Articles 
राजापूरच्या गंगेचे रहस्य काय?

राजापूरच्या गंगेचे रहस्य काय?

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गाव साधारणत: तीन वर्षांनी चर्चेत येते. कारण इथे अवतीर्ण होणारी गंगा. गावातील टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या तब्बल १४ टाक्या तीन वर्षांतून एकदा अचानकपणे पाण्याने ओसंडून वाहतात. या वाहत्या पाण्याला 'राजापूरची गंगा' म्हणतात. गंगेचे अकस्मात येणे-जाणे या निसर्गाच्या चमत्काराचे सर्वांनाच अप्रूप आहे. यंदा राजापूरच्या गंगेचे आगमन झाले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा या घटनेची चर्चा होत आहे. या घटनेमागील भूशास्त्रीय कारण नेमके काय आहे? 'भवताल रिसर्च टीम'ने या घटनेच्या मुळाशी जाऊन घेतलेला आढावा... 
...

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचे शहर आहे. शहरापासून सुमारे तीन-साडेतीन किलोमीटर अंतरावर एका उंच टेकडीवरती ‘उन्हाळे’ नावाचे गाव लागते. या गावात दर तीन वर्षांनी गंगा उगम पावते आणि साधारण तीन महिने राहते. सूर्य मीन राशीत असताना एप्रिल, मे या दरम्यान गंगा येते. मूळ गंगा एका वृक्षाच्या मुळाशी उगम पावून २० ते २५ पावलांवरील कुंडात वाहते. विशेष म्हणजे ‘उन्हाळे’ या गावी याच ठिकाणी बारमाही वाहणारे गरम पाण्याचे झरे देखील आहेत. यामुळे भूवैज्ञानिकांसाठी हा कायम संशोधनाचा विषय ठरला आहे. कोकणातील या वैशिष्ट्यपूर्ण भूगर्भ रचनेबाबत अभ्यासकांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत.  

 

राजापुरात गंगा अवतरते, म्हणजे नेमके काय होते?

राजापूरची गंगा ही अर्जुना नदीच्या नजीक तसेच उन्हाळे गावच्या गरम पाण्याच्या झऱ्याच्या प्रदेशात आहे. येथे अवतरणारे गंगेचे झरे ३,१५० चौरस यार्ड परिसरात आहेत. येथे मुख्य काशी कुंडासह दगडाने बांधलेली एकूण १४ कुंडे आहेत. सर्व कुंडातून पाणी वाहू लागले, की गंगा आली असे म्हटले जाते. मूळ गंगा उगमासमोर विविध आकाराची १२ कुंड आहेत. वरूण कुंड, हिमकुंड, वेदिका कुंड, नर्मदा कुंड, सरस्वती कुंड, गोदाकुंड, यमुना कुंड, कृष्णा कुंड, अग्नी कुंड, बाणकुंड, सूर्यकुंड व चंद्र कुंड अशी त्यांची नावे आहेत. या चौदाही कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे आहे. सूर्यकुंडातील पाणी उबदार तर चंद्र कुंडातील पाण्याचा स्पर्श वेगळा जाणवतो. येथील एक-दोन कुंडांमध्ये काही अंशी गंधकाचे प्रमाण आढळते. आश्चर्य म्हणजे ही सर्व कुंडे परस्परांपासून अवघ्या एक मीटर अंतरावर असली, तरी टाक्यांमधील पाण्याचे तापमान वेगळे आहे. 

राजापूरचा भूगर्भ जलस्तर कसा आहे?

रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर कॉलेजचे उपप्राचार्य आणि भूगोलाचे प्राध्यापक डॉ. सुरेंद ठाकूरदेसाई यांनी राजापूरच्या गंगेविषयी झालेल्या अभ्यासाविषयीची माहिती दिली. सह्याद्रीच्या बाजूला भूपृष्ठाखाली अधिक उंचावर एक भूमिगत जलसाठा आहे. पावसाळ्याच्या पाण्यासह भूगर्भातून पाझरणारे पाणी या पोकळीत साचत राहते. दोन-तीन पावसाळे खाऊन ही पोकळी पूर्ण भरते. ही पोकळी पाण्याने पूर्ण भरली, की अतिरिक्त पाणी गंगेच्या रूपाने बाहेर पडते. यालाच 'राजापूरची गंगा' असे म्हटले जाते. या पोकळीतील पाणी पूर्ण संपेपर्यंत ते वाहत राहते. ही पोकळी दरवर्षी भरत नसल्याने गंगेच्या अवतरण्याला निश्चित असा काळ नाही. अतिरिक्त पाणी गंगेच्या मुखापर्यंत भरण्याचा काळ कमी-जास्त होत असतो. हवेच्या दाबातील फरक, झिरपणाऱ्या पाण्याचा स्रोत यावर ते अवलंबून आहे. आपण शाळेत 'वासुदेवाचा प्याला' हा प्रयोग पाहिला आहे. प्याल्यात पाणी पूर्ण भरत नाही, तोपर्यंत नळीतून पाणी बाहेर पडत नाही. प्याला पूर्ण भरून पाणी नळीच्या वरच्या पातळीत आले की नळीतून पाणी वाहणे सुरू होते. त्यानंतर प्याल्यातील पाणी पूर्णपणे संपल्याशिवाय नळीतून वाहणारे पाणी थांबत नाही, हा तो प्रयोग आहे. हेच उदाहरण येथे लागू होते. 

