Articles 
सांगलीच्या हरवलेल्या पेवांची गोष्ट… (भाग १)

सांगलीच्या हरवलेल्या पेवांची गोष्ट… (भाग १)

सांगलीच्या हरवलेल्या पेवांची गोष्ट… (भाग १)

(भवतालाच्या गोष्टी १३)

 

खोल खोल पेवं!

महाराष्ट्राच्या काही भागाने गेल्या वर्षी पुराचा अनुभव घेतला. जुलै–ऑगस्ट महिन्यांचं हे वैशिष्ट्यच. सर्वाधिक पावसाचा काळ. धरणं भरत आलेली असतात. पडेल तो पाऊस सोडून द्यावा लागतो. मग अनेक भागात पुराची शक्यता निर्माण होते. कधी अतिवृष्टी झाली तर दाणादाणसुद्धा. पावसाच्या अशा अनेक आठवणी आहेत. दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या. आठ वर्षांपूर्वी दरडींखाली गुडूप झालेलं माळीण गाव... गेल्या वर्षी कोकणात कोसळलेल्या प्रचंड दरडी.. अशीच एक कहाणी २००५ सालची. त्या वर्षी २६ जुलै रोजी मुंबईने प्रलय अनुभवला, तसाच तो महाराष्ट्राच्या अनेक भागांनीही अनुभवला. कोकणात चार-पाच गावांवर दरडी कोसळल्या. शंभरावर लोकांचा मृत्यू झाला. त्या वर्षी एकाच वेळी राज्याचा निम्मा भाग पुराने वेढला गेला होता. सांगली-कोल्हापूर या जिल्ह्यांना तर पुराचा अभूतपूर्व विळखा पडला. या पुराने शेतीचं, आर्थिक नुकसान तर केलंच. त्याच्या बरोबरीनेच व्यापक बदल घडवले. अनेक ठिकाणची वैशिष्ट्यं संपवली. त्यातला एक बदल सांगलीच्या दृष्टीनं दूरगामी आणि या शहराची ओळख हिरावून घेणारा ठरला. कारण या पुरामुळं सांगलीची वैशिष्ट्यपूर्ण “पेवं” नष्ट झाली. त्या महापुराला आता सतरा वर्षं होतील, पण सांगलीच्या पेवांची घडी विस्कटली ती कायमचीच. सांगलीची ही महत्त्वाची ओळख हळूहळू विसरू लागलीय. विस्मरणात चाललेल्या पेवांच्या दुनियेत पावसाच्या निमित्तानं डोकावायला हवं…

पिवळीधमक हळद, सांगलीची ओळख

हरिपूरची ओळख

माझं पेवांबद्दलचं आकर्षण बरंच जुनं, पण ती पाहायला मिळाली सात-आठ वर्षांपूर्वी. सांगली मुक्कामात तिथल्या प्रसिद्ध हळदीबद्दल माहिती घेत होतो. वेगवेगळ्या भागात माती–पाणी–हवामान याचा हळदीवर, तिच्या दर्जावर काय परिणाम होतो, हे समजून घ्यायचं होतं. तिथले एक व्यापारी दिलीप मालू यांच्याशी बोलताना पेवांचा विषय निघाला. त्यांनी पेवांबाबत सांगितलेली माहिती इतकी रंजक होती की लगोलग दुसऱ्याच दिवशी पेवांच्या गावात प्रवेश केला. गावाचं नाव– हरिपूर. कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या संगमाचं गाव. सांगलीला लागूनच. वस्ती साधारण ६००० ते ६५००. हळदीसाठी सांगली प्रसिद्ध, तर हळकुंडं साठवण्यासाठीची पेवं ही हरिपूरची ओळख!

