Articles 
मुंबईत २६ जुलैच्या महापुरातून  मार्ग काढणाऱ्या आई-मुलाची गोष्ट!

मुंबईत २६ जुलैच्या महापुरातून मार्ग काढणाऱ्या आई-मुलाची गोष्ट!

मुंबईत २६ जुलैच्या महापुरातून

मार्ग काढणाऱ्या आई-मुलाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ५०)

 

२६ जुलै २००५ चा दिवस पावसाळी दिवसांपैकीच एक असल्याप्रमाणे उजाडला. मुलाला पार्ले टिळक प्राथमिक शाळेत सोडून मला पुढे कलिना येथील मुंबई विद्यापीठामध्ये माझ्या एम.फिल.च्या लेक्चर्ससाठी जायचं असल्याने सकाळही धावपळीचीच होती. सगळ्यांचा नाश्ता, डबा तयार करून, घरातलं आवरून निघेपर्यंत रोजची घाई ही ठरलेलीच असे. तशीच ती त्या दिवशीही झालीच. बरं, शाळेची वेळ सकाळी ११ वाजताची, त्यात आम्ही राहायला कांदिवलीला, त्यामुळे किमान तास दीड तास आधीच निघावं लागे. कांदिवली ते विलेपार्ले या १६ किलोमीटरच्या अंतराला वाहनानेही साधारणतः २० ते २५ मिनिटं लागावी, पण वाहतूक कोंडीत हेच अंतर तासा दीड तासाइतके प्रसरण पावत असे.

हायवेवरून बसने गेल्यास गर्दीतल्या त्या चेंगराचेंगरीतून स्थिरावेपर्यंत गोरेगांव मागे पडलेले असे. जरा कुठे बसतो तेवढ्यात हनुमान रोडचा स्टॉपही येई. कांदिवलीहून रेल्वेने जायचं तरीही वेळ तितकाच लागत असूनही ऐन ऑफिस गर्दीच्या रेट्याला तोंड देत सफाईने त्यात शिरत मुसंडी मारावी लागे. आमच्या आठ वर्षांच्या लहानग्या समर्थने हे कौशल्य अगदी छान आत्मसात केलं होतं. जी गत लोकलमध्ये चढण्याची असे तिच कसरत विलेपार्ले येथे उतरण्यासाठीही करावी लागे. थोडक्यात काय, तर मार्ग कोणताही निवडा रेटारेटी, गर्दी, घुसमट याला मुंबईत जगताना पर्याय नाही.

वेळेआधीच पोहोचलो

२६ जुलैलाही आम्ही असेच आधी शाळेला निघालो. पाऊस फारसा नसल्यामुळे कोरडेठाक असेच शाळेपर्यंत पोहोचलो. अगदी पावणेअकराच्या सुमारास शाळेच्या गेटपाशी गेल्यानंतर मुलाच्या नि माझ्याही जिवात जीव आला. माझ्या लेक्चरची वेळ त्याहून थोडी उशिराने असल्याने आता मला घाई करावी लागणार नव्हती. समर्थ वर्गात जाईपर्यंत, शाळा सुरू होईपर्यंत मी तिथेच थांबत असे. २६ जुलैलाही मी त्याला शाळा सुरू होताना टाटा बायबाय केलं, त्याचा तो हसरा इवलासा चेहरा डोळ्यांत साठवत मी कलिनाला जायला निघाले.

इतक्या धावपळीनंतर आलेलं हे निवांतपण पटकन स्वीकारता येत नाही, तसं काहीसं झालं होतं. एक भला मोठ्ठा समाधानाचा श्वास भरून घेत माझ्या अभ्यासाच्यादिशेने निघाले. विलेपार्ले येथूनच ३१७ नंबरची बस पकडली, ही बस थेट कलिनाला विद्यापीठाच्या गेटसमोरच आपल्याला सोडते त्यामुळे फारशी दगदग होणं टळतं. अकरा वाजून गेले असल्याने आता बसलाही गर्दी तुलनेने कमीच होती. असलीच तर ती शाळकरी मुलं, कॉलेज विद्यार्थी यांचीच. बाहेर सुरू असलेल्या रिपरिप पावसात बसमध्ये चढताक्षणी विंडोसीट मिळाली, यासारखं मुंबईत सुख नाही. विद्यापीठात गेल्यानंतर आमची दुपारी दोनपर्यंत लेक्चर्स झाली आणि पुढला वेळ लायब्ररीमध्ये जरा अभ्यासासाठी घालवू म्हणून तिथे गेले. त्याआधी कलिना येथील विद्यापीठाच्या आवारामध्ये पावसातही कँटिनला जाऊन चहा घेऊन फ्रेश होत अभ्यासाला बसले.

