Articles 
मराठा साम्राज्याच्या मूक साक्षीदारांची गोष्ट!

मराठा साम्राज्याच्या मूक साक्षीदारांची गोष्ट!

मराठा साम्राज्याच्या मूक साक्षीदारांची गोष्ट!

- साताऱ्यातील ३०० वर्षे जुन्या वृक्षांचे काय होणार...?

(भवतालाच्या गोष्टी २४)

छत्रपतींची थोरली गादी म्हणजे सातारा. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज हे या शहराचे निर्माते. त्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा राजधानी डोंगरी किल्ल्यावरून समतल भागात आणली. त्यांनीच शाहूनगराचा म्हणजेच आजच्या सातारा शहराचा पाया रचला, तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्यावर कळस रचला. सातारा शहराच्या निर्मितीची शाहूपर्वापासून सुरू झालेली प्रक्रिया आजही निरंतर सुरू आहे. त्यात सातारा राजघराण्याने मौलिक योगदान दिले आहे. परंतु, आधुनिकीकरणाच्या रेट्यात ऐतिहासिक मूल्य असलेल्या अनेक गोष्टी आज नामशेष होत आहेत.
३०० वर्षांपूर्वीचा सातारा
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पश्चात राजाराम महाराज यांनी मराठा साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. त्याच वेळी छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज व त्यांच्या मातोश्री येसूबाई साहेब यांना शत्रु पक्षाने कैदेत ठेवले होते. तब्बल २० वर्षाच्या बंदिवासातून मुक्त झाल्यानंतर शाहू महाराजांनी सातारा या ठिकाणी राज्य कारभाराची सूत्रे हाती घेतली. त्यांचा राज्याभिषेक १२ जानेवारी १७०८ रोजी सातारच्या किल्ल्यावर म्हणजेच आजच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर झाला. त्यावेळचा सातारा फक्त किल्ला व मेटावरील काही भाग इथपर्यंतच मर्यादित होता.

किल्ले सातारा ही मराठ्यांच्या राजधानीची जागा म्हणून उदयास येऊ लागली तशी ती अपुरी पडू लागली. त्यामुळे राज्यकारभारासाठी राजधानीचा विस्तार होणे गरजेचे होते. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच राजधानीचे ठिकाण किल्ल्यावरून समतल प्रदेशात हलविण्यात आले. याची सुरुवात साधारण १७२१ च्या दरम्यान झाली. त्यावेळी किल्ल्याच्या पायथ्याशी रंगमहाल, अदालत वाडा, तक्ताचा वाडा यासारख्या प्रशासकीय व राजघराण्याच्या वास्तूंची निर्मिती झाली.

पाणीव्यवस्था, अनेक बागा
छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे त्यावेळच्या शाहूनगर म्हणजेच आजच्या साताऱ्यात असंख्य नवनवीन गोष्टींची निर्मिती होऊ लागली. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे साताऱ्याची पाणी व्यवस्था. राजधानीचे शहर असल्यामुळे मुबलक पाणी असणे ही अत्यंत महत्त्वाची गरज होती. सातारा हा सुरुवातीपासूनच डोंगर उतारावर वसलेला असल्यामुळे येथे पाण्याची हवी तशी उपलब्धता नव्हती. यावर उपाय म्हणून शाहू काळात यवतेश्वराहून खापरी नळाच्या साहाय्याने साताऱ्यात पाणी आणले. ठिकठिकाणी त्याच्या साठवणुकीची सोय केली.


या पाण्याच्या जोरावरच साताऱ्याचे सिंचन होऊ लागले व खऱ्या अर्थाने मराठाकालीन नगररचना अस्तित्वात येऊ लागल्या. या नगररचनेचे एक वैशिष्ट्य म्हणून फळे-फुलांच्या बागा, प्राणी संग्रहालय याकडे पाहावे लागेल. सुरुवातीला मराठेशाहीचा कालखंड हा अत्यंत धामधुमीचा असल्याने अशा गोष्टीचा अभाव दिसून येतो. परंतु, शाहू महाराजांच्या काळात थोडे स्थैर्य लाभल्याने या बागांची संख्येत वाढ झाली. साताऱ्याजवळ शिवापूर येथे शाहू महाराजांची खाजगी आमराई होती. तसेच, नुने या गावी पेरू, साखर लिंबे, नारंगी अशा झाडांची फळबाग होती. तर आरळे गावी जाई, मोगरा, शेवंती, जास्वंदी यांची ही फुलबाग होती .धावडशी येथे ब्रह्मेंद्रस्वामी यांच्या सहाय्याने गुलाबजाम, महाळुंगे यासारख्या असंख्य झाडांची निगराणी होत होती. लिंब शेरी या गावात देखील फार मोठी बाग होती. या बागेच्या सिंचनासाठीच प्रसिद्ध बारा मोटाच्या विहिरीसारख्या सुंदर जल स्थापत्य रचनेची निर्मिती झाली. सातारा शहराच्या उत्तर सीमेवर करंजे गावालगत तसेच बुधवार पेठेतही बागा होत्या. त्यात शाहू महाराजांचे प्राणी संग्रहालय देखील होते, असा उल्लेख ऐतिहासिक कागद पत्रात आढळतो.


