Articles 
दोन महासागरांच्या महासंगमाची गोष्ट!

दोन महासागरांच्या महासंगमाची गोष्ट!

दोन महासागरांच्या महासंगमाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी २७)

 

आज, ८ जून. जागतिक महासागर दिन. यानिमित्त ही गोष्ट जगातील दोन प्रसिद्ध महासागरांच्या संगमाच्या ठिकाणाची, अर्थातच अथांग आणि रोमांचित करणारी...

बेभान वाहणाऱ्या वाऱ्याला अंगावर घेत आणि खडकावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज कानात साठवत तो सुळका चढून वर पोहोचलो... समोरचे दृश्य रोमांच उमटवणारे होते. डाव्या हाताला उबदार, पण काहीसा शांत असा हिंदी महासागर, तर उजव्या हाताला खवळलेला आणि हुडहुडी भरवणारा अटलांटिक महासागर! बस्स, केवळ मान फिरवायचा अवकाश एकाच वेळी दोन्ही अथांग महासागरांचे विस्तीर्ण रूप डोळ्यांत साठवता येत होते. प्राचीन दीपस्तंभाच्या खाली लावलेली ‘नवी दिल्ली ९२९६ किलोमीटर, लंडन ९६२३, न्यूयॉर्क १२५४१, सिडने ११६४२, तर रिओ-द-जनेरिओ ६०५५ किलोमीटर’ ही पाटी आपण नेमक्या कोणत्या जागी आहोत हे दर्शवत होती. खाली नजर वळल्यावर सर्व बाजूंनी सुळक्याच्या पायथ्याकडे झेपावणाऱ्या लाटा आणि सागराच्या गर्जनेमुळे थक्क झालो होतो, भारावून गेलो होतो, संमोहीत झालो होतो... ठिकाण होते आफ्रिका खंडाचे दक्षिणेकडील एक टोक असलेला ‘केप पॉईंट’ अर्थात दोन महासागरांच्या महासंगम!

भूगोल आणि इतिहाससुद्धा

भौगोलिकदृष्ट्या हा संगम महत्त्वाचा आहेच, कारण जगातील दोन प्रमुख महासागरांचे मीलन तिथे होते. त्याचबरोबर इतिहासातही हे ठिकाण अजरामर झालेले आहे. व्यापारासाठी भारताकडे येताना पंधराव्या शतकात वास्को द गामा याच ठिकाणाला वळसा घालून आला होता. त्याच्या दहा वर्षं आधी बार्टोलोने डायस हा दर्यावर्दी भारताच्या शोधात इथपर्यंत पोहोचला होता, पण पुढे जाण्याचे आव्हान न पेलल्याने त्याच्यासाठी भारत हे स्वप्नच राहिले, पुढे वास्को द गामाने भारताचा नवा मार्ग शोधल्यानंतर शेकडो जहाजांनी याच ठिकाणाला वळसा घालून भारत गाठला, दुसऱ्या महायुद्धात हेच ठिकाण लष्करीदृष्ट्या अतिशय मोक्याचे ठरले होते, अनेक जहाजांना जलसमाधी देणारीही हीच जागा आहे, जागतिक वातावरणाचे निरीक्षण करणाऱ्या ग्लोबल टमॉस्फेरिक वॉच स्टेशन ही त्याला लागूनच आहे... अशा इतिहासाची पार्श्वभूमी लाभल्याने हा महासंगम केवळ भौगोलिक न राहता त्याने मानवी इतिहासावर कसा प्रभाव टाकलाय व अनेक संस्कृतींच्या संगमाच्या दृष्टीनेही कशी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे लक्षात येते. या स्थानमाहात्म्यामुळे त्या ठिकाणी उभे असण्याचे महत्त्वही कित्येक पटींनी वाढते.

 

