Articles 
पिढ्यांपासून चारा टिकवणाऱ्या राखणरान परंपरेची गोष्ट!

पिढ्यांपासून चारा टिकवणाऱ्या राखणरान परंपरेची गोष्ट!

पिढ्यांपासून चारा टिकवणाऱ्या राखणरान परंपरेची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ४९)

 

अकोले तालुक्यातील महादेव कोळी हा आदिवासी समाज उत्तरेकडील पश्चिम घाटात राहणारा प्रमुख समाज आहे. किमान पाचशे वर्षापूर्वी महादेव कोळी सह्याद्रीत राहू लागले. दक्षिणेला भीमाशंकर-खंडाळा ते उत्तरेला त्र्यंबकेश्वर-डहाणूच्या हद्दीपर्यंत राहणारा कोळी समाज महादेव कोळी, या नावाने ओळखला जाऊ लागला. वन व शेती आधारित उपजीविका त्यांनी गरजेनुसार विकसित केली. सुरुवातीच्या काळात महादेव कोळी हे भटके पशुपालक असावेत. कर्नाटकातील कांदडी समाजाने डांगी ही गायीची जात उत्तरेत आणली. पुढे महादेव कोळी लोकांनी ती पाळण्यास सुरुवात केली. शेतीला उपयुक्त असणारा व डोंगरातील दऱ्याखोऱ्यात व अति पावसात टिकाव धरणारे डांगी गायी-बैल यांचे पालन या समाजाने केले व शेतीच्या जोडीला पशुपालन अशी एकात्मिक जीवनशैली त्यांनी स्वीकारली व एकेकाळी भटका असणारा हा समुदाय स्थिर राहून शेती करू लागला.

निसर्गाशी जैविक नाते

महादेव कोळी यांचे वन परीसंस्थेशी अनोखे नाते आहे. सह्याद्रीतील देवराई संवर्धनाची संस्कृती असो की खाजगी मालकीचे जंगल राखण्याची परंपरा. वाघाला देव मानून त्याचे पूजन करण्याची रीत या समाजाचे वैशिष्ट्य. एकूणच जंगलाला आपली आई मानून, वनश्रीचे शाश्वत व्यवस्थापन नव्हे, दोहन (Sustainable Harvesting) करण्याचे शहाणपण या समाजाने जपले आहे.

देवक (Totem) च्या रूपाने विविध उपयुक्त स्थानिक झाडे न वापरण्याची रूढी-परंपरा यांनी जपली आहे. त्यासाठी विविध प्रकारचे पारंपारिक नीती नियम गाव समाजाने तयार केले आहेत. त्यांचा प्रत्यक्ष जीवनात अंमल करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणून जगभरात असे आदिवासी समुदाय परिसंस्था जपणारे नव्हे, त्याचा एक भाग म्हणून जगणारे मानले जातात. त्यातून एक समृद्ध असा जैव-सांस्कृतिक वारसा त्यांनी निर्माण केला आहे.

डांगी संवर्धनाच्या निमित्ताने शोध  व बोध

डांगी पशुधनाच्या संवर्धनासाठी कृती संशोधनात्मक काम सुरु झाले. स्थानिक डांगी पालकांच्या आग्रहाने अकोले तालुक्यातील निवडक पंधरा गावे, की तेथील गोधन झपाट्याने कमी होत आहे, असे कार्यक्षेत्र निवडले. डांगी जनावरे जंगलात कोणत्या प्रकारचा चारा खातात. याविषयी लिखित माहिती शोधण्याचा प्रयत्न केला, पण फारच त्रोटक माहिती उपलब्ध झाली. त्यादृष्टीने रानातील चाऱ्याचा (Wild Fodder) शास्त्रीय अभ्यास करण्यास सुरुवात केली. निवडक ५ गावातील १० चराऊ कुरणे (चारण्याच्या जागा) निवडली. या गोष्टी समजावून घेण्यासाठी कळसुबाई व हरिश्चंद्रगड परिसरात भटकत होतो.

फोफसंडी या चाळीसगाव डांगाणातील खोल दरीत असलेल्या गावी डांगी पालक शेतकऱ्यांशी बोलत होतो. डांगी जनावरे पाळताना वर्षभर चाऱ्याचे नियोजन कसे होते, याविषयी श्री. बुधाजी वळे व इतर गावकऱ्यांशी गप्पा रंगल्या होत्या. सोबत नाशिक येथील वनस्पती वर्गीकरण विषयातील तज्ञ जुई पेठे होत्या. शिवारातला चारा संपला की आम्ही राखण रानातील गवत जनावरांना चारा म्हणून देतो. राखणरानाचा सर्वजण अधून मधून उच्चार करत होते. राखणरान म्हणजे काय हो? असा प्रश्न केल्यावर फोफसंडीकर आम्हाला गावा जवळचे राखणरान दाखवायला घेऊन गेले. ते रान दोन तीन एकराचे माळरान विविध प्रकारच्या गवताने गच्च भरलेले होते. नुकताच पाऊस उघडलेला होता. भाद्रपद महिना असावा. सध्या सात निवडक गावातील २६९ कुटुंबासोबत राखणरान या चारा व्यवस्थापन पद्धतीचे सर्वेक्षण सुरु आहे.

