Articles 
विदर्भातील ३००० वर्षांपूर्वीच्या पाषाणवर्तुळांच्या शोधाची गोष्ट!

विदर्भातील ३००० वर्षांपूर्वीच्या पाषाणवर्तुळांच्या शोधाची गोष्ट!

विदर्भातील ३००० वर्षांपूर्वीच्या पाषाणवर्तुळांच्या शोधाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३३)

या घटनेला दीडशे वर्षे उलटून गेली. १८६३ साल होते. ऐन पावसाळ्याचे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे दिवस होते. त्या वेळी मध्य प्रांताचे मुख्य आयुक्त होते सर रीचर्ड टेंपल. त्यांनी स्टीफन हिस्लॉप यांना नागपूरपासून सुमारे २० मैलावरील टाकळघाटच्या दौऱ्यावर सामील होण्यासाठी आमंत्रित केले. स्टीफन हिस्लॉप हे एक विलक्षण अजब व्यक्तिमत्व होते. ते निसर्गविज्ञान, भूविज्ञान, पुरातत्व, जीवशास्त्र, मानवविज्ञान अशा बहुविध विषयांत पारंगत असलेले आणि मूळचे स्कॉटिश मिशनरी असलेले. त्यांना जगातील जवळपास सर्वच क्षेत्रात कमालीची रुची प्रचंड कुतुहूल असे. त्यामुळे त्यांनी मुख्य आयुक्तांच्या या दौऱ्यात सामील होण्यास सहज सहमती दर्शविली. टाकळघाट जवळील बोरी या गावात मुक्काम ठरला. पुढच्याच दिवशी, ४ सप्टेंबर १८६३ ला अगदी उजाडताच हिस्लॉप टेम्पल त्यांच्या बोरी येथून नदी ओलांडून टाकळघाटच्या पाषाणवर्तुळांच्या स्थळाला भेट देण्यासाठी निघाले.

हिस्लॉप यांनी सर रीचर्ड टेम्पल यांच्या उपस्थितीत त्या पाषाण वर्तुळांच्या उत्खननाला सुरुवात केली. या उत्खननात त्यांना बरेच महापाषाणयुगीन अवशेष आढळले. दिवस मावळतीकडे झुकू लागला, तसे आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. त्यामुळे मुख्य आयुक्त टेम्पल यांनी पाऊस कोसळण्यापूर्वी मुक्कामाच्या ठिकाणी जायचे ठरवले. त्या वेळी हिस्लॉप उत्खननातील अवशेषांचे वर्गीकरण करण्यात मग्न होते. त्यांनी टेम्पल इतरांना पुढे जाण्यास सांगितले. टेम्पल त्यांचे कर्मचारी अंधारापूर्वी मुक्कामाच्या ठिकाणी परतले.

बायबल आणि पुरातत्वीय अवशेष

त्या पावसाच्या रात्री टेम्पल गाढ झोपले होते. परंतु, तंबूबाहेरील कोलाहल कानी पडल्याने ते जागे झाले. बाहेर येऊन पाहतात, तर हिस्लॉप यांचा घोडा एकटाच परतला होता. घोड्याची रिकीब पाण्यात भिजलेली होती. हिस्लॉप अजूनही शिबिरात पोहोचले नव्हते. मुख्य आयुक्तांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

त्यांनी लागलीच आपल्या सेवकांना हिस्लॉपचा शोध घेण्यास पाठविले. त्या गडद अंधारात जळत्या मशाली घेऊन शोधपथक टाकळघाटच्या मार्गावर निघाले. बोरी ते टाकळघाट मार्गावरील नाल्याला नुकत्याच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आलेला होता. बराच वेळ शोध घेतल्यावर नाल्यातच काही अंतरावर हिस्लॉप यांचे पार्थिव बसलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांच्या दोन्ही मुठीत चिखलात माखलेले गवत होते, त्यावरून पुराच्या पाण्यात बुडण्याआधी त्यांनी केलेली प्राणांतिक धडपड  लक्षात येत होती. त्यांच्या कोटाच्या एका खिशात बायबल तर दुसऱ्या खिशात पाषाण वर्तुळातील काही पुरातत्वीय अवशेष होते. ही गोष्ट अत्यंत सूचक होती. एकीकडे मिशनरी कार्य तर दुसरीकडे जिज्ञासू वृत्तीने केलेले संशोधन कार्य असे एकाच माणसात एकवटलेले दुर्लभ मिश्रण दिसून येत होते.

