Articles 
शिवरायांच्या काळातील ट्राफिक जामची गोष्ट!

शिवरायांच्या काळातील ट्राफिक जामची गोष्ट!

शिवरायांच्या काळातील ट्राफिक जामची गोष्ट!

- इतिहासात आजच्या दिवशी (२४ मे) घडलेली ही घटना

(भवतालाच्या गोष्टी १६)

 

इतिहासात डोकावून पाहिले, विशेषत: डोळे उघडे ठेवून पाहिले तर धमाल गोष्टींचा उलगडा होतो. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक कोणतंही मोठे शहर घ्या, मोठ्या सुट्टीच्या काळात घाट ओलांडून जायचे म्हटले तर कित्येक तासांचा ट्राफिक जाम ठरलेलाच. ठाणे-मुंबईकरांना तर त्याची चांगली कल्पना असेल... पण इतिहासात असे काही घडत होते का? विशेषत: मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या छत्रपती शिवरायांच्या काळात? काय आश्चर्य वाटलं का?.. मग गॅझेटियरमध्ये असलेली ही महत्त्वपूर्ण नोंद समजून घ्या. विशेष म्हणजे ही नोंद इतिहासात आजच्या तारखेला म्हणजे २४ मे रोजी घडलेल्या घटनेची आहे.

 

राज्याभिषेकानंतर पुढच्याच वर्षी

शिवरायांचा काळ. वर्ष १६७५. उन्हाळ्याचे दिवस होते. आदल्या वर्षी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक पार पडला होता. एक युरोपीय प्रवासी महाराष्ट्रात आला होता. डॉ. फ्रायर (Fryer) हे त्याचे नाव. त्याला महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्गावर फिरायचे होते. या मार्गावरील प्रवासाला सुरुवात अर्थातच कोकणातून होते. तिथून तो बोटीने इटवलीपर्यंत आला. इटवली म्हणजे आताचे ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा. उल्हास नदीच्या खोऱ्यातील हे ठिकाण. तो टिटवाळ्यानंतर मुरबाडला गेला. फ्रायर याला नाणेघाट चढून घाटावर जायचे होते. मुरबाडवरून घाटावर जायला वेगवेगळे मार्ग आहेत. तिथून तुम्ही कोणता मार्ग घेता त्यावर तुम्ही कसे घाटावर पोहोचणार हे ठरते. फ्रायर नेमका तिथेच रस्ता चुकला आणि नाणेघाटाऐवजी चुकून आहुपेच्या मार्गाने घाटावर पोहोचला. 

फ्रायरने कोकणात माघारी परतण्याचा प्रवास मात्र नाणेघाट उतरून केला. तो आहुप्यावरून आंबेगाव, जुन्नर या मार्गाने नाणेघाटापर्यंत आला. हा घाट उतरून कोकणात चौल या प्राचीन बंदराच्या ठिकाणी पोहोचला. त्याच्या नोंदींनुसार, तो २४ मे रोजी नाणेघाट उतरला. म्हणजे आजपासून बरोब्बर ३४७ वर्षांपूर्वीची ही घटना. त्या तीव्र उन्हाळ्यात त्याला घाटाच्या माथ्यावर कित्येक तास उन्हातच थांबून राहावे लागले. कारण काय?

 

मीठ वाहून नेणारे ३०० बैल

तर नाणेघाटात ‘ट्राफिक जाम’ लागला होता. त्याचं झालं असं. नाणेघाटातून बैलांवर लादून मीठ आणले जात होते. त्या वेळी देशावर मीठ आणले जायचे ते कोकणातूनच. हे मीठ वाहून आणणाऱ्या बैलांची संख्या होती तब्बल तीनशे. हे सर्व बैल चढून वर येईपर्यंत इतरांसाठी घाट बंद ठेवण्यात आला होता. आजही पायथ्यापासून नाणेघाट पायी चढून येण्यासाठी निदान दोन - अडीच तास लागतात. तेव्हा तर सामान लादलेले ३०० बैल वर चढवायचे होते. आणि त्यात भर उन्हाळ्याचे दिवस. यावरून नाणेघाटातून ही वाहतूक किती काळ चालली असेल आणि फ्रायरला तिथे किती वेळ ताटकळत थांबावे लागले असेल, याचा अंदाज येईल. नाणेघाट उतरताना काय - काय दिसले, याबाबत फ्रायरने नोंदी केल्या आहेत. तो नोंदवतो की नाणेघाटात अंतराअंतरावर धर्मादाय अशी स्वच्छ पाण्याची टाकी आहेत आणि हा घाट तळाशी उत्तम अशा जंगलाने नटला आहे. (आजही या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात.)

नाणेघाट हा सातवाहनांच्या काळापासून व्यापारासाठी वापरला जात होता. म्हणजे हा काळ इसविसनाच्या आधी दुसऱ्या-तिसऱ्या शतकापर्यंत मागे जातो. म्हणजे तब्बल २२००-२३०० वर्षे इतका जुना. या व्यापारी  मार्गाचे आकर्षण विविध कालखंडातील अभ्यासकांना होते, ते आजही आहे. या घाटाचे महत्त्व म्हणजे याच घाटामुळे, त्या काळी कोकणचा प्रदेश हा पैठण, जुन्नर यासारख्या प्राचीन केंद्रांशी जोडला गेला होता. पुढच्या काळात (१४९० ते १६३०) त्यात अहमदनगर या आणखी एका प्रमुख केंद्राची भर पडली. या घाटातून प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याने इसविसनाच्या सातव्या शतकात प्रवास केल्याचे दाखले आहेत. याशिवाय १४७० मध्ये अलेक्झांडर नावाच्या रशियन प्रवाशाने चौल ते नाणेघाट या मार्गाने प्रवास केल्याचीही नोंद आहे.

