Articles 
सह्याद्रीतील आदिवासींच्या मधाची गोष्ट!

सह्याद्रीतील आदिवासींच्या मधाची गोष्ट!

सह्याद्रीतील आदिवासींच्या मधाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी १८)

२००७ साल असावं. सह्याद्रीच्या माहेर ओढीने अकोले तालुक्यातील कळसूबाई, हरिश्चंद्रगड परिसरात भटकत होतो. लोकपंचायत या सामाजिक संस्थेत नुकताच रुजू झालो होतो. स्थानिक महादेव कोळी ठाकर आदिवासी मध कसा गोळा करतात? त्याच्या पद्धती काय? मध संकलनातील आदिवासींचे अर्थकारण? इत्यादी विषयांच्या अभ्यास नोंदी घेत होतो. मुळा नदी काठी असलेल्या आंबित गावात पोहोचलो. शेतातील कौलारू घरच्या अंगणात मधुमक्षिका पालनाच्या लाकडी पेट्या ठेवलेल्या होत्या. त्या भोवती काही तरुण जमून किती माश्या आहेत, मध गोळा होतो की नाही, हे तपासत होते. जवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या.

मधे, मोध्या अन् रक्ताची नाती

पुढे अनेकदा साहेबराव भारमल, संपत, अनाजी, बुधाजी, सयाजी, नवसू, रावजी मधे असे अनेक मध गोळा करणारे भेटत राहिले. ठाकर समाजात ‘मधे’ हे आडनाव त्यांचा पेशा सांगणारे वाटते. गप्पा मारत असताना जंगल, मधमाशी, पाणवठे याशी संबंधित लोकज्ञानाचा खजिना दृष्टीस पडायचा. आदिवासी बांधवांच्या मते आगीमाशी (Rock Bee), मोहरी (Cerena), मधमाशी (Floria) व कोटी माशी (Stingless) असे चार प्रकार सह्याद्रीत आढळतात. आग्या मोहोळ हे उंच अनगड जागी कड्याला लागते. ते काढायला किमान आठ - नऊ लोकांचा गट असतो. त्यात रक्ताच्या नात्यातील, एकमेकाशी भावनिक नाते असणारे सर्वजण असतात. कमरेला दोर बांधून खाली टांगता राहणारा तो दोर गच्च पकडून ठेवणारा या दोघातील नाते बर्‍याचदा मेव्हण्याचे (बहिणीचा नवरा वा बायकोचा भाऊ) असते. त्यात जबाबदारीची जाणीव अधिक प्रबळ होत असावी.

दुसर्‍या प्रकारचे मोहोळ मोहरी माशीचे. ते झाडाच्या बुंध्यात दगडाच्या पोकळीत छोटी छोटी सहा सात पोळी निर्माण करतात. म्हणून तिचे नाव सातेरी. साधे मोहोळ झाडाला लागते आकाराने अगदी लहान कोटी माशी आपले पोळे घरातील बिळात घालते. या मधू दुनियेतील राणी माशी, कामकरी माशी, नर ही ओळख हे आदिवासी ‘मोधे’ (मध गोळा करणार्‍या व्यक्तिला ‘मोध्या’ म्हणतात) अगदी सहज सांगतात. मध कधी पक्व होतो, हिरडा - जांभूळ यांच्या फुलांपासून मिळणारा कडसर मध औषधी असतो. देवराया किंवा पवित्र बनात मध संकलन करण्यामागील तर्कशुद्ध कारणे त्याचा जैव सांस्कृतिक नियम परंपरेशी असणारा संबंध, हे सारं मोधे सहज सांगून जातात.

