Articles 
महाराष्ट्रातल्या पाण्याच्या चवीची गोष्ट!

महाराष्ट्रातल्या पाण्याच्या चवीची गोष्ट!

महाराष्ट्रातल्या पाण्याच्या चवीची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ०९)

 

बहुतेक वर्ष २००९ होतं. नाशिकला एका कार्यक्रमासाठी मुक्कामी होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्राबरोबर गंगेवर, पंचवटी भागात प्रसिद्ध मिसळ खायला गेलो. सर्वसाधारण छोटंसं, जुनं हॉटेल. आता नाव आठवत नाही. पण मला त्या मिसळपेक्षा लक्षात राहिली तिथल्या पाण्याची चव. पाण्याचा खरा गोडवा अनुभवला. चौकशी केली तेव्हा समजलं, तिथं थेट गंगापूर धरणावरून पाणी येतं. (नाशिककर गोदावरी नदीला ‘गंगा’ म्हणतात. याच नदीवर नाशिकच्या वरच्या बाजूला गंगापूर धरण आहे... ज्यांना नाशिकची फारशी कल्पना नाही, त्यांच्यासाठी ही माहिती!)

अनेक ठिकाणी फिरताना तिथलं पाणी चाखलंय. कुठं त्याची चव चांगली असते, तर कुठं तहानही भागत नाही. पण असं का? हा प्रश्न पिच्छा सोडत नव्हता. त्याच्यासाठी अनेकांशी बोललो. त्यापैकी एक डॉ. प्रमोद मोघे. ते पुण्यातील प्रसिद्ध राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एन.सी.एलनिवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक) नावावर अनेक पेटंट आणि पाण्यावर काम करणारे. त्यांच्याशी दीर्घ चर्चा केल्यावर पाण्याच्या, विशेषत: महाराष्ट्रातल्या

पाण्याच्या चवीबाबत काही उत्तरं गवसली.

पाणी पावसाचे, पण चव?

आपल्याला पाणी मिळतं ते पावसामुळे, पण पावसाच्या पाण्याची चव कशी असते? ते डिस्टिल्ड वॉटर असल्याने त्याला चव नसते. चव येते, पाणी जमिनीवरून वाहताना त्यात मिसळणाऱ्या वेगवेगळ्या घटकांमुळेविविध धातू, त्यांची संयुगं आणि आम्लं-अल्कली. या घटकांचं प्रमाण जितकं आदर्श, तितकी पाण्याला उत्तम चव आणि अर्थातच, पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन! माती, खडकातले क्षार पाण्यात विरघळतात, ते त्याला चव देतात. पण हे सारं प्रमाणबद्ध असावं लागतं. लोह जास्त झालं तर चव बिघडतेसोडियम, कॅल्शियम,मॅग्नेशियम जास्त झालं तर पाणी मचूळ बनतं. झिंक, अर्सेनिक यांच्याही जास्त प्रमाणामुळे चव बिघडते.

प्रवाहांचं, झऱ्यांचं चवदार पाणी

झऱ्याचं पाणी चवदार का?... कारण पाणी चांगल्या मातीतून, वाळूतून, खडकातून येतं, तेव्हा ते नैसर्गिकरित्या गाळलं जातं. त्याच्यामुळं पाण्यातले अशुद्ध घटक किंवा इम्प्युरिटिज निघून जातात. धातूंचे अशुद्ध घटकही काढून टाकायला मदत होते. त्याला ‘बायो सँड फिल्टरेशन‘ असं म्हटलं जातं. त्यात वाळूबरोबरच मातीसुद्धा असायला हवी, तिची भूमिका महत्वाची असते. मग ती माती कोणत्याही प्रकारची असली तरी हरकत नाहीफक्त नैसर्गिक असावी / प्रदूषित नसावी इतकंच!

महाराष्ट्रात कुठलं पाणी चवदार?

