Articles 
कोकणातल्या झिपरीचं नेमकं काय झालं?

कोकणातल्या झिपरीचं नेमकं काय झालं?

कोकणातल्या झिपरीचं नेमकं काय झालं?

- बदलत्या हवामानात टिकणाऱ्या ज्वारीची गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी ०५)

काळाच्या ओघात आणि विकासाच्या नादात आपण काय - काय हरवत चाललो आहोत, हे पाहिलं की अस्वस्थ व्हायला होतं. गोष्ट पिकांच्या वाणांची असते तेव्हा तर गावोगावी नष्ट होत असलेला ठेवा डोळ्यासमोर येतो. अशाच मागं पडत चाललेल्या कोकणच्या पालघर-जव्हार भागातील ‘झिपरी’ची ही गोष्ट!

“पयले कुडाची घर होती अन् कुड बांधायला झिपरीचं साठं(धाटे) उपेग केलं जायचं. ते दोन - तीन वरीस टिकायचं, आत्ता घरकुल योजना आल्यापासनं सगळी सिमेंटची घर बांधत्यात, तै झिपरीच्या साठचां काय उपेग?”... रामचंद्र गावित हा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील माझा सहकारी. त्यानं केलेला हा सवाल.

जव्हारमध्ये आमच्या गप्पा सुरू होत्या. विषय होता ज्वारीच्या वाणांचा. त्यावर मावंजी पवार या सहकाऱ्याने झिपरी ज्वारीचं नाव घेतलं. “झिपऱ्या केसांसारखं पसरलेलं कणीस, म्हणून झिपरी जोरी (ज्वारी)!” त्यानं सांगितलं. त्यावर ही ज्वारी गेल्या दहा – पंधरा वर्षांमध्ये का कमी झाली याचं कारण रामचंद्र गावित यांनी सांगितलं. पूर्वी कुडाची घर होती. म्हणजे कडक काड्या उभ्या करायच्या आणि त्या एकमेकांमध्ये गुंफून शेणामातीने सारवल्या की झाल्या भिंती. त्यासाठी झिपरी ज्वारीची ताटं वापरली जायची. ती मजबूत असल्याने दोन - तीन वर्षे टिकायची. आता घरकुल योजनेत सर्वांची सिमेंटची घरं आल्यावर झिपरी कोण कशाला लावेल?... ही त्यांची खंत होती. त्याचं बोलणं ऐकून सुन्न झालो.

 अद्भुत झिपरी

झिपरी हे अद्भुत वाण. खरं तर कोरड्या भागात ज्वारी आणि कोकणासारख्या जास्त पावसाच्या भागात भात, ही सर्वसाधारण विभागणी. पण ही झिपरी कोकणात येते. अगदी जव्हार-पालघरच्या अडीच हजार मिलिमीटर पावसातही तग धरून राहते. एकदम काटक. खडकाळ भागात उगवते. उंच वाढते, जवळजवळ ११ ते १५ फुटांपर्यंत. जास्त पाऊस असला तरी अजिबात लोळत नाही.

तिथल्या वारली आणि कोकणा समाजातील आदिवासी बांधवानी, मुख्य पीक म्हणून कधी झिपरीची लागवड केली नाही. भात किंवा नाचणी, वरईचा राब केल्यावर रोपे टाकताना त्यांमध्ये झिपरीचे मुठभर बियाणे मिसळून फेकून द्यायचे. २५-३० दिवसात भाताची / नाचणी, वरईची रोपे लागवडीसाठी काढून घेतली की मग राबावर ह्या ज्वारीची रोपे जोमदार वाढतात. इतर कोणत्याही खताची, मशागतीची अजिबात गरज नाही.

काही ठिकाणी नाचणीची रोपे लागवड करताना ठराविक अंतराने झिपरी ज्वारीच्या ओळी टाकतात. तसेच तूर-ज्वारी अशी मिश्र पिकपद्धती आढळून येते. काही ठिकाणी ज्वारीचे रोपावर चवळीचा वेल वाढलेला दिसतो आणि त्यावर लटकणाऱ्या चवळीच्या शेंगा लक्ष आकर्षित करून घेतात, ह्यामध्ये आदिवासी शेतकऱ्याचा जमिनीच्या वापराचा आणि त्यातून विविध पिके एका वेळी घेण्याचे शहाणपण लक्षात येते.

ज्वारीच्या साठापासून मांदुस

झिपरी ज्वारीची जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी होते. नोव्हेबरचे मध्यापर्यंत काढणीस येते. जवळ जवळ ५.५ महिन्याचा कालावधी. झिपरी ज्वारीचे कणसातील प्रत्येक दाणा हा काळ्या किवा लाल रंगाच्या कोंदणात झाकलेला असतो. ते कोंदण अर्ध्याचे वर उघडले की ज्वारी काढणीस आली असे मानले जाते. मग प्रथम कणसे काढून घेतली जातात आणि काही दिवसांनी साठ (धाटे) कापून घेतले जाते आणि कणसे खळ्यावर वाळवली जातात. नंतर लाकडाच्या दांडाने झोडून दाणे वेगळे केले जातात. झिपरी ज्वारीची पाने जनावरांना चारा म्हणून वापरली जातात आणि साठ (धाटे) हे घराचे कुडासाठी वापरले जाते. त्याचबरोबर नाचणीची कापणी झाल्यावर त्याची कणसे ठेवणेसाठी ज्वरीच्या साठापासून मांदुस बनवले जाते. मांदुस म्हणजे ज्वारीच्या साठा उभ्या करून त्याला गोलाकार आकार दिला जातो आणि आतून सागाची पाने लावली जातात. ह्या ज्वारीची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात त्यामुळे मातीची धूप कमी होण्यास मदत होते.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी भागात झिपरी ज्वारी आढळते. ह्या भागात पाहणी केल्यावर लक्षात आले की झिपरी ज्वारी मध्ये पाच प्रकार आहेत- काळ्या बोंडाची (गरवी), सफेद बोंडाची, गोंडेवाली, काळ्या बोंडाची (निमगरवी), लाल बोंडाची. बियाणे काढताना वजनदार, रोग व कीड विरहीत, मजबूत खोड असलेली, लांब कणीस असलेले निवडले जाते आणि त्याचे दाणे वेगळे करून बांबू पासून बनवलेल्या झिल्यात ठेवले जाते.

