Articles 
टॉनिक नावाच्या औषधाची गोष्ट !

टॉनिक नावाच्या औषधाची गोष्ट !

‘टॉनिक’ नावाच्या औषधाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ०२)

.

‘कोरोना’ अर्थात ‘कोविड १९’ वरील लस विकसित होण्यापूर्वी त्यावरील उतारा म्हणून ‘हायड्रॉक्झीक्लोरोक्वीन’ या औषधाची जगभर चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे, या औषधाचे ७० टक्के उत्पादन भारतात होते. भारताकडून हे औषध मिळावे यासाठी जगातील अनेक देश प्रयत्न करत आहेत, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर त्यासाठी दबावही टाकला... पण या ‘हायड्रॉक्झीक्लोरोक्वीन’चा भारताशी संबंध कसा? ते भारतात कसे पोहोचले? ही कथा अतिशय रंजक आहे. त्यात श्रीरंगपट्टनचा टिपू सुलतान, मलेरिया आजार, ब्रिटिश सैन्य, रेशनवर मिळणारी दारू आणि अशी अनेक पात्रं आहेत. त्याचीच ही रंजक कथा...

अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांनी जवळजवळ संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्थापित केली होती. शेवटची काही राज्ये उरली होती. त्यात अर्थातच मराठ्यांचे राज्य होते. याशिवाय दक्षिणेत श्रीरंगपट्टनचा टिपू सुलतान हासुद्धा ब्रिटिशांशी संघर्ष करत होता. मात्र, १७९९ साली ब्रिटिशांनी त्याचा पराभव केला आणि त्याचे संपूर्ण म्हैसूर राज्य ताब्यात घेतले. ब्रिटिशांसाठी हे मोठ यश होते. त्यामुळे ब्रिटिश सैन्य या विजयाचा आनंद साजरा करत होते, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण काही आठवड्यांमध्येच अनेक ब्रिटिश सैनिक, अधिकारी मलेरियामुळे आजारी पडू लागले. हे मलेरिया प्रकरण किती गंभीर आहे याचा अंदाज ब्रिटिशांना आला आणि त्यांनी त्यावर मात करण्याच्या हालचाली सुरू केल्या.

लष्करी तळ हलवण्याचा निर्णय

टिपू सुलतानची राजधानी श्रीरंगपट्टन. हा प्रदेश म्हणजे हा मोठ्या प्रमाणावर पाणथळींचा, दलदलीचा. स्वाभाविकपणे तिथे डासांचे प्रमाण जास्त होते. त्यांच्यामार्फत मलेरियाचा प्रसार होत असल्याने श्रीरंगपट्टन या ठिकाणी मलिरियाचे प्रमाण अधिक होते. स्थानिक भारतीयांमध्ये या डासांपासून पसरणाऱ्या आजारांना प्रतिकारक्षमता निर्माण झाली होतीच. शिवाय त्यांच्या आहारात तिखट, मसालेदार पदार्थ असल्यामुळेही त्यांना फायदा झाला होता. ब्रिटिश सैनिकांची परिस्थिती  मात्र विपरित होती. त्यांना या वातावरणाची सवय नव्हती आणि आजारावर प्रतिकारक्षमताही निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात या आजाराला बळी पडत होते. परिस्थिती खूपच चिघळत गेल्याने ब्रिटिशांनी तातडीने काही गोष्टी केल्या. त्यापैकी मोठा निर्णय म्हणजे त्यांनी त्यांचा लष्करी तळ श्रीरंगपट्टनवरून जवळच असलेल्या बेंगलोरला (आताचे बंगळुरू) हलवला, तिथे नव्या लष्करी छावणीची (कॅन्टोन्मेंट) स्थापना केली. बेंगलोरचे  हवामान तुलनेने थंड असल्याने ते ब्रिटिशांना मानवले. मात्र, तिथेसुद्धा डासांची समस्या होतीच. परिणामी, हवामान तुलनेने सुखावणारे असले तरी मलेरियाचा धोका मात्र कायम होता.

 

‘क्विनाईन’ची मात्रा

त्याच सुमारास युरोपमध्ये वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाची घडामोड घडली. खरे तर मलेरिया भारताप्रमाणे जगाच्या इतर भागातही होता. 

त्याला युरोपीय जनता मोठ्या प्रमाणात बळी पडत होती. त्यामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाय सुरू होतेच. त्यात १८२० साली दोन फ्रेंच शास्त्रज्ञांना यश आले. प्रियरी जोसेफ पेलेटियर आणि जोसेफ कॅवेन्टू अशी त्यांची नावे. त्यांनी ‘सिंकोना’ (cinchona) झाडाच्या सालीपासून “क्विनाईन” (Quinine) हे रासायनिक संयुग शोधून काढले. ते मलेरियावरील उपचारासाठी उपयुक्त ठरू शकणारे होते. मात्र, त्याची अद्याप मोठ्या प्रमाणावर चाचणी व्हायची होती. त्याच वेळेस ब्रिटिश सैन्याला भारतात ही समस्या भेडसावत होती. त्यामुळे ब्रिटिशांनी सैन्यावर ही चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घाऊक प्रमाणात क्विनाईन मागवून घेतले आणि ते सर्व सैन्यामध्ये वाटले. त्यांना ते नियमित घेण्यासही सांगितले. अगदी निरोगी सैनिकांनीही ते घेण्याबाबत बजावले. मलेरियाची समस्या संपूर्ण भारतभर असल्याने भारतातील सर्व ब्रिटिश सैन्याला त्याची सक्ती करण्यात आली. त्याला ‘टॉनिक वॉटर’ असे संबोधण्यात आले.