राखण रान संकल्पनेतील पैलू

फोफसंडीचे राखणरान समजून घेताना एक संवर्धन परंपरा नव्याने कळत होती. खोलवर चर्चा झाली व त्यातून राखणरान पद्धतीचे अनेक पैलू समोर आले. ते असे,

  • राखणरान ठेवण्याची परंपरा किमान ८० ते ९० वर्ष जुनी आहे. मागील चार पिढ्यापासून आम्ही ते राखून ठेवतो, अस अनेकांनी सांगितले.
  • राखीव रान हे खाजगी व सामूहिक असे दोन्ही प्रकारचे असते. यामध्ये किमान सहा ते सात प्रकारचे गवत आढळते.
  • हरळ (Cyanodon dactylon), बेर (Ischaemum tumidum), ढोकळ (Heteropogon sp.), काहंडळ (Themeda triandra), तुरडा (Paseudanthistria ), कोलव्हा (Setaria pumila) अशी नानाविध गवते राखण रानात उगवतात.
  • या रानात कोणीही गुरे चारत नाही. अगदी अपवादात्मक परिस्थितीत अति पाऊस झाला व गुरांना दूरवर नेणे शक्य नसेल तर दोन–तीन दिवस राखणरानात चारायला मुभा असते.
  • राखणरानातील गवत पक्व झाले त्याचे बी खाली पाडून मग गवत कापले जाते. पुढील वर्षासाठी गवत मिळावे, हा हेतू.
  • अकोले तालुक्यात ही परंपरा फक्त महादेव कोळी हाच समाज जपतो. ठाकर किंवा इतर वन रहिवाशी समाज ही परंपरा जपताना फारसे दिसत नाही. एखादा दुसरा अपवाद असेल कदाचित.
  • अकोले तालुक्याच्या शेजारी असलेल्या संगमनेर तालुक्यातील जवळे-बाळेश्वर रांगातील पिंपळगाव माथा परिसरात गुरव समाजाचे पशुपालक काही प्रमाणात राखण रान ठेवतात.
  • डांगी गोवंश पाळणाऱ्या शेतकऱ्याकडेच फक्त राखणरान ठेवण्याची परंपरा प्रामुख्याने दिसते.

वरील सर्व महत्वाच्या बाबी समजून घेतल्यावर आदिवासींच्या एका महत्वपूर्ण संवर्धन परंपरेचा शोध आम्हाला लागला. चाळीसगाव डांगणातील इतर गावात शोध मोहीम काढली. ही परंपरा सर्वत्र आढळली.

मान्यवरांच्या भेटी अभिप्राय

ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांची खास राखण रान या विषयी चर्चा करण्यासाठी भेट घेतली. त्यानाही हे सर्व नवीन होते. हिमाचल प्रदेशात भटके पशुपालक या प्रमाणे गवताळ कुरण राखतात, या संदर्भ त्यांनी सांगितला. पण सह्याद्रीत अशी परंपरा कधी ऐकली नव्हती. या विषयी सविस्तर अभ्यास करा व संशोधनात्मक निबंध लिहा, असे प्रोत्साहन त्यांनी दिले.

वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. सुनील लिमये यांना राखणरान या विषयी सांगितल्यावर, तेही प्रभावित झाले. प्रत्यक्ष भेटीस आले. फोफसंडीच्या ग्रामस्थांशी बोलले. भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रात अशी परंपरा रूढ करण्याचा निश्चय त्यांनी केला. राखण रान ही  परंपरा वन संवर्धनासाठी पोषक अशी संकल्पना आहे, असे मत श्री. लिमये यांनी व्यक्त केले.

ख्यातनाम सूक्ष्मजीवअभ्यासक डॉ. मिलिंद वाटवे यांनी फोपसंडी गावाला भेट दिली व राखण रान समजावून घेतले. जंगल व आदिवासी संबंधावर मूलगामी काम करणारे कोडाईकनाल येथील मधू रामनाथ (Tribal Botanist) व कीस्टोन फौन्डेशन, निलगिरी या संस्थेच्या प्रमुख स्नेहलता नाथ यांनी पण ही संकल्पना जाणून घेतली व  उत्तरेकडील पश्चिम घाटातील एक महत्वाची संवर्धन परंपरा आजही टिकून आहे, तिला भविष्यात प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत नोंदविले.

