Articles 
पेवातल्या हळदीची चोरी का होत नाही? त्याची गोष्ट

पेवातल्या हळदीची चोरी का होत नाही? त्याची गोष्ट

पेवातल्या हळदीची चोरी का होत नाही? त्याची गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी १५)

सांगलीची हळद आणि तिची साठवणूक करण्यासाठी हरिपूरची पेवं, यांच्या कितीतरी कहाण्या. सर्वच विलक्षण. मला सर्वांत आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे- पेवातल्या हळदीची चोरी होत नाही, होऊच शकत नाही. हे ऐकल्यापासून प्रत्यक्ष पेवं पाहिपर्यंत डोक्यात एकच प्रश्न होता, असं का? तो तुमच्याही मनात आला असेल.

तिथं लोकांशी बोलताना एकेक रहस्यं उलगडत गेली. हरीपूरला सात-आठ वर्षांपूर्वीच्या भेटीत वसंत गोविंद आळवेकर भेटले. त्यांच्याकडून सविस्तर माहिती मिळाल्यावर या प्रश्नाचे उत्तर मिळाले. हळद साठवल्यामुळे पेवात ऑक्सिजन शिल्लक राहत नाही. कार्बन डय ऑक्साईड तयार होतो. त्यामुळे पेवातून हळद काढण्यापूर्वी कितीतरी तास पेवं उघडी ठेवावी लागतात. त्यात हवा खेळल्यावर आणि ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत झाल्यावर मगच त्यात उतरता येतं. नाहीतर माणूस गुदमरून मेलाच म्हणून समजायचे. रामभाऊ आळवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यासाठी १६ ते १९ तास लागतात. त्यामुळे पेवं आदल्या दिवशी दुपारी उघडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आत उतरता येत नाही.

पेटत्या कंदिलाची चाचणी

पेवं उघडल्यानंतर त्यात हवा पूर्णपणे खेळली आहे का आणि ऑक्सिजनचे प्रमाण पूर्ववत झआले आहे का, हे तपासण्यासाठी अगदीच साठीसोपी चाचणी केली जाते. पेटता कंदील दोरीला बांधून आतमध्ये सोडला जातो. त्याची ज्योत टिकली तर आतमध्ये उतरतात, तो विझला तर मात्र आणखी काही काळ वाट पाहिली जाते.

पण आतला ऑक्सिजन कुठं जातो? आणि कार्बन डाय ऑक्साईड का तयार होतो? याबाबत कोणी ठामपणे सांगू शकले नाही. ऑक्सिजन मातीत शोषला जातो, हे काहींनी सांगितले. पण आतमध्ये ऑक्सिजन नसतो हे निश्चित. या कारणावरून काही अपघात घडले आहेत. लोकांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. किंवा उघड्या पेवात पडूनही अनेकांचा मृत्यू झाला आहे. राजाभाऊ आळवेकर यांची आठवण म्हणजे त्यांचा मावसभाऊ असाच एका दुर्घटनेत दगावला.

१०० किलो ते १०६ किलो ?

पेवांमध्ये हळद टिकण्याचे एक कारण म्हणजे- ऑक्सिजन नसल्याने आतमध्ये सजीव जगू शकत नाहीत, कीटकही नाहीत. म्हणूनच पेवं पूर्णपणे कीडमुक्त असतात. तिचा दर्जाही सुधारतो, असं स्थानिक लोकांनी सांगतले. पेवात हळद साठवल्यावर तिचा रंग सुधारतो, तो अधिक पिवळा धमक होतो. आळवेकर यांच्या माहितीनुसार, पिवळेपणा २५-३० टक्क्यांनी वाढतो. पण पेवांची महती इथंच संपत नाही. गोविंद आळवेकर यांनी सांगितलेली माहिती आणखी आश्चर्यचकित करणारी होती. ती म्हणजे, हळद पेवात साठवल्यावर तिचे वजन वाढते. याबाबत आळवेवर यांनी सांगितले की, पेवात ठेवल्यावर १०० किलोच्या पोत्याचे वजन १०६ किलो इतके भरते. हे असे वजन का वाढते? हा प्रश्न माझ्या मनात होता, अजूनही आहे. वसंत आळवेकर यांनी असे सांगितले की, पेवात चांगलीच उष्णता असते. त्याच्यामुळे हळद फुगते, तिचे वजन वाढते.