मलेरियावर ही मात्रा लागू पडली. अनेक आजारी सैनिक या औषधामुळे लगेचच बरेही झाले. तरीसुद्धा अनेक सैन्य मलेरियामुळे आजारी पडतच असल्याचे लक्षात आले. काही रुग्णांना त्याचा फायदा होत होता आणि काहींचा आजार बरा होत नव्हता. असे संबोधण्यात आले.

मलेरियावर ही मात्रा लागू पडली. अनेक आजारी सैनिक या औषधामुळे लगेचच बरेही झाले. तरीसुद्धा अनेक सैन्य मलेरियामुळे आजारी पडतच असल्याचे लक्षात आले. काही रुग्णांना त्याचा फायदा होत होता आणि काहींचा आजार बरा होत नव्हता. असे का? त्याचा शोध घेतल्यावर असे निदर्शनाला आले की अनेक सैनिक त्याची मात्रा घेतच नव्हते. कारण हे औषध अतिशय कडू होते. यातून मार्ग काढण्यासाठी नुसती सक्ती करून चालणार नाही, हे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ओळखले. मग ब्रिटिश अधिकारी आणि संशोधकांनी यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले. संशोधकांनी या औषधाचा कडवटपणा कमी करण्यासाठी काही प्रयोग करायला सुरूवात केली. त्यात त्यांना असे आढळले की हे औषध ‘ज्युनिपर’ फळापासून तयार केलेल्या मद्यामध्ये मिसळून दिले तर त्याला गोडी प्राप्त होते. ‘ज्युनिपर’ फळापासून तयार केली जाणारी ‘जिन’ त्यासाठी उपयोगी ठरली. त्यामुळे क्विनाईनचा कडवटपणा नाहीसा झाला आणि त्याला उत्तम चव प्राप्त झाली.

 

‘जिन टॉनिक’ ची सुरूवात

मग काय? ‘जिन + टॉनिक’ असे हे ‘जिन टॉनिक’ ब्रिटिश सैनिकांमध्ये एकदम लोकप्रिय झाले. इतके की सैनिक दररोज चुकता ते पिऊ लागले. मग ब्रिटिशांनी सैनिकांच्या दर महिन्याच्या ‘रेशन’मध्ये जिनच्या बाटल्या आणि हे क्विनाईन (टॉनिक वॉटर) देणे सुरू केले. मग काय सैनिकांना रोज ‘जिन’चा आनंद घेता येऊ लागला, सोबत त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही वाढू लागली.

याची एकदा सुरूवात झाल्यावर ब्रिटिश सैनिकांकडून ‘जिन’ची आणि इतरही मद्याची मागणी बरीच वाढू लागली. त्यासाठी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने बेंगलोरच्या आसपास अनेक ‘ब्रिअरीज्’ आणि ‘डिस्टलरीज्’ सुरू केल्या. तिथे मद्याची निर्मिती करून ते भारतभर पाठवले जाऊ लागले. अशा प्रकारे ब्रिटिशांच्या काळातच बंगळुरू हे मद्य निर्मितीचे प्रमुख केंद्र बनले होते. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उद्योगपती विठ्ठल मल्या (विजय मल्ल्या याचे वडील) यांनी बहुतांश मद्यनिर्मिती कारखाने विकत घेतले. त्यांची मिळून ‘युनायटेड ब्रिअरीज्’ या कंपनीची स्थापना केली.

क्विनाईन आणि जिन हे ‘कॉकटेल’ मद्यपींमध्ये आजही लोकप्रिय पेय आहे. नुसते क्विनाईन हे ‘टॉनिक’ या नावाने ओळखले जाऊ लागले. अनेक डॉक्टर्स आजही वेगवेगळ्या प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी, ताप कमी करण्यासाठी हेच लिहून देतात. पुढे टॉनिक हा शब्द पाश्चात्य औषधांसाठी म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढच्या काळात क्विनाईन हे विविध रूपांमध्ये आले आणि वेगवेगळ्या आजारांसाठी मात्रा म्हणून दिले जाऊ लागले. त्यापैकीच एक म्हणजे हायड्रॉक्झीक्लोरोक्वीन. ते मलेरियावरचे रामबाण औषध बनले. आताच्या कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये जगभर त्याची मागणी वाढली आहे. 

या ‘हायड्रॉक्झीक्लोरोक्वीन’पर्यंत पोहोचण्यासाठी ही रंजक कथा उदयाला यावी लागली. त्यात टिपूचा पराभव, डासांनी पसरणारा मलेरिया, मद्याचे रेशन, ‘टॉनिक’.. अशी रंजक पात्रं आहेत. या कथेने ‘टॉनिक’ला जन्म दिला आणि अनेकांचे प्राण वाचवले.

 

(भवताल २०२० दिवाळी: ‘सूक्ष्मजीव विशेषांक’ यामधून साभार)

#भवताल #भवतालाच्यागोष्टी #सिंकोना #क्विनाईन # हायड्रॉक्झीक्लोरोक्वीन #टॉनिक #कोरोना #Bhavatal #StoriesOfBhavatal #Quinine #Cinchona #Hydroxychloroquine #Corona

1 Comments

Anil

Very nice information

Your Comment

Required fields are marked *

You may also like