Articles 
माझ्या गावाच्या जैवविविधतेची गोष्ट !

माझ्या गावाच्या जैवविविधतेची गोष्ट !

माझ्या गावाच्या जैवविविधतेची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी १७)

२०२१ च्या फेब्रुवारीचा सुमार. पहिल्या लॉकडाउननंतर जरा कुठे जनजीवन स्थिरस्थावर होतंय तोच दुसऱ्या लॉकडाऊनचे वेध लागलेले. त्यामुळे नोकरीसाठी बाहेर जाण्याची योजना गुंडाळून घरीच बसलो होतो. आमचे अणसुरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी). दर्यापीर ते दुर्गादेवी असा त्याचा विस्तार. त्याच वेळी गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन नवीन कार्यकारिणी तयार झाली होती. २००२ चा जैविक विविधता कायदा आणि लोकजैवविविधता नोंदवही हे विषय मला त्या सुमारास नव्याने कळले होते, आवडलेही होते. आपल्या गावात याबाबत काय काम झालंय? याबाबत सहज ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केली, तेव्हा असे लक्षात आले की हे काम खूपच औपचारिकतेने उरकलं जातंय. मला डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करण्याचा थोडाफार अनुभव आहे. डिजिटल मीडियाचा आज समाजावर जबरदस्त प्रभाव आहे. अशी कल्पना डोक्यात आली की आपण आपल्या गावाच्या जैवविविधतेची वेबसाइट तयार केली तर? कोणालाही आपल्या स्मार्टफोनवरून ती बघता येईल. ही कल्पना ग्रामपंचायतीत बोलून दाखवली आणि आमचे सरपंच रामचंद्र कणेरी आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांनी ती लगेच उचलून धरली. तुम्ही वेबसाईटचं काम सुरु करा आपण काय लागेल ते सहकार्य करू,” असा धडधडीत पाठिंबा त्यांनी दिला.

गावातला मित्र मंदार परांजपे याच्याकडे लागलीच गेलो. वेबसाईटच्या तांत्रिक कामाची जबाबदारी त्याच्याकडे दिली. त्यानेही कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा बाळगता ती आनंदाने स्वीकारली. तेव्हापासून गावाचा एकेक भाग ठरवून फिरणे, वनस्पती प्राण्यांचे फोटो काढणे, तज्ज्ञांकडून त्यांची नावे ओळखून घेणे, गावातल्या लोकांशी बोलून त्यांच्याबद्दल माहिती मिळवणे हा उद्योग सुरु झाला. बाकीचे व्याप सांभाळून मध्ये जसजसा वेळ मिळेल तसतसा हा उद्योग सुरू ठेवला. मला स्वतःला वनस्पतींची प्रचंड आवड असल्याने त्यांचे डॉक्युमेंटेशन करताना फार आनंद मिळत होता. आपल्याच परिसरात काय आहे हे आपल्यालाच माहीत नसते, जेव्हा ते कळते तेव्हा होणारा आनंद विलक्षण असतो. त्याचा अनुभव घेत होतो. गावातले अनेक लोकही उत्साहाने माहिती देत होते.

अनेकांचा हातभार

आमचे अणसुरे गाव हे खाडीकिनाऱ्याने वेढलेले आहे. त्यामुळे माशांची नोंद हा एक महत्त्वाचा भाग होता. त्याकामी आशिष पाटील या उत्साही तरुणाने चांगली मदत केली. त्याच्याकडे चाळीस-एक माशांच्या फोटोंचा संग्रह होता. ते सगळे त्याने दिले आणि त्यांची माहितीही दिली. दर्शन पंगेरकर या मित्राने खेकड्यांचे फोटो काढून दिले. वडिलांचा पक्ष्यांचा अभ्यास असल्याने पक्ष्यांची माहिती नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. अडिवऱ्यातले आमचे ज्येष्ठ मित्र सुहासकाका गुर्जर यांनी गावात येऊन मोठ्या कॅमेऱ्याने पक्ष्यांचे फोटो काढून देण्याचे काम आवडीने अंगावर घेतले. रत्नागिरीचे भूगोलाचे अभ्यासक श्रीवल्लभ साठे यांनी त्यांचे ज्ञान वापरून गावाचा अतिशय पद्धतशीर असा नकाशा तयार करून दिला. असे काम करत करत आज एक वर्षानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या अणसुरे गावाचं `लोकजैवविविधता संकेतस्थळ` तयार झाले आहे.

महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे सदस्य डॉ. राहुल मुंगीकर आणि डॉ. अपर्णा वाटवे यांच्याबरोबर गुगल मीट करून त्यांना वेबसाईटचं प्राथमिक काम दाखवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे २२ मे २०२२ रोजी पुण्यातील आयसर संस्थेत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. अणसुरे हे वेबसाईटच्या रूपात लोकजैवविविधता नोंदवही तयार करणारे भारतातले पहिले गाव ठरले!

