Articles 
अग्रणी नदीवरील हरवलेला धरणाचा पाट!

अग्रणी नदीवरील हरवलेला धरणाचा पाट!

अग्रणी नदीवरील हरवलेला धरणाचा पाट!

- दरवर्षी नव्याने बांधावयाच्या धरणाची गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी २९)

 

काळाच्या ओघात कितीतरी गोष्टी हरवत चालल्या आहेत. या व्यवस्थांनी आपल्याला पूर्वापार साथ केली आहे आणि मदतसुद्धा. पण या व्यवस्था आता संपत चालल्या आहेत- काही दुर्लक्ष झाल्यामुळे, तर काही परिस्थिती बदलल्यामुळे. त्यात विशेषत: ग्रामीण भाग, शेती आणि पाण्याशी संबंधित व्यवस्थांची संख्या अधिक आहे. अशाच एका सिंचनाच्या स्थानिक व्यवस्थेबाबत हा लेख. दु:ख एवढेच की ही व्यवस्था कदाचित पुन्हा कधीच पाहायला मिळणार नाही...

सांगली जिल्ह्यातील विटा-खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव हे तालुके कमी पावसाचे. या भागातून वाहणारी प्रमुख नदी म्हणजे अग्रणी. इतर नद्यांप्रमाणे आता अग्रणीचीसुद्धा रया गेली आहे. वर्षाचा बहुतांश काळ तिचे पात्र कोरडी ठणठणीत असते. ती पहिल्यासारखी बारमाही वाहावी म्हणून काही जण प्रयत्न करत आहेत. तेच पाहण्यासाठी सहा वर्षांपूर्वी खानापूर तालुक्यातील बलवडी गावात गेलो होतो. ज्येष्ठ कार्यकर्ते संपतराव पवार आणि माझे मित्र विजय लाळे हेही सोबत होते. गप्पांमध्ये अग्रणीवरील जुन्या सिंचन व्यवस्थेची माहिती मिळाली. त्यावरून अग्रणीचे त्या वेळचे चित्र डोळ्यासमोर आले, परिसरात झालेले बदलांची आपोआपच ओळख झाली. त्या व्यवस्थेचं नाव, धरणाचा पाट.

लोकांच्या आठवणीतील व्यवस्था

अग्रणीच्या काठावरचे मोठे गाव म्हणजे खानापूर तालुक्यातील बलवडी. या गावचे परशुराम गायकवाड ऊर्फ 'परशु अप्पा' तेव्हा साठीच्या आसपास आहेत. अग्रणीच्या आठवणी निघाल्या. मग परशु अप्पा आणि त्यांच्याबरोबरची मंडळी भूतकाळात पोहोचली. नदी किती बदलली आहे हे सांगू लागली. पूर्वी नदीचं पाणी वळवलं की शेतं भिजायची, पण आता सारं कसं बदललंय, याची खंत बोलण्यात जाणवत होती. या सर्वांची मुख्य आठवण म्हणजे धरणाचा पाट!

धरण म्हटले की मोठे बांधकाम डोळ्यासमोर येईल, पण अग्रणीवरचे धरण म्हणजे इनमीन दोन फूट उंचीचे, तेसुद्धा नदीतल्याच वाळूचे. लोक आठवणी सांगतात, "अग्रणीचं पात्र उथळ. शिवाय पात्रात काठोकाठ भरलेली वाळू. क्वचितच कुठेतरी खडक पाहायला मिळायचा. जमिनीसुद्धा नदीच्या पातळीलाच होत्या. पावसाळा संपला की नदीच्या पात्रातच वाळू एकत्र केली जायची. ती वापरून प्रवाहाला आडवा बांध घातला जायचा. त्यासाठी कुळव वापरला जात असे. दोनेक फुटापर्यंत वाळू साचली की झाले धरण. या धरणामुळे तुंबलेले पाणी पात्राच्या बाहेर वळवता यायचे. हे पाणी पाटाने लांबपर्यंत फिरवले जायचे. ते अगदी मे महिन्यापर्यंत मिळायचे. त्यानंतर पावसाळ्यात धरण वाहून जायचे. पावसाळा संपला की पुन्हा नव्याने धरण तयार केले जायचे..." अशी ही अग्रणीवरील सिंचनाची व्यवस्था.

