Articles 
एका पंजाने उलगडलेल्या रहस्याची गोष्ट!

एका पंजाने उलगडलेल्या रहस्याची गोष्ट!

एका पंजाने उलगडलेल्या रहस्याची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी २६)

 

थंडीचे दिवस होते. मी रात्री विद्यार्थ्यांच्या गटासोबत भोपाळ शहराजवळ एका ढाब्यावर जेवायला बसलो होतो. सर्वत्र शांतता होती, तेवढ्यात अचानक एक विचित्र आवाज कानावर पडला. पाठोपाठ आजूबाजूला गावातील कुत्र्यांचा रडण्याचा, भुंकण्याचा आवाज आला. मी कुजबुजलो, “तरस!” जणू काही मी मोठ्याने बोललो तर प्राण्याला आमचा आवाज ऐकू जाणार होता. तो फार दूर नव्हता. आम्ही मोहित झालो, पण काहीसे घाबरलोही. तो आवाज पुन्हा ऐकला, पाठोपाठ आजूबाजूच्या कुत्र्यांच्या भुंकणेसुद्धा. तीही घाबरली होती.

सह्याद्रीतील ‘ती’ गुहा

अगदी अलीकडेपर्यंत मला तरस (हाईना) दिसेल याची शक्यता वाटली नव्हती. एकदा विवेक काळे या मित्रासोबत आम्ही पश्चिम घाटातील काही गुहांचा शोध घेत होतो. ऑक्टोबर महिना होता, पाऊस नुकताच थांबला होता. आम्ही पुण्यापासून काही अंतरावर, सह्याद्री रांगांचा भाग असलेल्या उंच कड्यांनी वेढलेल्या खोऱ्यात एका भाताच्या खाचरात होतो. भातकापणी नुकतीच सुरू झाली होती. काही अंतरावर एक सुंदर असा दुमजली धबधबा होता. वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही मजल्यांवर धबधब्यांच्या मागे नैसर्गिक गुहा होत्या. त्यातल्या भल्यामोठ्या गुहेत आम्हाला जायचे होते. आम्ही चालत निघालो. भातशेती संपल्यावर चढ होता, त्यावर पुरूषभर उंचीचे गवत. वाट दिसत नव्हती. अंदाज घेत घेत धबधब्यापर्यंत पोहोचलो. ते ठिकाण अत्यंत सुंदर होते. पावसाळा संपल्यामुळे धबधब्याचा प्रवाह कमी झाला होता, त्यामुळे त्या गुहांमध्ये जाणे शक्य झाले.

गुहा पूर्णपणे नैसर्गिक होती. ती वापरात असल्याच्या स्पष्ट खुणा दिसल्या. पहिली खूण म्हणजे- गोगलगायींची शेकडो कवचे आणि दोन लहान चुली. यावरून ती त्या भागातील कातकरी आदिवासींकडून वापरात असल्याचे स्पष्ट होत होते. ते या भागात राहतात आणि त्यांनी अजूनही भटकी, शिकारी जीवनशैली कायम राखली आहे. प्रवाहातून पकडलेल्या आणि धगीवर भाजलेल्या गोगलगायी हे त्यांच्यासाठी पक्वान्न आहे. त्यांनी कदाचित गुहेच्या अरुंद आडव्या फटी बंद करण्यासाठी छोट्या दगडी भिंती उभ्या केल्या असाव्यात. कदाचित इतर वन्य प्राण्यांना गुहेत येण्यापासून रोखण्यासाठी त्या बनवल्या असाव्यात… पण तिथे कोण येऊ शकते?

