Articles 
बुद्धपौर्णिमेनिमित्त, वन्यप्राणी मोजण्याची संपूर्ण गोष्ट!

बुद्धपौर्णिमेनिमित्त, वन्यप्राणी मोजण्याची संपूर्ण गोष्ट!

बुद्धपौर्णिमेनिमित्त,

वन्यप्राणी मोजण्याची संपूर्ण गोष्ट!

(भवतालच्या गोष्टी ११)

आज बुद्धपौर्णिमा, उन्हाळ्यातील शेवटची पौर्णिमा. महाराष्ट्राच्या दृष्टीने वन्यप्राण्यांची गणना करण्यासाठीचा दिवस. उन्हाळ्यामुळे वन्यप्राण्यांसाठी मोजक्याच ठिकाणी पाणवठे उरलेले असतात, पौर्णिमेमुळे लख्ख चांदणे असते.

मचाणावरून प्राणी पाहून ते मोजण्यासाठी आणखी काय हवे? कित्येक वर्षे अशा प्रकारे गणना केली जात होती, पण आता प्राण्यांची गणना करण्याची ही पद्धत मागे पडली आहे. त्याऐवजी इतर पद्धती पुढे आल्या आहेत. यासाठीच्या

वेगवेगळ्या पद्धती, त्यांच्यात काळानुसार होत गेलेला बदल हे जाणून घेणे माहितीपूर्ण आहेच, शिवाय रंजकसुद्धा. निसर्गात वन्यजीवांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तसेच, त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी त्यांची संख्या किती आहे

याचा नेमका अंदाज असावा लागतो. कोणत्या भागात कोणते प्राणी आढळतात हेही माहिती असावे लागते. त्यानुसार वन्यजीवांच्या संवर्धनाचे कोणते कार्यक्रम राबवायचे, त्यात कोणते बदल करायचे हे ठरवणे शक्य होते. 

सुरुवातीच्या पद्धती

खरंतर, भारतात वन्यप्राण्यांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी ब्रिटिश काळापासून विविध पद्धती चालत आल्या आहेत. ‘रोडसाईड काउंट’ सारख्या पद्धतीत विशिष्ट रस्त्याने चालत गेले किंवा वाहनाने गेले तर एक तासात किती प्राणी दिसतात त्यावरून संख्येचा अंदाज घेतला जायचा. ‘ड्राईव्ह काउंट’ पद्धतीत हाकारे देत प्राण्यांना एखाद्या विशिष्ट दिशेला पळवले जायचे. त्या ठिकाणी लोक आधीच मचाण बांधून बसलेले असायचे. ते प्राण्यांची गणना करायचे.

‘टोटल काउंट’ पद्धती

ही पद्धती छोट्या क्षेत्रासाठी किंवा पाणथळींवर पक्षी मोजण्यासाठी वापरली जायची. प्रत्येक १०० - १०० मीटर अंतरावर लोक उभे राहायचे आणि एका दिशेने जायचे. ते ठरवून घेऊन डाव्या किंवा उजव्या बाजूला दिसणाऱ्या प्राण्यांची नोंद करायचे. त्यांच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला दिसणारे प्राणी मोजले जायचे. अशा प्रकारे गणना हिवाळ्यात, पानगळ सुरू व्हायच्या आधी केली जाते. कारण पानगळ झाल्यावर चालताना पानांचा जास्त आवाज होतो. त्यामुळे प्राणी दूर निघून शक्यता असते. या पद्धतीच्या काही मर्यादा आहेत. ती मोठ्या क्षेत्रासाठी सोयीची ठरत नाही, शिवाय डोंगराळ भागातही चांगल्या प्रकारे वापरता येत नाही. पाणथळ जागी येणाऱ्या वन्यपक्ष्यांच्या गणनेसाठीसुद्धा ‘टोटल काउंट’ पद्धत वापरली जाते. विविध पाणथळींचे ब्लॉक (क्षेत्र) ठरवले जातात. तिथे पक्षी एकत्र आणि शांत असतात अशा वेळी त्यांची संख्या मोजली जाते. यावरून काही वर्षांनी ते वाढताहेत की कमी होताहेत हे समजते. पक्षी मोजण्यासाठी त्यांच्या विविध आवाजाचा (कॉल्स) आधारही घेतला जातो. विशिष्ट वाटेने जाताना पक्ष्यांचे किती आवाज येतात, यावरून त्यांच्या संख्येचा अंदाज घेतला जातो. याशिवाय जागोजागी इतरही काही पद्धती वापरात असत. 

