Articles 
शतकांपासून बनणाऱ्या मातीच्या सुगंधी अत्तराची गोष्ट!

शतकांपासून बनणाऱ्या मातीच्या सुगंधी अत्तराची गोष्ट!

शतकांपासून बनणाऱ्या मातीच्या सुगंधी अत्तराची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३१)

निसर्गाची अनेक गुपिते उलगडणारी आणि थक्क करणारी मृदगंधाची अर्थात मातीचा सुगंधाची गोष्ट आपण मागच्याच भागात ऐकली. मातीला सुगंध कशामुळे येतो याचा उलगडा वैज्ञानिकांनी साठेक वर्षांपूर्वी केला. हे खरेच आहे. पण तुम्हाला हे माहितीए का- भारतात कित्येक शतकांपासून हाच मातीचा गंध काढून त्याचे अत्तर केले जात आहे?

मिट्टी का अत्तर

तुम्ही सुगंधाचे विशेषत: अत्तराचे शौकीन असाल तर कदाचित मिट्टी का अत्तर हा शब्द ऐकला असेल. आणि तो ऐकला नसेल तर मात्र तुम्ही अत्तराचे खरेच शौकीन आहात का, अशी शंका निर्माण होईल. भारतात मुघलांच्या काळापासून सुगंधी अत्तराची परंपरा वाढीस लागली आहे. त्याआधीसुद्धा आपल्याकडे विविध सुगंधी द्रव्ये वापरली जात होती. त्याचे उल्लेख जुन्या वाङ्मयात आहेत. मात्र, मुघलांसोबत हे सुगंधी अत्तराचे लोण आपल्याकडे पसरले, स्थिरावले आणि विस्तारलेसुद्धा! त्यासाठी विशेषत: उत्तर भारतातील अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे केंद्र म्हणजे कनौज. हे उत्तर प्रदेशातील एक शहर. ते अत्तर नगरी म्हणून प्रसिद्ध आहे.

अत्तराच्या गुलाब, चंदन, कस्तुरी, खस यासारख्या प्रसिद्ध गंधांच्या पलीकडचे आकर्षण म्हणजे मृदगंध अर्थात मिट्टी का अत्तर. हा गंध म्हणजे तीव्र उन्हाळ्यानंतर पहिल्या पावसाचे थेंब मातीवर पडतात तेव्हा दरवळणारा सुगंध. बहुतांश लोकांना हवाहवासा वाटणारा, पण एकदा दरवळला की पुन्हा पुढच्या पावसाळ्याची वाट पाहायला लावणारा. या गंधाला इंग्रजीमध्ये पेट्रिकर (petrichor) असे संबोधले जाते. हा गंध नेमका कुठून येतो, याबाबत अभ्यासकांना पूर्वी फारशी माहिती नव्हती. या संदर्भात वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असे माहीत झाले की स्ट्रेप्टोमायसीस (Streptomyces) नावाच्या जीवाणूमध्ये असलेल्या Geosmin या रसायनामुळे तीला हा विशिष्ट गंध प्राप्त होते. पण याची उकल होण्यासाठी १९६० - ७० हे दशक उजाडावे लागले. पण त्याच्या कितीतरी शतके आधीपासून भारतात हा मातीचा गंध मिट्टी का अत्तर याच्या स्वरूपात वापरला जात होता.

मातीपासून अत्तर काढण्याची पद्धत

मृदगंध हा अतिशय अतिशय सौम्य गंध. तो एरवीही वापरला जातो, पण त्याची खरी मजा असते ती तीव्र उन्हाळ्यात. या दिवसांमध्ये त्याचा सर्वाधिक वापर केला जातो. याचे कारण म्हणजे हा मातीचा गंध पावसाची आठवण करून देतोच, शिवाय दिलासासुद्धा देतो. सरकारी आकडेवारीनुसार, कनौज या अत्तर नगरीत अत्तर बनवणारे तब्बल ४०० उत्पादक आहेत. त्यांच्यापैकी किमान १० टक्के उत्पादक हा मृदगंध बनवतात. हे अत्तर बनवण्याची पद्धत परंपरागत आणि तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. काहीजणांनी यापैकी काही पद्धती नोंदवल्या आहेत.

