Articles 
हरिपूरच्या मातीत नेमकं काय दडलंय?... याची गोष्ट

हरिपूरच्या मातीत नेमकं काय दडलंय?... याची गोष्ट

हरिपूरच्या मातीत नेमकं काय दडलंय? याची गोष्ट...

(भवतालाच्या गोष्टी १४)

 

सांगली हळदीसाठी जगप्रसिद्ध आणि जमिनीत हळद साठवण्याची पेवं शेजारच्या हरिपूरला. अशी दोन गावांची ही जोडी. ही पेवं पाहताना मला पडलेला एक प्रश्न- ही पेवं हरिपूरलाच का? एक गोष्ट स्पष्टच होती. हळदीची देशातील सर्वांत मोठी उलाढाल सांगलीला व्हायची, आजही होते. या शहराच्या जवळ असल्यामुळे हरीपूर महत्त्वाचे. पण तिथे इतकी पेवं निर्माण होण्यासाठी हे एकच कारण पुरेसे नाही. कारण तसे असते तर मग खुद्द सांगलीत किंवा आसपासच्या इतर गावांमध्ये पेवं का नाहीत? अगदी कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या इतर गावांमध्ये अशी पेवं का नाहीत?.. ती फक्त हरीपुरातच का?

याचा संबंध तिथल्या नैसर्गिक घटकांशीही असणार हे निश्चित. तो नेमका काय आणि कसा? याचा शोध घेताना मजा आली, बरंही वाटलं. बरं वाटण्याचं कारण म्हणजे- या पेवांचा तिथल्या मातीच्या थरांशी संबंध असल्याचे ऐकायला मिळाले, पाहायलाही मिळाले. मी भूविज्ञानाचा विद्यार्थी. म्हणूनच इथे मातीचा संबंध असल्याचे पाहून आनंद झाला. इथल्या मातीचा या दृष्टीने विशेष अभ्यास झालाय, असे नाही. पण तिथले लोक पेवांची माहिती देतात, त्यावरून निश्चितपणे काही अंदाज बांधता येतात, ढोबळ निष्कर्षही काढता येतात.

पेवांमध्ये हळद साठवण्यासाठी तिथल्या मातीत तीन गुणधर्म असावे लागतील-

१. त्या मातीत पेवं सहजपणे खणता यावीत.

२. पेवं कोरल्यावर ती ढासळायला नकोत. त्यासाठी माती धरून राहणारी असावी.

३. पेवात ठेवलेली हळद टिकून राहायला हवी. त्यात पाणी झिरपायला नको, ओल यायला नको.

हरीपूरची माती हे निकष पूर्ण करते. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पेवं खणली गेली. आणि ती इतक्या वर्षांनंतरही टिकून राहिली. सात-आठ वर्षांपूर्वी हरीपूरच्या भेटीत अनेकांशी या विषयावर बोललो. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून हे स्पष्ट होते. हरीपूरला असलेल्या मातीचे थर साधारणपणे असे आहेत-

* सर्वांत वरती साधारणत: पाच-सात फूट जाडीचा काळ्या मातीचा थर.

* त्याच्या खाली सुमारे तीस ते सत्तर फुटांपर्यंत वैशिष्ट्यपूर्ण थर आहे. तो माण माती, चिकनी माती, चिकण माती, लाल माती... अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.

* याच्याखाली वाळूचा थर.

* त्याच्या खाली शेवटी काळा खडक.

या थरांपैकी माण मातीचा / चिकनी मातीचा थर हा महत्त्वाचा आहे. याचे वैशिष्ट्य असे की,

१. त्यात हवे तसे कोरता येते. बाजूची माती ढासळत नाही. टिकावाने किंवा कुदळीने मातीचा जेवढा भाग काढू, तेवढाच निघतो. बाजूचा भाग हलत नाही, पडत नाही. त्यामुळे त्यात पेवं खणणे सोपे जाते.

२. हा मातीचा थर वजन पेलू शकतो. म्हणून तर आत पोकळी असली तरी पेवं ढासळत नाहीत. या पेवांमध्ये हळदीची पोती भरण्यासाठी तिथपर्यंत माल भरलेले ट्रक आणावे लागतात. या मातीची इतके वजन पेलून धरण्याची क्षमता आहे.

३. या मातीतून पाणी पाझरत नाही. त्यामुळे आतील हळदीला ओल लागत नाही. ती व्यवस्थित राहते.

या गुणधर्मामुळेच इथं पेवांचं पेव फुटले. हे झाले मूलभूत कारण. त्याचबरोबर सांगलीच्या रूपात हळदीची मोठी बाजारपेठ जवळ असणे हेसुद्धा महत्त्वाचे कारण ठरले. नाहीतर मातीची अशी वैशिष्ट्ये दूर कुठे असती तर तिथे कदाचित पेवं फोफावली नसती. लोक सांगतात की, हळदीची जास्तीत जास्त पेवं हरीपूरलाच आहेत. नदीच्या पलीकडच्या काठावर सांगलवाडीलाही काही पेवं आहेत, पण ती मोजकीच... याचा अर्थ इथल्या मातीच्या थरांनीच हरीपूरला पेवं बहाल केली आहेत.