पाषाण वर्तुळे म्हणजे काय?

ज्या पाषाण वर्तुळांच्या उत्खननादरम्यान स्टीफन हिस्लॉप यांचा दुर्दैवी अंत झाला. ती पाषाण वर्तुळे म्हणजे नेमके काय? ती त्याच जागी नेमकी कोठून आली? त्याच्या उत्खननाचे कारण काय? व त्यातून प्राप्त झालेल्या अवशेषांत नक्की काय सापडते? असे असंख्य प्रश्न वाचकांच्या मनात डोकी वर करून उभे राहिले असतील. तर ही पाषाण वर्तुळे म्हणजे सुमारे २५०० ते ३००० वर्षांपूर्वीच्या बृहदाश्मयुगीन संस्कृतीची दफनस्थळे होत.

या पाषाण वर्तुळांना स्थानिक लोक गवळ्यांची वर्तुळे आणि त्यांच्या मुक्कामाची किंवा लमाणांच्या तांड्याची जागा मानत असत. याबाबत ब्रिटिशांची समजून वेगळी होते. ते त्यांना भारतात आक्रमण करणाऱ्या शककालीन संस्कृतीचे उरलेले अवशेष मानत होते.

दगडाच्या देशा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात लेणी, मंदिरे, किल्ले, वाडे, मूर्ती, वीरगळ दगडी दीपमाळ यापलीकडेही अजून एक अल्पज्ञात काहिसा दुर्लक्षित असा ऐतिहासिक वास्तूप्रकार आहे. तो म्हणजे बृहदाश्मयुगीन दगडी स्मारके.

महापाषाण / बृहदाश्मयुगीन संस्कृती

प्रागैतिहासिक काळात विशेषतः इसविसना आधी दुसऱ्या-पहिल्या सहस्रकांत मोठमोठ्या ओबडधोबड शिळांची रचना करून स्मारके उभी करण्याची पद्धती होती. त्या लोकांच्या संस्कृतीला महापाषाण किंवा बृहदाश्मयुगीन संस्कृती म्हटले जाते. बृहदाश्मयुगीन संस्कृतीच्या दफनांच्या विविध पद्धती आढळून येतात त्यात शिळावर्तुळ, शिळास्तंभ, पेटिका-दफन, शिळाप्रकोष्ठ इत्यादींचा समावेश होतो.

भारतात या संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने उत्तर-वायव्य, दक्षिण ईशान्य भागात आढळून येतात. दक्षिण भारतात यांची संख्या सर्वाधिक असून, महाराष्ट्रात हे अवशेष मुख्यत्वाने विदर्भात आढळून येतात. 

पाषाणवर्तुळांचा सुरुवातीचा शोध

भारतातील महापाषाणांचे स्वरूप आणि वैशिष्ट्य यामुळे सुरुवातीच्या ब्रिटिश शासकांचे लक्ष याकडे वेधले गेले. या दगडी स्मारकांचा सर्वप्रथम उल्लेख कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी केला आहे. मात्र, त्याच्या शोधाचे अभ्यासाचे श्रेय जॉन बॅबिंग्टन यांना दिले जाते. बॅबिंग्टनने यांनी अगदी १८१९ च्या सुरुवातीस मलबार येथे अशा स्थळांचा शोध घेतला आणि केरळमधील दोन पाषाणवर्तुळांचे उत्खनन देखील केले. बॅबिंग्टन यांनी दाखविलेला मार्ग अनुसरत पुढे बऱ्याच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बृहदाश्मयुगीन स्थळांचा शोध घेत अश्या स्थळांचा अभ्यास चालू ठेवला.