समाजशास्त्र, संशोधन हे माझे आवडते विषय. त्या पेपरसंबंधी सरांनी सुचवलेली संदर्भ पुस्तकं घेऊन वाचणं, त्यातील टिपणं काढण्यासाठी लायब्ररीत गेले. तळमजल्यावरील लायब्ररीच्या खिडकीतून पावसाचा नाद ऐकत पुस्तकांमध्ये गुंतून जाताना बाहेर काय घडतंय याकडे अजिबातच लक्ष राहिलं नाही. टिपणं काढत असले तरीही समर्थकरिता लक्ष घड्याळाकडे असायचंच सदैव. बरं, कलिनापासून पार्ले टिळकची शाळा फार फार तर अर्ध्या तासाच्या अंतरावर. रिक्षाने दहा मिनिटं तर बसने वीस पंचवीस मिनिटांत पोहोचण्याचं हे ठिकाण. घड्याळात चार वाजलेले दिसताच मी लायब्ररीतला माझा पसारा आवरता घेतला आणि काउंटरवर पुस्तकं परत करत बाहेर आले आणि पहातच राहिले.

वातावरण काहीतरी वेगळंच...

विद्यापीठाच्या परिसरात अगदी शुकशुकाट दिसत होता. चिंब चिंब झालेली झाडं, पाण्याने न्हायलेला काळाकुट्ट स्वच्छ रस्ता, तोही अगदी निर्मनुष्य. अशा रस्त्याच्या डोक्यावर आपलं छत्रं धरून असणारा भिजलेला गुलमोहर. वातावरणात गुढ गारवा.. असं दृश्यं फार कमी वेळा पहायला मिळतं, त्यामुळे काही क्षण प्रसन्न वाटलं, पण त्याचवेळेस काहीतरी विचित्र घडत असल्याची जाणीवही स्पर्शून गेली. आणि वाटलं, नाही... आपल्याला आता भरभर शाळेत पोहोचायलाच हवं. शाळा सुटायच्याच वेळेपर्यंत आपण पोहोचायलाच हवं. विद्यापीठाच्या आवारात एरव्ही रिक्षा, बस दिसतात, त्या गायब होत्या. पावसात शेवटी विद्यापीठाच्या मुख्य दरवाजापर्यंत चालत आले तरीही यांपैकी कोणतेही वाहन दिसेना. त्याच वेळेस शंकेची पाल मनात चुकचुकली... एखाद- दुसरी रिक्षा दिसली तर दिसली, अशी अवस्था होती.

हे काहीतरी आक्रितच होतं माझ्यासाठी. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते आणि जीवाची घालमेल मात्र ठोक्यागणिक वाढत होती. शाळा सुटल्यानंतर मी गेटपाशी दिसले नाही तर समर्थ शाळेच्या आवाराबाहेरही पडत नाही, ही खात्री होती. तसंच त्याला सांगूनही ठेवलं होतं. शिवाय, त्याच्या वर्गमित्रांच्या आयांशीही चांगली ओळख असल्याने मी येईपर्यंत त्या त्याची काळजी नक्की घेतील, याबद्दलही शंका नव्हती. तरीही आईचं मन काही स्वस्थ बसू देत नव्हतं.

उभा-आडवा कोसळणारा पाऊस

सतत पडणाऱ्या पावसाची लक्षणं काही बरी दिसत नव्हती. तो उभा-आडवा कोसळत होता. या विचित्र पावसात छत्रीचा निभाव लागणं कठीणच होतं, त्यात सुटलेला गार वारा भरच घालत होता. मी पूर्णपणे भिजले होते. त्याचवेळेस एक रिक्षा मोठ्या मुश्कीलीने मिळाली. रिक्षात बसताच त्या रिक्षावाल्याकडेच चौकशीला सुरूवात केली, तेव्हा तो म्हणाला, ‘मॅडम, पहिल्यांदा इथून बाहेर पडूया. कारण आता कोणत्याही क्षणी पाणी इथपर्यंत येईल’. मी घाबरलेच, ‘पूर आलायं की काय?’, असे विचारले त्यावर तो `हो’ म्हणाला.