ह्या ज्वारीवर पाने खाणारी आळी, खोड किडा, तांबेरा अश्या रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो पण नुकसानीची पातळी कमी असल्याने त्यावर कोणतेही उपाय योजना केली जात नाही.

झिपरी त्या भागाशी एकजीव झाली आहे. 
 झिपरीपासून भाकरीबरोबरच आंबील, लाह्या, उंडे, ज्वारीचे पोहे, ज्वारीची कोंडी असं बरंच काही बनवलं जातं.  ह्या ज्वारीच्या लाह्या आणि लाडू मुख्यत संक्रात, नागपंचमी आणि गणपती चे सणामध्ये प्रसाद म्हणून खाल्या जातात.  ज्वारीच्या भरड पासून बनविलेले उंडे (लाडू) उपवासात खाल्ले जातात. “पूर्वी घरात खायला काय नसायाचं, तेवा झिपरी ज्वारीची आंबील खावून दिवस काढलेत लोकांनी,” श्री. सुनील भोये यांनी सांगितले. याचं आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्व म्हणजे, सकाळी शेतावर जाताना आंबील घेतली की बराच काळ तहान लागत नाही आणि शरीरातली उर्जा टिकून राहते.

हवामान बदलामध्ये महत्त्व

झिपरी ज्वारी ह्यांचे वातावरण बदलात खूप महत्व आहे कारण अधिक पाऊसात तग धरून उत्पन्न देते, दाणे काळे पडत नाहीत, वारा - वादळ ह्यात लोळत नाही. रोग व किडीस दाद देत नाही. पोषणदृष्ट्या समृद्ध असून विविध पदार्थ बनविण्यासाठी उपयुक्त आहे, तसेच जळण म्हणून पण उपयोग केला जातो.

हे ज्वारीचे वाण अन्न, पोषण आणि वातावरण बदलात किती मोठे काम करू शकतात ही जाणीव झाली आणि झिपरी आणि उतावळी ज्वारीच्या संवर्धन आणि वापर साठी काय करता येईल ह्याचा विचार सुरु झाला, ज्यामध्ये ज्वारीच्या ह्या विविध वाणाचे बियाणे संकलन, धान्य आणि काड ह्याचे पोषण तत्वाचा अभ्यास, लाह्या आणि आंबील चा पोषण साठी उपयोग, नवीन पदार्थ निर्मितीसाठी अभ्यास, पिक लागवडीमध्ये ज्वारीचा समावेश (अधिक पावसात तग धरणे, मिश्र पिक म्हणून वापर), ज्वारीच्या काढा पासून (stem) विविध उपयोगाच्या शक्यता, तपासणे (बांधकाम, छत इत्यादी).

स्थानिक मंडळी रामचंद्र गावित, मावंजी पवार, सुनील भोये, सुरेश कोंब, देविदास बरफ, रघु रामा गावंढा, शंकर वरठा, संदीप टेंबरे, खंडू भांगरे ह्यांचा झिपरी  ज्वारी बद्दलचे ज्ञान आणि हे दुर्मिळ वाण वाचवण्यासाठीची धडपड खूप काही शिकवून जाते.

 

- संजय पाटील

प्रकल्प समन्वयक (कृषी जैव विविधता), बायफ

[email protected]

 

लेखातील फोटोंबाबत :

फोटो १- झिपरी ज्वारीचे कणीस

फोटो २- झिपरी ज्वारीचे लांब साठ(धाटे)

फोटो ३- झिपरी ज्वारी पासून बनविलेल्या कुडाची भिंत 

फोटो ४- झिपरी ज्वारीचे लांब साठ(धाटे)

फोटो ५- मांदुस –नाचणी ची कणसे ठेवण्यासठी बनविता

फोटो ६- ज्वारीच्या लाहया 

फोटो ७- ज्वारीच्या भरड पासून बनविलेले उंडे (लाडू)

फोटो ८-  झिपरी ज्वारीची आंबील

फोटो ९- सफेद बोंडाची झिपरी 

फोटो १०- कणसांची झोडणी झाल्यावर त्यापासून बनवलेला झाडू

3 Comments

रश्मीकांत श. खोटरे

छान माहिती. मला बियाणे मिळेल का? उपक्रमाला शुभेच्छा.

Balkrishna(Aaba) Gavas

Yes, Thanks For introducing Zipri, I was unaware of Javhar chi Ladki Zipri Mala krupaya Zipricha Bees Dyawa me Tal Koknat Zipriche Palan Poshan Karen Agdi Mayene Aaba Gavas, 9820939464 At village Dabhil, Post Sarmale Tal. Sawantwadi Dist. Sindhudurg Pin416511

खूप छान माहिती.....!! याचे बियाणे मिळेल का ??

Your Comment

Required fields are marked *

You may also like