Articles 
माणसाने बनवलेल्या  पहिल्या लसीची गोष्ट !

माणसाने बनवलेल्या पहिल्या लसीची गोष्ट !

माणसाने बनवलेल्या

पहिल्या लसीची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ०४)

आजपासून ३५०० ते ३१०० वर्षांपूर्वीचा काळ. इजिप्तमधील भव्य पिरॅमीड्समध्ये चीरनिद्रा घेतलेल्या काही ममीज् त्या काळातील आहेत. खरंतर त्याही आधीच्या ममीज् मिळतात. पण यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर काही व्रण आहेत. इसविसन पूर्व ११५६ मध्ये मरण पावलेला फरोह रामसेस. त्याच्या डोक्यावरही तसेच व्रण आढळले आहेत... हे व्रण आहेत देवीच्या रोगाचे.

तसा, देवीचा आणि तिच्या साथींचा इतिहास इसविसन पूर्व १०,००० वर्षांपूर्वीपर्यंत मागे जातो. या साथी आफ्रिका खंडात उद्भवल्या, नंतर जगभर पसरल्या. विविध प्रदेशातील व्यापार वाढत गेला, तसा देवीचा प्रसारही जगभर झाला. भारतातही इसविसनाच्या सातव्या शतकात देवीचा उल्लेख आढळतो.

काही ऐतिहासिक व्यक्ती

इतिहासातील अनेक नामवंतांना हा आजार जडला होता. चीनचे अनेक सम्राट, जपानचा सम्राट कोमेइ, स्पेनचा राजा लुई पहिला, रशियाचा सम्राट पीटर दुसरा, अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन ही काही प्रमुख नावे. रशियाच्या स्टॅलिन याला वयाच्या सातव्या वर्षी हा आजार जडला. त्यात त्याचा चेहरा विद्रुप झाला होता. त्याच्या फोटोंवर नंतर कृत्रिमरीत्या हे डाग लपवले जात. शिखांचे आठवे गुरु हरकिशन यांना हा आजार झाला होता. जुन्या काळातली प्रसिद्ध अभिनेत्री गीताबाली (शम्मी कपूर यांची पत्नी) यांचा या आजाराने मृत्यू झाला होता.

देवी रोगाची दहशत

देवी हा विषाणूपासून होणारा आजार. तो व्हेरीओला वर्गातल्या विषाणूंपासून होतो. या आजारात कपाळ, चेहरा व शरीरभर फोड येतात. त्यातून पाणी वाहू लागते. लागण झालेले एक-तृतियांश रोगी मरायचे. वाचलेच तर अंधत्व यायचे, फोडाचे वण मागे राहून चेहरा - शरीर विद्रूप करतात. त्यामुळे या रोगाची भयंकर दहशत होती. या रोगावर परंपरागत उपाय सुरू होतेच. त्यातून १७१६ च्या सुमारास युरोपात लसीकरण सुरू झाले. ही लस थेट देवीच्या फोडातून बाहेर पडणारे पाणी वापरून दिली जात असे. त्याचा उपयोग होत असे, पण रुग्णाला थेट रोगाचे विषाणू टोचले जात असल्याने या रोगाची लागण होण्याचाच धोका होता.

गायीच्या कासेवरील फोड

गायीच्या कासेवरील ‘काउ पॉक्स’

पुढे इंग्लंडचे एडवर्ड जेन्नर यांनी देवीवरची प्रभावी लस शोधून काढली. पण जेन्नरपर्यंत पोहोचण्याआधी बरेच काही घडले. जगाच्या अनेक भागात गायी पाळणाऱ्या लोकांना देवीसारखाच पण अगदी सौम्य स्वरुपाचा रोग होत असे. त्याला इंग्रजीमध्ये ‘काउ पॉक्स’ म्हटले जाते. गायींच्या कासेवर फोड असत. त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना हा रोग होत असे. तो बराही होई. हा रोग होऊन गेलेल्यांना देवी होत नाहीत, हे माहीत होते. इंग्लंडमधील बेंजामिन जेस्टी या शेतकऱ्याने या निरीक्षणाचा वापर जाणीवपूर्वक केला. त्याच्या जवळच्या दोन गवळणींना ‘काउ पॉक्स’ आजार होऊन गेला होता. त्यानंतर त्या देवीच्या रोग्यांच्या संपर्कात आल्या तरी त्यांना देवी झाल्या नाहीत, हे त्याने पाहिले.

बेंजामिन याने बायको, मुले यांना ‘काउ पॉक्स’ची लागण करुन घेतली. पुढे त्यांना जाणून बुजून देवीच्या रोग्यांच्या सानिध्यात ठेवले, अपेक्षेप्रमाणेच त्यांना देवीचा संसर्ग झाला नाही. त्याने नंतर हा प्रयोग खेड्यातल्या इतर लोकांवरही केला. तोही यशस्वी झाला.

