Articles 
रायरेश्वर पठारावरील मातीला  इतके रंग कशामुळे मिळाले?

रायरेश्वर पठारावरील मातीला इतके रंग कशामुळे मिळाले?

रायरेश्वर पठारावरील मातीला

इतके रंग कशामुळे मिळाले?

- ‘भवताल’ने हे रहस्य कसे उलगडले, त्याची ही गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी ०८)

 ही गोष्ट आहे, एका ऐतिहासिक ठिकाणाची, त्यावरील अद्भुत भौगोलिक वैशिष्ट्याची आणि त्याबाबत लोकांना असलेल्या कमालीच्या कुतुहलाची! हे ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर पठार. होय तेच, जिथे शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. महाराष्ट्रातील सर्वांत उंच ठिकाणांपैकी हे एक. समुद्र सपाटीपासूनची उंची ४६९४ फूट म्हणजे १४३१ मीटर. इतकी उंची आणि पावसाचं मुबलक प्रमाण. त्यामुळे पठारावर लालसर जांभा खडकाचं राज्य.

या पठाराला अनेक दुर्गप्रेमी, शिवप्रेमी भेट देतातच. अलीकडे त्यावर आढळणारी सात रंगांची माती लोकांना

आकर्षित करत आहे. काही जण, तिथे त्याहून जास्त रंग असल्याचे सांगतात. याबाबतच्या अनेक पोस्ट सोशल

मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्याबाबत लोकांमध्ये कुतुहलही आहे आणि काही प्रमाणात गूढसुद्धा !

‘भवताल’ टीमने हे गूढ उकलण्याचे ठरवले. त्या भागाची आवश्यक माहिती गोळा केली, भूवैज्ञानिक रचना

समजून घेतली. त्यावरून या मातीला हे रंग येण्यामध्ये तिथे असलेल्या जांभ्याने महत्त्वाची भूमिका बजावली

असावी, विशेषत: त्यातील लोह खनिजामुळे हे घडत असावे, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला. पण

तेवढ्यावर विसंबून चालणार नव्हते. प्रत्यक्ष मातीचे नमुने गोळा करणे गरजेचे होते. त्यासाठी ९ व १० एप्रिल

२०२२ रोजी मोहीम आखण्यात आली. उष्णतेची तीव्र लाट होती, पण उन्हाळ्यातच काम उरकावे लागणार

होते. एकदा का पाऊस सुरू झाला की पठारावर सर्व काही ठप्प होते.

ज्येष्ठ भूवैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर व डॉ. कांतिमती कुलकर्णी, ‘भवताल’चे संस्थापक व भूविज्ञानाचे

अभ्यासक अभिजित घोरपडे तसेच, कार्यकर्ते पुष्कर चेडे (उस्मानाबाद), वनिता पंडित (पुणे), वैभव जगताप

(सातारा) यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी पठारावर श्री. गोपाळ लक्ष्मण जंगम यांच्याकडे मुक्काम केला.

या माणसानेच हे मातीचे ठिकाण शोधून काढले होते आणि तिथे येणाऱ्या पर्यटकांपर्यंत पोहोचवले होते.

त्यासंबंधीच्या अनेक सुरस कथा त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पठाराची पाहणी

करायला निघालो, तर पायवाटेवर एक फुरसे मरून पडले होते. यावरून तिथे पावसाळ्यात कशी परिस्थिती

असेल, याचा अंदाज आला.

लाल मातीची वाट तुडवत रंगीत माती मिळते त्या ठिकाणी पोहोचलो. रायरेश्वरवरील मुख्य शिवमंदिराच्या

वायव्येला (उत्तर-पश्चिम) सर्वसाधारणपणे एखाद्या किलोमीटर अंतरावरील हे ठिकाण. दुरूनच लालसर,

पिवळसर, तपकिरी रंगांच्या छटा दर्शन देत होत्या. ठिकाणाची व्यवस्थित पाहणी केली आणि मातीचे नमुने

तंत्रशुद्ध पद्धतीने गोळा केले. ‘भवताल टीम’ला मातीच्या १० रंगछटा मिळाल्या. हे रंग होते, लालफिकट तपकिरी, . फिकट गुलाबी, . फिकट जांभळा, . . दोन वेगवेगळ्या पिवळसर छटा, . गडद शेवाळी, . पिवळसर शेवाळी, . पिस्ता, १०. दुधी.

