Articles 
वाळवंटातही हिरवाई टिकवणाऱ्या ओरण ची गोष्ट!

वाळवंटातही हिरवाई टिकवणाऱ्या ओरण ची गोष्ट!

वाळवंटातही हिरवाई टिकवणाऱ्या ओरण ची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३२)

 

राजस्थानच्या वाळवंटात अत्यंत कमी पाऊस, बहुतांश भूभाग कोरडा, बराचरा वाळूने व्यापलेला. तरीसुद्धा तिथे कित्येक शतके, सहस्रके माणूस राहतोय, संस्कृती नांदत आली आहे. हे सारे कशाच्या बळावर? निसर्गाने काही संसाधने दिली आहेतच, पण या दिलेल्या संसाधनांचा वापर निगुतीने व योग्य पद्धतीने करण्याची परंपरा निर्माण झाल्याने, त्या टिकवून ठेवल्याने झाल्याने तिथे माणसाची संस्कृती विकसित होऊ शकली. त्याचेच एक जिवंत उदाहण म्हणजे ओरण !

ओरण म्हणजे काय?

आपल्याकडे देवराया असतात. म्हणजे देवाच्या नावाने जपलेला झाडोरा किंवा वन. राजस्थानच्या हवामानाचा विचार करता तिथे मोठ्या प्रमाणात झाडे असण्याची शक्यता नाही. मात्र, गवताळ कुरळे मोठ्या प्रमाणात आहेत. ही कुरणे देवाच्या नावाने जपलेली आहेत. अर्थात, त्यात काही झाडांचा समावेश असतोच. अशी ही जपलेली गवताळ कुरणे म्हणजे ओरण. ही मुख्यत: राजस्थानच्या वाळवंटी भागात पाहायला मिळतात. ती तेथील स्थानिक समाजांनी जपली आहेत. ओरण हा शब्द संस्कृत मधील अरण्य या शब्दावरून आला आहे. हे छोट्या प्रकारचे जंगल असून राजस्थानमधील जवळपास सर्वच गावांमध्ये एक तरी ओरण असते. राजस्थानमधील संस्कृतीमध्ये ओरणचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजस्थानच्या पूर्व भागात याला देवबानी असे म्हणतात, तर पश्चिमेकडील भागात ओरण हा शब्द वापरला जातो.

स्वरूप लोकांच्या धारणा

ओरणची मालकी ही खासगी नसते, तर ती स्थानिक देवी, देवतांची असते. बहुतेक वेळा ओरण हे वाळवंटी प्रकारचे वन असते. यामध्ये गवतापासून ते उंच वृक्षांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची स्थानिक झाडे असतात. ओरणचे मालक देव असल्याने या संदर्भात विविध समजुती, धारणा आहेत. यामधील झाडांचे कोणीही नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला देव शिक्षा देतो अशी स्थानिकांची श्रद्धा असते. यामुळे ओरणमधील झाडे इतक्या वर्षांनंतरही सुरक्षित आहेत. एकदा का एखादा भूभाग ओरण म्हणून घोषित झाली की तिथून काहीच काढून नेता येणार नाही, असा नियम असतो. परंतु, त्याचवेळी स्थानिक लोक त्यांची गुरे ओरणमध्ये चरायला नेऊ शकतात. कोणी चुकून अथवा जाणूनबुजून ओरणमधील झाडे तोडलीच तर देवाच्या कोपापासून वाचण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातात. अशा व्यक्ती चांदीच्या झाडाची प्रतिकृती किंवा लॉकेट देवाला अर्पण करते. मग त्यातून या व्यक्तीची देवाच्या कोपापासून सुटका होते, असे मानले जाते.

किती क्षेत्र?

पश्चिम राजस्थानमधील ८ – ९ टक्के भूभाग हा ओरण साठी राखून ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही तर या जमिनी तेथील स्थानिक देवतांच्या नावानेच नोंदवल्या गेल्या आहेत. आजच्या काळात ही गोष्ट अद्भुत वाटावी अशीच आहे. राजस्थानातील सर्वात मोठ्या ओरणपैकी एक म्हणजे भादरिया जी माता ओरण. या ओरणच्या नावावर अंदाजे १५,००० हेक्टर इतके क्षेत्र आहे. यावरून ओरणचे क्षेत्र आणि त्यांचे महत्त्व यांचा अंदाज येऊ शकेल.
सांस्कृतिक महत्त्व

राजस्थानच्या सांस्कृतिक जीवनात ओरणला खूप महत्त्व आहे. राजस्थानमध्ये जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत ओरण मधील वरुण देवता म्हणजेच पाण्याचे पूजन करूनच तेथील सगळी कामे केली जातात. एवढेच काय, तेथील स्थानिक रहिवासी शपथ घेताना सुद्धा ती स्थानिक ओरण देवतेच्या नावाचीच घेतात. १२ व्या शतकामधील एक शिलालेखावरून तेथील पाण्याचे महत्त्व समजते. या शिलालेखामधील श्लोक गणपतीच्या आधी वरुण देवाला नमन करून सुरू होतो. हा श्लोक असा आहे-

ओम नमो वरुणाय,

हेरंबादी गणाय...