मुंबईत आणि पूर? असा प्रश्न मनात येईपर्यंत रिक्षावालाच उत्तर देऊ मोकळा झाला होता, घाबरलेल्या अवस्थेत तो म्हणाला, “मिठी नाल्याला पूर आलाय. आजूबाजूच्या झोपडपट्टीत आणि इमारतींमध्ये पाणी घुसलंय. वांद्र्याची मोठी गव्हर्नमेंट कॉलनी पाण्याखाली गेलीय. तळमजला सोडून लोक वरच्या मजल्यावर गेले आहेत. आता पाणी वरच्या मजल्यापर्यंत चढतंय. कालिनाला तर एअरपोर्ट कॉलनी पूर्ण पाण्याखाली गेलीय. तळमजला, पहिला मजला सोडून पाणी दुसऱया मजल्यापर्यंत जातंय, असं कळलं... म्हणून तर आता मिलिटरीच्या दिशेने रिक्षा न काढता हयातवरून काढून आपण बाहेर सटकतोय. नाही तर माझ्या रिक्षाची होडी व्हायची. आणि ते मला परवडणारं नाही”.

आजच्या दिवसाचा अपवाद

त्याने सांगितलेली माहिती एकापाठोपाठ एक करत माझ्या कानावर अक्षरशः आदळत होती. माझा जन्म मुंबईतला आणि त्यानंतरची ही ३५ वर्षेही मुंबईच घालवलेली. तुफान पाऊसही पाहिला. आज ऐकत होते ते सारेच भयानक होते. माझ्या डोळ्यासमोर समर्थ होता, त्याची अवस्था काय असेल. शाळेभोवतीही असेच पाणी असेल का, मी कशी पोहोचणार त्याच्या पर्यंत असे अनेक प्रश्न मनात होते. भीती काहीशी वाढत होती. हायवेवरदेखील पाणी केव्हाही रिक्षात शिरेल, अशीच अवस्था होती. या पश्चिम द्रुतगती महामार्गावर एवढे पाणी कधीच पाहिलेले नव्हते. किंबहुना पाऊस कितीही झाला तरी महामार्गावर पाणी राहात नाही, असाच आजवरचा अनुभव होता. २६ जुलै २००५ मात्र हा दिवस याला अपवाद ठरला.

हायवेवर अनेक लोक चालतच निघालेले दिसले. रिक्षा, कार पाणी इंजिनात शिरल्याने वाटेतच बंद पडलेल्या होत्या. शाळेजवळ जाईपर्यंत मुंबईत तुफान पाऊस झालाय, जणू ढगफुटीच, याची बातमी थडकली आणि काळजात चर्र झालं. सगळीकडे पाणीच पाणी झालंय. वस्त्यांमध्ये पाणी शिरून त्याने होत्याचं नव्हतं केलंय. रस्ते पाण्याखाली, रेल्वेरूळ पाण्याखाली, प्लॅटफॉर्मच्या उंचीइतकं पाणी साचलंय. सगळं काही जलमय झालंय. पिल्लाच्या काळजीने माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.

आ वासलेली उघडी गटारे

समर्थ नजरेस पडत नाही तोवर काही खरं नव्हतं माझं. कलिनाहून हायवेने शाळेपाशी येण्याच्या वाटेवर चांगलं गुडघाभर पाणी होतं. गटारं भरून वहात होती. अनेक ठिकाणी पाण्याचेचे भोवरे झाले होते. रस्त्यांवरची पालिकेची उघडी गटारं वासून गिळायला तयार होती. काही समाजहितैषी मंडळींनी अशा उघड्या गटारांच्या तोंडी झाडांच्या मोठ्याला फांद्या कोंबलेल्या होत्या. पण त्याही किती काळ तग धरू शकतील, याबाबत शंकाच वाटावी असा पाण्याला वेग होता. सगळी परिस्थितीच भयावह होती. तशातही रिक्षा शाळेपर्यंत पोहोचली. रिक्षावाल्याचे आभार मानत त्याला त्याच्या घरी ‘सुखरूप जा रे बाबा’, असं सांगत मी शाळेत पळाले. समर्थला पाहीपर्यंत चैन पडणार नव्हतंच.