पगमार्क मेथड

ही पद्धत वापरून १९३२ साली जगात पहिल्यांदाच वाघांची गणना करण्यात आली. ते ठिकाण होते आताच्या झारखंडमधील पलामू. मात्र, पुढे १९६० च्या दशकात ती अधिक विकसित झाली. सरोजराज चौधरी यांनी १९६६ साली आता वापरात असलेली पद्धत विकसित केली. वन्यप्राण्यांच्या, विशेषत: वाघ, सिंह यासारख्या मोठ्या हिंस्र प्राण्यांच्या गणनेसाठी तिचा वापर केला जातो. या पद्धतीत प्राण्याच्या पायाचा मातीत किंवा चिखलात उमटणारा ठसा शोधला जातो. त्याचे त्याचे ट्रेसिंग घेतले जाते, त्यावरून मोल्ड केला जातो. एकाच वेळी सलग एक-दोन आठवडे मोठ्या संख्येने लोक अशा ठशांची नोंद करतात. प्रत्येक प्राण्याच्या ठशाचा आकार वेगळा असतो हे या पद्धतीचे गृहितक. प्राण्याच्या मागच्या डाव्या पायाचाच ठसा घेतला जातो. यावरून काही प्राणी ओळखण्याचे काही ढोबळ नियमही आहेत. ठशामध्ये नखे उमटली असतील तर ते ठसे कुत्रावर्गीय (कोल्ही, लांडगा, तरस, आदी.) प्राण्यांचे असतात. नखे उमटली नसतील तर ते मांजरवर्गीय (सिंह, वाघ, बिबट्या, आदी.) प्राण्यांचे असतात. वाघाबाबत, ठशांच्या चारही बाजूंनी रेषा ओढल्यावर ती चौरस आली, तर तो नराचा ठसा असतो आणि रेषा आयताकृती आली तर तो मादीचा ठसा असतो. मात्र, मातीवर किंवा चिखलात ठसा पसरू शकतो. त्यामुळे आकाराने मोठा दिसतो. अशा काही आक्षेपांमुळे ही पद्धत आता मागे पडली. आज ती थेट गणनेसाठी वापरली जात नसली, तरी काही प्राण्यांचे पगमार्क घेतले जातात. 

वॉटर होल सेन्सस

पाणी पिण्यासाठी पाण्याच्या ठिकाणी  येणाऱ्या प्राण्यांची मचाणावरून केली जाणारी गणना. यामध्ये काही गृहितके आहेत- प्राणी दिवसातून किमान एकदा तरी पाणी प्यायला येतो. उन्हाळ्यामुळे अशा पाणथळ जागा मर्यादित असतात. त्याठिकाणी प्राणी आले की आधीच मचाणावर बसलेल्या लोकांनी त्यांची संख्या मोजायची. सायंकाळी ५ ते सकाळी ९ या काळात ही गणना केली जाते. ती बुद्धपौर्णिमेला होते. चांदण्यात प्राणी स्पष्ट दिसू शकतात. यासाठी काही ठिकाणी कायमस्वरूपी मचाण असतात, तर काही ठिकाणी ते तीन - चार दिवस आधी उभारले जातात, जेणेकरून नव्याने बांधलेले मचाण पाहून प्राणी बुजू नयेत. यामधील आणखी काही गृहितके म्हणजे- मोजणारे माहीतगार आहेत, ते प्रामाणिकपणे व व्यवस्थित नोंदी घेतील. यासाठी मचाणावर बसलेल्या लोकांकडून काही अपेक्षा असतात- शांतता पाळणे, जागे राहणे, खाली न उतरणे, अत्तर-परफ्यूम न वापरणे, भडक कपडे न वापरणे, पुरेसे पाणी सोबत ठेवणे, वगैरे. पाणथळ जागेवर पाणी प्यायला प्राण्यांचा, एखाद्या प्रोटोकॉलप्रमाणे विशिष्ट क्रम असतो. सुरुवातीला मोर येतात, मग भेकर, चितळ, सांबर, रात्री अस्वल, आणखी उशिराने वाघ... असा काहीसा हा क्रम असतो. ही अतिशय लोकप्रिय आणि लोकांचा सहभाग वाढवणारी पद्धत. पण अलीकडे ती वैज्ञानिक मानली जात नाही. त्यामुळे तिचा वापर, सर्वसाधारणपणे प्राण्यांची सख्या वाढली की कमी झाली हे जाणून घेण्यापुरता केला जातो. आता तिचा वापर लोकांचा निसर्गातील रस वाढवण्यासाठी केला जातो. प्राण्यांचा आवाज ऐकणे, त्यांचे प्रत्यक्ष निरक्षण करणे, आपण कितीवेळ शांत बसू शकतो हे तपासणे यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जातो. त्यातून भविष्यातील वन्यजीव अभ्यासक घडू शकतात.  

