Articles 
गावाचा अलिखित इतिहास सांगणाऱ्या टापूंची गोष्ट (भाग १)

गावाचा अलिखित इतिहास सांगणाऱ्या टापूंची गोष्ट (भाग १)

गावाचा अलिखित इतिहास सांगणाऱ्या टापूंची गोष्ट ! (भाग १)

(भवतालाच्या गोष्टी २०)

 

पाराळा. औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील एक गाव. ते मन्याड नदीच्या खोऱ्यात आहे. या गावाची जैव विविधता शोधून त्याची नोंद वही तयार करण्यात आली. त्यासाठी २००८ ते २०१८-१९ या काळातील निरीक्षणे आणि अनुभवसंपन्न लोकज्ञान यांचा आधार घेण्यात आला. हे करत असताना पाराळा गाव आणि मन्याड नदी खोरे-डोंगरातील ३० टापूंना अनेक वेळा भेटी देण्यात आल्या. त्यातून गावाची जडणघडण, निसर्ग-भूगोल, प्रथा-परंपरा, चालिरिती, शेती-पाणी याच्याशी संबंधित अनेक गोष्टींवर प्रकाश पडला.

टापू म्हणजे काय?

तर पारंपारिक नाव असलेला गावाचा विशिष्ट भूभाग. या टापूंना तऱ्हतऱ्हेची नावे पडली आहेत. ती पिढ्यान् पिढ्या चालत आली आहेत. ही नावे तेथील कित्येक दशकांतील फळझाडे, झुडपे, गारीचे रंगीत दगड, झरे-ओढे, जिवंत पाण्याचे स्रोत, नदीची विशिष्ट वळणे, आकार, पशु-पक्षी, आदिवासींचे देवप्राण्यांच्या पाऊखुणा यावरून दिलेली आढळली, तर काही नावे ऐतिहासिक घटनांमधून आली आहेत. तशा स्पष्ट खुणाही लोक दाखवतात.

या टापूंच्या माहितीतून शेकडो वर्षांमधील जैवविविधता काय होती, याचे दर्शन घडते. आजही ८०-९० वर्षांची दोन-तीन माणसे यातील काही खुणा पाहिल्या असल्याचे सांगतात. मी स्वत: या खोऱ्यात ४३ वर्षांपूर्वी आलो, तेव्हा काही टापूतील रंगीत दगड, प्रचंड झाडी-वृक्ष पाहिले होते. या बहुतांश टापूत भिल्ल-आदिवासी कुटुंब वनजमीन कसत आहेत. त्यांच्या हक्कांसाठी घटनात्मक मार्गाने ३५-३६ वर्षे अथक चळवळ केली. त्यानंतर ७९ भिल्ल-आदिवासी शेतकरी कुटुंबांना `वन हक्क कायदा २००६’ नुसार २०११-१२ मध्ये वन हक्क मिळाले आहेत. तेथील काही टापूंची ही ओळख...

गोंधणदरा आणि चुलंगण

मन्याडच्या नदी-खोऱ्यात गोंधणाची झाडे-झुडपे आहेत. सरपण, औषधासाठी यांचा उपयोग होतो. मन्याड साठवण तलाव बांधून आज १७-१८ वर्ष झाली. तत्पूर्वी या भागाचा आकार चुलीसारखा होता. म्हणून या भागाला चुलंगण म्हणायचे.

 

जुनोने

पाराळा येथील गट नं. ४२ मधील ओढ्यामध्ये वडाचे झाडाखाली पाण्याचा झरा (झिरा) आहे. तो आजही जिवंत आहे. हे पाणी सर्वांत जुने पाणी (जिवंत असलले पाणी). म्हणून या जागेला जुनोने किंवा जुनाने या नावाने सारा परिसर ओळखतात. मृग वा रोहिणी नक्षत्रांमध्ये पहिला पाऊस पडतो, तेव्हा गढूळ पाण्याबरोबर कासव पिल्ले बाहेर येतात. म्हणून येथे कासवांचा पाऊस पडतो, असे म्हणतात. ही पिल्ले मी १९७८ ते ८५ मध्ये पाहिली होती.