अग्रणीचा उगम तामखडी या गावचा! ती पुढे वाहत आली की धरणाचा पाट ही व्यवस्था पाहायला मिळायची. नेमकी गावांची नावे सांगायची तर जाधववाडी, गोरेवाडी, बलवडी, बेणापूर, सुलतानगादे, खापरगादे, करंजे इथे वाळूची धरणे बांधली जायची. हा साधारणत: १५ ते १८ किलोमीटरचा पट्टा. त्यात नदीवर साठेक धरणे असायची. प्रत्येक धरणामुळे दोन्ही बाजूचे मिळून शंभरेक एकर क्षेत्र भिजायचे. म्हणजे या पट्ट्यातील जवळजवळ सहा हजार एकर जमीन या सिंचन व्यवस्थेमुळे भिजत होती. त्या वेळी विहिरींवरील मोटांनी बागायती केली जायची. त्याचे क्षेत्रही तितकेच भरत असावे, असे बेणापूरच्या गावकऱ्यांनी सांगितले. याचा अर्थ धरणाचा पाट ही त्या पट्ट्यातील सिंचनाची प्रमुख व्यवस्था होती. त्याच्यावर गहू, हरभरा, शाळू यासारखी हंगामी पिके घेतली जायची. उसासारख्या बारमाही पिकांसाठी ही व्यवस्था कामाची नव्हती.

अग्रणी नदी

 

दरवर्षी नवे धरण

या व्यवस्थेसाठी खर्च करायची गरजच पडायची नाही. नदीतली वाळू आणि जमिनीतली माती. त्या त्या ठिकाणी एकत्र करून पाण्याला वाट करून द्यायची, इतकेच. पण या व्यवस्थेचे म्हणून स्वतंत्र व्यवस्थापन होते. एकतर ही सामूहिक व्यवस्था होती. धरणाचे पाणी ज्यांच्या ज्यांच्या शेतात जाणार आहे, त्यांची ही व्यवस्था. त्याचे निर्णय, श्रमदान आणि त्याचा वापर हे सर्वच सामूहिक होते. दरवर्षी वाळूचे धरण बांधायला लागायचे, पण हे काम तास-दोन तासात पूर्ण व्हायचे. त्याच्यापासून पाणी घेऊन जाणारे पाट साफ करायला लागायचे. त्या लाभेक्षेत्रात जमीन असलेल्या शेतकऱ्यांपैकी घरटी एक माणूस त्याच्यासाठी यायचा. सर्व जण मिळून ही कामे करायचे. एकाचे संपले की दुसऱ्याला.. असे सर्वांनाच पाणी मिळायचे. मोठा तंटा असा व्हायचा नाही. समजुतीने सगळे होत असे. एखादा आडवा आलाच तर प्रकरण पंचायतीसमोर जायचे, तिथे केला जाईल तो निवाडा स्वीकारला जायचा.

 

अग्रणी नदीतच का?

ही व्यवस्था प्रामुख्याने अग्रणीतच का?... तर तिचं उथळ पात्र आणि पात्र असलेली वाळू. त्यामुळेच नदीकाठच्या जमिनींसाठी कोणताही आटापिटा न करता सहजी पाणी बाहेर वळवणे शक्य व्हायचे. नदीचे पात्र खोल असेल किंवा वाळू पुरेशी नसेल ही व्यवस्था शक्यच नाही. म्हणूनच हे भाग्य इतरांपेक्षा अग्रणीला लाभले.

ही व्यवस्था का व कधी मोडली याबाबत सविस्तर माहिती परशु अप्पांनी सांगितली. "पूर्वी मोटेने पाणी काढले जायचे. त्यामुळे जमिनीत पाणी शिल्लक असायचे. पुढे मोटारी आल्या, मग बोअरवेल आल्या. लोकांना जमिनीतील पाणी सहज मिळू लागले. या बदलांमुळे भूजलाची पातळी खोल गेली. त्यात पाऊसमान कमी झाले. शिवाय नदीच्या पात्रात काठोकाठ भरलेली वाळूसुद्धा संपली. मग ही व्यवस्थाच गैरलागू बनली. याची सुरुवात १९७२ च्या दुष्काळात झाली. १९८० च्या दशकात ही व्यवस्था पूर्णपणे संपली."