पुढे एडवर्ड जेन्नर या अभ्यासकाने नवी लस शोधून काढली. त्याचा ब्रिस्टोल मधील एका गवळणीने सांगितले की, तिला ‘काउ पॉक्स’ होऊन गेलाने देवी कधीच होणार नाहीत. त्यातून त्यांना नव्या लसीची कल्पना सुचली. त्यांनी १४ मे १७९६ ला नऊ वर्षांच्या एका मुलाला ‘काउ पॉक्स’च्या फोडातले द्रव्य टोचले. दोन वर्षांनी त्याच मुलाच्या शरीरात प्रत्यक्ष देवीचे विषाणू टोचले. तरीही त्याला देवीची लागण झाली नाही. जेन्नर यांनी हे निरीक्षण लगेचच प्रसिद्ध केले.

जेन्नर करू शकला, पण...

इथे एक बाब सांगायला हवी. जेन्नर जे केले तसे माणसावर प्रयोग आजच्या काळात एकदम करता येत नाहीत. निष्कर्ष पक्के असले तरी असे प्रयोग माणसावर करण्याची परवानगी तज्ञ समितीकडून घ्यावी लागते. काही अपाय झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन भरपाई देखील द्यावी लागते. त्या काळी अशी आचारसंहिता नसल्याने जेन्नरला तसे करणे शक्य झाले.

मात्र, जेन्नरच्या या यशानंतर लसीकरणाचा प्रसार वेगाने झाला. देवीच्या विषाणूऐवजी ‘काउ पॉक्स’ चा विषाणू वापरल्याने ही लस आता जास्त सुरक्षित झाली होती. पुढे लेस्ली कोलियर यांनी १८५० च्या सुमारास ही लस पावडरच्या रुपात बनविण्याची पद्धत विकसित केली. त्यामुळे दुरवरच्या भागातही ती पोचविणे शक्य झाले.

देवीचा रोगी कळवा, १००० रुपये मिळवा

जागतिक आरोग्य संघटनेने जगातून देवीचा रोग नाहीसा करण्याचा कार्यक्रम १९५९ साली हाती घेतला. त्याला आर्थिक, राजकीय कारणांमुळे यश आले नाही. पुढे १९६७ मध्ये पुन्हा हा कार्यक्रम सुरु झाला. तो उपयोगी ठरला. या मोहिमेचा भाग म्हणून भारतातल्या गावागावात भिंतींवर “देवीचा रोगी कळवा, १००० रुपये मिळवा” ही जाहिरात रंगवली जात असे.

देवीचा शेवटचा बरा केलेला रुग्ण १९७५ मध्ये बांगला देशात (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) आढळला. ती होती, रहिमा बानू ही तीन वर्षांची मुलगी. तिला आजाराची लक्षणे दिसू लागताच तिचे ताबडतोब विलगीकरण केले गेले. ती पूर्ण बरी होइपर्यंत घराबाहेर २४ तास पहारा ठेवला गेला. घराच्या १.५ मैलांच्या परिघात घरोघर जाऊन पुन्हा देवीची लस टोचली गेली. ५ मैल परिघातल्या प्रत्येक घर, शाळा आणि सार्वजनिक जागांची तपासणी केली गेली. देवीचा रोगी दाखवणाऱ्यास इनामही जाहीर केले गेले.

शेवटचा बळी

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या वैद्यकीय शाखेत छायाचित्रकार जेनेट पार्कर ही देवीने मरण पावलेली शेवटची व्यक्ती. त्या ११ ऑगस्ट १९७८ रोजी आजारी पडल्या, पण रोगनिदान व्हायला ९ दिवस लागले. ११ सप्टेंबर १९७८ ला त्यांचे निधन झाले.

जगातून देवीचा रोग नाहीसा झाल्याची अधिकृत घोषणा ८ मे १९८० रोजी जागतिक वैद्यकीय परिषदेत करण्यात आली. आज जगात देवीचा विषाणू फक्त सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (अटलांटा, अमेरिका) आणि स्टेट रीसर्च सेंटर फॉर व्हायरॉलॉजी अँड बायोटेक्नॉलोजी (कोलस्टोव्ह, रशिया) या दोनच ठिकाणी केवळ संशोधनासाठी जतन करून ठेवला आहे.

सुनियोजित लसीकरण, जागतिक सहभाग आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर एखादा घातक रोग कसा हद्दपार करता येतो, याचे हे उत्कृष्ट उदाहरण.

- डॉ. योगेश शौचे (ज्येष्ठ सूक्ष्मजीववैज्ञानिक)

[email protected]

(भवताल वेबसाईटच्या bhavatal.com वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या मालिकेतील ही चौथी गोष्ट)

...

फोटो १ - फरोह रामसेस (पाचवा) याच्या ममीचे डोके,

फोटो २ - गायीच्या कासेवरील ‘काउ पॉक्स’चे व्रण

फोटो ३ - एडवर्ड जेन्नर

(फोटो सौजन्यविकीमीडिया.ऑर्ग)

 

#Bhavatal #StoriesOfBhavatal #Corona #COVID_19 #Yogesh_Shouche #Pandemic #Smallpox #Edvard_Jennar #Vaccine #Vaccination #Quarantine #Cowpox #भवताल #भवतालाच्यागोष्टी #कोरोना #कोविड_१९ #देवी #साथीचे_रोग #एडवर्ड_जेन्नर #क्वारंटाईन #लस #काउ_पॉक्स

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like