 

कारवीचा कैफ

सात वर्षांनी फुलणारी ‘कारवी’ तीन वर्षांनी फुलणारी ‘आखरा’ नावाची वनस्पती यापासून मिळणारे मध हे पांढरट रंगाचे असते. त्यात नैसर्गिक साखर जास्त असते. दमा आजारावर हे मध गुणकारी, असे गाव वैदू सांगतात. कारवी फुले आले की त्यातून मादक असा गंध सभोवताली पसरतो. फोफसंडीचे बुधाभाऊ वळे यांच्या भाषेत हा ‘कारवीचा कैफ’. किती सुंदर उपमा आहे ना ही! कारवीचे मधाळ कणीस मधमाश्या सोबत डांगी गुरांचा पण आवडता चारा. असे हे वनस्पती, मानव, जंगली वा पाळीव प्राणी यांचे सहजीवन-सहचर्य जंगलात भटकताना त्या परिसंस्थेचा एक भाग असणार्‍या वनोपजीवी समुदायाशी संवाद साधला तरच ध्यानी येते हा अनुभव वेगळीच अनुभूती नवी दृष्टी देणारा पण असतो.

चाळीसगाव डांगाणातील ठाकर महादेव कोळी हे मधमाशीविषयी खूपच नादिष्ट आणि छंदी असतात. आगी माशी असो वा सातेरी माशी, तिला शोधण्याची एक पद्धत आहे. होळी झाली की जंगलातील बहुतांश वनस्पती फुलायला लागतात लागलीच मधमाश्या पण आपले काम सुरू करतात. माश्या कुठे जातात कुठे पोळं बांधतात याचा शोध हे जाणकार मोधे घेतात. त्यासाठी भल्या पहाटे, दुपारी सायंकाळी ते माश्यांवर लक्ष्य ठेवतात. कोवळ्या उन्हाच्या तिरपीमध्ये माश्यांची जा-ये हेरतात. ठिकाणं निश्चित झाली की मे महिन्याच्या आसपास सातेरीचे पोळे पक्व होते. पोळे सील झाले म्हणजे मध साठवलेले पोळे त्या माश्या पांढर्‍या स्रावाने बंद करतात, तो मध पक्व झाल्याचा संकेत असतो.

 

पहिले पोळे ग्रामदेवतेला

मध गोळा करण्याची प्रक्रिया खूपच काळजीपूर्वक होते. झाडाच्या धोर्‍यात किंवा दगडमातीच्या बिळाचे अत्यंत सावध हळुवारपणे निरीक्षण होते. मग गरजेपुरते ते बिळ मोठे करतात. बिळात तोंडाने हवा फुकतात. मग त्या सातेरी माश्या पोळ्यावरुन उठतात बाजूला जाऊन बसतात. मग हाताने एक एक पोळे बाहेर काढले जाते. दोन - तीन पोळी आहेच तशीच ठेवली जातात. खरा मोध्या पूर्ण वसाहत कधीही काढत नाही, मधाचे दोहन करताना हेच ते शहाणपण पिढ्यान् पिढ्या वापरले जाते आहे. मग ते बीळ योग्य आकाराचा दगड वापरुन बंद केले जाते. फक्त माश्यांना जा - ये करण्याइतपत फट ठेवली जाते. हंगामातील पहिले मधाचे पोळे स्थानिक ग्राम देवतेला भोग (नैवेद्य) म्हणून चढवतात. मग घरी आणून खाल्ले जाते घरगुती वापरासाठी साठवून ठेवतात. मेण पण कढवून ठेवतात.

लहानपणी दोन वाट्या मध एकदाच खाल्ले तर दोन दिवस भुकच लागली नाही, असे मजेदार किस्से वयोवृद्ध मंडळींकडून ऐकायला मिळतात. मध विक्रीसाठी आदिवासींना फार श्रम पडत नाही. पर्यटकांचा ओघ वाढल्याने सातेरीचे कडसर मध चारशे पाचशे रुपयांना सहज विकले जाते. दरवर्षी सत्तर-ऐंशी किलो मध विकून चांगला आर्थिक लाभ होत असतो.