जुने पाणी

जुनोने प्रमाणे याचा इतिहास आहे. हा डोंगराळ भाग. वडाच्या झाडाखाली बारमाही जिवंत पाण्याचा झरा. तेथे आदिवासींचे दैवत आहे. पिढ्यान् पिढ्यांपासून भिल्ल-आदिवासी मृग नक्षत्राच्या तोंडावर कंदुरीसाठी एकत्र येतात. दर तिसऱ्या वर्षी कंदुरी केली जाते. त्यावेळी बोकड कापतात. चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि पुरुषांनी केलेला बोकडाच्या मटणाचा नैवेद्य म्हसोबाच्या गाडीवाना ला देतात. प्रत्यक्ष म्हसोबा व साती आसरा यांना मात्र चोखा नैवेद्य देतात. तो निखळ शाकाहारी असतो. यात डाळ, भात, कुरडया, भजे व गुळाचा खडा किंवा साखर असते. जुने पाणी परिसरात करवंदांच्या जाळ्या आहेत. या जाळ्यांमध्ये गोड्या मोहोळ, लाल गांड्या मोहोळ खूप सापडते. यातील लाल गांड्या मधमाशा या अधिक चावतात. जुने पाणी लगतच (लागून शेजारच्या थडीला) राजहंसाचा पाला (काळा राजहंस) सापडतो. हा पाला तोंड येणे, शरीरात अधिक उष्णता असणे या सारख्या आजारांवर वापरला जातो.

धोदाणी (धबधबा)

मन्याडच्या पाण्याला जुनोन्यातील नाला मिळतो. गोंधणदरा नाला तिथे येवून मिळतो. त्यामुळे तिथे खूप खोल दरी तयार झाली. त्यातून धबधबा तयार झाला. या वाहणाऱ्या पाण्याला धो धो वाहणारे पाणी म्हणून याचे नाव धो-दाणी पडले.

चोरथापी (सोरथापी)

या परिसरासाठी बाजारपेठ नांदगाव (नाशिक जिल्हा) होती. त्यासाठी पायवाट व गाडीरस्ता (गाडरस्ता) येथून जायचा. हे ठिकाण सर्वांत उंच ठिकाण. चोरांचा अड्डा. ज्यांना रोजगार साधन, जमीन-जुमला नाही. पाटलांच्या जमिनीचे राखण भिल्ल माणसे करत. ते जागले. कुटुंबांचे पोट भरत नसे. त्यामुळे काही लोक चोरथापी येथे दबा धरून बसत. वाटसरूंना लुटत. विविध रंगी गारीचे दगड सापडत. त्याला गारखिळा म्हणतात. झुडपांनी भरलेला परिसर. बसण्यासाठी साबरीच्या झाडी-झुडपांची गुहा तयार केली गेली होती. म्हणून हा टापू सोरथापी-चोरथापी.

 

हरण टेकी

चोरथापी परिसरातच हरण टेकी (हरण टेकडी) आहे. सर्वांत उंच ठिकाण. येथे सर्वाधिक हरणे होती. त्यावर हरणे पाठ करून चार दिशेने बसत. वाघासारख्या शिकारी प्राण्यावर लक्ष ठेवत, स्वत:चा बचाव करीत.

गवळण टेकी

हरण टेकी ला लागूनच गवळण टेकी (गवळण टेकडी). उंच ठिकाण. त्यामुळे या परिसरात गवळी त्यांच्या गायी-बैल-वासरे घेऊन रहायचे. पुरुष गवळी जेव्हा गायी-बैल चारण्यासाठी जंगलात जात. तेव्हा छोटी वासरे सांभाळायची कामे स्त्रिया (गवळणी) करायच्या. वाघासारखा जंगली प्राणी या परिसरात आल्यावर हरण टेकी वा हरणांचे कळप पळायला लागायचे आणि त्यावेळी गवळणींना समजायचे की, शिकारी-जंगली प्राणी आले आहेत. आणि आपापली गुरं-वासरांचे रक्षण करायचे. या परिसरात पवन्या चे सकस गवत प्रसिद्ध आहे.

खुन्याची टेकी

स्वातंत्र्यपूर्व काळात निझाम राजवटीत येथील पायवाटांवर जकात नाके होते. गवळण टेकी लगतच खुन्याची टेकी (खुन्याची टेकडी) आहे. थोडासा उताराचा भाग. तेथे ममदापूर व पाराळा या गावांची शीव. येथे रानात दोन गावांच्या दोन गटांमध्ये वनचराईवरून वाद. येथे पवन्या सकस गवत व बारमाही पाणी आहे. त्यामुळे सर्वच धनगर शेळ्या-मेंढ्या-घोडे, गावातील गाय- बैल (गाय-गवार) घेऊन चरायला यायचे. आजही हा परिसर यासाठीच प्रसिद्ध आहे. त्यातून दोन गटांमध्ये भांडण वाढले व त्याचा परिणाम खून होण्यापर्यंत झाला. म्हणून या टेकडीला खुन्याची टेकी म्हणतात.

सातकुंड

नाशिक जिल्हा, येवला तालुक्यातील ममदापूरची नदी पाराळा शिवारातील जंगलात प्रचंड वेगाने येते. आधी तिचे पात्र रुंद आहेपाराळा शिवारात उतरल्यावार ती चिंचोळी बनते. त्यामुळे तिच्या पाण्याचा प्रवाह आवाज करीत वाहतो. त्यातून सात धबधबे पडतात. त्यामुळे खडकामध्ये नैसर्गिक, मोठ्या, गोल आकाराची गोलकुंड तयार झाली. म्हणून हा परिसर सातकुंड नावाने प्रसिद्ध आहे.