पावसाचा एकूणच रागरंग त्यामुळे उडालेली दैना पाहूनच शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना लवकर न सोडण्याचा निर्णय घेतलेला होता. प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आल्याशिवाय, त्यांना त्यांच्याहाती सोपविल्याशिवाय शाळेतला एकही शिक्षक, कर्मचारी इतकंच काय मुख्याध्यापिकाही शाळा सोडून जाणार नव्हत्या, हे ऐकून मनाला किती आश्वस्त वाटलं असेल, हे शब्दांत नाही सांगता येणार. समर्थच्या वर्गमित्रांच्या आयाही त्यांच्या मुलांना घेऊन माझीच वाट पहात आवारातच थांबलेल्या होत्या. अजून काहीवेळ मी आले नसते तर कोणाच्या घरी समर्थला न्यायचं आणि तसा निरोप मला द्यायचा हे त्या ठरवत होत्या. मला मनापासून त्या साऱ्यांच्याच वागण्याचं खूप कौतुक वाटलं आणि भरूनही आलं. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून मदतीचा असा हात देणाऱ्या त्या साऱ्याचजणी मला माझ्या जीवाभावाच्या सख्या वाटल्या.

शाळेतून घराकडे

तसं पाहिलं तर आमची ओळख उणीपुरी दोन तीन वर्षांचीच. तेही शाळेत मुलांना नेता आणताना जितकं जमेल तितकंच आमचं बोलणं होत असे, तरीही त्यांची ही आत्मियता क्षणात खूप काही देऊन गेली. शाळेबाहेरही पाण्याचे लोटच वहात होते. मुलांना मात्र मोठी गंमत वाटत होती. त्या निरागस मनांना पावसाने घातलेल्या थैमानाची कसलीच भीती शिवलेली नव्हती. त्यामुळे कमरेपर्यंत साचलेल्या पाण्यातून चालताना त्यांचा दंगा, खेळ सुरू होतं. पार्ल्यात ही परिस्थिती तर पुढे काय वाढून ठेवलं असेल, याच्या नुसत्या कल्पनेनेचं भीतीचा काटा अंगावर आला.

लोकल बंदच पडल्याने तो घरी परतायचा मार्ग खुंटलाच होता. आता हायवेने घरी जाणे, हाच काय तो सुरक्षित पर्याय समोर दिसत होता. दुपारच्या डब्यानंतर समर्थला भूक नक्कीच लागलेली असणार, शिवाय घरी पोहोचायला किती वाजताहेत कोण जाणे, असा विचार करून त्याला हनुमान रोडच्या कोपऱ्यावरील एका हॉटेलात खाऊ घातले. त्या हॉटेलात आणि अन्यत्रही आमच्यासारखाच विचार करून पायी निघणाऱ्यांची तोबा गर्दी होती. मिळेल ते पोटात ढकलून आणि सोबत काहीबाही घेत मंडळी हायवेच्यादिशेने निघत होती. पोटभरीचा कार्यक्रम होईपर्यंत सव्वा पाच होऊन गेले होते.

आपल्याच दोन पायांची गाडी

पाऊस सुरूच होता. रेनकोट अंगावर चढवलेला समर्थ, त्याची स्कूलबॅग घेऊन छत्री सांभाळत पाण्यातून वाट काढत आम्ही हायवेला आलो. बघतो तर काय माणसांचे लोंढे कदमताल करीत घराच्या दिशेने निघालेले. पावसाच्या माऱ्यातून वाचलेल्या गाड्या धिम्या गतीने रस्त्यांवरून चालत होत्या. बसेस तर नव्हत्याच. रिक्षांचं तर कंबरडंच पावसाने मोडून टाकलेलं. अशा परिस्थितीत आम्हांला वाहन मिळणं हे केवळ अशक्य दिसत होतं. इतक्यात, समर्थच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नेणारी छोटी व्हॅन अंधेरीच्या दिशेने निघताना दिसली. त्यांना हात दाखवून थांबवलं तर ते विद्यार्थ्यांना जोगेश्वरीपर्यंत सोडून घरी जाणार असल्याचं समजलं. आम्ही त्या गाडीमध्ये लिफ्ट मागणार तर ती त्याआधीच पूर्ण भरलेली होती. आमची निराशा झाली आणि मग अकरा नंबरच्या बसशिवाय अर्थात चालत निघण्याखेरीज इलाज राहिलेला नव्हता.