कल्पनेहून सुंदर

दक्षिण आफ्रिकेत चौदा वर्षांपूर्वी गेलो होतो. केप पॉईंटबाबत आकर्षण होतेच. ते आकर्षण व त्या ठिकाणाबाबतच्या कल्पनेपेक्षाही प्रत्यक्षात ती जागा अनुभवणे कित्येक पटीने समृद्ध करणारे ठरले. अतिशय नियोजनबद्ध तसेच कित्येक शतकांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या केपटाऊन शहरापासून केप पॉईंटपर्यंत पोहोचताना सुंदर समुद्र किनारा सर्वकाळ साथ करतो. एका हाताला डोंगरउतार व त्यावरील गर्द वृक्षराजी सोबतीला असते. ही साथ असतानाच विस्तीर्ण पठार आणि त्यावर असलेलं झुडपी जंगल सामोरे येते. हा संपूर्ण परिसर राष्ट्रीय उद्यानाच्या रूपात संरक्षित केल्यामुळे या पर्यटनस्थळाचं नैसर्गिक स्वरूप टिकून राहिले आहे, त्याचा ‘बाजार’ झालेला नाही. विस्तीर्ण पठारावरील हे जंगल पार करत असतानाच समोर उंचावरील दीपस्तंभ लक्ष वेधून घेतो. पुढे जाऊ तसे वाऱ्याचा वेग वाढत जातो आणि केप पॉईंट जवळ आल्याची तो जणू वर्दीच देतो. शेवटच्या टप्प्यात खडकाची एक बाकदार भिंत समुद्रात शिरते. या भिंतीला आकर्षक भेगाळलेल्या खडकांची नक्षी, खाली नीळाशार समुद्र आणि खडकावर फुटणाऱ्या फेसाळणाऱ्या पांढराशुभ्र लाटा स्वागत करत असतात. दीपस्तंभाजवळ पोहोचण्यासाठी शेवटचा टप्पा चढून जायला छोटी ट्रेन मदत करते. ती संगमाच्या टोकावर नेऊन पोहोचवते.

खरा संगम कोणता?

दोन महासागरांचा संगम म्हणजे खरेच रोमांच आणणारा! काही अभ्यासकांच्या मते हा संगम आणखी दक्षिणेला केप ऑग्युलस या ठिकाणी आहे, कारण हेच आफ्रिका खंडाचे खरे दक्षिण टोक आहे. पण समुद्र काही सरळ रेषेत किंवा आपल्या चौकटीत बसणारी गोष्ट नसल्याने हा संगम केप ऑग्युलस ते केप पॉईंटच्या दरम्यान पुढे-मागे सरकत राहतो. भूगोलाचे अभ्यासक केप ऑग्युलस ला संगम मानत असले तरी केप टाऊनच्या रहिवाशांच्या मते केप पॉईंट हेसुद्धा महासंगमाचेच ठिकाण आहे. स्थानिक गाईड डेल याने केलेला दावा, हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण! या ठिकाणाला महासंगम मानण्यामागचे त्याचे स्पष्टीकरण सोपे होते. अटलांटिक महासागर शीत पाण्याचा मानला जातो, तर हिंदी महासागर उबदार पाण्याचा. हाच बदल केप पॉईंटच्या दोन्ही बाजूंना आढळतो. तेथील कड्याच्या एका बाजूला हवेत गारवा आणि दुसरीकडे ऊब असल्याचा अनुभव त्याने सांगितला. हिवाळ्यात एकीकडे थंडीमुळे सर्फिंग करणे मुश्किल बनते, दुसरीकडे मात्र ही मजा व्यवस्थित लुटता येते.

अर्थात केप पॉईंट, केप ऑग्युलस किंवा केप ऑफ गुड होप ही सर्वच ठिकाणे टेबल माऊंटन नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकाच पठाराच्या पट्ट्यात येतात. खाली उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा, त्यांना लाखो वर्षांपासून तोंड देत असलेले वाळूच्या खडकांचे कडे, उबदार व शीत प्रवाहांच्या एकत्र येण्यामुळे निर्माण झालेले विशिष्ट हवामान आणि त्याचा परिणाम म्हणून आगळीवेगळी परिसंस्था ही या भागाची वैशिष्ट्ये. शीत व उबदार प्रवाहांच्या मिसळण्यामुळे समुद्रात अतिशय समृद्ध परिसंस्था निर्माण झाल्याने मासे व इतर समुद्री जिवांच्या भरभराटीसाठी हे स्थान अनुकूल ठरते. त्यांच्यासाठी ते जितके अनुकूल तितकेच माणसासाठी, विशेषत: दर्यावर्दींसाठी घातकसुद्धा!