लोकांचे हे अनुभव, त्यांनी दिलेली माहिती. पिढ्यान् पिढ्या असल्याने ते नाकारण्याचे कारणच नाही. पण हळदीचे वजन वाढणे, तिचा पिवळेपणा वाढणे, ऑक्सिजन नष्ट होणे, महत्त्वाचे म्हणजे उत्तम पेवं बनण्यासाठी या मातीच्या थरात नेमकं काय दडलंय? असे अनेक प्रश्न पिच्छा पुरवतात... त्यांची नेमकी उत्तरं शोधण्याचे आव्हान पेलेल का कोणी?

पेवांचं अर्थकारण

हरिपुरात पेवं या गोष्टीला इतके पैलू आहेत की अनेक सुरस कथा ऐकायला मिळतात. २००५ सालापूर्वी पेवं म्हणजे आर्थिक सुबत्ता, हे समीकरण होते. २००५ आणि २००६ च्या महापुरात हरीपुरातील निम्मी पेवं पडली. त्यानंतर या व्यवसायावर आणि पेवांच्या संस्कृतीवर फारच विपरित परिणाम झाला. पण त्यापूर्वी पेवं हे समृद्धीचे निदर्शक होते. वसंत आळवेकर यांच्या म्हणण्यानुसार, १९७४ ते २००५ हा पेवांचा सुवर्णकाळ, तर इतर काहींच्या मते हा काळ १९७५ च्या आधीपासूनच सुरू होतो.

दहा-वीस पेवं असलेल्या घरात लोक आनंदाने मुली द्यायचे. त्यापेक्षा जास्त पेवं असतील तर मग विचारूच नका. याबाबत वसंत गोविद आळवेकर यांचा अनुभव बोलका आहे. सात-आठ वर्षांपूर्वी भेट घेतली तेव्हा त्यांचे वय होते ५० वर्षे. पेवांच्या सुवर्णकाळात ते शाळेत होते. आता त्यांची विटांची भट्टी आहे, शेतीसुद्धा आहे. आता उत्तम चाललंय. पण शाळेत असताना आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. त्या वेळी पेवं असलेल्या घरातील पोरं आणि वसंत यांच्यासारख्या पेवं नसलेल्या घरातील मुलांमध्ये स्पष्ट फरक दिसायचा.

आळवेकर यांनी त्यांच्या जवळ राहणारा मित्र संपत शिरोळे यांचे उदाहरण दिलं. शिरोळे आता हयात नाहीत. "शाळेत असताना आम्हाला सायकलीचं अप्रूप असायचं. मात्र, पेवं असणाऱ्य़ांची पोरं सायकली वापरायची. त्यांचे कपडे टापटीप असायची आणि आम्हाला धड चड्ड्यासुद्धा नसायच्या..." इति वसंत आळवेकर. संपत शिरोळे यांच्याबद्दल ते सांगतात, "त्याचा हिप्पी कट होता. पायात चांगले शूज असायचे. कपड्याची इस्त्री मोडायची नाही... आमच्याकडं मात्र शाळेचा एकच ड्रेस. तोच रात्री धुवून दुसऱ्या दिवशी वापरायचा..."

जमीनमालक हळदीसाठी पेवं काढायचे. ती व्यापाऱ्यांना हळद साठवण्यासाठी भाड्याने दिली जायची. हे भाडे पोत्यावर (प्रति क्विंटल) असायचे. वर्षाचे चक्र पाडवा ते पाडवा, असे असायचे. पेवं असणाऱ्यांचे पैशाचे गणित या भाड्यावर अवलंबून असायचे. पेवं भरणे, त्यातली हळद काढणे हे सारं व्यापारी करायचे.

पेवांचं उत्पन्न किती, हा प्रश्न माझ्या मनात होता. राजाभाऊ, त्यांचे चुलतभाऊ वसंत आणि आताच्या पिढीतील काही जण एकत्र असताना हा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर आले, गावाच्या शेतीच्या एकूण उत्पन्नापेक्षा पेवांचं उत्पन्न जास्त होतं... ही गोष्ट २००५ च्या आधीची. यावरून हरीपूरच्या अर्थकारणावर पेवांचा काय प्रभाव होता, याचा थोडासा अंदाज येतो.