 

मधमाश्यांवरचे संकट

आज घडीला मात्र हे मधमाश्यांचे विश्व संकटात आहे. सह्याद्रीची सातेरी धोक्यात आहे. स्थानिकांच्या निरीक्षणानुसार दरवर्षी मध मिळेलच याची खात्री नाही. त्याची अनेक कारणे आहेत, काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित! जंगल क्षेत्र कमी होत आहे, माश्यांना उपयुक्त वनस्पती घटत आहेत. त्याची जागा नव्या झाडोर्‍यांनी घेतली आहे. मुक्त चराईमुळे फांगळा वनस्पती कमी होत आहे. तिच्यावर मधमाश्या मोठ्या प्रमाणात पंजारतात म्हणजे फुलांतून मध गोळा करतात. माश्यांना आवश्यक असणारा गारवा, पिण्यासाठी पाणी यांचा तुटवडा जाणवत आहे. हवामान बदल, पावसाचे प्रमाण, शेतीतील रसायनांचा वापर अशा असंख्य कारणांनी मधमाशा स्थलांतरित होत आहेत किंवा मरत आहेत.

या पार्श्वभूमीवर, मधमाश्या वाचवण्यासाठी सर्वदूर सकारात्मक प्रयत्नही होत आहेत, वातावरण निर्मिती होते आहे. अभ्यासक, संशोधक, निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी अनेक सूचना करत असतात. पण हे सर्व कोणाच्या हाती आहे. उर्जाप्रधान, अतिकेंद्रीत असे नागरीकरण, विकास प्रकल्पाच्या नावाखाली होणारा जंगलांचा ऱ्हास, एकसुरी पीक पद्धत त्यातील रसायनांचा अमर्याद वापर, आदिवासी वन यांच्यातील दुरावत चालले नाते, विपरीत अशी सरकारी धोरणे यांचा प्रभाव सर्वच नैसर्गिक संपत्तीवर होत आहे. त्यातील अति महत्वाची मधमाशी आहे. तिच्यावर आजही अवलंबून असणारे समुदाय, शेतकरी यांची तर जबाबदारी आहेच, पण या सर्वांवर ज्या नागरी घटकांची अन्नसुरक्षा आरोग्य अवलंबून आहे त्यांनाही मधूदुनिया समजावून घ्यावी लागेल, सर्वच घटकांना संवेदनशील व्हावे लागेल. अन्यथा मधमाशा पूर्वी होत्या, आता दिसत नाहीत, असे विषण्ण संवाद करत बसावे लागेल.

- विजय सांबरे

[email protected]

(फोटो सौजन्य - विजय सांबरे)

भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील ही अठरावी गोष्ट.

भवतालविषयक दर्जेदार माहितीसाठी उत्तम पर्याय - bhavatal.com

(इतरांसोबत शेअरही करा.)

7 Comments

फारच उपयुक्त माहिती .व पर्यावरण र्हासाचा विचार करण्याची देणारा लेखजाणीव

Bhavatal Reply

धन्यवाद सर.

सर,बालपणी काढलेलं मोहळ आणि त्यातून पाच मित्रांनी वाटून खाल्लेला मध याची आठवण झाली.

Bhavatal Reply

खरंच, अनेकांना बालपण आठवले असेल. प्रतिक्रियेबद्दल आभार.

धन्यवाद सर , जबरदस्त माहिती

Bhavatal Reply

आभार.

"मेण कढवणे" वाचून मला माझ्या वडिलानं मला शिकवलेलं, मेण कढवून साठवण्याचं कसब आठवलं

खूपच छान सर ... अप्रतिम माहिती दिली.. कारण आत्ताच्या काळात मध हे फक्त एका ब्रँडेड कंपनीचे आणि packed केलेले असते.. त्यामुळे हे packed केलेले मध नेमकी आले कोठून?... त्याची नेमकी process काय ? या गोष्टी जाणून घेतल्यानंतर खरोखरच खूपच छान वाटलं ... खरे आपला जुन्या परंपरा आदिवासी लोक खूपच प्रामाणिकपणे पार पाडताना दिसतात...... धन्यवाद सर

Bhavatal Reply

अगदी खरंय. धन्यवाद.

मध ,मधे , मधमाशांबद्दल खूपच छान माहिती मिळाली .

Bhavatal Reply

धन्यवाद.

Sushant Arvind Salokhe

What a Study! this is really serious issue and need to be communicated to all. Thanks a lot

Bhavatal Reply

Yes, You said it. Need to understand these issues in detail and in depth. Thank you.

Your Comment

Required fields are marked *

You may also like