सुमारे २०० वर्षांपासून

"ही व्यवस्था कधी सुरू झाली हे नेमके सांगता येणार नाही, पण अंदाजे त्याला दोनशे वर्षे झाली असावीत. माझे वय साठ वर्षे. मी स्वत: या धरणाच्या पाटाचे पाणी धरलेय. पुढे मात्र ती बंदच पडली. काही ठिकाणी आता त्याचे पाट पाहायला मिळतात. त्याच त्याच्या खाणाखुणा. पण आताच्या पिढीला ही व्यवस्था माहीत होणार नाही आणि विहिरीवरची मोटसुद्धा नाही..." परशु अप्पा म्हणाले.

अग्रणीचे पात्र आता पूर्णपणे बदलले आहे, भकास झाले आहे. बेणापूरला नदीत एके ठिकाणी मूठभर वाळूही पाहायला मिळत नाही आणि पात्रसुद्धा कोरडे ठणठणीत. तिथे पाणी आडावे म्हणून सिमेंटच्या बंधाऱ्याचे काम सुरू होते... काळ बदलला, परिस्थिती बदलली, तशी व्यवस्थासुद्धा! पूर्वीच्या धरणाचा पाट व्यवस्थेतील काही पाट शासनाने ताब्यात घेतले होते. गाव नकाशात आजही त्याची नोंद पाटवान अशी आढळते. पूर्वी हे क्षेत्र संरक्षित होते, पण आता त्याच्यावर अतिक्रमणे वाढत आहेत... पुढच्या काही काळात कदाचित त्याच्या उरलेल्या खाणाखुणासुद्धा संपतील. ती या आगळ्या वेगळ्या व्यवस्थेची अखेर असेल!

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही २९ वी गोष्ट)

 

- अभिजित घोरपडे

[email protected]

(भवतालच्या मार्च २०१६ च्या अंकातून...)

(नकाशा सौजन्य : सुशांत सावंत व एस. अरुण दास यांच्या Journal of the Geological Society of India- August 2021 मध्ये प्रसिद्ध झालेल्या रीसर्च पेपरमधून)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी - bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा.)

6 Comments

उमा भंडारे

आम्ही विटा कडेपूर ह्या भागात 50वर्षापूर्वी रहात असताना गावा शेजारीरून दरवर्षी3/4 महिने भरपूर पाणी वहात असलेल्या ओढ्यावर आपण लिहिल्याप्रमाणे 3/4 वाळूची धरणे असताना हरबरा/शाळूस पाटाचे पाणी मिळत असे. कालओगात निसर्ग बदलला तसा माणुसकी ऐदी झाला."भवताल" चे प्रयत्न चालूच राहणार आहेत. यशाची अपेक्षा करूया.

Bhavatal Reply

"भवताल"चे प्रयत्न निश्चितपणे सुरू राहतील. आपली साथ आणि सहकार्याने हे काम पुढे जाईल. धन्यवाद.

महादेव माळी, हिंगणगांव, ता.कवठेमहांकाळ

खूप छान माहिती, मला आज माझ्या अग्रणी नदीचा इतिहास समजला. मला आनंद वाटला

Bhavatal Reply

धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.

Anil khilare

Nice

Bhavatal Reply

Thank you.

सचिन

छान विस्तृत माहिती अग्रणी नदिबद्दल

Sujit shimpi

छानसा व माहितीपूर्ण लेख.हे किंवा याही पेक्षा चांगली व्यवस्था महाराष्ट्रातील दुर्गम भागातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आजही अस्तित्वात आहेत. यावर मी एक लेखही लिहीला आहे.

Bhavatal Reply

अरे व्वा, यासारखी किंवा वेगळी काही व्यवस्था असेल तर नक्की शेअर करा. [email protected] किंवा 9545350862. धन्यवाद.

sushant nikam

1972 पासून पाऊसमान कमी झाला हा एक नैसर्गिक भाग सोडला तर वाळू उपसा करणे, विजेवरील पंपाने खेचणं ,वाळू उपसा करणे हे सगळे मानवनिर्मित दोष या व्यवस्थेला नष्ट होण्यास कारणीभूत आहेत . माणसाचा हव्यास कधी संपला नाही. वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस निसर्गाला ओरबडतोय हे आता अधिकाधिक पाहायला मिळतंय. यामुळे सुंदर अशा व्यवस्था नष्ट होतात हे बघून वाईट वाटतं. या व्यवस्थेचे अवशेष पाहायला आवडतील.

Bhavatal Reply

या व्यवस्थेच्या आठवणी त्या भागातील जुन्या पिढीच्या लोकांकडून ऐकायला मिळतात. प्रत्यक्ष काही पाहायला मिळेलच असे नाही.

Your Comment

Required fields are marked *

You may also like