रोअरिंग फोर्टीज

या पट्ट्यात, विशेषत: केप ऑग्युलस येथे तर समुद्र सारखाच खवळलेला असतो. रोअरिंग फोर्टीज अर्थात गर्जणारे चाळीस या नावाने ओळखला जाणारा विषुववृत्तापासून ३० ते ४० अंशांदरम्यानचा पट्टा हे त्याचे प्रमुख कारण. पृथ्वीभोवती असलेल्या या पट्ट्यात जमिनीचा फारसा अडथळा नसल्याने समुद्र खवळलेला असतो. त्याला अडविणारे कोणीही नसल्याने तो बेभान बनलेला असतो. याशिवाय दोन महासागरांचे वेगळे प्रवाह एकत्र येण्याने निर्माण होणारी अस्थिरता आणि तेथील उथळ किनारा या गोष्टीही समुद्राला अधिक प्रक्षोभक बनवितात. समुद्रापासून सुमारे २५० मीटर उंचीवरून, दीपस्तंभाजवळून खाली उसळणाऱ्या लाटा पाहताना त्याची झलक मिळत होतीच. त्यामुळे या परिसरात गेल्या २०० वर्षांमध्ये अनेक मोठ्या नावांनासुद्धा कशी जलसमाधी मिळाली असेल याचेही रहस्य उलगडते.

रोमांचक इतिहास

या नावांच्या दुर्घटनांच्या निमित्ताने या भूमीचा इतिहासही उलगडत जातो. फार पूर्वी मध्ययुगाच्या आधी भारतीय, चिनी किंवा अरबी व्यापारी व दर्यावर्दांनी या भूमीवर समुद्रामार्गे पाय ठेवला असल्याचे काही अभ्यासक मानतात. पण त्यानंतरच्या काळात म्हणजे पंधराव्या शतकात या भागात सुरू झालेल्या इतिहासाचा आजपर्यंत सलग धागा पाहायला मिळतो. युरोपातून भारतात व्यापारासाठीच्या तुर्कस्थान व तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या स्पाईस रूट वर अडथळे निर्माण झाल्याने भारतात येण्यासाठी समुद्री मार्ग शोधण्यासाठी युरोपात चढाओढ सुरू झाली. त्यात सुरुवातीला पोर्तुगीज दर्यावर्दी आघाडीवर होते. बार्टोलोमे डायस याने १४८८ साली पहिल्यांदा आफ्रिकेचे दक्षिण टोक पार केले आणि समुद्रीमार्गे भारतात पोहोचणे शक्य आहे, हा आत्मविश्वास निर्माण केला. स्वत: डायस भारतापर्यंत येऊ शकला नाही, पण त्याने माघारी परतताना केप ऑफ गुड होप हे ठिकाण शोधले. तो तिथे पोहोचलेला पहिला युरोपीय ठरला.

येथे खवळलेल्या समुद्राने केलेल्या नुकसानीचे आणखी एक उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष डायस याचाही याच भागात वादळात जहाज सापडून मृत्यू झाला. त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी त्याच्याच देशाचा दर्यावर्दी वास्को गामा याने आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक पार केले. त्याला वळसा घालून तो १४९८ साली भारतात पोहोचला. त्यानंतर वाढलेला व्यापार आणि या व्यापाराबरोबरच जगाचा इतिहास कसा घडत गेला याची कल्पना साऱ्यांना आहेच. अर्थात, वास्को द गामाच्या भारत मोहिमेची पार्श्वभूमी बार्टोलोमे डायस याच्या मोहिमेमुळेच निर्माण झाली होती, हेही तितकेच खरे. आजही या दक्षिण टोकाला वळसा घालणे आणि एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात उतरणे कठीण मानले जाते. जागतिक महायुद्धांच्या काळातही या ठिकाणाला विशेष महत्त्व होते. त्यामुळेच या काळात मित्रराष्ट्रांची जहाजे या परिसरात तळ ठोकून होती... दोन समुद्रांच्या महासंगम पाहत असताना या ठिकाणाची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी खरंच त्याचे माहात्म्य वाढविते.

इतिहासाच्या खाणाखुणा

पूर्वी जहाजांना व्यापारासाठी किती अंतर पार करावे लागत असेल आणि त्यासाठी किती काळ घालवावा लागत असेल याची कल्पनाही या ठिकाणावरून येते. जगातील विविध शहरे कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहेत याची माहिती देणारे दिशादर्शक पाहताना या ठिकाणापासून नवी दिल्ली ९२९६ किलोमीटर दूर असल्याचे समजते. त्या काळी हजारो किलोमीटरचे अंतर पार करताना खवळलेल्या समुद्राला कसे तोंड दिले असेल याचा केवळ अंदाज बांधावा लागतो. हे दिशादर्शन, तेथील दीपगृह, जुन्या कथा-दंतकथा आणि प्राचीन वास्तूंचे काही अवशेष या परिसराबाबत अधिकाधिक गोष्टी जाणून घ्यायला भाग पाडतात.