`लोकजैवविविधता नोंदवही` म्हणजे नुसती गावातल्या वनस्पती-प्राण्यांच्या प्रजातींची नोंद करत जाणे, एवढेच नव्हे, तर लोकजीवनाचा आणि जैवविविधतेचा संबंध काय आहे, याची नोंद करणे इथे महत्त्वाचे आहे. या संकेतस्थळावर प्रत्येक वनस्पती-प्राण्याच्या प्रजातीची चित्रमय नोंद करताना लोकांकडे त्याच्याबद्दल असलेले स्थानिक ज्ञान याला प्राधान्य दिले आहे. उंडिलापासून कडुतेल काढण्याचा घाणा, पांगाऱ्याचे लाकूड तळाशी घालून बांधलेली ६० वर्षे जुनी विहीर, निवडुंगाचा खत म्हणून केला जाणारा उपयोग, अशा स्थानिक ज्ञानाचे संकलन या वेबसाइटवर केले आहे आणि अधिक माहितीसाठी उपयुक्त `संदर्भ लिंक` दिल्या आहेत.

`कुसुम्बा`च्या १०० पेक्षा जास्त झाडांची राई

या वेबसाईटवरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे `विशेष नोंदी`. या भागाचे डिझाईन गावातीलच स्वप्नाली देसाई हिने उत्तम प्रकारे करून दिले. वनस्पती-प्राण्यांच्या प्रजाती जवळच्या गावांमध्ये, किंवा एका जैवभौगोलिक प्रदेशात सारख्याच असतील. पण मग गावाच्या संदर्भातल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी काय आहेत त्या सगळ्याची नोंद या भागात केली आहेत. गावाचा कानाकोपरा फिरताना काही अद्भुतरम्य गोष्टी आढळल्या. वसंत ऋतूत लालेलाल पालवीने अतिसुंदर दिसणाऱ्या `कुसुम्ब` या वृक्षाची १०० पेक्षा जास्त झाडे असलेली राई आपल्या गावात आहे हे पहिल्यांदा कळले तेव्हा डोळ्यांवर विश्वासच बसेना! गावातले वहाळ फिरणे, डोंगर पालथे घालणे, पारंपरीक पाणवठ्याच्या जागा शोधून त्यांची नोंद करणे, दुर्मिळ झाडे, जुने महावृक्ष यांची स्वतंत्र नोंद करणे.

फिरता फिरता जो माणूस भेटेल त्याला जवळपास असलेल्या वनस्पती-प्राण्याबद्दल त्या जागेबद्दल काहीतरी विचारणे त्याने सांगितलेली माहिती टिपून घेणे, संध्याकाळी घरी येऊन रात्री नोंदवलेली सगळी माहिती वेबसाइटवर अपलोड करणे हा वर्षभराचा प्रवास आनंददायी, आव्हानात्मक आणि सृजनशीलतेला चालना देणारा होता. हा प्रवास यापुढेही सतत चालू राहील. डिजिटल माध्यमाचा फायदा असा की त्यावरची माहिती कधीही कुठूनही अपडेट करता येते.

लोकजैवविविधता नोंदवही ही एक `महा लोकचळवळ` व्हावी. प्रत्येक गावाने आपल्या गावाचे `जैवविविधता व्यवस्थापन आराखडे` तयार करणे आणि राबवणे अपेक्षित आहे. लोकजैवविविधता नोंदवही ही त्याची एक पायरी आहे. भारतात काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गावांमध्ये हे काम चांगल्या रीतीने झाले आहे. ज्या गावांना हे सुरु करायचेय त्यांच्यासाठी अणसुरे गावाने तयार केलेली वेबसाईट नक्की संदर्भ म्हणून उपयोगी पडेल.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी `भवतालाच्या गोष्टी` या खास मालिकेतील ही सतरावी गोष्ट.)

 

- हर्षद तुळपुळे

[email protected]

अणसुरे गावाची जैवविविधता वेबसाईटhttps://ansurebmc.in/

(फोटो सौजन्य = अणसुरे वेबसाईट / हर्षद तुळपुळे)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय-  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

6 Comments

उपयुक्त माहिती आणि एक नवीन कल्पना समजली 🙏🏻

Bhavatal Reply

धन्यवाद.

Yes...Very good initiative...I know Harshad as he was my ecological society course batch met. All the best for his next move.

Bhavatal Reply

Yes, Harshad and residents of Ansure village have done fantastic work.

फारच छान काम आहे.. खूप आनंद वाटला बघताना.. आणि प्रकर्षाने वाटलं की याचा प्रेरणादायी प्रसार होऊन अनेकांनी आपापल्या गावांची अशी वेबसाईट करावी.

अनसुरे गावाला नक्की भेट देऊ...👍

अतिशय उदबोधक आणि मनोरंजक!!

Bhavatal Reply

धन्यवाद.

विशाखा पेंडसे-पंढरपुरे

खूप आवडला हा उपक्रम! खरोखरच जास्तीत जास्त गावांच्या बाबतीत हे काम झालं तर उत्तम.

Bhavatal Reply

खरंय. धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like