२००५ चं शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत सुदैवाने गुंदवलीचा उड्डाणपूल तयार झालेला होता. जोगेश्वरीहून निघालं की थेट विलेपार्ले आणि पुढे विनाथांबा जाण्याची चांगली वाहतूक सोय झालेली होती. शक्यतोवर उड्डाणपूलांचाच वापर करत चालायचं मी ठरवलं. खालच्या रस्त्याला पाण्याची स्थिती भीषण म्हणावी, अशीच असल्याने हेच योग्य होतं. एरव्ही रिक्षा, गाडी, बसने पाच मिनिटांच्या याच पुलावरून चालत जोगेश्वरीपर्यंत जायला त्यादिवशी आम्हांला पाऊणतास लागला.

पावसाचा मारा चुकवत, आमच्यासारख्याच सहप्रवाशांच्या जोडीने कधी आगे मागे चालत हे अंतर आम्ही कापत होतो. कानांवर तोवर आजूबाजूच्या लोकांकडून पावसाचे प्रताप ऐकू येत होते आणि काळजी वाढतच होती. पूलावरून चालताना आम्ही मध्येच थांबत खालच्या रस्त्याकडे वरून डोकावून पहात होतो. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे अनेकांनी आपापल्या गाड्या आहे त्याचजागी सोडून जाणं पत्करलं होतं. कित्येक कार, रिक्षा पाण्याखाली गेलेल्या दिसत होत्या. (दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांतून या भयानक पावसाच्या अनेक वास्तव करूण घटना सचित्र प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात विलेपार्ले येथे पावसाच्या भितीने आपल्या गाडीतच आसरा घेतलेल्या चौघांचा याच पावसाच्या पाण्याने कारचे दरवाजे लॉक झाल्याने कसा घास घेतला होता. हे आणि यासारख्या घटना वाचताना त्याच वाटेवरून आलेल्या माझ्यासारख्या अनेकांच्या मनात भीती किती दाटली असेल, याची कल्पनाच केलेली बरी.)

असहायता आणि मदतीचे हात

इमारतींच्या खिडक्यांतून, गच्चीतून बरीच डोकी हे सारी भीषणता असहाय्यपणे पहात होती. पाण्यात अडकलेल्यांना काही मुलांचे, प्रौढांचे गट मदत करण्यात गुंतलेले होते. पावसाचा जोर मध्येच कमीजास्त होत या सगळ्या भीतीदायक वातावरणात भरच घालत होता. पुलावरही परिस्थिती तुलनेने बरी होती. पुलाच्या दोन्ही बाजूंना उतरण असल्याने तिथून पुलावरील पाण्याचे लोट वेगात खालच्या दिशेने वहात होते आणि त्यांच्या त्या वेगामुळे चालणाऱ्यांच्या वेगालाही मर्यादा येत होत्या. प्रत्येकजणच जीव मुठीत घेऊन घराच्या ओढीने पावलं टाकत होता.

आठ वर्षांच्या समर्थला इतकं चालण्याची कधीच सवय नव्हती. तरीही विनातक्रार तो माझ्यासोबत चालत होता. मध्येच मी त्याला कडेवर उचलून घेत काहीवेळ त्याच्या छोट्या पावलांना आराम मिळावा, याची काळजी घेत होते. कांदिवली ते विलेपार्ले हे अंतर तसं पाहता १६ – १७ किलोमीटर इतकंच. परंतु २६ जुलै रोजी हेच अंतर पायी चालायला आम्हांला तब्बल चार तासांहून अधिक काळ लागला. याच काळात हायवेला एम.एम.आर.डी.ए.ने अनेक ठिकाणी उड्डाणपूलांची कामं हाती घेतलेली असल्याने ठिकठिकाणी खड्डे, वाहतूक कोंडी, अपघात हे नित्याचंच झालं होतं. मजल दरमजल करीत आम्ही जोगेश्वरीपर्यंत पोहोचलो.

पावसाच्या हाहाःकाराच्या खुणा

इस्माईल युसुफ कॉलेजचा परिसर आणि दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी गुंफांच्या दिशेची वस्ती इथेही तुफानी पावसाच्या हाहाःकाराच्या खुणा दिसत होत्या. असं असूनही अनेकजण स्वयंस्फूर्तीने पायी निघालेल्यांची काळजी वाहताना दिसत होती. बिस्किटांचे पुडे, पाण्याच्या बाटल्या असं घेऊन ही तरूण मंडळी मदतीला तत्पर होती. याठिकाणी काही वेळ आम्ही थांबत घोटभर पाणी पित पुन्हा चालायला सुरूवात केली. इथे पोहोचेपर्यंतच सात वाजत आलेले होते. पावसाने आधीच केलेल्या अंधाराला आता रात्रीचाही हातभार लागणार होता. अजून घर खूप लांब होतं. म्हटलं तर सारेच अनोळखी, म्हटलं तर सारेच एकाच अनुभवातून जाणारे. मदतीचा हात मागायचा तरी कुणी कुणाकडे... सारंच विचित्र, अवघड झालं होतं.