त्यापैकी एक पद्धत म्हणजे- उन्हाळ्यात तापलेल्या कोरड्या मातीचा वरचा थर काढून ती माती तांब्याच्या मोठ्या डेगांमध्ये टाकली जाते. त्यात पाणी टाकून हे मिश्रण गायीच्या शेणाच्या गोवऱ्या / शेणकुटे जाळून उकळले जाते. डेगाचे तोंड चिखलाने सील केले जाते. त्यातून निघणारी वाफ बांबूच्या पोकळ काड्यांमधून पुढे जाते. ती चंदनाच्या तेलातून सोडली जाते. अशा प्रकारे मिट्टी का अत्तर तयार केले जाते. तयार केलेले अत्तर चामड्याच्या कुप्यांमध्ये साठवले जाते. त्यामुळे त्यातील जास्तीची आर्द्रता शोषून घेतली जाते. भारतात तयार केला जाणारा हा मृदगंध शतकांपासून जगभरातील सुगंधप्रेमींना भुरळ घालत आला आहे. हे अत्तर मध्यपूर्वेतील देशांमध्ये निर्यात केले जातेच. याशिवाय अमेरिका, युरोपीय देश, जपान या देशांसह जगाच्या विविध भागांमधून मागणी आहे.

मृदगंधाला काही जण The Smell of Rain या समर्पक नावानेही ओळखतात. हा गंध पावसाची आठवण करून देत असला तरी हे अत्तर पावसाळ्यात तयार केले जात नाही. कारण त्याच्यासाठी कोरड्या मातीचा वरचा थर आवश्यक असतो, तो पावसाळ्यात मिळत नाही. त्यामुळे पावसाच्या दिवसांमध्ये त्याची निर्मिती केली जात नाही.

हा मृदगंध, तो निर्माण करणाऱ्या जीवाणूची जगण्याची-विस्तारण्याची धडपड, त्याच्या गंधाची वैज्ञानिकांनी केलेली उकल, त्याच्या कितीतरी आधीपासून आपल्याकडे हा मृदगंध अत्तराच्या स्वरूपात तयार करण्याची आणि वापरण्याची प्रथा... भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील गेल्या दोन भागांमधील ही उपकथानके. या सर्व गोष्टी- सृष्टी, सूक्ष्मजीव आणि माणूस यांच्या अनोख्या संबंधांचेच उदाहरण म्हणून आपल्यापुढे उभ्या राहतात. एका जीवाणूचे विश्व किती व्यापक असू शकते आणि ते आपल्यावर किती मोठा प्रभाव टाकू शकते याचेही हे चपखल उदाहरण. अशाच सृष्टीच्या गोष्टी उकलण्यासाठीच भवतालाच्या गोष्टी ही मालिका. आणि त्यातील आजची ही ३१ वी गोष्ट!

- भवताल टीम

[email protected]

(संदर्भ: हिंदुस्थान टाईम्स, बीबीसी, नवभारत टाईम्स)

फोटो सौजन्य : कनोजअत्तर.कॉम, विकिमीडिया.ऑर्ग, बिकायी.कॉम, मुसिंगइंडिया.कॉम, इंडियामार्ट.कॉम

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

(इतरांसोबत शेअरही करा.)

6 Comments

A. M. Deshmukh

Excellent article,keep it up

Bhavatal Reply

Sure, Thank you. Plz share in your circles.

Ashok Pethkar

खूपच सुंदर माहिती, आवडली 👌

Bhavatal Reply

आभार.

Sachin Patwardhan

सौंधी.... हिन्दी भाषेत त्या सुगंधाला असलेला शब्द. पण त्या सुगांधाबरोबर निगडित असलेल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आठवणी कुपिबंद कशा होणार...!

Bhavatal Reply

खरंय... धन्यवाद.

अविनाश

छान माहिती, वापरावं लागेल हे अत्तर

Dhanashree Ashok Paranjpe

Nice article! Just a small correction- the smell is due to Actinomycetes bacteria - not streptomyces.

SURESH OSWAL

कुठे उपलब्ध आहे available /rate

Bhavatal Reply

ऑनलाईन उपलब्ध आहेत. थोडे सर्च केले तर सहज माहिती मिळेल.

Your Comment

Required fields are marked *

You may also like