Articles 
३५०० वर्षांपूर्वीचा इतिहास  एका भांड्याने कसा उलगडला? त्याची ही गोष्ट...

३५०० वर्षांपूर्वीचा इतिहास एका भांड्याने कसा उलगडला? त्याची ही गोष्ट...

३५०० वर्षांपूर्वीचा इतिहास

एका भांड्याने कसा उलगडला? त्याची ही गोष्ट...

(भवतालाच्या गोष्टी ०७)

दगडांचा देश म्हणून प्रसिद्ध असलेला आपला महाराष्ट्र ! या महाराष्ट्राचा प्राचीन काळाच्या आधीचा इतिहासही अतिशय रंजक आहे. इथे इतिहासपूर्व काळाचा लिखित पुरावा सापडत नाही. दगडी हत्यारे, अवजारे, खापरे, मातीची भांडी हेच त्या काळाचे साक्षीदार ठरतात. काही अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रात माणसाच्या दगड वापराच्या युगांमधील अलीकडचे युग म्हणजेच ‘नवाश्मयुग’ अवतरले नाही, तर थेट ताम्रपाषाण युग (तांबे-दगड यांचा वापर असलेली संस्कृती) अवतरले. ते अंदाजे इसविसन पूर्व १६०० - १५००, म्हणजे आजपासून ३६००-३५०० वर्षांपूर्वीचे.

या विषयावरील ख्यातनाम अभ्यासक डॉ. मधुकर ढवळीकर यांच्या ‘The First Farmers of Deccan’ या पुस्तकानुसार दक्खनचे आद्य शेतकरी याच ताम्रपाषाण युगात भेटतात. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील जोर्वे हे गाव या दृष्टीने महत्वाचे. तिथे १९४७ साली उत्खनन झाले. त्यात पहिल्यांदाच या संस्कृतीचे अवशेष सापडले. त्या ठिकाणच्या सन्मानार्थ या संस्कृतीला ‘जोर्वे संस्कृती’ हे नाव देण्यात आले.

इनामगाव येथील १५ वर्षांचे उत्खनन

पुढे इसविसन १९६८ ते १९८३ या काळात इनामगाव या ठिकाणी उत्खनन झाले. हे पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला ४२ किलोमीटरवर असलेले गाव. या गावाजवळ जोर्वेप्रमाणेच पुरातन अवशेष असणारे आणि मोठ्या विस्ताराचे ठिकाण मिळाले आहे. डॉ. ढवळीकर, डॉ. सांकलिया, डॉ. अन्सारी या त्या काळच्या आघाडीच्या पुरातत्व अभ्यासकांनी तेथे उत्खनन केले. हे तंत्रदृष्ट्या प्रगत व आंतरविद्याशाखीय असे उत्खनन. ते तब्बल १५ वर्षे सुरू होते.

या उत्खननात जोर्वे संस्कृतीच्या आधीची आणि नंतरच्या काळातील माळवा संस्कृती उघडकीस आली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील आतापर्यंत माहीत असलेल्या पहिल्या (ज्ञात) शेतकऱ्यांची सखोल माहिती हाती लागली. त्यात त्याचे दैनंदिन जीवन, आचार-विचार ,आहार, भटकंती, धर्मश्रद्धा या गोष्टींचे वस्तुरूपातील पुरावे हाती लागले. यातील खास अवशेष  म्हणजे- गोल झोपड्या, मातीच्या डबीतील ‘विशिरा’ म्हणून ओळखली गेलेली मातृदेवता, खापरावरील बैलगाडीचे तसेच नावेचे चित्र, विविध धान्याचे अवशेष, जलव्यवस्थापनाची व्यवस्था. (तेथील जलव्यवस्थापनाबाबत जिज्ञासूंनी ‘भवताल’च्या दिवाळी २०१८ विशेषांकातील डॉ. वरदा खळदकर यांचा ‘पहिल्या कालव्याची गोष्ट’ हा लेख आवर्जून वाचावा!) इनामगावच्या उत्खननात आणखी एक अतिशय विलक्षण गोष्ट सापडली.