‘काही मदत करू का?’

गोरेगांवच्यादिशेने जाणारा एक बाईकस्वार जोगेश्वरीपुढील पुलावर दिसला. चालणाऱ्यांच्या कंपूत तोच काय तो एक वेगळा. त्याने आपणहून आमच्याजवळ गाडी आणून उभी करत ‘काही मदत करू का’, अशी विचारणा केली. त्याला काय उत्तर द्यावं, ते मला कळेचना. इतक्यात तोच म्हणाला, ‘तुम्ही मुलाला घेऊन बसता का मागे?, मी गोरेगांवपर्यंत जातो आहे; तिथे सोडतो तुम्हांला! तुम्हांला कुठे जायचंय?’ त्याच्या प्रस्तावाला ‘हो’ म्हणावं, तर तेवढाच चालण्यातून आराम असा स्वार्थी विचार मनाला स्पर्शून गेला. मीही ‘हो’ म्हटलं. परंतु प्रत्यक्षात मात्र आम्हां दोघांना आमच्या जाम्यानिम्यासह बाईकवर बसवणं हे अशा पावसात अशक्य आहे, हे काही अंतर गेल्यानंतर त्याच्याच लक्षात आलं. त्याने ती असमर्थता व्यक्त करून दाखवली, त्यात तथ्यही होतंच.

मी त्याचे आभार मानले आणि आम्ही पुन्हा चालायला सुरूवात केली. इतक्यात, तोच म्हणाला, की “मी तुमच्या मुलाला घेऊन पुढे जाऊन थांबतो. तुम्ही या!” खरंतर त्याचा हेतू अतिशय स्वच्छ, प्रामाणिक होता. पण शेवटी माणसाचं मनच वाईट असतं. नको नको ते विचार आधी तुमच्या मनाचा ताबा घेतात, तसंच माझंही झालं. त्यात आपलं मुल असं कुणा अनोळखी माणसाच्या हाती तेही अशा बेभरवशाच्या परिस्थितीत द्यायचं??... अजिबात नाही. त्यालाही माझी घालमेल समजली असावी बहुधा. त्यानेच त्यावर उपायही सुचवला. “मी त्याला बाईकवर घेतल्यामुळे तुमच्याही चालण्याला वेग येईल. नाहीतर त्याच्या चालीने तुम्हांला घरी पोहोचायला अजून उशीर होईल. त्याला गाडीवर घेतल्यानंतर मी तुमच्या नजरेच्या टप्प्यातच राहतो. म्हणजे मग तुम्हांलाही काळजी वाटणार नाही आणि तुमचं चालणंही वेगात होईल”.

त्याचं म्हणणं मला पटलं आणि समर्थला त्याच्या गाडीवर बसवून मी चालू लागले. त्यानेही त्याचं म्हणणं पाळलं, माझ्या नजरेच्या टप्प्यात तो राहिला. मी दिसले नाही तर मध्येच थांबलाही. असं करत आम्ही गोरेगांव गाठताना पावणेआठ वाजले. त्या भल्या माणसाचे किती आभार मानू आणि किती नको, असं झालं होतं मला. अशा प्रसंगांतून दिसून आलेल्या या माणूसकीमुळेच जगण्याला बळ मिळतं, इतकंच नव्हे तर जगण्यातील मुल्यांवरचा विश्वासही दृढ होतो.

तो अंधार

अंधार आता अजगरासारखा गिळू पहात होता. अनेक इमारतींच्या, झोपपट्ट्यांच्या मीटर्समध्ये पाणी गेल्याने शॉर्टसर्किट झालेलं होतं. अधिक कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये याकरिता उपनगर वीज कंपनीनेच (बीएसईएस) संपूर्ण मुंबई उपनगराचा वीजपुरवठा खंडित केला होता. अशा गुडूप अंधारात आम्ही नि आमच्यासारखे वसई, विरार, पालघर अशा दूरदूर राहणाऱ्यांची पावलं अंतर कापत होती. साडेआठ वाजेपर्यंत आम्ही एकदाचे आमच्या परिसरात येऊन दाखल झालो. एकदम सुरक्षित वाटायला लागलं. इतकं चालून आलो आहोत, आता काय घरी पटकन पोहोचूच, असं वाटल्याने पावलं थोडी भराभर टाकायला सुरूवात केली.