डॉ. मोघे सांगतात, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी नैसर्गिकरित्या मॅग्नेशियम, कॅल्शियम या घटकांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तिथलं पाणी बेचव लागतं. कोकणातही लोह आणि सोडियम यांचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे हा प्रदेशही पाण्याच्या चवीच्या बाबतीत मागं पडतो. विदर्भातही मॅग्नेशियम, कॅल्शियम किंवा सोडियम प्रमाणापेक्षा जास्त आढळतं. मग प्रदेश उरतो तो नद्यांच्या उगमाच्या जवळचा. पुण्याचं, नाशिकचं उदहरण घेतलं तर ही शहरं नद्यांच्या उगमांच्या जवळ आहेत. इथलं पाणीसुद्धा गोड आहे. कारण मुळातच पाण्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम यांच्या क्षारांचं प्रमाण कमी आहे. काही प्रमाणात असलं तरी ते नैसर्गिकरित्या गाळलं जातं, ते संतुलित प्रमाणात उरतं.

डॉ. मोघे यांनी पुण्याला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचं पृथ:क्करण केलंय, त्यात धातूंच्या संयुगांचं प्रमाण जवळजवळ नाहीच, तेच नाशिकच्या बाबतीत. म्हणून तर पाण्याला चांगली चव येऊ शकते. कृष्णा, कोयना नद्यांच्या उगमाजवळ महाबळेश्वर किंवा भीमा, प्रवरा नद्यांचा उगम... तिथं पाण्याची चव चांगली आहेपण नद्या पुढं वाहत जातात, तेव्हा त्यांच्या पाण्यात त्या त्या भागातले इतर घटक मिसळत जातात आणि त्याची चवही बदलत जाते. नदी वनस्पती, पालापाचोळा यातून वाहते, तेव्हाही तिच्या पाण्याची चव बिघडते. कारण पालापाचोळ्यामुळं पाणी शुद्ध होत नाही, उलट तो कुजल्यामुळं पाणी बिघडतंच.. एवढंच नव्हे तर अशा पाण्यात जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता असते.

नद्यांच्या उगमाजवळ असं काय असतं?

तिथं असतो पाण्याचा खळाळता प्रवाह. उगमाजवळच्या प्रदेशात तीव्र उतार असल्यामुळं पाणी खळाळत वाहतं आणि त्यात जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिसळला जातो. ‘पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन’ (डिजॉल्व्ह ऑक्सिजन) जास्त असेल तर पाण्याची चव उत्तम राहते. त्यात काही कुजत नाही, जीवाणूंची विशेष वाढही होत नाही. जीवाणूंचे प्रमाण जास्त झाले तर चव बिघडते.पाण्याचा पीएच (सामू) किंवा आम्ल व अल्कली यांचं प्रमाण हा तर सर्वांत महत्वाचा घटक. हे प्रमाण ७ असावंते जास्तीत जास्त ७.५ पर्यंत गेलं तर स्वीकारार्ह असतं. कारण तो या प्रमाणात असेल तर आम्ल आणि अल्कली हे एकमेकांचा प्रभाव निष्प्रभ करतात. त्यामुळे पाण्याला गोडी मिळतेहे झालं नैसर्गिक स्रोतांबद्दल. इथं एक गृहित आहे की जवळपास माणसानं प्रदूषण केलेलं नसावं. केवळ पाणीच नव्हे, तर अगदी हवासुद्धा शुद्ध असावी.

हे बाटलीबंद पाण्यात मिसळलं तर?

डॉ. मोघेंशी चर्चा सुरूच होती, त्यात एक प्रश्न उपस्थित झाला. हे सर्व घटक पाण्याला चव देतात, तर मग हे सारं योग्य प्रमाणात बाटलीबंद पाण्यात मिसळलं तर? “अहो, बाटलीबंद पाण्याला चव देण्यासाठी हे केलं

जातंच. डिस्टिल्ड पाण्यात सर्व क्षार, विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण हे आदर्श समजतात तेवढं राखलं जातंम्हणून तर त्याला चव येते,” डॉ. मोघे यांचं उत्तर.