चिंचेचे अनेक महावृक्ष
शाहू काळ लोटून आज तब्बल तीन शतके झाली. एवढ्या मोठ्या कालखंडात आणि शहरीकरणाच्या रेट्यात हे सारं वैभव लयास जात आहे. परंतु, सातारा शहरातील मराठा साम्राज्याचे साक्षीदार आजही शिल्लक आहेत. त्यातील मूक साक्षीदार म्हणता येतील असे काही महावृक्ष साताऱ्यात आहेत. सातारा शहरातील राज्यपाल गणपतराव तपासे मार्ग म्हणजेच राधिका रस्ता ज्या भागातून जातो त्या भागात प्रतापसिंह शेती शाळा आहे. या रस्त्यामुळे या शेतीशाळेचे दोन भागात विभाजन झालेले दिसते हा भाग बुधवार पेठे नजीकच आहे. या मार्गावरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चिंचेचे महावृक्ष दिसतात. तसेच, त्या वृक्षांच्या दोन्ही बाजूस सरळ रेषेत अजूनही काही भलीमोठी चिंचेची झाड आहेत. चिंचेच्या झाडाचे वय काढणे ही तांत्रिकदृष्ट्या किचकट गोष्ट आहे, पण या झाडांचे आकारमान पाहता त्यांचे आयुर्मान सहज २५० वर्षांहून जास्त असल्याचे तज्ञ सांगतात. या झाडांची लागवड अतिशय सुनियोजित पद्धतीने केलेली आढळते.

याच भागात शाहू महाराजांच्या काळातील बुधवार बाग अस्तित्वात होती असे कागदोपत्री पुरावे देखील मिळत आहेत. या बागाच्या देखभालीचे सातत्य छत्रपती प्रतापसिंह महाराज पर्यंत होते. या बागेच्या पाणीपुरवठ्यासाठी मोती तलावाच्या पिछाडीस एक बंधारा बांधला असून त्याचे पाणी पाटातून या बागेपर्यंत येत होते, अशी माहिती साताऱ्यातील जेष्ठ मंडळी देतात. लोकस्मृतीतील तो बंधारा आजदेखील अस्तित्वात आहे. या परिसरातील मोठ्या चिंचेच्या झाडांची संख्या १५ इतकी आहे. ही झाडे साताऱ्याच्या जडणघडणीतील महत्वाचे मूक, पण जिवंत असलेले साक्षीदार ठरतात. त्यामुळे या ऐतिहासिक झाडांचे वारसा म्हणून जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे.


या झाडांपैकी एक झाड गेल्या वर्षीच्या वादळी पावसात कोसळले. इतर झाडेसुद्धा त्याच रांगेत आहेत. त्यांच्या एकाच बाजूस भराव, राडारोडा टाकण्याचे काम निरंतर चालू आहे, त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे या झाडांचे लवकरात लवकर शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करणे गरजेचे आहे. ही बाब जिज्ञासा मंच, भवताल आणि मेरी या समविचारी मित्र संस्थांनी सातारा नगर पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासनाने देखील या बाबत गांभिर्याने दखल घेतली आहे... या झाडांच्या संवर्धनाचे काम लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे.

फोटो:

• चिंचेचा महाकाय वृक्ष

• छत्रपती शाहू महाराज

• छत्रपती प्रतापसिह महाराज

• अदालत वाडा

• बुधवार बागेतील चिंचेचे वृक्ष

• बागेच्या पाण्यासाठी ऐतेहासिक बंधारा

• बागेच्या बाहेर असलेले जुने चिंचेचे वृक्ष

• नुकताच पडलेला वृक्ष

 

- नीलेश पंडित

कार्याध्यक्ष, जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था, सातारा

[email protected]

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही चोवीसावी गोष्ट)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी -  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

2 Comments

उमा भंडारे

राजवाडा चौक, मंगळवार तळे,राजवाड्यातील मंदिर ह्यांचे व्हिडीओ चित्रण सोबत दिल्यास लेख आधिक वाचनीय होईल.धन्यवाद

Bhavatal Reply

ओके, धन्यवाद.

avinash

सुंदर माहिती, इतिहास,भूगोल आणि पर्यावरण या काय भिन्न बाबी नाहीत. महाराजांनी या भूगोलाच्या जीवावरच इतिहास घडवला. महाराणी येसूबाई आणि शाहू महाराज 20 वर्ष शत्रूच्या कैदेत होते याच खूप वाईट वाटतं. त्या काळी त्यांना सोडवण्यासाठी काही tactics झाल्या असतील किंवा नसतील, झाल्या असतील तर त्याला यश आलं नाही हे आपल्या इतिहासाचं अपयश मान्य करावे लागेल. भवताल ला विनंती आहे की मराठा नगर रचनेचे एखादे व्याख्यान करता आले तर बघावे...

Bhavatal Reply

धन्यवाद. आपल्या सूचनेची दखल घेऊ.

Your Comment

Required fields are marked *

You may also like