समर्थ दमला होता. त्याला धीर देत देतच मध्येच कडेवर उचलून घेत ही वाट तुडवली होती. आमच्या घराजवळील रस्त्याला वळलो मात्र तिथल्या पाण्याचा विस्तार, लोट पाहूनच आता काही खरं नाही, याची जाणीव झाली. हाकेच्या अंतरावरील आमचं घरही गाठू की नाही, याची शाश्वती देता येणं कठीण अशी स्थिती त्या रस्त्यावर झालेली होती. याचं कारण म्हणजे, आमच्या इमारतीच्या पुढे साठ फुटांवरूनच पोयसर नदी वाहते. (लोकांना मात्र हा नालाच वाटतो. २६ जुलै पूर्वी आम्ही हा नाला नव्हे तर ही नदी आहे, असं लोकांना सांगत असू. त्यावेळी आम्हांलाच वेड्यात काढले जायचे. मात्र २६ जुलैच्या हाहाःकारानंतर मुंबईकरांना मीठी, पोयसर, दहिसर व ओशिवरा या नद्या असल्याचा साक्षात्कार झाला.)

पोयसरचे रौद्र रूप

त्या नदीचं पात्र रूंद असलं तरीही त्याची भीती अशी कधी जाणवलीच नाही. उलट, त्यात नित्यनेमाने लोक टाकत असलेल्या कचऱ्यामुळे ती गलिच्छच अधिक दिसत होती. ह्याच पोयसर नदीचं पात्र २६ जुलैच्या पावसाने होत्याचं नव्हतं करत त्यातील सांडपाण्याने थेट आमच्या संकुलात शिरकाव करत थैमान घातलं होतं. पावसाचा जोर आता काहीसा ओसरला असला तरीदेखील इमारतीपासूनच्या काही अंतरावरील शाळेनजिकचा एक नाला आणि पोयसर नदीजवळील आमची इमारत यांतील पाण्याची ही भिंत कापून जाणं अतिशय गरजेचं होतं.

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींमधील रहिवासी घरांतूनच आमच्यासारख्यांना वाट दिसावी म्हणून बॅटरींच्या उजेडात साह्य करीत होते. या भागात साधारणतः माझ्या छातीपर्यंत (माझी उंची ५.४) पाणी साचलेले होते. या पाण्यातून समर्थ चालणं अशक्यच होतं. इथवर चालत येईपर्यंत आम्ही पूर्णच भिजलेलो असल्याने भिजण्याचंही काही वाटेनासं झालं होतं. समोरची परिस्थिती बिकटच होती. समर्थचं दप्तर पाठीशी मारून छत्री मिटत मी त्याला माझ्या खांद्यावर घेतलं आणि त्या साचलेल्या घाणीच्या पाण्यातून चालू लागले. इतक्या पाण्यातूनही एखादा मोठा ट्रक, टेम्पो गेलाच तर या साचलेल्या पाण्यातही लाटा उठत होत्या आणि त्या थेट तोंडापर्यंत येऊन आदळत होत्या. इतकी किळस आयुष्यात कशाचीही वाटली नसेल, ती त्यावेळी आणि नंतरही आठवून वाटत राहिलीय.

आणखीनच वेगळं दृष्य

वेगाने येणाऱ्या या पाण्याला मागे रेटत पुढे जाताना पाय अक्षरशः भरून आले होते. आता चालणं पुरे, अशी केविलवाणी स्थिती होती. पण हे सारं इथेच संपणारं नव्हतं. या दोन दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवाहांच्यामधून चालत इमारत गाठणं हे दिव्यही आम्ही पार पाडलं. इमारतीच्या आवारात शिरल्यानंतर तिथे तर आणखीनच वेगळं दृष्य पाहायला मिळालं. तळमजल्यावरील घराच्या अर्ध्या भागात पाणी घुसलं होतं. जमिनीलगत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरूनही नाल्यांतून आलेलं हे सांडपाणी वाहात होतं. अनेकांच्या चीजवस्तूंची अपरिमीत हानी झालेली होती. इमारतीमध्ये शिरल्यानंतर पोहोचल्याचं हायसं वाटलं तरीही आता सहा मजले चढून गेल्यानंतर घर येणार होतं. हत्ती गेला नि शेपूट राहिलं, तसं काहीसं हे होतं. घरापर्यंत नीट पोहोचल्याचं समाधान होतं, तरीही पुढे आणखी दिव्यांना सामोरं जावं लागणार आहे, हेही ठाऊक होतं. वीज नव्हतीच त्यामुळे अंधाराला सरावलेले आमचे डोळे घरात आल्यानंतर लकाकले.