काही धागेदोरे

आम्हाला तिथे घुबडाच्या तोंडावाटे पडलेले, न पचलेले भाग (केस, हाडे, वगैरे) दिसले. गुहेच्या छतावर उलट्या इग्लूच्या आकाराची मातीची काही तुटलेली घरटी होती. ती ‘रेड-रम्पड स्वॅलोज’ या प्रकारच्या पाकोळीची होती. शिवाय गुहेच्या छतावर छोट्या स्विफ्टने पिसे आणि इतर नैसर्गिक गोष्टींमध्ये लाळ मिसळून बनवलेली किंचित खराब झालेली घरटी देखील होती. आणि मग आम्हाला मोठी हाडे विखरून पडलेली दिसली, विशेषत: फटीच्या तोंडाजवळ! बहुतेक हाडं गुरांची दिसत होती... ही हाडं इथे कोणी आणली असतील? गुहेत जमिनीवर २ - ३ ठिकाणी एखाद्या प्राण्याने विश्रांती घेतल्याच्या खुणाही आमच्या दृष्टीला पडल्या. मऊसर मातीत कुत्री बसल्यानंतर जसे खड्डे पडतील तसे ते स्पष्टपणे दिसत होते. हे तरस असू शकते का? असे वाटत होते की ही विश्रांतीची जागा रोजच्या रोज वापरली जात असावी. आम्ही तिथे पोहोचण्याच्या खूप आधी आमची चाहून लागल्याने हे प्राणी सटकले असतील. आम्ही पंजाच्या खुणांसारखी काही इतर चिन्हं शोधली, पण तिथे काहीही सापडले नाही.

तरसाचे कुळ...

तरस बऱ्याच अंशी कुत्र्याच्या कुळातील वाटते. कुत्र्याच्या कुळात कुत्रा, लांडगा, कोल्हा आणि खोकड यांचा समावेश होतो. पण प्रत्यक्षात, तरस त्याच्या स्वतःच्या नावावरून असलेल्या ‘हायनाईड’ (Hyaenidae) या कुळातील आहे. ते कुत्र्यांपेक्षाही मुंगूस आणि उदमांजर यांच्या जवळचे आहेत. त्यांचे पुढचे पाय त्यांच्या मागच्या पायांपेक्षा उंच आहेत, म्हणजे त्यांचे शरीराचा मागच्या बाजूला उतार असल्यासारखे दिसते. ते चालताना चढ चढून जाताना झगडत असल्यासारखे विचित्र दिसतात. असे म्हटले जाते की शरीराच्या या असामान्य रचनेमुळे चालताना त्यांच्या ऊर्जेची बचत होते. मेलेली जनावरे शोधण्यासाठी लांब अंतर कापावे लागते. ते फिरण्यासाठी त्यांना या बचत झालेल्या उर्जेचा उपयोग होतो. त्यांच्या शरीरावरील पट्ट्यांमुळे त्यांना चुकून कधी कधी वाघ समजले जाते. त्यांच्या डोक्यापासून पाठीवर शेवटपर्यंत ऐटदार वाटणारी घोड्यासारखी दाट केसांची पट्टी असते. तरसांना तीक्ष्ण ऐकण्याची शक्ती आणि कुत्र्यांसारखी उत्तम हुंगण्याची क्षमता असते. कडाकड हाडे फोडता येतील असा सर्वाधिक शक्तिशाली जबडा असतो.

खराखुरा सफाईकामगार

मी वन्यजीव जीवशास्त्रज्ञ प्रिया सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तरसाच्या खाण्याच्या सवयी समजून घेण्यासाठी त्यांचा अभ्यास केला आहे. त्यांच्याकडून याबाबत अतिशय रंजक तपशील समजले. तरस हे प्रामुख्याने निसर्गातील सफाई कामगार आहेत. ते मेलेले प्राणी शोधण्यासाठी खूप फिरतात. ते जवळजवळ केवळ निशाचर असतात. बहुतेक वेळा गावाकडे दिवसा कुत्र्यांनी खाऊन उरलेले प्राण्यांचे भाग किंवा जंगलात शिकारी प्राण्यांनी फडशा पाडल्यानंतर राहिलेला भक्ष्याचा भाग अशा अवशेषांवर जगण्यात ते पारंगत झाले आहेत. त्यामुळे त्यांना मांस, कातडी, जबड्यावरील मांस इत्यादी इतर प्राण्यांनी खाल्ल्यावर उरलेल्या उष्टावणीवर अवलंबून राहावे लागते.