बरम्यावीर

सातकुंडाच्या वरच्या थडीला बरम्यावीराचे मंदिर आहे. बरम्यावीर नावाचा साधू येथे राहायचा. सातकुंडावर स्नान करून तेथेच ध्यान साधना करायचा. त्याच्या नावाचे हे मंदिर आहे. मंदिर म्हणजे झाडांच्या मध्ये मोठा गारीचा दगड. भिल्ल, धनगर इ. समाज त्यांना मानतात. श्रावण महिन्यात तिसऱ्या शनिवारी येथे पूजा-अर्चा होते.

 

एक कुंड (बोकडदरा)

वेगवान प्रवाही नदीवर मन्याड नदीच्या संगमाच्या उतारावर एक कुंड आहे. सातकुंडाप्रमाणेच याची निर्मिती. या भागात बोकडाचा पाय खडकावर नदीच्या पात्रात उमटला आहे असा सर्वांचा समज. म्हणून एक कुंड परिसराला बोकडदरा नावानेही ओळखले जाते. येथे कुंडामध्ये ते खोल असल्यामुळे पाणी असते. माणसे पोहरा टाकून पाणी काढून पितात. साधारणपणे संक्रांतीपर्यंत (जानेवारी) कुंडामध्ये पाणी असते.

भोपळ्याचे जाळवण

येवला तालुक्यातील जरंडी, राहाडी गावे आणि पाराळाचे शिवार मिळून या भागाला भोपळ्याचे जाळवण म्हणतात. झुडपी-जंगलात भोपळ्याचे (रानभोपळा गोलाकार) वेल मोठ्या प्रमाणावर होते. हा भोपळा वाळवून आत कोरून श्रावणात तिसऱ्या सोमवारी महादेवाला पाणी वाहून नेण्यासाठी वापरतात. आज त्याचे रोपही सापडत नाही. या परिसरातील जिवंत पाण्याचा वापर करून बंजारा, भिल्ल व बौद्ध समाजातील कुटुंबं वन जमिनी कसत होती. बाजरी (गावरान), कुळीथ, मठ, चवळी, मुग्या, कपाशी, तूर, कपाशी, कांदे, चवळी, आदी पिके घेतात. यापैकी बाजरी, कुळीथ, मठ, चवळी, मुग्या (बियाण्यावर ठिपके असलेला मुगाचा एक प्रकार) ही गावरान बियाणे अत्यंत चांगल्या प्रतीची तयार केलेली आहेत.

कवठीची बारी

चार गावांच्या शिवेवरील खोलवर दरीतील हे ठिकाण. कवठीची खूप झाडे-जाळी होती. तेथे पायवाट व गाडीरस्ता होता. माणसांची वर्दळ होती. म्हणून चोरांचे लपण्याचे ठिकाण. येथे लूटालूट पूर्वी खूप होत होती. दरीमध्ये एका कवठाच्या झाडाखाली नवनाथांपैकी एका नाथांची समाधी आहे. या समाधीखाली सात कढ्या धन आहे असा समज आहे. जी माणसे धनाच्या आशेने जातात आणि खोदण्याचा प्रयत्न करतात, एकतर ती माणसे आंधळी होतात किंवा जमिनीमध्ये गाडली जातात. चारी बाजूंनी दगड येतात, असा पूर्वापार समज आहे. या ठिकाणी एकाला लागून अशी कवठीची बारा मोठी, उंच झाडांची जाळी होती. म्हणून या भागाला कवठीची बारी म्हणतात.

अशा या टापूंच्या कथा गावाचा अलिखित इतिहास सांगतातगावाची वैशिष्ट्यं, चालिरिती, भूगोल यांचीसुद्धा माहिती देतात आणि संपूर्ण गाव आपल्या डोळ्यासमोर उभं करतात.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही विसावी गोष्ट.)

शांताराम पंदेरे, औरंगाबाद

[email protected]

फोटो =

खुन्याची टेकी

जुनेपाणी-राजहंस

कंदुरी 

हरण टेकी

एककुंड

 

पुढच्या भागात,

होळीच्या विस्तवामुळे मारले गेलेल्या, झांज्या-पुंज्या पहेलवानांची गोष्ट !

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय-   bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

1 Comments

Hemant Jadhav

खरच त्या त्या ठिकाणाची वैशिष्ट्या मुळेच पुर्वापार नावे पडलेली असणार..

Bhavatal Reply

गावोगावी या गोष्टी आहेत. तो आपला वारसा आहे. आभार.

Your Comment

Required fields are marked *

You may also like