची. मृगाचा किडा दिसला की त्याला हळदी-कुंकू वाहिलं जायचं. पावसाच्या आधी येणार्‍या एक विशिष्ट पाकोळया दिसल्या की वरुण राजाचे अश्व पुढे आले, असा अदमास निघायचा. ‘पडत्याल उत्तरा तर भात खाईना कुत्तरा’ आणि ‘नाही पडल्या उत्तरा तर भात मिळणा पुत्तरा’ असं सूत्र त्याला ठाऊक होतं. ‘पडल्या मघा तर चुलीपुढं हगा नाहीतर ढगाकडं बघा’ हे नक्षत्राचे आणि पावसाचे अंदाज त्याच्या हाताशी होते.

मराठवाडा हा तसा खर्‍या अर्थाने मागास! अख्या देशाला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालं, पण मराठवाड्याला १ वर्ष एक महिना दोन दिवस उशिराने म्हणजे १७ सप्टेबर १९४८ साली निजामाची राजवट संपल्यानंतर मिळालं. मग पाऊस ही हाच उशिराचा शिरस्ता संभाळीत या भागात उशिरानेच येतो. आधी केरळ, गोवा, मुंबई असे साहेबांच्या गावाचे मुक्काम घेत घेत मान्सून दहा ते पंधरा जूनच्या सुमारास या भागात यायचा.

कधी मृग निघायच्या आधी रोहिण्या बरसल्या की संतांची भूमी असलेल्या या मातीचा गंध जपून ठेवावा वाटायचा. सुताराच्या नेटावर माणसांची अन् तिफणीची दाटी व्हायची. मृग नक्षत्र आलं की तिफणी भरून तयार असायच्या, पाऊस ही फार आडेलतट्टू नसायचा. ‘पाऊस पडला नाही की महादेवाला कोंडा,’ असं वृद्ध सांगायचे. तरुण मंडळींना हुरूप यायचा. महादेव मंदिरात पिंड बुडेल एवढं पाणी गावकरी आणून ओतायचे. अन् पाऊस यायचा. कधी यासाठी पोरंसोरं बेडूक - बेडकीचं लग्न लावयाचे. आणि मग हलकडिची टांगलेली कणसं, बी भरनासाठी (कणसं बडवून बी वेगळं करण्यासाठी) कणगी आणि इर्ल्यातून थेट वावरात पोचायची. पाऊस झाला की तिफणीतून मूठ सोडली जायची. भारी जमिनीत उडीद, मूग, तूर, मका, तर हलक्या जमिनीत हुलगे, मटकी, तीळ, बाजरी, शेंदरी, पिवळी पेरली जायची.

वारकरी देहू-आळंदी गाठायचा

एखादा ‘ठोक्या पाऊस’ पडला की जमिनीची तहान भागायची आणि पडलेलं पावसाचं पाणी वाहू लागायचं. दिवसातून चार वेळा लेंडया, ओढे, यांना अचानक पूर यायचा. या पुरात काट्या, कुपाट्या, बेसावध जनावरं अन् माणूस वाहत जायचा. कंदील अन् टेंभे घेवून सारा गाव पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आकृती काठाकाठाने शोधत फिरायचे. चार दोन दिवस पुराच्या गोष्टी रंगायच्या. ‘ओढ असणारा तो ओढा’ हे त्यावेळी पटायचे. गोदामाय पैठणपासून ते नांदेडपर्यंत ओसंडून वाहायची. तेरणा - मांजरा यांसह अनेक लहान मोठ्या नद्यांना भरते यायचे. ते पार उन्हाळ्यापर्यंत नद्यांचा ओलावा टिकून राहायचा. पेरण्या उरकल्या असल्याने खुरपणी टुरपाणी महिला मंडळाच्या स्वाधीन करून वारकरी देहू-आळंदी गाठायचे. तिथून पंढरीचा रस्ता धरायचे. सुखा समाधानाने झेंडे पताका नाचवित दिंड्या पालखीत हरिनामात गुंगून जायचे. उरले सुरले बार्शी लाईट रेल्वेनी दशमीला पंढरी गाठायचे. द्वाद्स सोडून लेकराबाळांना भेंड-बत्तासे-लाह्याचा प्रसाद घेवून गावाकडं परतायचे.

श्रावणात संततधार लागायची. अन् मग रानात काम करता यायचं नाही. सोंगट्याचे डाव टाकले जायचे. सर्दलेल्या वातावरणात सोंगट्या खेळणाऱ्या भिडूत गर्मागर्मि व्हायची. मलाही पाऊस थांबू नये असं वाटायचं. कारण एरवी वेळ पाळणारी मंडळी पावसामुळे माझ्या आजोबाच्या ढाळजेत अक्षरक्ष: लोळत पडायची. रानाशिवारातल्या गप्पा रंगायच्या अन् पाऊस माणसाला माणसात बसवायचा. रोजच्या रामरगाड्यातून काही काळ विश्रांति द्यायचा.