(या मोहिमेचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकhttp://youtu.be/rQ076mj0Oek)

मातीच्या रासायनिक पृथ:करणातून नेमके कारण समजणार होते. त्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सांगण्यावरून रसायनविज्ञान

विभागप्रमुख डॉ. विजय तडके आणि प्राध्यापक नितीन गांजवे यांनी या नमुन्यांचे पृथ:करण केले. त्यांचे निष्कर्ष

व भूवैज्ञानिक रचना यावरून जे बाहेर आले ते असे=

 १. लाल, पिवळा, तपकिरी रंग कशामुळे?

‘भवताल’ टीमने कयास केला होता त्याप्रमाणे यापैकी बहुसंख्य नमुन्यांमध्ये लोहाचे अस्तित्त्व आढळून आले. ते

मुख्यत: ऑक्साईडच्या स्वरूपात आहे. त्यामुळे तेथील मातीला लाल, पिवळा व फिकट तपकिरी रंग आले

आहेत. परंपरागतरित्या घरांच्या भिंती, मातीची भांडी रंगवण्यासाठी पिवडी किंवा गेरू याचा वापर केला जातो.

काही प्राचीन लेणी आणि गुहांमधील भित्तीचित्रे रंगवण्यासाठीही अशा रंगांचा वापर करण्यात आला आहे.

त्याचीच ही नैसर्गिक रूपे आहेत.

२. इतर रंगछटा कशामुळे?

रायरेश्वरवर सर्वसाधारणपणे सात रंगांची माती सापडते, असे मानले जाते. त्यात लाल, पिवळा, तपकिरी तसेच,

दुधी, हिरवट शेवाळी, फिकट जांभळा, फिकट गुलाबी, पिस्ता अशा रंगांची मातीसुद्धा मिळते. रासायनिक

पृथक्करणाचा निष्कर्ष असे सांगतो की या मातीमध्ये लोहाच्या ऑक्साईडच्या जोडीने अल्युमिनियम,

मॅग्नेशियम, मँगेनीज या धातूंची काही संयुगे अल्प प्रमाणात आहेत. त्यांच्यामुळे मातीला इतर रंगही प्राप्त झाले

आहेत. (उदा. मँगेनीजमुळे जांभळा रंग, वगैरे.) 

३. नेमकी किती रंगांची माती?

रायरेश्वर पठारावर नेमकी किती रंगांची माती आहे, याबाबत वेगवेगळी मते असू शकतात. कारण रंगाची गडद

छटा किंवा फिकट छटा यानुसार तो वेगळा रंग मानावा की एकच रंग मानावा, याबाबत प्रत्येक व्यक्तिनुसारवेगवेगळे मत असू शकते. मात्र, लाल, पिवळा, तपकिरी, जांभळा, शेवाळी, दुधी  या सहा रंगाची माती तिथे निश्चितपणे आहे, असे “भवताल”च्या या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.

४. इतरत्र कुठे मिळू शकते?

महाराष्ट्रात जांभा ज्या ठिकाणी आढळतो त्या त्या ठिकाणी अशी वेगवेगळ्या रंगांची माती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यात विशेषत: कोकण आणि सह्याद्रीचा घाटमाथा या प्रदेशांचा समावेश आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांमध्ये भटकंती करणाऱ्यांनी अशा इतरही ठिकाणांचा शोध घ्यावा. इतर काही ठिकाणी विविधरंगाची माती मिळाल्यास त्याबाबत “भवताल”ला [email protected] या ई-मेलवर कळवावे, जेणेकरून त्याचीही नोंद घेण्यात येईल.

५. अधिक अभ्यासाचे नियोजन

या मातीमध्ये आणखी कोणत्या संयुगांचे अस्तित्त्व आहे याचा शोध घेणे, हा या उपक्रमाचा पुढचा टप्पा असेल. त्यात अत्याधुनिक उपकरणे आणि प्रकिया यांचा अवलंब करण्यात येईल.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील आठवी गोष्ट.) 

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय-  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

 

- भवताल टीम

[email protected]

 

4 Comments

Guru

खूप छान माहिती आहे.

प्रतिभा प्रकाश चव्हाण

खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

खूप छान माहिती मिळाली

Darshana

माहिती मध्ये भर पडली

Bhavatal Reply

धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like