महत्त्वाचे म्हणजे तरस, अतिशय मजबूत जबडे आणि दात यामुळे इतर मांसाहारी प्राण्यांनी सोडून दिलेली अत्यंत कठीण अशी मांडीची हाडे (फेमर्स) फोडून खाण्यास सक्षम असतात. त्यांच्या या क्षमतेमुळे त्यांना हाडांच्या बाहेरच्या मांसाबरोबरच हाडांच्या आतील मऊ मगज (मॅरो) सुद्धा खायला मिळतो. ही चैन इतर मांसाहारी प्राण्यांना अनुभवता येत नाही. तरस, मुद्दाम कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळवण्याच्या हेतूने हाडे खात नसले, तरी शेवटी त्यांना हा फायदा होतोच. ते शिंगे आणि खूर देखील चघळतात. त्यांची पचनसंस्था इतकी सक्षम असते की ती कितीतरी काळापूर्वी मेलेल्या मांसामधील जीवाणू पचवू शकते. यामुळे ते कदाचित सस्तन प्राण्यांमध्ये सर्वात विशेष असे ‘स्कॅव्हेंजर’ बनतात.

चेटकिणीचा घोडा

प्रिया सिंग यांनी ‘राऊंड ग्लास सस्टेन’ नियतकालिकामधील लेखात मनोरंजक लोककथा सांगितली आहे. राजस्थानच्या काही भागात तरसाला ‘डाकन रा घोडा’ म्हणजे ‘चेटकिणीचा घोडा’ असे म्हणतात. चेटकीण तरसाच्या पाठीवर मागच्या बाजूला तोंड करून बसते, त्यामुळे तरसाचे मागच्या बाजूने उतार असलेले शरीर तिच्यासाठी उत्तम वाहन ठरते. रात्र वाढत जाते तसे तरस वाळवंटातील महत्त्वाच्या अशा खेजरीच्या झाडाखाली उभे राहते. चेटकीण खेजरीच्या झाडावरून थेट तरसाच्या पाठीवर स्वार होते. मग तरस मृत प्राण्यांचे मृतदेह शोधत निघते. तरस प्राण्यांचे मृत शरीर खाते, तर चेटकीण मेलेल्या प्राण्यांचा आत्म्या खाते... अशी ही कथा. ही नकारात्मक लोककथा असली तरी चपखल आहे. ती या निशाचर प्राण्याच्या मेलेल्या प्राण्याचे मांस खाण्याच्या सवयी, शरीराची वेगळी रचना आणि घोड्यासारखे मानेपासून पाठीपर्यंत रुळलेले केस या गोष्टी नेमकेपणाने नोंदवते.

तुम्हाला वाटत असेल की तरस हे केवळ मेलेल्या प्राण्यांना खाते, तर तसे नाही. प्रिया सिंग यांनी याच लेखात नमूद केले आहे की तरसाच्या विष्ठेचे विश्लेषण केल्यावर त्यात कारले, बोर, काकडी, खरबूज यांच्या बिया आणि वेड्या बाभळीच्या (Prosopis juliflora) शेंगांची टरफलं मिळाली. त्यांनी रात्रीच्या वेळी तरसांना कारल्याच्या शेतात धाड टाकतानाही पाहिले आहे.

