Articles 
पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराची गोष्ट!

पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराची गोष्ट!

पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३५)

ढग दाटून आल्यावर मोर पिसारा फुलवून नाचतो, हा आपल्या सर्वांचा समज. तो कितपत खरा आहे आणि त्यात किती कविकल्पना आहेत, याचा उलगडा करणारी ही गोष्ट.

विणीच्या हंगामातील मोराचा नाच ही माणसाला सर्वाधिक संमोहित करणारी गोष्ट. मोरांचा विणीचा हंगाम उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात वेगवेगळ्या काळात आहे. उत्तर आणि मध्य भारतात तो पाऊस सुरु झाल्यानंतर मुख्यतः जूनच्या शेवटी सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटापर्यंत असतो. तर दक्षिण भारतात तो एप्रिल-मे मध्ये सुरू होतो आणि ऑगस्ट महिन्यात संपतो.

नरांची संख्या माद्यांपेक्षा कमी

नैसर्गत:च मोरांमध्ये नर-मादी यांच्या संख्येत तफावत असते. नरांची संख्या माद्यांपेक्षा नेहमीच कमी असते. त्यामुळे पाळीव कोंबड्याप्रमाणे एकाच नराच्या ४-५ माद्या असतात. नराचा पिसारा आणि त्याचे सौंदर्य हे प्रजनन संबंधी उत्क्रांतीचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. मोराला प्रजननक्षम होण्यासाठी सुमारे तीन वर्षाचा कालावधी लागतो, तर लांडोर २-३ वर्षाच्या दरम्यान वयात येते. नराचा पिसारा पूर्ण बहरात यायला मात्र ५-६ वर्षाचा कालावधी लागतो. मात्र, पिसारा बहरात आल्याशिवाय माद्या त्याला अजिबात भाव देत नाहीत. नराचा पिसारा दरवर्षी झडतो आणि विणीच्या हंगामा आधी ही पिसे परत वाढतात.

हा पिसारा त्याच्या प्रजननासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण पिसाऱ्याच्या लांबीवर आणि चमकदारपणावर त्याला किती माद्या मिळणार हे ठरते. पूर्ण वाढ झालेला नर जंगलातील खुली जागा निवडतो ज्याला इंग्रजीत लेक असे म्हणतात. ही जागा फक्त त्याच्याच मालकीची असते. किंबहुना त्यावर फक्त त्याचाच अधिकार चालतो. या जागेवर जाऊन तो पिसारा फुलवून नाचतो आणि माद्यांना आकर्षित करतो. एका उमद्या नराचे वैशिष्ट्य त्याचा डौलदार पिसारा, पिसांचा रंग, लांब पाय नखे आणि पाणीदार डोळे असतात. ही सर्व वैशिष्ट्ये ज्या नरात जास्त दिसतात त्याला जास्त माद्या मिळतात. एक नर ४-५ माद्यांशी प्रणय करतो.

मिलनानंतर मादी एकांत अशा ठिकाणी झुडपात अथवा दाट अशा झाडोऱ्यात खळग्यासारखे घरटे बनविते. त्यात ती ७-१० अंडी घालते आणि २७-३० दिवस हा अंडी उबवण्याचा काळ असतो. या काळात अंडी आणि मादी यांना शिकारी प्राण्यांचा धोका संभवतो. यांचे प्रमुख शत्रू कोल्हा, खोकड, रानमांजर, मुंगुस, भटकी कुत्री आणि साप हे होय. या सर्वांपासून लपून राहिली तरच अंडी आणि पिल्ले वाचू शकतात.

किती खरे, किती कल्पना?

पाऊस आणि मोर यांचे नाते आपण नाच रे मोरा... सारख्या कवितेतून पाहिलेच आहे. पण पाऊस आल्यावर मोर नाचू लागतो हे कितपत सत्य असावे, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचा आपण थोडा मागोवा घेऊया. आधी सांगितल्या प्रमाणे भारतात मोराच्या विणीचे दोन हंगाम आहेत. उत्तर आणि मध्य भारतात तो पाऊस सुरू झाल्यानंतर म्हणजे मुख्यतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होतो. तर दक्षिण भारतात तो पाऊस सुरू होण्याअगोदर दोन महिने म्हणजे एप्रिल अथवा मे मध्ये सुरू होतो. त्यामुळे दक्षिण भारतात मोराचे नाचणे हे पाऊस यायच्या खूप आधीच सुरू होते. याच्या अगदी उलट उत्तर आणि मध्य भारतात मात्र ते पाऊस सुरू झाल्यानंतर दिसून येते.

मोराबद्दलचा हा समज कालिदासाच्या मेघदुतम मधून आला असावा, अशी शक्यता आहे. कारण त्यानंतरच्या सर्व कथा-कवितांमध्ये अशीच वर्णने सापडतात. या कथा-कविता प्रामुख्याने उत्तर भारतात रचल्या गेल्या. त्यावेळी ज्या लोकांनी हे दृश्य पहिले असणार त्यांना साहजिकच असे वाटले असावे की पाऊस येण्याच्या आनंदातच मोर नाचत असावा. पण प्रत्यक्षात मात्र मोर पावसाच्या आनदांत नाचत नसून माद्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने नाचतो.

पावसाशी नक्कीच संबंध

हे जरी सत्य असले तरीही मोराचा विणीचा हंगाम आणि पावसाचा दृढ संबंध आहेच. मोर प्रागैतिहासिक काळात युरोप, आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये पसरला होता. या खंडातील हवामान आणि भारतीय उपखंडातील हवामान यात बराच फरक आहे. मोराने भारतीय उपखंडात बस्तान बसविले असावे, तेव्हा त्याच्या वंश-वृद्धीसाठी अन्नाची उपलब्धता असणे आवश्यक असणार. ही अन्नाची उपलब्धता पावसाशी नक्कीच निगडीत आहे. आपण सर्वाना माहीतच आहे की पाऊस आल्यावर निसर्गातील सर्वच घटकांची वाढ होते. हेच मोराच्या पिल्लांच्या वाढीसाठी आवश्यक असते. त्यामुळे मोराने पावसाळा हा ऋतू आपल्या प्रजननासाठी निवडला असावा.

अर्थात, ही घटना अपघाताने किंवा जाणून बुजून घडता उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर घडली असणार. आता दक्षिण भारत आणि उत्तर भारतातील विणीच्या हंगामात तफावत का असावी, असाही प्रश्न उभा राहतो. तर याचे उत्तर थोडे जटील आहे. पण दक्षिण भारतातील काही भागात पाऊस मे महिन्याच्या शेवटीच सुरू होतो. जर त्याचा फायदा घ्यायचा असेल तर प्रजनन चक्र लवकर सुरू करावे लागेल. याच कारणास्तव हे दोन वेगवेगळे ऋतू मोराने निवडले असावेत. पण मोराच्या या निवडी बाबत मात्र आपले कथा-कविताकार अनभिज्ञ असावेत त्यामुळे पाऊस आल्यावर मोर नाचतो, ही संकल्पना दृढ झाली असावी.

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ३५ वी गोष्ट.)

 

- गिरीश जठार

[email protected]

सर्व छायाचित्र - विकिमीडिया.ऑर्ग

(भवताल मासिकाच्या जुलै - ऑगस्ट २०१६ अंकातून...)

भवतालाविषयी दर्जेदार वाचनासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like