गंगा अवतरणाचा कालावधी अनिश्चित 

गंगा साधारणपणे तीन ते साडेतीन वर्षांतून एकदा येते असे पूर्वीची आकडेवारी सांगते. याचाच अर्थ त्या भागातील पावसाचे प्रमाण पाहता भूमिगत जलसाठा पावसाच्या पाण्याने भरून वहायला साधारणपणे तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी लागत होता. मात्र, सध्या हा काळ अनियमित झाला आहे. वर्षातील बराच काळ गंगेचे पाणी वाहत असते. याचे कारण म्हणजे येथून वरच्या भागात असलेल्या अर्जुना नदीवर एक मोठा धरण प्रकल्प झाला आहे. या प्रकल्पात पाणी साठवायला सुरवात केली, तसतशी 'राजापूरची गंगा' ही वर्षाचा बराच काळ राहू लागली. धरणातील जलसाठा कायमस्वरूपी असल्यामुळे भूमिगत जलसाठ्यामध्ये पाण्याच्या पाझरण्याचे प्रमाण वाढले. परिणामी हा जलसाठा केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता, झिरपणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध झाल्याने कमी काळात भरतो आणि दरवर्षी गंगा येते. विशेष म्हणजे वर्षातील बराच काळ ती असते. गंगेचे पाणी भूगर्भातून येत असल्याने येथील प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगळे असते. येथे प्रस्तरभंग असल्याचा पुरावा म्हणजे येथून जवळच गरम पाण्याचा झरा आहे. यामुळे येथील कुंडातील पाण्याला गंधकाचा वास येतो. येथील प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे आहे, हा अनुभव आहे. मात्र, येथील पाण्याची त्यादृष्टिने तपासणी झालेली नाही, असे डॉ. सुरेंद ठाकूरदेसाई यांनी स्पष्ट केले. पूर्वी तीन ते साडेतीन वर्षांतून एकदाच गंगा येत असल्यामुळे गावाला जत्रेचे स्वरूप येत असे. अगदी पुण्या-मुंबईहून सहली येत असत. आता वर्षातील बराच काळ गंगा येत असल्याने तुलनेने गर्दी कमी झाली आहे.

भूवैज्ञानिक संदर्भ काय सांगतात?

भूवैज्ञानिक जयराज राजगुरू यांनी ही घटना घडण्यामागील भूशास्त्रीय कारण उलगडले. जमिनीखालून अचानकपणे पाणी वाहू लागते, यासाठी भूजलधारक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जमिनीखालील पोकळीत साठलेले अतिरिक्त पाणी भूजलधारक सोडून देतात. या पाण्याला संरचनात्मक अथवा भौगोलिक नियंत्रण नसेल तर हे पाणी वाहत एका ठराविक ठिकाणी येऊ शकते. पर्जन्यवृष्टी झाल्यावर भूजलाचे पुनर्भरण होते. हे पाणी जमिनीत झिरपून ते भूजलधारकापर्यंत पोहोचायला ठराविक वेळ लागतो. तो वेळ किती असेल, हे त्या जमिनीखाली कोणत्या प्रकारचे खडक आहेत, खडकाच्या थरास भेगा, फटी किती आहेत, यावर अवलंबून असते. खडकांमधील फटींमधून झिरपत हे पाणी भूजलधारकापर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ त्या भूजलधारकाच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असतो. भूजलधारक भरण्यासाठी त्याचा संपूर्ण वेळ घेतो. पूर्ण भरल्यानंतर तो पाणी सोडून देण्यास सुरवात करतो. हे सोडलेले पाणी ठराविक कुंड, विहिर, नदी किंवा प्रवाहापर्यंत ठराविक कालावधीनंतर येते. यालाच आपण 'गंगा अवतरली' असे म्हणतो. या घटनेची नेमकी वेळ आपण सांगू शकत नाही. गंगा अवतरण्यामागे हे सर्व नैसर्गिक घटक कारणीभूत आहेत.  


