Articles 
पालखी मार्गावरील एका दक्षिणी भाषेच्या प्रभावाची गोष्ट!

पालखी मार्गावरील एका दक्षिणी भाषेच्या प्रभावाची गोष्ट!

पालखी मार्गावरील एका दक्षिणी भाषेच्या प्रभावाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३६)

 

पंढरपूरच्या सावळ्या विठोबाच्या दर्शनाला निघालेल्या वारीला दोनच दिवसांपूर्वी देहू-आळंदीहून सुरुवात झाली. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या दोन प्रमुख पालख्या पुण्यात पोहोचल्या. दोन दिवसांचा मुक्काम उरकून त्या प्रस्थान ठेवतील, पुढच्या प्रवास सुरू करतील. नियमित वारकऱ्यांसोबतच इतर लोकही त्यांच्यासोबत काही अंतर जातील. काही जण श्रद्धा म्हणून, काही जण हौस म्हणून, काही जण वेगळा अनुभव घ्यायचा म्हणून या पालख्यांसोबत प्रवास करतील.

या दोन्ही पालख्यांचे मार्ग ठरलेले आहेत. तुकोबांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी-काळभोरला पोहोचेल. पुढे यवत, बारामती मार्गे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल, तर माऊलींची पालखी दिवे घाट ओलांडून सासवडला पोहोचेल. तिथला मुक्काम संपवून जेजुरी, वाल्हे या मार्गे पुढे जाईल. या गावांच्या नावामध्ये एक विलक्षण साम्य आढळते. उदाहरण म्हणून माऊलींच्या पालखीचा मार्गावरील ठिकाणे पाहा.

पालखीमार्गावरील गावे

माऊलींची पालखी पुण्यात येताना आळंदी रस्त्याने येरवड्याजवळून येते. शब्द लक्षात ठेवा- येरवडा. पुण्यातून पुढे जाताना एका गावावरून जाते. त्याचे नावही लक्षात ठेवा, वडकी. त्यानंतरचा टप्पा अवघड आहे. पालखी एक घाट ओलांडून जाते. घाटाचे नाव लक्षात ठेवा, दिवे घाट. सासवडला दोन दिवसांचा मुक्काम होईल. त्यानंतर मुख्य गाव लागते. त्याचे नाव लक्षात ठेवा, जेजुरी. त्यानंतर मार्गावर अनेक गावे येतात. त्यापैकी उदाहरण म्हणून आणखी एक नाव लक्षात ठेवा, वाल्हे. आणि पालखी मार्गावर नसले तरी वाल्ह्यापासून काही अंतरावर गाव आहे परिंचे.

पालखी मार्गावरील गावांची नावे पुन्हा एकदा पाहा- येरवडा, वडकी, दिवे, जेजुरी, वाल्हे, परिंचे. यामध्ये काही साम्य आढळते का? ही नावे इतर कोणत्या भाषेतून आली आहेत असे वाटते का? क्षणभर विचार करा आणि मगच पुढे वाचा.

आता या गावांच्या नावाचे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत याचा शोधू घेऊया आणि त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्नही करूया.

एरूवडै= एरू म्हणजे खत. “एरूवडै” म्हणजे खतासाठी खिल्लारे शेतात बसवणे. यावरून येरवडा  हे नाव आले.

वडक्कु= याचा अर्थ उत्तर. यावरून वडकी नाव पडले.

दिववु= डोंगरात कोरलेल्या पायऱ्या. यावरून मार्गावरील घाटाला दिवे हे नाव पडले.

जेजै / चेचै= याचा अर्थ बोकड. याचा अपभ्रंश होऊन जेजुरी शब्द बनला आहे.

वाल्ह= याचा अर्थ तलवार. यावरून वाल्हे या गावाचे नाव आले.

परिचु= याचा अर्थ तलवारीची मूठ. यावरून परिंचे या गावाचे नाव पडले.

काय... ही भाषा?

आता सर्वांत मोठा आश्चर्याचा धक्का सहन करायला तयार राहा. हे शब्द आणि त्यांचे अर्थ आहेत- तमिळ भाषेतील. या सर्वच गावांच्या नावांवर तमिळ भाषेचा मोठा प्रभाव आहे. ही झाली काही उदाहरणे. शोध घेतला तर अशी आणखीही अनेक गावांची नावे आणि शब्द सापडतील.