विदर्भातील पाषाणवर्तुळांचा शोध

स्कॉटिश मिशनरी म्हणून १८४४ साली भारतात आलेल्या स्टीफन हिस्लॉप यांची नेमणूक नागपूर येथील फ्री चर्च ऑफ स्कॉटलँड वर झाली. त्या काळी नागपूर हे भोसले राजांच्या राजधानीचे शहर होते. ते पुढे ब्रिटिश आमदानीत मध्य प्रांताचे (सेंट्रल प्रोव्हिन्स) मुख्यालय झाले. त्यामुळे आधीच जिज्ञासू असलेल्या हिस्लॉप यांना भारताचे केंद्रस्थान असलेल्या मध्य प्रांताच्या इतिहास संस्कृतीत आपोआप रस निर्माण झाला. हिस्लॉप यांनी येथील जीवशास्त्र, जीवाष्मविज्ञान भूविज्ञान यांमध्ये मूलभूत संशोधन करण्यास सुरुवात केली. १८४७ दरम्यान हिस्लॉप यांनी नागपूरपासून २० मैलावर असलेल्या टाकळघाट येथे एक पाषाणवर्तुळ पाहिले. त्यात जमिनीपासून काहीसे वर आलेल्या मातीच्या भांड्यामध्ये राखेचे अवशेष त्यांना आढळून आले. तेथेच शेजारी लोखंडी भाला, सुरा अन्य अवशेष आढळून आले. या परिसरात भरपूर अवशेष असून त्यांच्या अभ्यासासाठी फुरसत आवड असलेल्या अभ्यासकांची गरज असल्याचे त्यांनी त्या वेळेस आपल्या नोंदवहीत नमूद केले होते. त्याचबरोबर पाषाणवर्तुळे असलेल्या २० स्थळांचा शिलापेटिका असलेल्या स्थळांचा उल्लेखसुद्धा त्यांनी आपल्या नोंदवहीत केला होता.

पुढे १८४९-५० च्या सुमारास केलेल्या अन्वेषणादरम्यान हिस्लॉप यांना जवळपास १०० पाषाणवर्तुळे सापडली. त्यांनी त्या पाषाणवर्तुळांच्या उत्खननाची परवानगी नागपूरच्या भोसले राजाकडून मिळवली. परंतु, गावच्या प्रमुखाने उत्खननासाठी मजूर पुरवण्यास नकार दिला. म्हणून मिशनरी स्थानिक ख्रिश्चनांच्या सोबतीने हातात कुदळ घेऊन हिस्लॉप यांनी स्वतःच उत्खननाला सुरुवात केली. या उत्खननात त्यांना मातीची भांडी लोखंडी अवजारे आढळून आली. या उत्खननाचा तपशील १८५७ मध्ये मुंबई येथील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या संशोधनपत्रिकेत प्रकाशित झाला. १८५७ साली त्यांना हिंगणा गावाच्या उत्तरेला अशीच पाषाणवर्तुळे आढळून आली. नागपूरच्या भोसले राजांचे संस्थान खालसा झाल्यावर नागपूर राज्य ब्रिटीश प्रांत बनले तेव्हा मुख्य आयुक्त सर रीचर्ड टेम्पल यांनी हिस्लॉप यांना या पाषाण वर्तुळांवर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले.

पुढील संशोधनाचा प्रवास 

हिस्लॉप यांनी निर्माण केलेली उत्सुकतेची लाट ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यांचा कित्ता गिरवत विदर्भात रुजू झालेल्या त्यानंतरच्या जवळपास सर्व उत्साही अधिकाऱ्यांनी या पाषाणवर्तुळांचा शोध उत्खननात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. नागपूर परिसरात त्या काळचे चांदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कर्नल सी एल ग्लासफर्ड नियुक्तीस होते. त्यांनी सिरोंचामधील एका शिलापेटिकेचे उत्खनन करून त्यातील अवशेष स्टीफन हिस्लॉप यांना पाठविले होते. तर विदर्भातील पहिले शास्त्रशुद्ध उत्खनन त्याचे दस्तावेजीकरण बेरार प्रांताचे आयुक्त असलेल्या जॉन हेन्री रिवेट-कार्नाक यांनी नागपूरचे आयुक्त आल्फ्रेड लायल आणि जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया च्या हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड सोबत १८६७ साली जुनापानी येथे केले. येथील उत्खननात त्यांना लोखंडी बाण, भाले, कुऱ्हाडी, खंजीर, सुरा इ. अवजारे आढळून आली.