संवर्धनाला पूरक समाज

एवढी सविस्तर चर्चा यासाठी केली की, महादेव कोळी आदिवासी समाज डांगी जनावरांचे पालन करताना स्थानिक जंगल संपत्तीचे पण जतन करतो. जगभरातील पर्यावरणवादी पशुपालन हे जंगल परिसंस्थेला घातक आहे, अशी मांडणी करतात. प्रगत मानवाचा (Homosapien) इतिहास लिहिणाऱ्या युवाल हरारी असो की ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञ स्टीवन लीब्लान्क असो सर्वांनी उत्क्रांत होत असलेल्या मानवाला व त्यातील शेती करणाऱ्या व भटक्या पशुपालकांना निसर्गाची हत्यारा, खुनी (serial killer) असाच काळिमा फासला आहे. हे अर्धसत्य आहे. जो समाज निसर्गावर अवलंबून आहे, तो सरसकट विनाश कसा करील? आफ्रिकेतील केनिया-टांझानियातील मसाई समाजाचे पशुपालन हे कुरणांची परिसंस्था, जैवविविधता व वन्यजीवासाठी घातक ठरत नाही. राजस्थान मधील रायका हा पशुपालक समाज जोधपुर-कुम्भालगड परिसरात निसर्ग स्नेही असे पशुपालन करत आहे. आपल्या सह्याद्रीतील नव्हे चाळीसगाव डांगाणातील महादेव कोळी अशीच एक संवर्धन परंपरा जोपासत आहेत. राखणरानासारखे व्यवस्थापन कौशल्य वापरून वन व त्यातील कुरण यांचा ऱ्हास न होता शाश्वत पशुपालन शक्य आहे.

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४९ वी गोष्ट.)

 

- विजय सांबरे

[email protected]

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

9 Comments

एकनाथ राहाणे

हे सर्व मी जवळून पाहिले आहे. राजूर, ता.अकोले या ठिकाणी डांगी जनावरांचे प्रदर्शन प्रथम प्रदर्शन भरवण्यात आमचे गंगाधर दगडू राहाणे यांनीच पुढाकार घेतला होता. त्यांनी हा परिसर पायी तुडवला आहे. ते आता हयात नाहीत. माझ्याकडे एवढी चिकित्सक बुद्धी नाही. पण मी हे सर्व पाहिले आहे. ही अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.

Bhavatal Reply

धन्यवाद. गंगाधर राहाणे यांच्याबद्दल जाणून आनंद वाटला.

Sandip

फोफसंडी ला जाताना गुहा लागते त्या ठिकाणी पशुधनासाठी (मुठे पाटील) गवताची साठवण केलेली दिसते. छान माहिती!!

Bhavatal Reply

धन्यवाद.

Sanjay G. Auti

अत्यंत उपयुक्त माहिती आहे शाश्वत विकासाचे उत्कृष्ट उदाहरण

Bhavatal Reply

धन्यवाद सर.

Sunita Khare

नमस्कार, आपल्या गोष्टी मी नियमित वाचत असते. अतिशय उपयुक्त आणि रंजक माहिती मिकते. राखण रानाची ही माहिती फारच कमी लोकांना असावी.आदिवासींच्या या आणि अश्या अनेक परंपरा आहेत. निसर्गाचे अफाट ज्ञान त्यांच्याकडे आहे, ते आता हळूहळू लुप्त होत चालले आहे. ते जतन करण्यासाठी त्या पद्धती, परंपरा आसपासच्या गावातील लोकांनी आत्मसात करणे हा मार्ग उपयुक्त ठरेल असे वाटते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जंगल खात्यापर्यंत, सरकारपर्यंत ही माहिती सकारात्मक पद्धतीने पोहचवणे महत्वाचे वाटते. सुनीता खरेदी

Bhavatal Reply

आपण म्हटल्याप्रमाणे खूप मोठे ज्ञान व परंपरा आपल्याकडे आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही या गोष्टींमधून केला जातो. आपल्या संपर्कात जरूर शेअर करा. मनापासून आभार.

Archana Jagtap

Archana Jagtap

Archana Jagtap

Khup chan vegali mahiti

Bhavatal Reply

Thank you.

रोहीदास डगळे

खूप छान महत्त्वपूर्ण माहिती सामोर मांडली आहे यासाठी आपला हृदयस्पर्शी जिव्हाळ्याने कृतज्ञ आहे सदैव आणि पुढेही आशि माहिती जगासमोर मांडवी अशी सदिच्छा 🌱🌾🌳 परंतू यातील एक विषय मला उमजला नाहि. डांगी जनावर/गोवंश कानडी जातीने कर्नाटक येथून अनला याला काही पुरावा आहे की कसे असल्यास कळवा अशी विनंती 🙏🏾 "चाळीसगाव डांगाण" तेथील कोळी महादेव/डोंगर कोळी जमातीची बोली भाषा "डांगाणी" आणि त्या भागात गोवंश आहे त्याला"डांगी" म्हणतं

श्रीधर उत्तमराव घुगे

आपल्या माध्यमातून नवनवीन आणि उपयुक्त माहिती मिळत असते. अशीच माहिती मिळावी. खूप छान वाटत अश्या गोष्टी वाचून. मि अपल्या सर्व गोष्टी वाचतो

Bhavatal Reply

मनापासून धन्यवाद. आपल्या संपर्कातही शेअर करा.

Kiran Kadam

छान माहिती मिळाली. राखणरान ही पद्धती नव्याने समजली. यातून आपले आदिवासी लोक निसर्गा चे संवर्धन कसे करतात याची माहिती मिळाली. धन्यवाद

Bhavatal Reply

होय खरंच. या पद्धतींची ओळख करून देण्यासाठीच हा लेख प्रसिद्ध करण्यात आला. धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like