श्रावणात सणासुदीला गोडधोड खायला मिळायचं. नागपंचमीला पोरी सोरी नटायच्या, वारूळ धुंडली जायची, सोमवारी शाळेला अर्ध्या सुट्टी राहायची. त्या दिवशी एखाधि ट्रक भरून परळीच्या वैद्यनाथ, ओंढ्याचा नागनाथ किंवा वेरूळचा घृष्णेश्वर दर्शन करायला जायचे. फारच ज्याला पैशाची आबाळ असली तर जवळपासचे शिवमंदिर गाठले जायचे. सहस्त्रकुंड, रामलिंगच्या, सौताड्याच्या, कपिलधारच्या धबधबा पावसाचे अनोखे रूप घेवून यायचा. त्यासमोर उभा राहून उडणाऱ्या तुषारात भिजताना नायगरा फिके वाटायचे. पोळ्याला तर ‘पाऊस झाला भोळा’ प्रमाणे वागायचा. आदल्या दिवशी नदी, नाले, ओढ्याला बैल,

गाई, वासरं धुवायला न्यायची शाडूने जनावरे घासून काढायची. पोळ्या दिवशी कन्या अन् गुळवणी बैलाला चारायची अन् मग ‘चौर चौर चांगभलं, पाऊस आला घरला चलं’ असे म्हणत गाई बैलाचे लग्न लावायचे. सायंकाळी कुस्त्यांची दंगल. नारळावरच्या कुस्त्यांपासून ते पैजेच्या कुस्त्याला गावोगावचे पैलवान यायचे. त्यांची दंगल चालायची. ऊसतोड कामगार बाजऱ्या काढून त्याची बुचाडे लावायची. घरी म्हातारे अन् लहान लेकर ठेवून ऊसतोडीसाठी कधी सांगली - सातारा, तर कधी कर्नाटक गाठायचे. दरम्यान आघात काढणी यायची.

कधी उंदर्याचा पाऊस

राशी भरता भरता शेतकरी हरखून जायचा. खंडीनं धान्य पिकले आणि मोजले जायचे. लोखंड्याचा पाऊस पडला की रान लोखंडा सारखी कडक व्हायची त्यात औत मोडायचे. बैल शिळवट तोडायचे. तुरीत दाणे भरायचे नाहीत. उंदर्‍याचा पाऊस पडला की उंदराचा सुळसुळाट व्हायचा. हस्ताच्या पावसाचं पाणी धरून ठेवलं जायचं. रब्बीच्या ज्वारीच्या बियाण्याला हे पाणी लावले की ज्वारीची ताटं नजर लागण्यासारखी दिसायची, कणसे भरायची. पार उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम तालुक्यातील देवळाली, माणकेश्वर, सिरसाव वाकडी इथंपासून ते परभणी जिल्ह्यातील झरी बोरीपर्यंत, आष्टी - पाटोद्या पासून ते नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, किनवटपर्यंत जिकडं बघावं तिकडं ज्वारी लगडून जायची. वेगवेगळ्या भागात शाळू, दगडी, मालदांडी, झिपरी, गूळभेंडी अशा वेगवेगळ्या ज्वारीचं वाण रग्गड झालेल्या पावसावर दाण्यादाण्यात भरून यायचं. माणसाला खायला ज्वारी आणि जनावराला कडब्याची सोय व्हायची. अन् मराठवाडा ज्वारीचं कोठार बनून जायचा.

आणि आता...

आता मात्र स्थिती झपाट्याने बदलली आहे. आम्ही आमची पिके बदलली. कमी पाण्यावर येणारी पिके टाळून कापूस, ऊस, सोयाबीन याच्या मागे मेंढरासारखे पळतो आहेत. १९७२ साली दुष्काळ पडला. तेंव्हा पाणी होतं, पण खायला अन्न नव्हतं. आता स्थिती विरुद्ध आहे. त्यानंतर १९८६ साली टंचाई स्थिती होती. पण २००५ नंतर पावसाचे प्रमाण तुलनेत कमी झाले. पडला की तो एवढा पडायला लागला की पार आमच्या जमिनी वाहून नेऊ लागला. आणि सर्वदूर पडणं तर दूरच. बैलाचं एक शिंग पावसाने चिंब, तर दुसरं कोरडं, अशी स्थिती म्हटलं तर वावग ठरणार नाही. आम्ही झाडे जपली नाहीत. नवीन लावली नाहीत, जुनी ठेवली नाहीत. त्यामुळे पर्यावरण असंतुलित झाले. निसर्गाचे चक्र बादलायला लागले. पावसाळ्यात पाऊस पडेना.

जो मराठवाडा म्हणून आज भाग ओळखला जातो. त्याच भागातील ‘प्रतिष्ठान’ म्हणजे आजचे पैठण येथे शककर्ता शालिवाहन या चक्रवर्ती राजाने आपल्या राज्याची गोदेकाठी राजधानी केली. ती गोदाकाठची पाणीदार संस्कृती आज मात्र वाळवंट होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. तो ओलावा इथल्या मातीत जपणे, पावसाचा थेंब ना थेंब मातीत रुजवणे, आणि ती मातीची ओल ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे. कधी काळी तो होता, पण आता घरच्यांवर रागावून घरातून निघून गेला, अशी जाहिरात मराठवड्यातील पावसाच्या बाबतीत दिली तर नवल वाटायला नको!

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४५ वी गोष्ट.)

 

- अतुल अविनाश कुलकर्णी, बीड

[email protected]

(भवताल मासिकाच्या जून २०२१ अंकातून...)

फोटो सौजन्य -

1. अभिजित घोरपडे

2. आलोक मंत्री

3. पुष्कर खाडे

4. अभिजित घोरपडे

 

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

2 Comments

Vandana Sanjay

महाराष्ट्राच्या एक मोठ्या भूभागाच्या शेतीची...संस्कृतीची...दुर्लभ होत चाललेल्या...आजोबांच्या ढाळजेतल्या रानशिवारातल्या गप्पांची माहिती या लेखाच्या निमित्ताने मिळाली... आपल्यातीलच एका प्रदेशाशी भावबंध जुळवणारे लेखन...🌧🌧🌾🌿🌾🌿

Bhavatal Reply

हो, खरंय. या लेखांच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातील संस्कृती व जीवनपद्धतीची ओळख व्हायला मदत होत आहे. धन्यवाद.

Gajanan Lonkar

खूप छान लेख आहे

Bhavatal Reply

धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like