त्याच वर्षी जुलै १८६७ मध्ये मेजर जी.जी. पीअर्स यांनी कामठीपासून मैलावर असलेल्या वरेगाव येथे पाषाणवर्तुळाचे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्खनन केले. उत्खननात त्यांना मानवी अवशेषांसोबत लोखंडी हत्यारे तांब्याचे दागिने आढळून आले. या उत्खननात मिळालेली लोखंडी अवजारे सध्या लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात येथे ठेवली आहेत.

पुढे मध्य प्रांताचे तत्कालीन मुख्य आयुक्त असलेल्या सर जॉन हेन्री मॉरिस यांच्या आग्रहावरून जे जे कॅरी या अभियंत्याने वर्धा जिल्ह्यातील आर्वीपासून २४ किमी अंतरावरील खैरवाडा येथे १८६९ दरम्यान एका पाषाण वर्तुळाचे उत्खनन केले. अशा जवळपास १५० पाषाणवर्तुळाचे दस्तावेजीकरण सुद्धा केले.

हडप्पा-मोहंजोदारो च्या शोधापूर्वी

१८७१ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या स्थापनेनंतर वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र उत्खननांना चाप बसला. त्यामुळे अशा उत्खननाला पुढे उतरती कळा लागली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या सर अलेक्झांडर कनिंगहम त्यानंतर हेन्री कझिन्सने अनेक बृहदाश्मयुगीन स्थळांचा उल्लेख केला आहे. जी. ए. पी हंटर यांनी १९३३ मध्ये प्रकाशित केलेल्या माहूरझरी येथील अन्वेषणात तेथील पाषाणवर्तुळांचा उल्लेख केला आहे.

भारतीय पुरातत्व इतिहासाच्या अभ्यासाला कलाटणी देणाऱ्या हडप्पा-मोहंजोदारो स्थळांच्या उत्खननाला १०० वर्षे पूर्ण झाली असली तरी, त्याच्याही १०० वर्षे आधी महापाषाणयुगीन पाषाण वर्तुळांनी ब्रिटिश अधिकारी इतिहास अभ्यासकांना संमोहित केले होते. त्यात विदर्भाच्या पाषाणवर्तुळांच्या शोधाची उत्खननाची शृंखला तितकीच सुरस रंजक आहे. तरीही ती फारशी माहीत नाही. या पाषाणवर्तुळांच्या शोधांचा विदर्भाच्या या अनोख्या वारसास्थळांचा परिचय करून देण्यासाठीच ही गोष्ट.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही ३३ वी गोष्ट.)

 

- अमित भगत

[email protected]

फोटो सौजन्य - अमित भगत 

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी - bhavatal.com

(इतरंसोबत शेअरही करा.)

3 Comments

Sachin Kaldate

Extensively informative article

Bhavatal Reply

Thank you.

Aditi

Vidarbhabaddal hi mahiti pahilyandach kalali..mastach..

Bhavatal Reply

Thank you.

स्वप्निल गिरी

काटोल च्या बाजूला ला धरती मूर्ती या गावांशेजरी 14 ते 15 पाषाण वर्तुळे बघितलेली आहे आम्ही.... ते काय होते हे तुमचा लेख वाचल्यावर कळले.... खुप खुप धन्यवाद..... पण कुतूहल म्हणून Wikipedia वर शोधलं तर फार काही माहिती मिळाली नाही .....

Bhavatal Reply

धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like