पेवांची रचना :

या पेवांच्या रचनेवर सांगलीच्या ‘दिलीप ट्रेडर्स’चे श्री. दिलीप मालू यांनी प्रकाश टाकला. हरीपूरचे राजाभाऊ आळवेवर यांनीही त्यांची रचना समजावून दिली.

* सर्वांत वरती चार-सहा फुटाच्या थरात पेवाचं तोंड असतं. सरळ उभट तोंड. ते सर्व बाजूंनी विटानी बांधून घेतलं जातं.

* त्याच्या खाली या तोंडापेक्षा थोडा कमी व्यासाचा मार्ग असतो. तिथं ‘आढी’ बांधतात. या ठिकाणी पेवाचे झाकण असते. आढी म्हणजे- खाली थोडंसे विटांचे बांधकाम, त्याच्यावर लोखंडी पट्ट्या आणि त्या पट्ट्यांवर पेवाचे झाकण बसवले जाते. आयताकृती शहाबादी फरशीचे झाकण असते. ती बसवली की वर माती टाकून त्याचे तोंड बुजवून टाकतात.

पेवाचे तोंड साधारणपणे वरचा काळ्या मातीचा थर आणि खालचा चिकणमातीचा थर यांच्या सीमेवर असते. तोंडाच्या खाली हंड्याच्या आकाराची मोठी पोकळी केलेली असते. ती पूर्णपणे चिकण मातीच्या थरात असते. त्याची खोली साधारणपणे २० ते २५ फुटांपर्यंत असते.

पेवाचा व्यास १५-२० फुटांपर्यंत असतो ... राजाभाऊ आळवेकर यांनी वर्णन केलं . पण मी प्रत्यक्ष काही पेवांमध्ये डोकावले, तेव्हा त्यांचा व्यास १२ फुटांच्या आसपास असावा असे वाटले. दोन पेवांमध्ये काही फुटांचे अंतर असते. हरीपूरची पेवं पाहिल्यावर ते तीन-चार फूट असावं, असे जाणवले.

पेवाचं तोंड भरून घेतल्यानंतर ते कुठे आहे हे ओळखू यावे म्हणून वर मातीचा ढिगारा करतात. या ढिगाऱ्यावर बँकेची प्लेट रोपलेली असते. ज्या बँकेने पेव तारण ठेवून कर्ज दिले असेल, त्या बँकेची ती प्लेट!

पेवात हळद भरण्याची पद्धत :

पेवं ही एक स्वतंत्र संस्कृती होती, अजूनही थोड्या टिकून आहे. त्यामुळे तिथं लोकांनी पेवांशी संबंधित कामं, कौशल्य आत्मसात करून घेतली होती. त्यातलंच एक काम म्हणजे पेवं भरणं. पेवं भरण्याची पद्धत सविस्तर वर्णन करण्याजोगी आहे. थोडक्यात सांगायचं तर,

- तळाशी शेणकुटं टाकतात.

- त्याच्यावर शिंदीच्या पानांपासून तयार केलेल्या चटया अंथरतात.

- पेवात कडेला उसाच्या वाड्याच्या वाळलेल्या पेंड्या लावतात.

- मग मधल्या भागात हळदीची पोती ठेवतात. पोती ठेवत ठेवत कडेच्या उसाच्या पेंड्यांचा थर वाढवत जातात.

- पेवाच्या झाकणापासून खाली पाच फुटांचा थर मोकळा ठेवला जातो. त्याच्या खालपर्यंतच हळदीची पोती ठेवली जातात. एका सर्वसाधारण आकाराच्या पेवात साधारणत: १५० ते २०० क्विंटल पोती हळद मावते.

श्री. दिलीप मालू यांच्यानुसार, पेवांमध्ये हळद व्यवस्थित टिकते. कडेला असलेल्या हळदीला थोडी फार बुरशी लागलेली दिसते , पण त्याचे प्रमाण अगदीच नगण्य असते.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील ही चौदावी गोष्ट.)

 

- अभिजित घोरपडे

ई-मेल : [email protected]

(“सांगलीच्या पेवां”संबंधी उद्याच्या शेवटच्या भागात वाचा-

पेवांमधल्या हळदीची चोरी का होत नाही? तिचं वजन का वाढतं?)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्यायbhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

2 Comments

सेलामची हळद प्रसिद्ध आहे. ती कुठे पेवात ठेवतात?

Wonderful amazing information.Thanks for sharing

Your Comment

Required fields are marked *

You may also like