Articles 
पावसाळ्यात दरवर्षी बुडणाऱ्या मुंबईची गोष्ट; भाग १

पावसाळ्यात दरवर्षी बुडणाऱ्या मुंबईची गोष्ट; भाग १

पावसाळ्यात दरवर्षी बुडणाऱ्या मुंबईची गोष्ट; भाग

(भवतालाच्या गोष्टी ५१)

 

मुंबईबाबत एक वास्तव लक्षात घ्यावे लागते. ते म्हणजे, आपण मुंबई म्हणतो ते एक सलग बेट म्हणून असित्त्वात नव्हते. आजही नाही. तेथील सात लहान बेटांच्या मध्ये कृत्रिम भर टाकण्यात आली. त्याला ब्रिटिशांच्या काळात सुरूवात झाली. ही भर घातल्यामुळे आताचा सलग वाटणारा असा भूभाग तयार झाला आहे. तो सलग वाटतो खरा, पण प्रत्यक्षात तो तसा नाही. ते मनुष्यनिर्मित बेट आहे.

आपण ही भर घातल्याचे परिणाम होतातच. विशेषत: समुद्राजवळ नवी भौगोलिक रचना केली जाते, तेव्हा तेथील किनारपट्टीचे संतुलन बिघडते. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांसाठी पूर्वी वेगळा मार्ग होता. आता त्यांना अडथळा निर्माण झाला. त्यांचा पूर्वीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे या लाटा किनाऱ्यावर अधिक धडकतात आणि मोठ्या प्रमाणात धूप घडवून आणतात. ती रोखण्यासाठीच आज मुंबईच्या किनाऱ्यावर जागोजागी काँक्रिटचे मोठाले टेट्रापॉड टाकलेले दिसतात. लाटांमुळे होणारी धूप थांबवण्याचा हा एक प्रयत्न. तरीसुद्धा ही प्रतिबंधक उपाय योजना किमान आणखी काही वर्षे सुरूच ठेवावी लागेल. या असंतुलनाला निसर्ग अजूनही तोंड देतो आहे. आपण भूगोलात केलेला हा मोठा बदल आहे.

नवी जमीन तयार केली, पण...

दुसरे झाले असे- नवी जमीन तयार करताना भर घालण्याचे काम योग्य पद्धतीने झाले नाही. त्या वेळच्या गरजाही वेगळ्या होत्या. भरतीची जी महत्तम पातळी आहे, त्याच्या वरतीच मनुष्यवस्ती व माणसाशी संबंधित इतर कामे होतील हे ठरवून ही कामे झालेली दिसत नाहीत. उदाहरण द्यायचे तर भांडूप, मुलुंड येथे आजही मिठागरं दिसतात. त्या पातळीवरच नव्या वस्त्या आकाराला येत आहेत. या सात बेटांच्या आसपास आणि त्यांच्या दरम्यानच्या उथळ जमिनीवर मिठागरं होती. याशिवाय खारफुटीच्या वनस्पती होत्या. म्हणजे बेटांच्या मधल्या पट्ट्यात समुद्र होता, तसेच या गोष्टीसुद्धा होत्या. भर टाकली तरीसुद्धा त्यातील खोलगट भाग मनुष्यवस्तीसाठी उपयुक्त अशा उंचीला आणला गेला नाही. लोवर परळ हेही याचे उदाहरण. त्याचे नावच सर्व काही सांगते. तेथील मिठागरांवर अर्धवट आणि समुद्र पातळीच्या जेमतेम वर येईल अशी भर टाकण्यात आली. तो भाग ओहोटी असताना किंवा कमी भरतीच्या वेळी सुरक्षित असायचा. मोठ्या भरतीच्या वेळी तेथे पाणी साचणे स्वाभाविक होते / आहे. त्याचेच परिणाम आपण भोगतो आहोत. सध्या जो पूरप्रवण क्षेत्र आहे, ते समुद्राची ओहोटी व भरती यांच्या पातळीच्या मधले क्षेत्र. कारण तेथे भर पुरेशी टाकण्यात आली नाही.

