Articles 
वळीव ते मान्सून पावसातील फरकाची गोष्ट!

वळीव ते मान्सून पावसातील फरकाची गोष्ट!

वळीव ते मान्सून, पावसातील फरकाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी २२)

 

महाराष्ट्रात, विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एखादा जोरदार पाऊस पडला की, ‘मान्सून आला वाटतं?’ असा प्रश्न विचारला जातो, मग तो पाऊस मान्सूनचा असो नाहीतर वादळी! हा प्रश्न मात्र मनात येतो आणि बरेच जण मान्सून आला असे गृहितही धरतात. खरंतर वादळी पाऊस आणि मान्सूनचा पाऊस यात मूलभूत तफावत आहे.

 

वादळी पाऊस म्हणजे अवखळ, गरजणारा, अस्वस्थ, अस्थिर आणि अपूर्ण; याउलट मान्सूनचा पाऊस म्हणजे शांत, स्थिर, संपूर्ण आणि भरवशाचा! एखादा नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला युवक आणि एखादा पोक्त अनुभवी प्रौढ यांच्या स्वभावात, वागण्यात असलेला फरक या दोन प्रकारच्या पावसाची तुलना करताना जाणवतो.

 

आक्रमकता, दिखाऊपणा

वादळी पावसाचा अनुभव घेण्याआधी जणू प्रसववेदना सहन कराव्या लागतात. उन्हाची ताप, असह्य उकाडा, घामाच्या धारा, जिवाची तगमग हे सहन केल्यावर मग कुठे वादळी पावसाची हजेरी लागते. सकाळपासून हा त्रास सहन केल्याचे फळ म्हणून दुपारनंतर हा बरसतो. अर्थात, एवढे झाल्यावरही त्याच्या बरसण्याची खात्री नसते. त्याची वातावरणनिर्मिती तर पाहावी अशीच. पाऊस किती पडतो, किती भागावर पडतो यापेक्षा याची आक्रमकता, दिखाऊपणाच जास्त! म्हणून तर सोसाट्याचा वारा त्याची वर्दी देतो, ढगांचा गडगडाट आगाऊ सूचना देतो. हे कमी असते म्हणून की काय जबरदस्त कडकडाट करणाऱ्या विजा उरल्यासुरल्या सर्वांनाच तो येणार असल्याचा इशारा देतात. पण कधी-कधी ही सर्व वातावरणनिर्मिती वांझोटीच जाते.

 

पण पाऊस पडला तर मात्र त्याचा झपाटा मोठा असतो. कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त. ते कमी वाटते म्हणून की काय याच्या जोडीने वाहणारा वारा व विजासुद्धा त्यात भर घालतात. हा पाऊस थोड्याच वेळासाठी धुमधडाक्यात हजेरी लावून गायब होतो, तो किमान पुढच्या दिवसापर्यंत तोंड दाखवत नाही. आणि पुन्हा पडणार असेल तेव्हाही तीच वातावरण निर्मिती, आक्रमकता आणि दिखाऊपणा!

 

भरवशाचा साथीदार

याउलट मान्सूनचा पाऊस ‘लगे रहो’ प्रकारातला. संततधार, सततची रिपरिप, कोणताही गाजावाजा नाही, फारसा वारासुद्धा नाही. कधी तर दिवस-दिवस, रात्र-रात्र पडत राहतो. मधूनच विश्रांती घेतो, मग पुन्हा ‘लगे रहो’. शेतीसाठी उपयुक्त ठरणारा, धरणे भरणारा, भूजलाची पातळी वाढविणारा तो हाच पाऊस! सर्व परिसर चिंब करून सोडणारा, वातावरणात गारवा पसरविणारा आणि सृष्टीचे रूप पालटणारा असा हा भरवशाचा साथीदार! पण एक मात्र निश्चित- वादळी पावसाचा धडाका अनुभवल्याशिवाय मान्सूनसुद्धा हजेरी लावत नाही. वादळी पावसाच्या वातावरणातूनच पुढे हा अचानक दाखल होतो.

