Articles 
होळीवरून मारल्या गेलेल्या झांज्या-पुंज्या पहेलवानांची गोष्ट!

होळीवरून मारल्या गेलेल्या झांज्या-पुंज्या पहेलवानांची गोष्ट!

होळीवरून मारल्या गेलेल्या,

झांज्या-पुंज्या पहेलवानांची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी २१)

प्रत्येक गावात अनेक टापू असतात. टापू  म्हणजे  पारंपारिक  नाव असलेला  गावाचा  विशिष्ट  भूभाग. 

या टापूंची तऱ्हेतऱ्हेची नावे आणि  त्या नावांच्या सुरस कथा. त्यांच्यावरून गावाची  जडणघडण  कशी  झाली आहे ते समजते. तसेच, त्या भागाच्या नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक इतिहासावर प्रकाश पडतो. अनेक रंजक गोष्टीसुद्धा उलगडतात. औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील पाराळा हे गाव. तिथल्या टापूंच्या भन्नाट गोष्टी मागच्या भागात वाचल्या. त्याचाच हा पुढचा भाग. या भागात झांज्या-पुंज्या, हेंकळदरा, टपक्याचे लवण, धारकडा, नकटीचा ओहोळ... अशा अनेक टापूंच्या गोष्टी.

त्या कदाचित तुमच्या गावातील वेगवेगळ्या ठिकाणांची आठवण करून देईल... बघा, काही आठवतंय का?

बोरतळे

रहाडी, वडजी व पाराळा या गावांच्या शिवेवरील हे ठिकाण. पूर्वी हा भाग गावरान आणि अत्यंत बारीक, गोड, आंबट बोरांसाठी प्रसिद्ध होता. दोन डोंगरांच्या मधून गाडरस्ता गेला आहे. तेथे निसर्गत:च पाणी धरणाप्रमाणे अडवले जाते आणि दिवाळी ते जानेवारीपर्यंत जनावरांसाठी राखले जाते. याच्या शेजारीच गावरान बोरींच्या बुटक्या उंचीच्या जाळ्या आहेत. म्हणून या भागाला बोरतळे म्हणतात.

आंब्याचा ओढा

पूर्वी येथे आंब्याची अनेक झाडे होती. तेथे एका प्रचंड मोठ्या आंब्याच्या झाडाजवळून ओढा वाहायचा. एप्रिल, मे, जून महिन्यांच्या कडक उन्हात या आंब्याच्या सावलीखाली शेकडो शेळ्या, मेंढ्या, गायी, बैल बसायचे. थंडगार पाणी प्यायचे. आज हे झाड तोडले गेले. ओढा मात्र आहे. म्हणून हा आंब्याचा ओढा !

 

पिंडीचा डोह

मन्याड नदी उंचावरून खाली वाहत असताना पाण्याच्या प्रचंड वेगामुळे पात्रामध्ये पिंडीच्या आकाराचा दगड तयार होऊन त्याच्या भोवती मोठा डोह तयार झाला आहे. या पाण्याच्या प्रवाहामुळे शेजारच्या दगडी कड्यामध्ये नागफणीच्या आकाराचा दगड कोरला गेला आहे. त्यामुळे हा परिसर ’पिंडीचा डोह’ या नावाने ओळखतात. या ठिकाणी जंगल दाट होती. या गुहेत जंगली प्राणी होते. या परिसरात लळई, रानवांगी मोठ्या प्रमाणात आढळतात.

इनामी जमीन

निजाम राजवटीमध्ये निजामाने सुमारे ५० एकर जमीन वडजीच्या मुसलमान कुटुंबांना इनाम (बक्षिसी) म्हणून जाहीर केले. ती अत्यंत काळी, सुपीक जमीन आहे. आजही ही कुटुंबं आदिवासींसोबत मैत्रीच्या नात्याने राहत आहेत.