नदीचं की बाटलीतलं पाणी?

मग पुढचा प्रश्न उपस्थित झाला. हे सर्व घटक योग्य प्रमाणात असतील तर, जास्त सरस पाणी कोणतं- नदीचं की बाटलीतलं? डॉ. मोघे बोलले, “खरं सांगायचं तर कोणी तशी तुलना केल्याचं माहीत नाही, पण मला वाटतंनदीचं. कारण बाटलीतलं पाणी कृत्रिमरित्या अडजस्ट केलंय.” दोन्ही पाण्यात सारखेच घटक असतील तर हा फरक का?... पुढचा प्रश्न उभा राहतो. “वैज्ञानिकदृष्ट्या, दोन्ही पाण्याला एकच चव यायला हवी. पण चवीचं शास्त्र खूप वेगळंय. चहा किंवा वाईन यांच्याप्रमाणे पाण्याची चव चाखणारे तज्ज्ञ माझ्या तर माहितीत नाहीत. मला वाटतं, कोणतीही नैसर्गिक गोष्ट नेहमीच चांगली असते. काकुठास ठाऊक? पण त्याची गोडी कृत्रिमरित्या मिळवता येत नाही. मधाचं उदाहरण घ्या- नैसर्गिक आणि कृत्रिम मध याच्या गोडीत जमीन आसमानचा फरक पडतो. अर्थात, ज्याने नैसर्गिक गोष्टींची चव चाखलीए त्याच व्यक्तिला तो समजतो.’ या दोन्ही पाण्यात एक फरक उरतो, तो जीवाणूंचा. नैसर्गिक पाण्यात काही ना काही जीवाणू असतात, ते बाटलीबंद पाण्यात मिसळले जात नाहीत.

जीवाणूंची काही भूमिका असेल का?

“जीवाणूंमुळे चव वाढते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. पण ती एक शक्यता असू शकते, असं म्हणता येईल. नदीच्या पाण्यात जीवाणू मिळतीलच. मात्र, यावर अभ्यास होऊन त्याचा पाण्याच्या चवीशी संबंध प्रस्थापित झाल्याशिवाय काहीही बोलणं योग्य होणार नाही,” डॉ. मोघे यांनी समारोप केलाखरंतर आपण रोजच पाणी पितो. त्याची चव हा किती महत्वाचा मुद्दाय ना? पण त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण केलाय का? नसेल तर प्रयत्न करू यात्याचं एखादं रहस्य तुम्हालाही सापडेल... कदाचित!

 

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील नववी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्यायbhavatal.com

 

- अभिजित घोरपडे

[email protected]

 

(संदर्भ: भवताल मासिक, जानेवारी २०२१ अंक)

5 Comments

Ajinkya Bedekar

पाण्याचे तापमान कमी असल्यास, विरघळणाऱ्या/ विरघळू शकणाऱ्या ऑक्सिजन चे मूल्य (युनिट) हे जास्त तापमान आसलेल्या पाण्यापेक्षा नेहमी अधिक असते. म्हणूनचं थंड पाणी अनेकदा, रूम temperature किंवा गरम पाण्यापेक्षा जास्तं आल्हाद दायक वाटतें, व पिण्यासाठी चवीला छान वाटते.

Archana

खूप छान लेख. हा प्रश्न अनेकवेळा मनात येऊन गेलाय कारण बाहेर गेल्यावर बराचदा तहान भागत नाही. पाण्याची चव चांगली नसते. उत्तर आज मिळाले.

Anjali Takke

सुंदर लेख. आजच्या मुलांना हे समजायला पाहिजे. पण distill water च्या काळात निसर्ग समजणे कठीण आहे.

बाटली बंद पाण्याची चव गरम असताना वेगळी व गार असताना वेगळी लागते. पाण्यात तुळस किंवा मिंट ची चार पान टाकले तरी चवीत फरक येतो

Test Rating

Your Comment

Required fields are marked *

You may also like