पेवं हा शब्द ऐकला असेल, पण पेवं म्हणजे नेमकी काय? हे पाहिल्याशिवाय समजत नाही. मलासुद्धा ती पाहिल्यावरच स्पष्टता आली. समज-गैरसमजही गळून पडले. पेव म्हणजे जमिनीत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं तयार केलेली पोकळी. माती उकरून ती तयार केली जाते. आकार साधारण गोलाकार. त्यात धान्य, शेतीमाल साठवला जातो. इथल्या पेवांचा मुख्य उद्देश हळकुंडं साठवणं. ती पेवात चांगली टिकतात. हळदीचा दर्जा सुधारतो. शिवाय इतर साठवण्याच्या पद्धतीपेक्षा खूपच किफायतशीर. त्यामुळे पेवं वाढली. एकेका पेवात १५ टन ते २५ टन इतकी हळकुंडं मावतात. व्यवस्थित राहतात. त्यामुळे व्यापारी मंडळी हळद (हळकुंडं) पेवात साठवायचे. ही पेवं मात्र हरिपूरच्या लोकांची. आता परिस्थिती बदललीय. तरीही पेवं तग धरून आहेत. पेवं आणि हरीपूर यांचा घट्ट संबंध. अगदी थेट. ती तशी इतरत्रही पाहायला मिळतात, पण इथली पेवं वैशिष्ट्यपूर्ण. म्हणूनच पेवं म्हटलं की याच गावाचं नाव घेतलं जातं. हळदीसाठी प्रसिद्ध असलेली पेवं फक्त इथलीच. याचा संबंध इथल्या मातीशी, तिच्या थरांशी आहे.

 

पेवांची दुनिया

पेवांची दुनिया समजून घेण्यासाठी अनेकांना भेटलो, बोललो. ज्यांची आजही पेवं आहेत ते अशोक मोहिते, याच गावचे राजाभाऊ आळवेकर, अशोक तेलंग, तेव्हा वयाची शंभरी गाठत आलेले गोविंद नारायण ऊर्फ अण्णा आळवेकर, सांगलीतील दिलीप ट्रेडर्सचे दिलीप मालू, असे बरेच जण… हरिपुरात गेल्यावर एक वैशिष्ट्य जाणवलं. या गावात मैदानंच मैदानं. गावठाणात, आजूबाजूला. सगळीकडंच मैदानं. मुद्दामच राखलेली. ही सारी पेवांची मैदानं– बोंद्रे मैदान, पिंगळे मैदान, फाकडे मैदान, कत्ते मैदान, हनवर मैदान… अशी कितीतरी. फाकडे मैदानात दोन एकरावर नारायण बजरंग फाकडे यांची १००-१५० पेवं असल्याचं समजलं. अंकली रस्त्यावर बोंद्रे मैदानातली पेवं चांगल्या प्रकारे राखलेली होती. या मोठ्या मैदानात पेवाच्या ८ ओळी मोजल्या. एका एळीत १० पेवं होती. अशी एकूण ८० पेवं होती. त्यालाच लागून असलेल्या लहान मैदानात ५० पेवं होती.

ही सर्व पेवं जुनी. अलीकडच्या २५–२७ वर्षांत नव्यानं पेवं काढली नाहीत. पण या पेवांचा काळ नेमका किती मागं जातो, हे अधिकारवाणीने कोणी सांगू शकलं नाही. पेवांचे मालक असलेले अशोक मोहिते यांच्या म्हणण्यानुसार, पेशवाईपासून घरात पेवं होती. कारण तितक्या जुन्या वाड्यांमध्ये आजही पेवं पाहायला मिळतात. पुढे १९३५ नंतर त्यांची संख्या वाढत गेली.