 

महामार्ग, रेल्वेमार्गाला पुरून उरलेला घाट

ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या काळातही नाणेघाट चांगल्या स्थितीत होता. १८१९ साली ब्रिटिश कलेक्टरने ज्या घाटांची दुरुस्ती करून घ्यायचे ठरवले होते, अशा घाटांच्या यादीत नाणेघाटाचा समावेश होता. इंग्रजांच्या काळात १८३०-४० च्या दरम्यान कोकण आणि देश यांना जोडणारे महामार्ग विकसित झाले. पुढे १८५८ ते १८६५ या काळात हे प्रदेश रेल्वेने जोडले गेले. असे झाले तरीही कोकण आणि देश यांना जोडणारी सर्वाधिक व्यापारी मालवाहतूक व लक्षणीय संख्येने प्रवासी वाहतूकही नाणेघाटातूनच होतअसे... अशी नोंद गॅझेटियरमध्ये आहे. अशा प्रकारे पुढेही काही दशके महामार्ग आणि रेलमार्ग यांना पुरून उरलेला असा हा नाणेघाट!

सध्या त्यातून मालवाहतूक होत नाही, पण या व्यापारी मार्गाबद्दल आतासुद्धा अनेकांना आकर्षण आहे. म्हणूनच ‘भवताल’तर्फे ‘२००० वर्षांपूर्वीच्या प्राचीन व्यापारी मार्गावर’ या नावाने इको-टूर आयोजित केली जाते. त्याद्वारे सहभागींना त्या काळाचा अनुभव दिला जातो... असा हा प्राचीन नाणेघाट. तो अनुभवण्यासाठी तयार राहा!

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही सोळावी गोष्ट.)

 

- अभिजित घोरपडे

[email protected]

 

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय-  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

15 Comments

सातवाहन काळात पैठण हे. प्रतिष्ठान म्हणून प्रसिद्ध होते. लेखासोबटच्या फोटोत मात्र प्रतिष्ठान म्हणजे जुन्नर असे दाखवले आहे ते चुकीचे वाटते.

Bhavatal Reply

होय, आपले म्हणणे बरोबर आहे. तो फलक बहुदा वन विभागाने लावलेला आहे. जुन्नर (जीर्णनगर), पैठण (प्रतिष्ठान) असायला हवे.

नवीन माहिती मिळाली

Bhavatal Reply

धन्यवाद.

छान माहिती

Bhavatal Reply

धन्यवाद.

छान माहिती मिळाली, अहमदनगर चा tour आयोजित झाल्यावर कळवा मी नगरचा आहे, एक इतिहास अभ्यासक आहेत नगर मध्ये वेलणकर म्हणून त्यांचा प्रचंड अभ्यास आहे सर्व परिसराविषयी माहिती जाणून घेता येईल. खूप वास्तू आहेत नगर मध्ये.... कळावे

Bhavatal Reply

नक्कीच. दरम्यानच्या काळात बोलूया. वेलणकर किंवा आपला संपर्क [email protected] यावर ईमेल करू शकता. धन्यवाद.

खुंच सुंदर माहिती, आपला प्राचीन आणि वैभवशाली इतिहास

Bhavatal Reply

मन:पूर्वक आभार.

खूपच छान व रंजक माहिती.

Bhavatal Reply

धन्यवाद.

वाचायला मस्त वाटले

Bhavatal Reply

आभार.

लेखातून खूप दुर्मिळ माहिती मिळाली. भवतालच्या माध्यमातून अतिशय महत्वाची आणि माहीत नसलेली माहिती नेहेमीच मिळत असते.

Bhavatal Reply

धन्यवाद. वाचकांना महत्त्वाचे आणि काहीतरी अनोखे देण्याचा "भवताल"चा प्रयत्न असतो.

Wantt to join trip

Bhavatal Reply

Ok, will inform once we announce the same. You can share your contact details on [email protected] Plz keep watching bhavatal website.

धन्यवाद, फारच छान माहिती मिळाली.

Bhavatal Reply

धन्यवाद.

खूपच छान लेख.. काही वर्षांपूर्वी लोकप्रभा मासिकात नाणेघाटाविषयी वाचलेलं.. आणि मी कर्जतला राहते त्यामुळे खूप ट्रेकर्सकडून ऐकलेलं घाटाविषयी.. आज अजून काही वेगळं समजलं.. खूप छान.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

Bhavatal Reply

मन:पूर्वक धन्यवाद.

खुप चांगली माहिती

Bhavatal Reply

धन्यवाद.

खूप छान, माहितीपूर्ण लेख. आपणासोबत नाणेघाट प्रवासासाठी उत्सुक आहे.

Bhavatal Reply

आभार सर. नक्कीच जाऊया.

खरच हे सर्व वाचून या मार्गावर अनुभूती घ्यावी अशी प्रबळ इच्छा होते.

Bhavatal Reply

जरूर, पावसाळ्यात किंवा त्यानंतर नियोजन आहे. अवश्य सहभागी व्हा. धन्यवाद.

शरद सांगळे

खुप छान माहिती दिलीत.

Bhavatal Reply

मन:पूर्वक आभार.

Your Comment

Required fields are marked *

You may also like