विषयच निघाला आहे म्हणून आणखी काही उदाहरणे. अकोले या गावाचे. म्हणजे गाय आणि कोले म्हणजे धरणे. म्हणजेच गाय ज्याने धरली जाते किंवा ज्याला बांधली जाते तो दांडा. यावरून आकोले किंवा अकोले हे नाव आले. जिथे जिथे गोठे किंवा गवळीवाडे होते, त्या ठिकाणांसाठी हा शब्द वापरला जातो. म्हणून या नावाची गावे अनेक ठिकाणी आढळतात. याशिवाय इतरही काही शब्द मराठी बनून गेले आहेत. वडी म्हणजे नाला. तांबवे याचा अर्थ गायीचे दावे. या नावाची गावे आपल्याकडे आढळतात. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात या नावाचे गाव आहे. इतरत्र असेल तर त्याचा शोध घ्या.

आणखी एक शब्द वाशल्. याचा अर्थ प्रवेशद्वार. अनेक गावांची नावे वाशी आहेत. ती याच शब्दावरून पडली आहेत. वसई या गावाचा, नावाचा संबंधसुद्धा तमिळ भाषेशी आहे. मूळ तमिळ शब्द वैसावे. त्याचा अर्थ शांत होणे. आभीर या तमिळ शब्दावरून आला आहिर. असे कितीतरी शब्द मूळ तमिळ भाषेतून आल्याचे सांगता येतात.

या प्रभावाचे कारण काय?

महाराष्ट्राच्या भूभागावर वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या प्रदेशातील राज्यकर्त्यांची सत्ता होती. त्यांच्या भाषेचा प्रभाव मराठीवर पडला आहे. सत्ताधाऱ्यांच्या भाषेतील अनेक शब्द मराठीने स्वीकारले आहेत. याबाबत फारसी आणि अलीकडच्या इंग्रजी भाषांच्या प्रभावाची उदाहरणे आपल्याला माहितीची असतात. तशाच प्रकारे त्याच्याही आधी तमिळ आणि कन्नड सत्ताधीशांचा प्रभाव म्हणून हे शब्द आपल्याकडे आले आहेत. तमिळ शब्दांरोबरच मोठ्या संख्येने कानडी शब्दसुद्धा मराठीमध्ये आहेत. ते इतके बेमालूमपणे मिसळले आहेत की ते मराठीपासून वेगळे करता येत नाहीत.

भाषा विकसित होत असताना तिच्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो, तशीच तीसुद्धा इतर भाषांवर प्रभाव टाकत असते. सत्ताधाऱ्यांची भाषा / त्यातील शब्द स्वीकारण्याची सर्वसाधारण प्रवृत्ती असते. तसेच जे सोयीचे आहे, व्यवहार्य आहे तेसुद्धा सहजपणे स्वीकारले जाते. त्यामुळे मराठीने इतरांचे शब्द घेतले. तसेच, मराठीतील अनेक शब्द इतर भाषांनी घेतले आहेतच. त्याचा शोध घेतल्यावर हा भाषांचा व्यवहार कसा चालतो, त्यांचा एकमेकांशी काय संबंध असतो आणि त्या कशा विकसित होत जातात, हेही समजेल. आता हा शोध मात्र प्रत्येकाला आपापला घ्यावा लागेल!

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ३६ वी गोष्ट.)

 

- प्रदीप आपटे

[email protected]

(मराठीचा तमिळ भाषेशी असलेला हा पूर्वज संबंध विश्वनाथ खैरे यांच्या लेखनात विपुलपणे नोंदला गेला आहे.)

(फोटो सौजन्य - पुष्कर खाडे, सुनील लांडगे)

भवतालाविषयी दर्जेदार वाचनासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

5 Comments

Hemant Jadhav

कधी लक्षात हि आले नाही..छानच माहिती

Bhavatal Reply

हो, हे फारच इंटरेस्टिंग आहे. धन्यवाद.

Dhanashri

अस पण असू शकते. खुप छान आणि नवीन माहिती मिळाली धन्यवाद

Bhavatal Reply

Thank you.

स्मिता कुलकर्णी

खूपच माहितीपूर्ण लेख आहे. उपयुक्त ! 👍🏻☺ धन्यवाद ! 🙏🏻

Bhavatal Reply

धन्यवाद. आपल्या संपर्कात शेअर करावा.

सुहास रंगराव कुळकर्णी

खुपच छान लेख!नेहमी मनात विचार यायचा की गावांची नावे कशी ठेवली असावी...आज हे गुपित कळाले 😊🙏

Your Comment

Required fields are marked *

You may also like