Articles 
चांद्रवारी हुकलेल्या महाराष्ट्रातील खनिजाची गोष्ट !

चांद्रवारी हुकलेल्या महाराष्ट्रातील खनिजाची गोष्ट !

चांद्रवारी हुकलेल्या

महाराष्ट्रातील खनिजाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी- ०१)

महाराष्ट्राचा काळा खडक अर्थात बेसॉल्ट हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा. बांधकामासाठी उत्तम असा हा खडक. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या पोकळ्यांमध्ये आढळणारी अतिशय आकर्षक खनिजे व त्यांचे स्फटिक. जगात मोजक्याच ठिकाणी या प्रकारचे सुंदर स्फटिक मिळतात. त्यांचे वेगवेगळे आकार आणि अनेक रंगछटा. त्यांची महती जगभर पसरली आहे. विशेषत: भूविज्ञानाचे परिचित आणि संग्रहकांमध्ये त्यांचे विशेष आकर्षण आहे.

यापैकी सर्वाधिक गाजलेले खनिज आहे अपोफिलाईट, विशेषत: पुण्यातील पाषाण या ठिकाणी मिळणारे त्याचे आकर्षक हिरव्या रंगाचे स्फटिक. त्याने जगभरातील अनेक संग्रहकांनी मोहिनी घातली आहे आणि ‘नॅचरल हिस्टरी म्युझियम्स’मध्ये महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. पुण्यातील प्रसिद्ध चतु:शृंगी देवीचे मंदिर डोंगरावर आहे. त्याच डोंगरात, मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर दगडाची खाण होती. तिथून १९५० सालापासून बांधकामसाठी दगड काढायला सुरुवात झाली. पुण्यातील प्रसिद्ध खनिज संग्राहक श्री. महंमद एफ. मक्की यांना या खाणीत हिरवा अपोफिलाईट मिळाला. या स्फटिकांचा रंग, रचना आणि सौंदर्य यामुळे तो थोड्याच काळात जगभर लोकप्रिय झाला. आणि पाषाणचे (व पुण्याचेसुद्धा) नाव जगभरातील भूविज्ञान संग्रहकांमध्ये चर्चेत आले. पाषाणच्या खाणीतून इतरही खनिजे मिळत होती, पण हिरवा अपोफिलाईट एकदम खास.

पाषाणचे हे स्फटिक जगभरातल्या ‘नॅचरल हिस्टरी म्युझियम’मध्ये पोहोचले, तसाच त्याचा प्रवास ‘नासा’च्या चांद्रवीरापर्यंत झाला. त्याचे असे झाले. श्री. महंमद मक्की यांचे बंधू श्री. मुजाहिद मक्की. ते १९७४ च्या सुमारास अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’मध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी प्रसिद्ध भूवैज्ञानिक व चांद्रवीर डॉ. हॅरिसन श्मिट यांची भेट घेतली. डॉ. श्मिट हे ख्यातनाम अमेरिकन भूवैज्ञानिक आहेत. त्यांनी एका मोहिमेंतर्गत चंद्रावर पाऊलही ठेवले आहे. श्री. मक्की यांनी पाषाणच्या खाणीत सापडलेला हिरव्या अपोफिलाईटचा एक नमुना डॉ. श्मिट यांना भेट दिला. त्यांना तो इतका आवडला की त्यांना सांगितले- हा नमुना पुढच्या चांद्रमोहिमेत चंद्रावर पाठवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन.

परंतु, चंद्रावर जाण्याचा खर्च पाहता, एकेक गॅमचा हिशेब केला जातो. त्यामुळे त्यांना हा नमुना चंद्रावर पाठवण्याची परवानगी मिळाली नाही... अशा प्रकारे आपल्या काळ्या खडकातील एका खनिजाची चांद्रवारी राहून गेली. मात्र, पृथ्वीवरच्या सर्वच महत्त्वाच्या ‘नॅचरल हिस्टरी म्युझियम’मध्ये हा स्फटिक दिमाखात स्थान टिकवून आहे.

- श्री. महंमद एफ. मक्की यांनी दिलेल्या माहितीनुसार

(शब्दांकन- भवताल टीम)

फोटो सौजन्य : Franco Lazzari (mindat.org)

#भवताल #भवतालाच्यागोष्टी #अपोफिलाईट #पोकळीतीलखनिजे #महंमदमक्की #एमएफमक्की #भूविज्ञान #Bhavatal #StoriesOfBhavatal #Apophyllite #CavityMinerals #MohammadMakki #MFMakki #Geology

1 Comments

Ujwal Walanju

Very useful information

Bhavatal Reply

Thank you so much.

Your Comment

Required fields are marked *

You may also like