आता ही पेवं उतरतीला लागली आहेत. नुसती पेवंच संपली नाहीत तर त्यांच्यासोबत एक संस्कृती लयाला जात आहे... आपल्या सर्वांच्या डोळ्यादेखत!

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील ही पंधरावी गोष्ट.)

 

- अभिजित घोरपडे

ई-मेल : [email protected]

 

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्यायbhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

10 Comments

अत्यंत उपयुक्त माहिती आहे.

Bhavatal Reply

Thank you.

आतापर्यंतच्या सर्वच भवताल एकदम गोष्टी उत्तम व माहितीपूर्ण .तितक्याच रंजक

Ata Aplyaa pev baghayala milatil ka Ani te kas banvtat hyavishai mahiti milu shakel ka .baki hi mahiti chan hoti me tari pahilyandach vachali thank u

सांगलीच्या पेवांबद्दल्लची व त्या संबंधीच्या अर्थकारणाची अत्यंत मोलाची माहिती आपण दिलीत याबद्दल आपले विशेष धन्यवाद. अश्याच अभ्यासपूर्ण रीतीने आपण पर्यावरण व सभोवतालच्या नावीन्यपूर्ण गोष्टींची माहिती व त्याचे शास्त्रशुद्ध संकलन करीत रहाल याची खात्री आपल्या संशोधनवृत्तीतून मिळते.

Bhavatal Reply

नक्कीच. मन:पूर्वक आभार.

सांगलीच्या पेवांबद्दल्लची व त्या संबंधीच्या अर्थकारणाची अत्यंत मोलाची माहिती आपण दिलीत याबद्दल आपले विशेष धन्यवाद. अश्याच अभ्यासपूर्ण रीतीने आपण पर्यावरण व सभोवतालच्या नावीन्यपूर्ण गोष्टींची माहिती व त्याचे शास्त्रशुद्ध संकलन करीत रहाल याची खात्री आपल्या संशोधनवृत्तीतून मिळते.

Bhavatal Reply

धन्यवाद.

खूप माहितीपूर्ण पोस्ट आहे आणि भवतालच्या सर्वच पोस्ट खूपच माहितीपूर्ण आणि आश्चर्यचकित करणाऱ्या असतात दीपक वणारे

Bhavatal Reply

धन्यवाद. आपल्या संपर्कात शेअर करत राहा.

वजन वाढण्याचे कारण पटत नाही. उष्णतेमुळे जलद्रव्य उडून जाईल. फुगेल कशी हळद? भवतालचे विषय इतके सुंदर, वेगळे आणि लोकोपयोगी असतात की त्यातलं नाविन्य कधीच संपत नाही.

Bhavatal Reply

हे कोडे आहे. ते उलगडायला हवे. धन्यवाद.

माहिती खूपच छान व रंजकतेने लिहिली आहे. भवताल ने मांडलेला प्रत्येक विषय हा माहितीचा खजिना असतो. धन्यवाद टिम भवताल

Mahesh

महाराष्ट्रात अशी ठिकाणे पर्यटन स्थळे व्हावी मला तरी हे हरीपुर पहावेसे वाटते

Bhavatal Reply

हरिपूर जरूर पाहा आणि तिथल्या लोकांकडून पेवांची व्यवस्था समजून घ्या. हो, ही ठिकाणे पर्यटन स्थळे व्हावीत. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, लोकांचीही साथ हवी. स्थानिकांशी बोलू या. धन्यवाद.

Darshana

माझ्या मामाकडे लहानपणी मी पेवं काढतांना पाहीली आहेत.ज्वारी साठवून ठेवलेली असायची पेवांमध्ये.त्या ज्वारीच्या भाकरींचा एक ठराविक गंध यायचा. वरच्या थरातील ज्वारीचे धापडे व्हायचे ती ज्वारी वाया जात असे मग ती ज्वारी गुरांना खायला द्यायचे बालपणीची आठवण जाग्रूत झाली.धन्यवाद!

Bhavatal Reply

तुमच्या कमेंटमुळे माहितीमध्ये आणखी भर पडली. धन्यवाद.

Bhavatal Reply

तुमच्या कमेंटमुळे माहितीमध्ये आणखी भर पडली. धन्यवाद.

Bhavatal Reply

तुमच्या कमेंटमुळे माहितीमध्ये आणखी भर पडली. धन्यवाद.

Bhavatal Reply

तुमच्या कमेंटमुळे माहितीमध्ये आणखी भर पडली. धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like