गंगा अवतरण्यास मानवनिर्मित घटक देखील कारणीभूत ठरू शकतात. मोकळ्या जमिनीवर बांधकाम झाले, शेती करण्यात आली किंवा विहिरी खोदल्या गेल्या, तर नैसर्गिरित्या जमिनीखालील पाण्याचे प्रवाह कार्यान्वित होतात. जमिनीच्या खाली फ्रॅक्चर असल्यास भूजलधारकामधील पाणी बाहेर येते. पाण्याचा दाब हा घटक देखील याला कारणीभूत ठरतो. राजापूर येथे गंगा अवतरते त्यावेळी कुंडातील पाण्याचे तापमान आणि आजूबाजूच्या पाण्याचे तापमान यामध्ये देखील फरक आढळतो. यामागे अनेक भौगोलिक घटक कार्यरत आहेत. याच ठिकाणी गरम पाण्याचे झरे कार्यरत आहेत. हे भूपृष्ठाखाली प्रस्तरभंग असल्याचे पुरावे मानले जातात. जमिनीतून बऱ्याच खालून पाणी वर येत असल्यामुळे ते गरम असते. शिवाय पाण्याचा दाब देखील लक्षणीय असतो. गरम पाण्याचे झरे हे गंधकयुक्त असतात. गंगेच्या ठिकाणी असलेल्या एक-दोन कुंडांमध्येच गंधकाचे काहीसे प्रमाण आढळते. 

- जयराज राजगुरू, भूवैज्ञानिक  

गंगेचे वेळापत्रक बदलले

निसर्गाचा चमत्कार मानली जाणारी राजापूरची गंगा नियमितपणे दर तीन वर्षांनी प्रकट होते, असा आजवरचा जाणकारांचा अनुभव आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निसर्गातील अन्य बदलांप्रमाणेच तिचेही वेळापत्रक बदलत आहे. २०११ मध्ये फेब्रुवारी महिन्यात गंगा प्रकट झाली. त्याच वर्षी जून महिन्यात गंगा आटली. त्यानंतर पुन्हा अवघ्या दहा महिन्यांतच म्हणजे एप्रिल २०१२ मध्ये गंगेचे पुनरागमन झाले. पण थोड्याच महिन्यांत गंगा आटली. २०१३ च्या मार्च महिन्यात ती पुन्हा प्रकटली. त्या वेळी मात्र येथील वास्तव्याचा नवा विक्रम प्रस्थापित करीत सप्टेंबर २०१४ पर्यंत ती प्रवाही राहिल्याची नोंद आढळते. नोव्हेंबर २०१८ या साली अवतरलेली गंगा शंभर दिवसांनंतर आटली आणि पुढील अवघ्या ५ महिन्यांत म्हणजेच एप्रिल २०१९ मध्ये पुन्हा अवतरली. यंदा मार्च महिन्यात गंगा अवतरली आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीनंतर गंगेचे पुनरागमन झाले आहे. गंगेचा अवतरण्याचा अनिश्चिच कालावधी पाहता, या घटनेची नेमकी वेळ आपण सांगू शकत नाही. यामागे नैसर्गिक घटक कारणीभूत आहेत, या विधानाला पुष्टी मिळते.  

ऐतिहासिक नोंदी काय सांगतात?

राजापूर येथील काशी कुंड पवित्र मानले जाते. वर्षभर गंगेचे पुजारी येथे नित्यनेमाने पूजा करतात. कोणत्याही धार्मिक ठिकाणी जुन्या नोंदी ठेवल्या जातात. त्यानुसार, शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याच्या नोंदी आहेत. १६६१ साली इंग्रजांची राजापूर येथील वखार लुटल्यावर शिवाजी महाराजांनी गंगास्नान केले होते. तसेच १६६४ मध्ये गागाभट्टांनी येथे घेतलेल्या ब्राह्मण सभेच्या वेळीही महाराज गंगास्नानाला आले होते, अशी नोंद आढळते. 

- भवताल रिसर्च टीम

(छायाचित्रे Kokan Search Engine, kokan katta वेबसाइटवरून साभार.)

1 Comments

किरण

छान माहिती

Your Comment

Required fields are marked *

You may also like