Articles 
शिवकालीन धरण व जिजाऊंची दृष्टी यांची गोष्ट!

शिवकालीन धरण व जिजाऊंची दृष्टी यांची गोष्ट!

शिवकालीन धरण जिजाऊंची दृष्टी यांची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी २५)

 

आज शिवराज्याभिषेक दिन. शिवराय छत्रपती बनले तो दिवस, आपल्या सर्वांसाठीच अभिमानाचा! ही घटना राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाची. पण या घटनेला त्याच्याही पलीकडे अर्थ आहे. शिवरायांनी उभे केले ते खरे रयतेचे राज्य. रयतेचे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या भल्याचे, कल्याणाचे राज्य. असे राज्याच्या निर्मितीसाठी अनेक व्यवस्था उभ्या कराव्या लागतात, लोककल्याणाच्या योजना राबवाव्या लागतात. त्याकडे महाराजांचे कटाक्षाने लक्ष होते. म्हणून तर त्यांच्या राज्यातील सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांच्या प्रती प्रचंड आदर होता, लढणाऱ्या मावळ्यांमध्ये त्यांच्यासाठी - त्यांनी दाखवलेल्या स्वप्नासाठी जीव देण्याची तयारीही होती.

पण हे चुकून घडले नाही, त्याला निश्चित पूर्वपिठिका होती. शहाजी राजांनी त्यांना राजकीय, सामरीक, प्रशासकीय महत्त्वाच्या अंगांनी तयार केले होतेच. जिजाऊंनी त्यांना दिलेली प्रेरणा आणि केलेले संस्कार यांचा तर शिवरायांच्या घडण्यात मोलाचा वाटा आहे. हे केवळ सांगून - शिकवून घडले नाही, तर जिजाऊंनी आपल्या कृतीतून तसे प्रत्यक्ष उदाहरण घालून दिले. याची अनेक उदाहरण सापडतील. पण आजच्या दिवसानिमित्त हे वेगळे उदाहरण. ते पुण्याजवळ शिवगंगा नदीच्या खोऱ्यात पाहायला मिळते.

शिवगंगा नदीवरील बंधाऱ्यांची साखळी

शिवगंगा ही छोटीशी नदी. ही नदी सिंहगडावरून खाली उतरणाऱ्याच्या प्रवाहाच्या स्वरूपात उगम पावते आणि पुढे थोडीशी मोठी होते. पुढे दुसऱ्या नदीला मिळेपर्यंत रांजे, कुसगाव, बनेश्वर या ऐतिहासिक गावांमधून वाहते. या नदीवर तीन बंधाऱ्यांची साखळी पाहायला मिळते. तिची निर्मिती खुद्द जिजाऊंनी करून घेतली होती. त्याचा उपयोग त्या भागातील शेतीसाठी झाला.

या बंधाऱ्यांचा काळ साधारणपणे पावणेचारशे वर्षे मागे जातो. शहाजी राज्यांच्या सूचनेनुसार, शिवरायांना घेऊन जिजाऊ राज्य कारभारासाठी पुण्यात आल्या. पुणे शहरात राहण्याच्या तसेच, इतर व्यवस्था होईपर्यंत त्यांचा मुक्काम पुण्याच्या दक्षिणेला असलेल्या खेड-शिवापूर परिसरातील वाडा येथे होता. हा शिवगंगा खोऱ्याचाच भाग. शिवगंगा ही छोटीशी नदी. आजही तिचे ते स्वरूप पाहायला मिळते. त्या नदीच्या पाण्याचा सिंचनासाठी दीर्घ काळासाठी निश्चितपणे उपयोग करण्यासाठी या नदीचे पाणी अडवण्याची आवश्यकता होती. त्यासाठी खुद्द जिजाऊंनी शिवगंगा नदीवर बंधारे बांधून घेतले.