हेंकळदरा

मन्याड नदीचे पात्र आणि दोन्ही उंच थडीचा परिसर यामध्ये हा येतो. हा परिसर हेंकळणी या औषधी वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे. या वनस्पतीपासून तेल काढून संधीवात आजारासाठी वापरतात. आजही हेंकळणीच्या झाडांच्या जाळ्या या भागात आहेत. म्हणून या परिसराला हेंकळदरा नावाने ओळखले जाते. या परिसरात पूर्वी वाघाचे वास्तव्य असायचे. त्यांच्या गुहा आजही पाहायला मिळतात. एका जुन्या कवठीच्या झाडाजवळ मोठे भुयार सापडले आहे. हे भुयार ऐतिहासिक असावे असे बोलले जाते. या परिसरात सायाळ (साळींदर) प्राणी आढळतो.

 

रायजांभूळ ओढा

याच जमिनीत पुढे रायजांभूळ ओढा वाहतो. तो पुढे मन्याड नदीला मिळतो. रान जांभळाची खूप झाडे होती. म्हणून रायजांभूळ ओढा.

झांज्या-पुंज्या

रायजांभूळ ओढा व हेंकळदरा परिसराला लागून झांज्या-पुज्या नावाच्या दोन टेकड्या उभ्या आहेत. झांज्या-पुंज्या या नावाचा शोध घेताना एका महिलेने त्याची कहाणी सांगितली. पाराळा, भादली, वडजी परिसरातील गावात होळी सणाबाबत एक समज होती. होळीचा विस्तव जो गाव घेऊन जाईल, त्या होळीच्या गावची लक्ष्मी (दौलत-संपत्ती-बरकत) दुसऱ्या गावात विस्तवाबरोबर जात असे. म्हणून होळी पेटवली की रात्रभर पहारा असे. या पहारेकरी पहिलवानांना सणासाठी गावाच्या वतीने खुराक दिला जात असे. एका प्रसंगात होळीचा विस्तव नेताना दोन्ही गावांची हाणामारी झाली. त्यात झांज्या-पुंज्या नावाचे दोन पहेलवान मारले गेले. हे सारे आदिवासी-बलुतेदार-दलित होते. त्यांच्या नावाने या दोन टेकड्या ओळखल्या जातात.

पिंपळचोंडी

या ठिकाणी पूर्वी वड, पिंपळ व चिंचेचे वृक्ष होते. डेरेदार वृक्षांवरून या परिसराला पिंपळचोंडी म्हणतात.

मेळ

मन्याड, शेरकडा आणि वडजीकडून राजापूरमार्गे येणारी नदी यांचा संगम येथे झाला. त्याल मेळ म्हणतात. येथे पवन्या, कुसळी गवत खूप प्रमाणात आहे.

वरचा मेळ

बरम्यावीराजवळून येणारी नदी, बोकडदरा व सातकुंड या नदी-नाल्यांचा संगम (मेळ) वरच्या बाजूला झाला. तो परिसर वरचा मेळ नावाने ओळखला जातो. कुसळी गवत व पवन्या गवत या भागात प्रसिद्ध आहे.

घारकडा (धारकडा) 

या कड्यावर घार पक्ष्याचे राहण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी आजही माणूस जाऊ शकत नाही. इतके उंच व घारींचे साम्राज्य असलेले ठिकाण. याला घारकडा हे नावही आहे. दोरखंड धारीने तुटतो आणि लोखंडी साखळीने माणूस कड्यावरून खाली यायचा प्रयत्न करतो, तेव्हा घारी त्याच्यावर तुटून पडतात. दगडाच्या घामाला शीलाजीत म्हणतात. या घारकड्यांवर मोठे-मोठे साप, नाग आहेत. येथे दगड घाम आणि परिस आहे, असे बोलले जाते. जेथे परिस तेथे घारींचे ठिकाण आणि जेथे ’दगडांचा घाम’ तेथे सापांचे ठिकाण आहे असे समजते.

नागझरी

येथे नागाचे दैवत आहे. येथे बारमाही जिवंत पाणी आहे. नागपंचमीला येथे आदिवासी जमतात व पूजा करतात. मात्र, महिलांनी प्रसाद खाऊ नये ही प्रथा होती. आता मात्र आदिवासी, बंजारा समाजातील महिला तो प्रसाद खातात.