 

हे वादळी पावसातून मान्सूनच्या पावसापर्यंतचे स्थित्यंतर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. त्याबाबत मला फार उत्सुकता आहे. हे स्थित्यंतर अनुभवणे व त्याबाबत निरीक्षणे करणे ही अतिशय रंजक बाब. प्रत्येक वेळी त्याचे आगमन पकडता येतेच, असे नाही. कधी आपण निरीक्षणात किंवा इतर गोष्टीत मग्न असताना मान्सून हलकेच दाखलही झालेला असतो.

 

स्थित्यंतराचा अनुभव

काही वर्षांपूर्वीच्या नोंदी आठवतात. बहुदा २०११ साल असावे. आतासारखीच जून महिन्याची सुरुवात होती. महाराष्ट्रात, विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली. दमदार पाऊस पडल्यावर हा वादळी (मान्सूनपूर्व, अवकाळी, उन्हाळी, वळीव... अशी त्याची अनेक नावे!) की मान्सूनचा, हा प्रश्न उपस्थित होणारच. त्या दिवशी पुण्यातही जोरदार पाऊस बरसला. सकाळपासून उकडत होते. हवेत भरपूर बाष्प होते. इतके की दुपारचे तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचले तरीही उकाड्याने हैराण केले होते. त्या पार्श्वभूमीवर सायंकाळी साडेचारच्या सुमारास अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. पाऊस वादळीच होता- गडगडाट, कडकटात, वारा आणि मोठ्या सरी! वादळीच पाऊस असल्याने तास-दीड तासाच थांबण्याची अपेक्षा होती. पण मध्ये जोर थोडा कमी झाल्यानंतर पुन्हा संततधार बरसू लागला. पुढे अगदी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत पडतच होता.

 

हा दुसऱ्या टप्प्यात पडणारा पाऊस गडगडाट किंवा विजांशिवाय होता. वातावरण चिंब बनले होते आणि गारवाही होताच. जणू वादळी पावसाचे रूपांतर हलकेच मान्सूनच्या पावसात व्हावे. अशा प्रकारे वातावरण बदलल्यासारखे वाटले. मी रात्री पावणेअकरा वाजता ऑफिसामधून निघून या रिपरिप पावसात भिजतच घरी पोहोचलो. रात्री पाऊस उघडला, पण हवेत चांगलाच गारवा होता. आकाशाकडे पाहिले तर चांदण्या ढगांआड दडल्या होत्या. मध्यरात्रीसुद्धा काही थेंब पडले. या स्थितीमुळे मलाही वाटले- बहुदा मान्सून आला. पण त्याची खात्री दुसऱ्या दिवशी पटणार होती. पुढच्या दिवशी दिवसभर वातावरण कसे राहते, यावर ‘वादळी की मान्सूनचा?’ याचे उत्तर मिळणार होते.

 

पहाटे तीनच्या सुमारास पुन्हा हलक्या सरींना सुरुवात झाली. हे पावसाचे वळीव ते मान्सून, असे स्थित्यंतर होते. ते प्रत्यक्ष अनुभवणे, उघड्या डोळ्यांनी पाहणे ही अतिशय रोमांचक बाब! हवामान विभाग कोणत्या पावसाला काय म्हणून जाहीर करतो, यापेक्षा हा अनुभव महत्त्वाचा. लक्ष असू द्या, कदाचित या आठवड्यात त्याची संधी घेता येईल!

 

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही बावीसावी गोष्ट)

 

- अभिजित घोरपडे

[email protected]

 

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय -  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

3 Comments

digambar gadgil

वादळी पावसाला मोन्सून समजून काही जन पेरण्य करतात आणि मान्सून लांबल्यास तोंडघशी पडतात

Bhavatal Reply

ओके. याबाबत जागरुकता आवश्यक आहे.

अमोल नाईक

अफलातून !

Bhavatal Reply

आभार.

Sushant Arvind Salokhe

Dear Writer, Thanks for brief on types of rain, This question was always there in my mind since childhood. Thanks for clearing the dout.

Bhavatal Reply

Glad that this article has helped to clear your doubts. Thank you for your reaction.

Your Comment

Required fields are marked *

You may also like