मजबूत बंधारे, आकर्षक रचना

हे बंधारे बांधण्याचे काम कामठे आडनावाच्या मंडळींच्या देखभालीखाली करून घेण्यात आले. आजही कामठे यांच्या वंशजांकडे याबाबतचे तपशील उपलब्ध आहेत. हे बंधारे प्रत्यक्ष पाहणे हा अतिशय रोमांचक अनुभव असतो. आखीव रेखीव असे हे दगडी बांधकाम. एकापाठोपाठ एक असे हे तीन बंधारे. पहिला कोंढणपूर-रांजे या गावांच्या हद्दीवर. त्यांच्यामधील अंतर सर्वसाधारणपणे अर्धा किलोमीटर इतके आहे. सर्वांत वरच्या बंधाऱ्याच्या भिंतीची रुंदी साधारणपणे सहा फूट इतकी आहे आणि लांबी सुमारे १०० फूट. बंधाऱ्यांच्या भिंतीला मधोमध उंचवटा आहे, ती दोन्ही बाजूंना निमुळती होत जाते. या बंधाऱ्यातून पाणी सोडण्यासाठी दोन दारे आहेत. ही दारे खाचांमध्ये बसवली जातात. ती वर उचलली की पाणी सोडता येते आणि ती खाली टाकली की पाणी अडून राहते. ही दारे बसवण्याच्या खाचा सपष्टपणे पाहायला मिळतात. त्यावरून त्याच्या रचनेची नेमकी कल्पना येते. या बांधकामाला सर्वसाधारणपणे पावणेचारशे वर्षे झाली. तरीसुद्धा आजही या बंधाऱ्याचे सर्व दगड जागच्या जागी आहेत. त्यावरून त्याच्या मजबुतीची आणि त्या काळातील बांधकामाच्या दर्जाची कल्पना येते.

मधला बंधारा रांजे गावात आहे, तर त्याच्यापासून सव्वा-दीड किलोमीटर अंतरावर सर्वांत खालचा बंधारा आहे. तो आकाराने मोठा आहे. त्याला धरण असेही म्हटले जाते. रांजे आणि कुसगाव या गावांच्या हद्दीवर असलेले हे बांधकाम. पाहचाक्षणी मनात भरावे असे. या धरणाच्या जाडजूड भिंती, पुढच्या बाजूने पाहिल्यास बुरुज असल्यासारख्या भासतात. या ठिकाणी नदी आणखी रूंद झाली आहे. त्यामुळे इथल्या धरणाच्या भिंतीची रुंदी वरच्यापेक्षा जास्त आहे. या धरणामुळे तिथे जास्त प्रमाणात पाणी साठून राहते. धरणाला पाणी जाण्यासाठी दारे आहेत, तसेच जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी सांडवेसुद्धा आहेत. हे सर्वच बांधकाम दगडात असल्यामुळे आणि नेमकेपणाने केल्यामुळे ते अतिशय आकर्षक दिसते. वर्षाच्या कोणत्याही काळात ते पाहिले तरी पाहातच राहावेसे वाटते.

...म्हणून राज्याभिषेक जिव्हाळ्याचा

रयतेच्या दृष्टीने प्रत्यक्ष उपयोग असलेली काम स्वत: जिजाऊ करून घेतात. यावरून त्यांची कारभाराकडे पाहण्याची दृष्टी लक्षात येते. हीच दृष्टी शिवरायांकडे आली असेल आणि त्यांनी ती अधिक विकसित केली असेल तर ते स्वाभाविकच आहे. अशा कितीतरी रचना, निर्मिती शिवरायांनी त्यांच्या कार्यकाळात करून घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांचे छत्रपती बनणे लोकांसाठी आनंदाचे, जिव्हाळ्याचे, अभिमानाचे होते. आज तब्बल ३४८ वर्षांनंतरही त्यांचा राज्याभिषेक इतक्या उत्साहात का साजरा केला जातो, याचे कारणही त्यांच्या या दृष्टीतच दडले आहे. ती दृष्टी आपणही आपल्या कामात घेतली तर तेच या महत्त्वाच्या दिवसाचे खरेखुरे स्मरण ठरेल!

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही पंचवीसाची गोष्ट)

 

- अभिजित घोरपडे

[email protected]

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी -  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

4 Comments

Keshav Mannur

धन्य जिजाऊ माते धन्य ते शिवराया

Bhavatal Reply

धन्यवाद.

जयप्रकाश नारकर

राजमाता जिजाऊ यांनी पाण्या साठी ओढ्याला बंधारे बांधण्याची ३४८ वर्षापुर्वी दाखवलेली दुरद्रुष्टी जगांतील दुर्भिळ उदाहरण आहे.

Bhavatal Reply

होय, या वारशातून भरपूर काही शिकण्याजोगे आहे. धन्यवाद.

Bhavatal Reply

अगदीच. त्या काळाचा विचाप करता हे नक्कीच दुर्मिळ आणि दूरदृष्टीचे उदाहरण आहे.

Sandeep prabhakar ghatage

Aai saheb Jijau ani chatrapati shivaji maharaj tyanchya durdrushila aadhi manacha mujara. Pan sadhyachya Nakarte,Nalayak Nete ani Rajyakartyani yatun kahi shikal pahije, pan kutryach sheput te kadhi saral nahi honar.....

ANUSHRI pai

जीजाऊंची दुरदृष्टी खरच महत्त्वाची.

Bhavatal Reply

धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like