पेवांबाबत जुनी माहिती मिळवण्यासाठी गावातील वयोवृद्ध गृहस्त गोविंद नारायण आळवेकर ऊर्फ अण्णा यांना भेटलो. जन्म– १९२०. त्यांच्या घरी गेलो. नेहरू शर्ट, धोतर, डोक्यावर पिवळसर फेटा, कपाळावर चंदनाचा टिळा. दृष्टी व्यवस्थित, आवाजही उत्तम, मात्र ऐकायला कमी येत होतं. पन्नाशीत असलेल्या आपल्या मुलाचा (वसंत) हात धरून बाहेरच्या खोलीत आले. नमस्कार केला, तर ते माझ्या पाया पडण्यासाठी वाकले… ते वारकरी संप्रदायाचे असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं.

आजपर्यंतचा प्रवास

अण्णांनी हरिपुरात लहानपणीपासून पेवं पाहिलीत. “ती आधी धान्य साठवण्यासाठी वापरली जायची. हळदीची बाजारपेठ वाढली, तशी पेवांची संख्याही वाढत गेली. आधी पेवं घरातच असायची. ती फार मोठी नव्हती. त्यात २५-५० पोती धान्य मावायचं. अनेकांच्या घरात आजही पेवं आहेत. पुढं पेवांची संख्या वाढली, तशी ती अंगणात गेली. १९३५ नंतर हळदीचं उत्पादन वाढलं, सांगलीत हळदीची बाजारपेठही विस्तारली. व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात हळद साठवण्याची गरज निर्माण झाली. मागणी आणखी वाढल्यावर लोकांनी शेतातही पेवं काढली. पेवांकडं उत्पन्नाचं चांगलं साधन म्हणून पाहिलं जाऊ लागलं…” अण्णांनी बराच जुना पट उलगडून दाखवला. “१९७५ ते २००५ हा कालावधी हळदीच्या पेवांसाठी अतिशय लाभदायक. सुवर्णकाळच म्हणा...” अण्णांचे चिरंजीव वसंत आळवेकर यांनी माहितीत भर टाकली. “३० वर्षांपूर्वी पेवं काढायला तीन हजार रुपये खर्च यायचा…” हरिपुरात भेटलेले ७४ वर्षांचे श्रीपती केदारी जाधव यांनी ही माहिती दिली.

एकट्या हरीपुरात ४५००-५००० पेवं होती, असं गावातील राजाभाऊ आळवेकर यांनी सांगितलं. “२००५ च्या पुरात हरिपुरातली निम्मी पेवं गेली. पुरामुळे पेवं पाण्याखाली गेली. पाणी आत शिरल्याने स्फोट झाल्यासारखी पेवं उडाली. पेवं अशी फुटायची, त्याचा मोठा आवाज व्हायचा, मग तिथं पाणी शिरून पाण्याचा भोवरा व्हायचा. कदाचित आत साठून राहणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूचा तो परिणाम असावा… या पुरात हरिपूरची निम्मी पेवं संपली” राजाभाऊ यांची आठवण. “या पुरामुळे सांगलीतील हळदीच्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. ते सहा–आठ वर्षे मागं फेकले गेले..” हळदीचे व्यापारी दिलीप मालू यांची आठवण. सध्या म्हणजे सात-आठ वर्षांपूर्वी हरीपुरात २०००–२५०० पेवं असल्याचं सर्वांच्याच बोलण्यात आलं.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी 'भवतालाच्या गोष्टी' या खास मालिकेतील ही तेरावी गोष्ट.)

 

– अभिजित घोरपडे

[email protected]

(पुढच्या, दुसऱ्या भागात- असं काय दडलंय हरिपूरच्या मातीत? हळदीची पेवं हरिपूरलाच का?)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय - bhavatal.com

4 Comments

Thanks for rare information

Bhavatal Reply

Thank you.

Thanks for rare information

पूर्वा पार पारंपारीक पध्दती अतिशय चांगल्या व निसर्गाशी एकरूप अशाच होत्या . आरोग्य दृष्टा सुध्दा अतिशय योग्य..

Bhavatal Reply

खरंय..

Very well written article. New generation will not know Pev. If it is in home we called Ambari. Always local words are different.

Your Comment

Required fields are marked *

You may also like