गरजा, तेव्हाच्या आणि आताच्या

हे असे अर्धवट काम का झाले? यामागे प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत. भर टाकणे हे खर्चिक काम असते. त्यामुळे सर्व भागात पुरेशी भर घातली गेली नसावी. त्याचबरोबर हे भर घालण्याचे काम पहिल्यांदा घडले तो काळ आणि त्या वेळच्या गरजाही लक्षात घ्याव्या लागतील. भर टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली- १७५० च्या आसपास. हे काम सुमारे शंभर वर्षे म्हणजे १८५० सालापर्यंत सुरू राहिले. या बेटांदरम्यानचे रस्ते हे मोठाले पूल नव्हते, तर ते कधी पाण्याखाली जाणारे पूल म्हणजे "कॉज वे" (उदा.- कुलाबा कॉज वे, माहीम कॉज वे, आदी.) म्हणूनच बांधण्यात आले होते. हे मार्ग भरती असताना पाण्याखाली जाणारे होते. त्या काळची वाहतुकीची गरज पाहता ते तसे चालणारे होते. म्हणूनच या कॉज वेची उंची साधारण सरासरी भरतीच्या पातळीला ठेवण्यात आली होती. ते मोठ्या भरतीच्या वेळी बंद होणार हे स्वीकारलेच होते. ही बाब त्या वेळच्या मुंबईच्या व्यवहारासाठी पुरेशी होती. दिवसभर अखंड वाहतूक ही त्या वेळची गरज नव्हती. हा मुंबई बेटावरील नागरी विस्तारीकरणाचा मधला टप्पा होता.

पुढच्या काळात, १८५० च्या नंतर रेल्वे आली. रेल्वे वाहतुकीच्या गरजा वेगळ्या होत्या. रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ देणे धोक्याचे होते. तेव्हा पहिल्यांदाच सूत्र पुढे आले ते वाहतुकीचे मार्ग सर्वकाळ पाण्याच्या पातळीच्या वर ठेवण्याचे. तरीही काही भागात रेल्वे स्थानकांसाठी भर टाकणे हे खूप महागडे होते. त्यामुळे एल्फिन्स्टन रोड, लोवर परेल यासारखी स्थानके बांधताना तडजोड करावी लागली. मुंबईच्या रेल्वेचा नकाशा पाहिला तरी त्यावरून हे दिसून येते. त्यामुळे थोडा मोठा पाऊस सुरू होताच हिंदमाता चित्रपटगृह या सारख्या ठिकाणी पाणी जमा व्हायला सुरूवात होते. आता झालंय असं की आजच्या आधुनिक रचनेत आपल्या गरजा आणि उद्दिष्ट्ये बदलली आहेत. हाच मुख्य दोष बनला आहे.

आपल्याला सर्वकाळ, दिवस-रात्र वाहतूक सुरू ठेवावी लागते. मात्र, निर्माण झालेली व्यवस्था वेगळ्या व कमी गरजांसाठी होती. उदाहरणच द्यायचे तर खार-सांताक्रुझचा परिसर. गावाचे नावच खार आहे. तिथे मिठागरे होती, खाजण जागा होत्या. तेथे समुद्राच्या भरतीचे पाणी येणे अपेक्षितच होते. ते तेव्हा चालायचे. इतकेच नव्हे तर हवेसेही होते. त्या वेळी नागरी व्यवहारांना भूक्षेत्र कमी असले तरी त्या काळासाठी ते पुरेसे होते. आता मात्र आपल्याला ते पाणी नको आहे. या बदलाला आपण तोंड देत आहोत. याचा अर्थ असा निघतो की, मुंबईच्या नागरी विस्ताराबाबत त्या वेळी बांधण्यात आलेली अटकळ (अँटीसिपेशन) पूर्णपणे चुकली. त्याच्या परिणामांना आपण आता तोंड देत आहोत.

पावसाचा वाटा

मुंबईत दाणादाण उडवण्यासाठी केवळ पडणारा पाऊस याचा विचार करून चालत नाही. हा पाऊस किती प्रमाणात आणि दिवसाच्या कोणत्या वेळी पडतो, याही महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. भरती आणि पाऊस यांचा संयोग होतो, तेव्हा गंभीर परिस्थिती निर्माण होते. मिठी ही मुंबईतील प्रमुख नदी. मोठा पाऊस पडल्यानंतर मिठीचे मोठ्या प्रवाहात रूपांतर व्हायला सुमारे ४० मिनिटे लागतात. अशा स्थितीची कल्पना करावी- मुंबईत दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास मोठा पाऊस पडला आणि दोन वाजण्याच्या सुमारास मोठ्या भरतीची वेळ आहे. अशा वेळी मिठीतील पुरप्रवाहाचा खाडीच्या तोंडातून निचरा होत नाही. हे झाले मिठीच्या बाबतीत. मुंबईत असलेले वेगवेगळे नाले प्रवाह आहेत. प्रत्येकाची पूर निचऱ्याची गरज वेगवेगळी आहे. त्यातही बदल होत आहेत. म्हणूनच मुंबईत साचणाऱ्या पाण्याबाबत केवळ पावसाकडे लक्ष देऊन चालत नाही, तर भरतीच्या वेळाही पाहाव्या लागतात. ओहोटीच्या वेळी मोठा पाऊस पडला, तर प्रश्न येत नाही. भरतीच्या किंवा अगोदर वेळी असे घडले तर मात्र मोठा गोंधळ उडतो.