तीन पद्धतींचा आधार

आजची वन्यजीव गणनेच्या आधुनिक पद्धतीत तीन वेगवेगळ्या पद्धती एकाच वेळी वापरल्या जातात. त्यात कॅमेरा ट्रॅप, लाईन ट्रान्सेक्ट आणि व्हेजिटेशन एस्टिमेशन यांचा समावेश आहे. २००० च्या दशकात ती विकसित करण्यात आली. वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी २००६ सालापासून तिचा अवलंब केला जात आहे. ती विकसित करण्यात राजेश गोपाल, कमर कुरेशी, डॉ. यादवेंद्र झाला या तज्ज्ञांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. या पद्धतींचा वापर करून हिवाळ्यात डिसेंबर - जानेवारी या काळात गणना केली जाते. ‘कॅमेरा ट्रॅप’ पद्धतीत विविध ठिकाणी कॅमेरे लावून प्राणी प्रत्यक्ष मोजले जातात. विशेषत: वाघाच्या गणनेसाठी त्याचा उपयोग होतो. वाघासारखे प्राणी सर्वसाधारणपणे फिरण्यासाठी विशिष्ट मार्गाचा वापर करतात. त्यानुसार हे कॅमेरे लावले जातात. वाघाच्या शरीरावरील पट्ट्यांच्या रचनेवरून वेगवेगळे वाघ मोजले जातात. ‘लाईन ट्रान्सेक्ट’ पद्धतीत चार किलोमीटर लांबीचे सलग पट्टे ठरवले जातात. ते विशिष्ट अंतराने एक ट्रान्सेक्ट ४ किलोमीटरचा असतो. यावरून फिरताना दिसणाऱ्या प्राण्यांच्या नोंदी घेतल्या जातात. या ट्रान्सेक्टला प्रत्येक १०० मीटरवर आडव्या रेषा केल्या जातात. तिथे २० मीटरवर सर्कल करून तेथील गवत, वनस्पती तसेच, तृणभक्षक प्राण्यांची विष्ठा व इतर नोंदी घेतल्या जातात. याद्वारे जंगलातील वनस्पतींचा योग्य पद्धतीने अंदाजही (व्हेजिटेशन एस्टिमेशन) घेतला जातो. आधिनुक कम्प्युटर प्रोग्राम आणि स्टॅटिस्टिक्सचा वापर करून या सर्व नोंदींची संगती लावली जाते. त्यारून प्राण्यांच्या संख्येचा आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या वन संसाधनांचा अंदाज बांधला जातो. ही पद्धत गेल्या चार गणनांसाठी (२००६, २०१०, २०१४, २०१८) आल्यामुळे तिची उपयुक्तता लक्षात आली आहे. या वर्षी (२०२२) होणाऱ्या गणनेसाठीही ती वापरली जात आहे. हीच पद्धत वापरून वाघांच्या संख्येचा अंदाज काढण्यात आला आहे. त्यांची संख्या गेलया चार गणनेमध्ये, १४००, १७११, २२२६, २९६१ अशी वाढली आहे. २०१८ सालच्या गणनेत तर २९६१ पैकी २४०० वाघ तर प्रत्यक्ष कॅमेऱ्यात ट्रॅप झाले आहेत. इतर वाघांचा अंदाज त्यांची विष्ठा, त्यांनी मारलेले भक्ष्य, जंगलाची घनता, तृणभक्षकांची संख्या यावरून घेण्यात आला आहे.

पुढे काय?

वन्यप्राण्यांच्या गणनेच्या पद्धती काळानुसार हळूहळू विकसित होत आल्या आहेत, पुढेही विकसित होतील. आता कॅमेरा ट्रॅपचे छोटे-अत्याधुनिक कॅमेरे आले आहेत. त्यांना ‘वाय-फाय’चा आधार असल्याने प्राण्यांची हालचाल ऑफिसमध्ये बसूनही पाहता येईल. अर्थात, प्रत्यक्ष जमिनीवरील पेट्रोलिंग नेहमी महत्त्वाचे आणि आवश्यक राहणार आहे.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी 'भवतालच्या गोष्टी' या खास मालिकेतील अकरावी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय -  bhavatal.com

- डॉ. नितीन काकोडकर

निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक- वन्यजीव

ईमेल : [email protected]

(शब्दांकन : भवताल टीम)

फोटो सौजन्य : वन विभाग, महाराष्ट्र / विकिमीडिया 

4 Comments

Nice

सुमारे २५ वर्षापूर्वी माझी निवड गणनेसाठी झाली होती. पण जे अधिकारी नेम,लेले होते त्यांची शास्त्क्रिया आल्याने ते राहून गेले .आता मी ८८ वयाचा असल्याने ते शक्य नाही.

Bhavatal Reply

ओके.

Are Drone surveys used now?

खूपच छान लेख.... या मध्ये रस असलेले विद्यार्थी यात भाग घेऊ शकतात का? त्या साठी काय तयारी करावी लागते?

Your Comment

Required fields are marked *

You may also like