कुटुंबवत्सल सदस्य

पट्टेदार तरस हे एकमेकांची काळजी घेणारे प्राणी आहेत. मुलांच्या संगोपनासाठी आई संपूर्ण वर्षभर स्वत:ला वाहून घेते. टोळीतील प्रत्येक सदस्य, अगदी आधीची मोठी पिल्लं आणि प्रौढसुद्धा, पिल्लांची काळजी घेतो. तथापि, तरसांची स्थिती चांगली नाही. ही प्रजाती आफ्रिका खंडातील सहाराच्या दक्षिणेकडील प्रदेशापासून (सब-सहारा) भारतीय उपखंडापर्यंत विस्तृत प्रदेशात सापडते, तरीही त्यांची संख्या विरळ आहे. त्याचबरोबर त्यांचा निशाचर स्वभाव; खडकाळ, दाट झुडपांच्या प्रदेशात राहणे यामुळे त्यांचे दर्शन दुर्मिळ आहे. या प्राण्याची प्रतिमा, थडगी उतरणारा, मुलांना मारणारा आणि चेटकिणीची वाहतूक करणारा अशी चुकीची असल्यामुळे माणसे त्यांना मोठ्या प्रमाणात मारून टाकतात- कधी विष घालून, तर कधी कुत्र्यांच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला करून. त्यांच्या विविध अवयवांसाठी शिकारी पट्टेदार तरसांची शिकार करतात. माणसाची वाढती वस्ती आणि वाढत्या विकास प्रकल्पांमुळे तरसांची वसतिस्थाने धोक्यात आली आहेत. याशिवाय भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसांदिवस वाढत असल्याने तरसांची जगण्यासाठीची स्पर्धा तीव्र बनली आहे. २०१४ मधील शेवटच्या जागतिक प्राणिगणनेत, त्यांची एकूण संख्या ५००० ते ९९९९ इतकी असल्याचा अंदाज होता. त्यातही दिवसेंदिवस घट होत आहे.

एकच पंजा..?

आम्ही गुहेची पाहणी करत असताना हाडांचे आणखी काही ढीग आणि मातीत आणखी काही विसाव्याच्या खुणा सापडल्या. परंतु, तिथे तरसाचा वावर असल्याची अद्याप पटली नव्हती, त्यासाठी आणखी काही चिन्हे मिळणे आवश्यक होते. तेवढ्यात, विवेकला गुहेच्या एका भागात काहीतरी भन्नाट दिसले. तो होता, चिखलात उमटलेला एका पंजा. आम्ही त्याचा बारकाईने अभ्यास केला. त्याचा नेमका आकार (size) लक्षात यावा म्हणून माझा पाय शेजारी ठेवून त्याची काही छायाचित्रे घेतली. ही पंजाची खूण अगदी अलीकडची होती. पण तिथे पंजाची ही फक्त एकच खूण कशी? आम्ही सर्वत्र काळजीपूर्वक शोध घेतला. हा मिळालेला संदर्भ वापरून इतर पंजांच्या स्थितीची कल्पना करण्याचा प्रयत्न केला. या दृष्टीने बरीच धडपड केली, पण शेवटी हार पत्करून बाहेर पडलो. फक्त एकच पंजा कसा?... आम्ही काहीसे गोंधळात होतो.

या अद्भुत भटकंतीवरून परतताना मी फरिदाबादमधील सुनील हरसाना आणि भोपाळमधील डी.पी. श्रीवास्तव या मित्रांशी संपर्क साधला. त्या दोघांचाही त्यांच्या ‘फील्डवर्क’च्या वेळी तरसाशी संबंध आला होता. आम्हाला गुहेत दिसलेली हाडे, विश्रांतीची ठिकाणे आणि पंजाचा शिक्का यांचे फोटो पाठवले. डी.पी.ने उत्तर पाठवले, ‘हाईना असू शकते.’ सुनीलने ठामपणे लिहले, ‘१०० टक्के तरस!’

ते वाचून आम्ही रोमांचित झालो. विवेक मला गमतीने म्हणाला, ‘आता तू यावर एक भाग लिहिणार आहेस ना?’ मी हसून म्हणालो, ‘हो, त्याचे नाव असेल- एक पंजाचे रहस्य!’

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही २६ वी गोष्ट)

 

- पीयूष सेकसेरिया

[email protected]

(भवताल मासिकाच्या डिसेंबर २०२१ अंकातून)

(फोटो सौजन्य : हृषिकेश देशमुख, विशाल जाधव, सुचंद्र कुंडू, पीयूष सेकसेरिया)

 

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठीbhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

3 Comments

Avinash

Interesting माहिती मिळाली.... धन्यवाद

Bhavatal Reply

मन:पूर्वक आभार.

Rahul Pargaonkar

Khup chan mahiti.

Bhavatal Reply

Thank you.

Sanika Waghere

खुप सुंदर महिती मिळाली आणि कधीही न ऐकलेली.

Your Comment

Required fields are marked *

You may also like