घरात येताच आधी पाणी तापवून त्यात मीठ घालून समर्थला पाय शेकवायला बसवलं. छोट्याशा त्या जीवाने कसलीच तक्रार न करता माझी साथ केली होती. पटकन काहीतरी गरम जेवण करून त्याला खाऊ घातलं नि तो झोपलाही. आता पुढचे काही दिवस कसोटी होती ती वीज आणि पाण्याची.

पुढची आव्हानं

पावसाने सगळ्यांचं सगळंच धुवून नेल्याने घरात असलेल्या सामानावरच आता साधारण पुढचे चार पाच दिवस निभावून न्यावे लागणार होते. पाण्याच्या टाकीतही सांडपाणी गेल्याने इमारतीच्या गच्चीवरील टाकीतील पाण्यावरच काही दिवस तहान भागवावी लागणार होती. शिवाय पाण्याच्या टाक्या धुवून, त्यांचं निर्जंतुकीकरण केल्यानंतरही किमान महिनाभर तरी आरोग्याची काळजी घेणंही क्रमप्राप्तच होतं. जी अवस्था पाण्याची तिच अन्नपदार्थांचीही. हे झालं घरातलं. घराबाहेरचं चित्र तर आणखीनच शहारा आणणारं होतं. जागोजागी वाहून आलेल्या वस्तूंचे ढिगारे, प्लास्टिकच्या पिशव्यांचे थर, चिखल, पाण्याने वाहून आणलेली घाण... यांचंच साम्राज्य. या सगळ्याची स्वच्छता व्हायलाच साधारणपणे आठवडा लागला.

२६ जुलै २००५ चा दिवस नेहमीच्या पावसाळी दिवसांपैकी एक म्हणून उजाडला खरा परंतु तो अनेकानेकांच्या आयुष्यात काळा पाऊस ठरला. कित्येकांचे लाखमोलाचे जीवलग गेले, कित्येकांची घरं उद्ध्वस्त झाली. मालमत्तेचं नुकसान तर मोजदादी पलिकडचं होतं. सगळं काही धुवून नेणारा, दुःखाच्या – वेदनेच्या जखमा देत दरवर्षीच्या पावसात त्याची आठवण करून देत धडकी भरवणारा असा हा काळा पाऊस!

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५० वी गोष्ट.)

 

- अनुराधा परब

[email protected]

(भवताल च्या दिवाळी विशेषांक २०१५ मधून...)

फोटो सौजन्य :

1. weather.com

2. pixahive.com (Ronie)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

4 Comments

Gayatri Gumaste

A very heart touching article

Bhavatal Reply

Yes, thank you.

Sangeeta Joshi

वर्णन केलेलं प्रत्येक दृष्य डोळ्यासमोर उभं राहीलं आणि अंगावर काटा आला! प्रश्न एकच पडतोय, ह्या सगळ्यातुन आपण आणि प्रशासन काय शिकलोय. सतरा वर्षांनी परिस्थीती अजुनच गंभीर झाली आहे.

Bhavatal Reply

रास्त मुद्दा मांडलाय. आपण काय शिकलो हा प्रश्नच आहे. कदाचित पुढच्या आपत्तीपर्यंत आपण असेच दुर्लक्ष करू. धन्यवाद.

M N Damle

26जुलै 2005 च्या अनेक दर्दभर्या गोष्टी ऐकल्या आहेत ,त्यातील ही एक .मन हेलावून टाकणारी. वाईट एवढेच आहे की प्रशासन ,राजकारणी व काही अंशी नागरिक पण सुधारत नाहीत हे विदारक सत्य हेही खरं!

Bhavatal Reply

खरंय. धन्यवाद.

Anjali Mahajan

वाचताना डोळ्यात पाणी आले.

Bhavatal Reply

हो, असाच ही आठवण आहे. धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *


You may also like