बाजूलाच असलेले केपटाऊन शहर आणि तिथल्या किल्ल्याचा इतिहासही असाच रंजक आहे. हा किल्ला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील आजही उभी असलेली सर्वांत जुनी वास्तू! बार्टोलोमे डायस १४८८ साली या ठिकाणी पोहोचल्यानंतर पुढे तब्बल दीडशे वर्षांनी १६५२ साली डचांनी तिथे वसाहत केली आणि लगेचच किल्ला बांधायला घेतला. पुढे १६६६ ते १६७९ या काळात कॅसल ऑफ गुड होप हा भक्कम किल्ला उभा राहिला. तो आजही जसाच्या तसा उभा आहे. फरक एवढाच की तो बांधला तेव्हा अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर होता. आता समुद्रात भराव टाकल्यामुळे तो दीड-दोन किलोमीटर आत आला आहे. पण आजही हा किल्ला पाहताना, विशेष म्हणजे सादर केले जाणारे प्राचीन प्रसंगनाट्य पाहताना काही काळ इतिहासात रमता येते.

केप ऑफ गुड होपसाठी सतराव्या शतकात व पुढेसुद्धा किल्ला हेच मध्यवर्ती केंद्र होते. राजकारण, व्यापार, लष्कर या सर्वच गोष्टींचे तेच प्रमुख केंद्र होते. त्यामुळे सकाळी दरवाजे उघडणे आणि सायंकाळी ते बंद करणे ही तेव्हाची रीत. आजही प्रातिनिधिक म्हणून ही प्रथा जिवंत ठेवलेली आहे. त्यासाठी जुन्या वेशातील सैनिक ‘परेड’ करत येतात आणि समारंभकपूर्व किल्ल्याची दारे उघडतात. त्यानंतर तोफ उडवून शहरात ही वार्ता पोहोचवली जाते... किल्ल्याची आगळी रचना व हा प्रातिनिधिक समारंभ यावरून इतिहासाला उजाळा मिळतो आणि ते पाहताना आपणही गढून जातो.

एकाच ठिकाणी ‘टेबल माऊंटन’, केप पॉईंट, केप ऑग्युलस, केप ऑफ गुड होप आणि या ठिकाणांना लाभलेला इतिहास-भूगोल यामुळे ही ठिकाणे पाहणे हा अवर्णनीय आनंद असतो. जगातील एका अनोख्या महासंगमाला भेट दिल्याचे समाधान असतेच, शिवाय त्याच्या सौंदर्यात बुडून जाण्याचा आणि इतिहासात रमण्याचा आनंदही पुढे बराच काळ टिकून राहतो... त्यामुळेच हा महासंगम मनाच्या कोपऱ्यात कायमचाच कोरलेला राहतो!

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही २७ वी गोष्ट)

 

- अभिजित घोरपडे

[email protected]

(सर्व छायाचित्रे - अभिजित घोरपडे)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी - bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा.)

6 Comments

अविनाश कुबल

आज ८ जून म्हणजेच जागतिक महासागर दिवस. अशा ह्या महत्वाच्या दिवशी वाचकांना इतका सुंदर वृत्तान्त वाचायला मिळणे म्हणजेच पर्वणी. सोबतच्या फोटो मुळे ह्या लेखाला एकदम जबरदस्त पार्श्वभूमी सुद्धा लाभली आहे. अभिजीत, आपले खूप खूप अभिनंदन

Bhavatal Reply

धन्यवाद सर.

Anjali Mahajan

अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे

Bhavatal Reply

धन्यवाद.

Anagha Shiralkar

दोन महासागराच्या संख्यांची व त्यांच्या ठिकाणांची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती देणारा देणारा हा लेख अप्रतिम आहे.

Bhavatal Reply

मन:पूर्वक आभार.

Bharati Vagal

अद्भूत महासागर संगमाचे इतिहास कथन

Bhavatal Reply

धन्यवाद.

दीपक नलवडे

अतिशय वाचनीय व माहितीपूर्ण लेख आहे.

Bhavatal Reply

आभार.

धनंजय मदन

सर, लेख उशिरा वाचला याबद्दल क्षमा. "केप ऑफ गुड होप" विषयी वाचलं होतं, पण महासागरांच्या तेथील संगमाबद्दल माहिती नव्हती. लेख माहितीपूर्ण तर आहेच शिवाय रोमांचक देखील आहे. विशेष म्हणजे "आंतरराष्ट्रीय महासागर दिवस" या दिवशी तो प्रसारित केल्याने प्रसंगोचित झाला आहे.

Bhavatal Reply

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. भवताल वेबसाईट नियमित वाचत राहा, इतरांसोबत शेअरही करत राहा.

Your Comment

Required fields are marked *

You may also like