Articles 
कळलावी आणि आमची गौराय!

कळलावी आणि आमची गौराय!

आज गौरीचा सण. कोकणाच्या काही भागात गौरी असते ती निसर्गातल्या घटकांची. ही अगदी आगळीवेगळी प्रथा. पण आता हे निसर्गघटकच जवळजवळ नामशेष होताहेत तर भविष्यात हे सारं बहुदा फोटोतच बघावं लागेल. हे नेमकं काय घडतंय? ‘भवताल’ च्या वाचकांसाठी लिहताहेत, पालघर जिल्ह्यातील शिक्षक श्री. किशोर काठोळे

….

गौरी पूजनाची आगळी परंपरा

जेष्ठा गौरी आवाहनाच्या दिवशी पालघर, ठाणे या दोन्ही जिल्ह्यांत बहुतांश घरांमध्ये गौरी पूजनाची वेगळी परंपरा आहे. या दिवशी कळलावी नावाच्या एका रानटी वेल वजा झुडूप असलेल्या फुलांंच्या काड्या, सोबत वेली आणि फुलांनी सजवून मनोभावे पूजन करतात.

कृषकसंस्कृती तसेच निसर्गपूजक मानवी परंपरांमधील गौरी पूजन हा तसा महत्त्वाचा सण. गणपती पाठोपाठ अगदी आनंदात साजरा होतो. कळलावी किंवा अग्निशिखा (वनस्पतिशास्त्रीय नाव- gloriosa superba) ही नितांत सुंदर वनस्पती. तिचे अनेक औषधी उपयोग आहेत.‌  कळलावीच्या या मोहक रुपाला भुलून तर नसेल ना हा पूजेचा मान?

गौराय खांद्यावर घेऊन येणारी मुल्हारी

शेताच्या बांधावर, एखाद्या झाडाच्या आडोशाला नाहीतर करवंदीच्या जाळीच्या वर पावसाळ्याच्या मध्यावर ही अग्निशिखा दिमाखात फुलते. झाडाचा आधार घेत काटेकुटे चुकवत ही हमखास डोकं वर  काढून फुलणार. शाळांमधील मुली, कष्टकरी बाया येता जाता एखादं फुल हलकेच तोडून केसात माळणार. लाल पिवळा रंगाचा साज चढलेल्या फुलाची शोभा आणखीच वाढते मग.

गौरी आवाहनाच्या एक दोन दिवस आधी कळलावीच्या काही फांद्या आणायच्या. तिला सजवायला रानहळदीचं (शिंदी) फूल, गोमेटी, गायगवारी, कंटोळी, कडुकांद यांच्या वेली घ्यायच्या. दिंड्या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका  रानभाजीच्या मोठ्या पानात हे सारं छान बांधून सजवलं की, गौराय झाली तय्यार. ही गौराय खांद्यावर घेऊन तिचा मुल्हारी घरी येतो. घरात गऊर आली आहे याचं प्रतिक म्हणून तांबड्या मातीचे पट्टे ओढून तांदळाच्या पिठाने हाताच्या मुठीचे ठसे मारायचे. स्वयंपाकघरात ही ‘गऊर’ मोठ्या थाटात विराजमान होते.

ढोलकीच्या ठेक्यावर नाचगाणं

पुढे माठाच्या भाजीचा नैवेद्य आणि जमेल तसं गोड धोड करून सण करायचा. या बरोबरच गावातील एखाद्या घरी सणाच्या काही दिवस आधीच ढोलकीच्या ठेक्यावर नाचगाणं सुरू झालेलं आसायचं. गौरी जागवायला नाचत गाणी म्हणत रात्र काढायची. पूर्वी सहज कुठेही फार न हिंडता मिळणारी ही कळलावी आता आख्खं रान हिंडून मिळायला मुष्किल झाली आहे. आपल्या आधी कोणी नेईल म्हणून बरेच दिवस आधीच फांद्या आणून ठेवल्या जातात. तसेच कधी फांद्या झुडपात कुणाच्या नजरेस पडू नयेत म्हणून दडवून ठेवल्या जातात. सणासुदीच्या दिवसांत चार पैसे मिळतात म्हणून आता बाजारात तयार गौरी विकायला असतात. बिया पडतील त्या रुजतील इतका अवकाश आहे कुणाला?

या साऱ्या प्रकारामुळे या वनस्पतीची संख्या वेगाने घटते आहे. या कळलावीला फुलं येऊन गेल्यावर बिया तयार होतात. या बिया रुजून कंद तयार होतात, पुढे बरीच वर्षे ती वाढते. मात्र, सणासाठी होणारी तोड वनस्पतीला समूळ संपवू नये म्हणजे झालं. एखादी वनस्पती तिच्या खास आधिवासात वाढते तेव्हा ती तिथल्या परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असते. एखाद्या प्रजातीचं नष्ट होणं हे निसर्गासाठी घातकच.  पुजापात्रीच्या नावाखाली पाने तुटणाऱ्या वनस्पती बाबतीत हेच सर्रास होत आहे.

आज शिक्षित समाजाने तरी या परंपरेतील महत्त्वाच्या बाबी समजून घेणे गरजेचे आहे. तसं झालं तरच ही कळलावी ऊर्फ अग्निशिखा, म्हणजे आमची गौराय वर्षानुवर्षे विराजमान होईल. नाहीतर तिच्या जागी तिचा फोटो किंवा मूर्ती लावून पूजा करायची वेळ येईल.

bhavatal.com

तुम्हीसुद्धा “भवताल”साठी आपल्या परिसरातील निसर्गपरंपरा, त्यातील बदल व संबंधित गोष्टींबाबत लिहू शकता.

संपर्क :  [email protected] / +919545350862

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like