१७५० ते १८५० चा काळ

मुंबईत सरासरीइतका पाऊस पडला तर कोठे किती आणि किती काळ पाणी साचू शकते, याचा खोलवर विचार करू या. या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. मुंबईच्या सखल भागात पावसाचे पाणी साचणे समजण्याजोगे आहे. मात्र, आता मोठ्या लाटांच्या पातळीच्या वर असलेल्या क्षेत्रातही पाणी साचते. कारण येथे नदी नाल्याच्या पूर प्रवाहांना अडथळे निर्माण झाले आहेत, त्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला उशीर लागतो, प्रवाहाचे पाणी तुंबून राहते. मुंबईत भर टाकण्याची क्रिया १७५० ते १८५० या दरम्यान सुरू राहिली. या काळात परिपूर्ण पुलांऐवजी कॉज वे बांधले गेले. १८५० नंतर दुसरी प्रक्रिया सुरू झाली. त्या वेळी कॉज वे ऐवजी परीपूर्ण पूल लहान सहान नाल्यांवरही बांधायला सुरूवात झाली. यामुळे मुंबईत पाऊस पडल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्याला जास्त अडथळे निर्माण होऊ लागले.

मुंबईतील एकूण पावसाच्या प्रमाणात फारसे बदल झालेले नाहीत. मात्र, पावसाची तीव्रता वाढते आहे असे दिसते. कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढण्याकडे कल आहे. त्यामुळे थोड्या वेळात जास्त पाण्याचा निचरा व्हावा लागतो. त्यासाठी पूर्वी पुलाच्या तीन कमानी पुरत होत्या, तर आता पाच कमानींची आवश्यकता भासते. याचा परिणाम म्हणून बोरीवली येथे अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले दिसते, कारण तेथे पाण्याचा निचरा होण्याची क्षमता कमी पडते.

नागरिकरणाची भर

आता त्यात भर पडली आहे ती नागरिकरणाची! त्याचबरोबर भरपूर रस्ते झाले, मोठ्या प्रमाणात फरसबंदी झाली, जागोजागी आवारात फरशा टाकण्यात आल्या. त्यामुळे पाणी जिरणे हा प्रकार कमी होत गेला. ढोबळमानाने सांगायचे तर पूर्वी फारशी जमीन झाकलेली नव्हती. परिणामी जमिनीच्या केवळ १० टक्के क्षेत्रावरील पाणी जिरत नव्हते. आता हे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आहे. फोर्टसारख्या भागात तर तब्बल ९५ टक्के क्षेत्रावरील पाणी जिरत नाही. पूर्वी पावसांच्या दोन झडींमध्ये जमिनीत बऱ्यापैकी पाणी मुरायचे. आता ही क्रिया जवळजवळ बंदच झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे पडलेला सर्व पाऊस प्रवाहाच्या रूपात वाहतो. यामुळे पावसाचे पाणी जास्त काळ साठून राहू लागले आहे.

मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस पडतो हे सकृतदर्शनी पाहायला मिळते. मात्र, त्यात किती वाढ झाली आहे हे नेमकेपणाने सांगायला काही वर्षे लागतील. याचे कारण असे की मुंबईत पूर्वी दोनच ठिकाणी पर्जन्यमापके होते- एका कुलाबा वेधशाळेत आणि दुसरे सांताक्रुझ विमानतळावर. त्यामुळे मुंबईच्या विविध भागात पाऊस किती व कसा पडायचा याची दीर्घकालीन अशी पुरेशी आकडेवारी उपलब्ध नाही. मुंबईत २००५ साली महापूर अनुभवल्यानंतर आतापर्यंत ५४ ठिकाणी पर्जन्यमापके बसवण्यात आली. त्यांच्या आकडेवारीवरून नेमकेपणाने यापुढे भाष्य करता येईल. मात्र, असे निष्कर्ष काढण्यासाठी २५ - ३० वर्षांच्या आकडेवारीची आवश्यकता असते. त्यामुळे याचे स्पष्ट व संख्यात्मक उत्तर भविष्यात मिळेल. मात्र, निरीक्षणांवरून असे दिसते आहे की, पावसाची तीव्रता वाढते आहे. त्याचा नेमकेपणा मात्र आकडेवारी उपलब्ध झाल्यावर, सांख्यिकीय विज्ञानावर ताडून पाहावा लागेल.

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५१ वी गोष्ट.)

(दुसरा भाग उद्या)

 

- डॉ. माधवराव चितळे

[email protected]

(भवतालच्या दिवाळी २०१५ या विशेषांकातून...)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

2 Comments

Rita Khandekar

नेहमी प्रमाणे उत्तम व माहितीपूर्ण लेख

Bhavatal Reply

धन्यवाद.

Anand Chaubal

तज्ञ अभ्यास केलेल्या व्यक्तींच ऐकतं कोण...? धंद्यात व राजकारणात सगळेच गर्क असतात

Bhavatal Reply

हो, पण हे बदलले नाही तर मुंबईची अवस्था आणखी बिकट होईल. धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *


You may also like