जीतपाणी

पूर्वी या ठिकाणी वीज पडली होती. तेथे कायम पाणी, जिवंत पाणी आहे. म्हणून जीतपाणी म्हणून हा भूभाग ओळखला जातो.

टपक्याचे लवण

या परिसरात पूर्वी वाघ रहात होते. हा भाग जांभूळ झाडांनी भरलेला होता. तो भाग या जांभळवन नावाने प्रसिद्ध आहे. येथील ओढ्यात सतत पाणी टप टप टपकत असते. म्हणून हे टपक्याचे लवण.

वीज झिरा

येथेही पूर्वी वीज पडली होती. पावसात ही वीज पडली. तेथे आजही जिवंत पाणी आहे.

टाका (परधुना)

वीज झिऱ्याजवळची जागा. येथे पाण्यावर गावातील बाया धुणी धुवायला जायच्या. येथे त्यांच्या आपापसात सुखदु:खाच्या गप्पागोष्टी व्हायच्या. ती गावठाणाजवळची जागा ’टाका’ वा परधुना’ नावाने प्रसिद्ध आहे.

नकटीचा ओहोळ

आताच्या पाराळा गावातील तांड्यांजवळच्या नाल्याला ’नकटीचा ओहोळ’ म्हणतात. या नावामागील कहाणी अशी- गावातील महिलेने जर एखादे वाईट कृत्य केले तर गावपंचायत बसत असे व त्या महिलेला शिक्षा केली जाई. त्या शिक्षेची अंमलबजावणी तिच्या घरच्या माणसांनी करायची. तिचे नाक, कान, स्तन अर्धे कापायचे; डोक्यावरचे केस भादरायचे आणि त्यावर शेंदूर लावला जायचा. त्यानंतर तिला पूर्ण नग्न करून गाव शिवाबाहेर सोडायचे आताच्या `नकटीच्या ओहोळ´ मध्ये हे सारे कृत्य केले जायचे.

...अशा या टापूंची नांवं, तपशिल वाचताना तो मौखिक इतिहास म्हणून समजून घ्यावा असे वाटते. खरे-खोटे, तार्किक-अतार्किक, चांगले-वाईट, आदी विचार करत हे वाचू नये. वास्तविक या आणि अन्य गांवं-डोंगर-नदी खोरे-दऱ्यातील भिल्ल, ठाकर, कोकणा, पारधी, कातकरी वा विदर्भातील आदिवासी, भटके-विमुक्त  स्त्री-पुरूष समूहांचे अमूल्य लोकज्ञान, अनुभव, निरीक्षण, इतिहास, कथा, पुराणकथांमधून सामाजिक-सांस्कृतिक, लोकविज्ञान उलगडून सांगत, ते जतन करायचे काम-जबाबदारी शाळा-महाविद्यालये, विद्यापीठांची आहे... पण या पातळीवर सर्वच अंधार आहे.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही एकविसावी गोष्ट.)

- शांताराम पंदेरे, औरंगाबाद

[email protected]

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय-  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

5 Comments

radha

very interesting information, with central though aspects, without any biases. all we need to provide this non- biased trustworthy information to next generation.

Arvind Patil

मजेशीर नावे आणि प्रत्येकाला मजेशीर पार्श्वभूमी...

Bhavatal Reply

होय, या सर्वच गोष्टी रंजक आणि मजेशीर आहेत. असे सगळीकडचे दस्तावेजीकरण (documentation) व्हायला हवे.

Sunil Kaduskar

Interesting

Bhavatal Reply

Thank you.

ravindra a.wagh

अतिशय मजेदार माहीती भवताल मुळे वेगवेगळ्या टापू,प्रांतातील मिळते.

Bhavatal Reply

धन्यवाद. आपल्या भागातील अशा माहितीचा जरूर शोध घ्या, शेअर करा.

Hemant Jadhav

छानच मौखिक गोष्टिचा धुंडोळा...

Bhavatal Reply

धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like