ओरण ही जुनी परंपरा आहे. पूर्वी होत असलेल्या लढायांमध्ये धारातीर्थी पडलेले वीर किंवा त्यांच्या सतींच्या नावानेसुद्धा ओरण राखले जात असे. तसेच, महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे वीरगळ आढळतात, त्याच प्रमाणे जुंझार नावाने ओळखली जाणारी दगडाची स्मारके ओरणमध्ये पाहायला मिळतात. ओरणची हद्द ठरवण्याबाबतच्या सुद्धा अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत.

ओरणमधील जैवसंपदा
राजस्थानमध्ये ८०० ते ९०० वर्षांपासून ओरण जोपासले आहेत, असा अंदाज आहे. यामुळे वाळवंटात सापडणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पती आजसुद्धा ओरणमध्ये उभ्या आहेत. राजस्थानमध्ये खडतर हवामानामुळे झाडांची वाढ अतिशय खुरटी व संथ असते. तरी सुद्धा ओरणमधील झाडे एवढी उंच व मोठी आहेत की त्यांच्यामधून उंटांचा कळप चालत असेल तरी तो दिसणार नाही. ओरणमध्ये असलेली मोठी झाडे त्यांच्या वयाची व ओरण पद्धतीच्या इतिहासाचा पुरावा देतात. खडतर हवामानात तग धरणाऱ्या बऱ्याच वनस्पतींचे उत्तम नमुने ओरणमध्ये पाहायला मिळतात. ओरणमध्ये मुख्यत: गवताळ कुरणे सुद्धा असतात. जंगलातील चिंकारा हरीण आणि गुराख्यांची गुरे ओरणमध्ये सोबतच चरतात. या सोबतच नामशेष होत चाललेल्या प्रजातींपैकी माळढोक हा पक्षी सुद्धा ओरणमध्ये आढळतो. किंबहुना ओरणमध्ये माळढोकचा वावर असणे म्हणजे ते कुरण गुरांना चरायला उत्तम आहे, असे स्थानिक मानतात.

पाण्याच्या दृष्टीने महत्त्व

ओरणची वनस्पती व वन्यजीवांसोबतच जलसंधारणाचे एक महत्त्वाची भूमिका आहे. राजस्थान मधील अनेक हंगामी नद्यांचा उगम ओरण मधून होतो. ओरण जवळ असलेले खडीन म्हणजेच वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी बांधलेले बंधारे हे सुद्धा याचेच उदाहरण आहे. खडीनमध्ये ज्या दिशेने पाणी येणार असते, त्या भागात ओरण नक्की असते. हे ओरण पाण्याचा प्रवाह तसेच वाहून जाणारी माती व वाळू रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम करते.
ओरणला असलेले धोके
अनेक ओरणची अधिकृत नोंद पडीक जमीन म्हणून झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आधुनिक जगाचे सावट येऊन त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशी ओरण विद्युत निर्मिती कंपन्यांना सौर तसेच पवन विद्युत प्रकल्पासाठी देण्यात येत आहेत. यापैकी एक बिकानसिंगजी ओरण आहे. या परिसरावरून वीज वाहणाऱ्या तारांचे जाळे पसरत चालले आहे. यामुळे ओरणमध्ये असलेल्या स्थानिक जीवसंपदेला मोठा धोका निर्माण होत आहे. या प्रकारामुळे बऱ्याच ओरणविषयी न्यायालयात खटले सुरू आहेत. आपल्या भारतातील ही संस्कृती व पर्यायाने निसर्ग जपण्यासाठी लवकरात लवकर योग्य मार्ग काढणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील देवराई तशीच ही राजस्थानच्या वाळवंटातील ओरण. त्यांची निर्मिती, संवर्धन, त्यांना असलेले धोके या सर्व पैलूंचा विचार करता त्यांच्यात किती साम्य दिसते ना! पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वच भागावरील आव्हाने किती एकसारखी आहेत याचीच कल्पना देणारा हा लेख, अनेकांना प्रेरणा देणारा!

भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही बत्तीसावी गोष्ट!

- पार्थ जगानी / सुमित डुकिया (जैसलमर)

[email protected]

(भवताल मासिकाच्या मे २०२१ अंकातून..)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

(इतरांसोबत शेअरही करा.)

2 Comments

संदिप नानासाहेब देशमुख

खूपच छान

Bhavatal Reply

आभार.

Mrs geeta Karhadkar

खूप छान माहीत. बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या त्या कळ आल्या .

Bhavatal Reply

धन्यवाद. त्यासाठीच "भवताल"चा हा उपक्रम आहे.

Your Comment

Required fields are marked *

You may also like