अखंड भांडे, त्यावरील चित्र

कोणत्याही उत्खननात सामान्यपणे खापरं जास्त प्रमाणात सापडतात. मातीचे अखंड भांडे क्वचितच मिळते. काही वेळेस उत्खननातील खापराचे तुकडे जोडून पुरातत्वतंत्रज्ञ एकसंध भांडे बनवण्याचा कष्टपूर्वक प्रयत्न करतात. जोर्वे संस्कृतीच्या कालखंडातील लाल रंगाचे एक दुर्मिळ भांडे सदर लेखकाच्या प्राचीन वस्तू संग्रहात आहे. त्यावर  काळ्या  रंगात नक्षी व चित्र आहेत. या भांड्याच्या खासियत म्हणजे हे अखंड आहे, जराही तुटलेले नाही. त्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या भांड्यावर एक सुंदर काळवीट रंगवलेले आहे. काळवीट (Black buck) हा मृगवर्गीय प्राणी आहे आणि ही हरणे आजही या कोरड्या हवामानाच्या परिसरात आढळतात. काळवीट या प्राण्याचा सर्वसाधारण अधिवास आणि त्याचा पोषक भवताल म्हणजे कोरडे हवामान. या भांड्यावरून आपण त्या काळात म्हणजे ३५०० वर्षांपूर्वी हा भाग कोरड्या हवामानाचा, कमी पावसाचा होता, असा अंदाज बांधू शकतो.

तसे पाहता इनामगाव येथील उत्खननामध्ये अंदाजे १५ हजार वर्षांपूर्वीची, पाणघोड्याच्या फऱ्याची हाडे मिळाली आहेत. तिथे पाणघोड्यांचा वावर होता म्हणजे तो भाग पाणथळ होता. अर्थातच, तिथे पाऊस जास्त होता. परंतु, त्यानंतरच्या साडेअकरा हजार वर्षांमध्ये बरीच उलथापालथ झाली हे नक्की. 

त्याचा पुरावा म्हणजे साडेतीन हजार वर्षांपूर्वीचे मातीचे हे रंगीत भांडे. त्याचा काळ इसविपूर्व चौदाशे वर्षांपर्यंत सांगता येतो. ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ शिरीन रत्नागर यांच्या एका लेखाचा आधार घ्यायचा झाल्यास उत्तर जोर्वे काळात येथील उत्खननात कुत्रे खाल्ले जात असल्याचा (श्वान-भक्षण) जुना पुरावा मिळाला आहे.

काळविटाच्या चित्राचा अर्थ

इनामगावचा परिसर पश्चिम घाटापासून दूर अंतरावर आहे, म्हणजेच तो पूर्वेकडच्या दुष्काळी पट्ट्यातील आहे. साडेतीन हजार वर्षांपूर्वी तिथले पर्यावरण आजच्या सारखे म्हणजे कमी आणि  बेभरवशी पावसाचे होते. हा अर्ध-दुष्काळी म्हणजे गवताळ प्रदेश. तिथल्या सपाटीवरचा प्रदेशात काळविटासारखे प्राणी जास्त प्रमाणात दिसून येतात.त्या काळातील मातीच्या भांड्यावर काळविटाचे चित्र असणे हा त्या काळातील वातावरणाचा पुरेसा बोलका पुरावा आहे. त्याचप्रमाणे असेही  शक्य आहे की, काळविटाची शिकार ही त्या काळातील लोकांच्या आहाराचा (किंवा मेजवानीचा) भाग असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, उत्तर-जोर्वे कालखंडात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने, पिके हवी तशी उगवेनाशी झाली. परिणामी, त्या काळातील माणसाच्या आहारातला धान्याचा वापर कमी झाला आणि मांसाहाराचे प्रमाण वाढलेले दिसते. त्यात पाळीव व वन्य प्राण्यांचा समावेश असावा. 

एक मातीचे भांडे महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्याचा भवताल उलगडून दाखवते आणि ३५०० वर्षे

उलटल्यानंतरही त्या काळाची साक्ष देत आहे हे मात्र विशेष !

भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील सातवी गोष्ट.

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय-  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

- डॉ. पद्माकर प्रभुणे

[email protected]

फोटो सौजन्य - डॉ. पद्माकर प्रभुणे

(‘भवताल मासिका’च्या जानेवारी २०२१ च्या अंकातून)

2 Comments

digambar gadgil

itis strange that an earthen pitcher was found intact after thousand yrs and that too with colors

Sunil kaduskar

उत्तम माहिती.

Your Comment

Required fields are marked *

You may also like