Articles 
वारी आणि पाऊस यांच्यातील बदललेल्या संबंधाची गोष्ट!

वारी आणि पाऊस यांच्यातील बदललेल्या संबंधाची गोष्ट!

वारी आणि पाऊस यांच्यातील बदललेल्या संबंधाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ३७)

 

जून महिना उजाडला की मोसमी पावसाची वाट पाहिली जाते. तशीच पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीचीसुद्धा याच महिन्यात प्रतिक्षा असते. विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टींचा म्हणजे पाऊस आणि वारी यांच्यात घट्ट संबंध आहे. आज त्याच्यातील घडलेल्या, बिघडलेल्या संबंधाची ही गोष्ट!

हा शेतकऱ्यांचा संप्रदाय

हा संबंध सांगताना वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक व साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी दिलेल्या माहितीची दखल घ्यावी लागेल. ते सांगतात, “वारकरी हा शेतकऱ्यांचा आणि शेतीशी संबंधित लोकांचा संप्रदाय आहे. त्याचा दाखला विविध संतांच्या अभंगांमधून येतोच. हा जगाचा, मनुष्याच्या जन्माचा उत्सव आहे. वारीचे वेळापत्रक पाहिले तरी ते पूर्णपणे पावसाशी आणि शेतीच्या वेळापत्रकाशी जोडलेले आहे. ते कसे?”

“...तर पाऊस सुरू होतो. त्या आधी मशागतीची कामे झालेली असतात. पावसानंतर वापसा होतो, पेरण्या होतात. त्यानंतर पीक खुरपणीला येईपर्यंत म्हणजे पीक उगवून येऊन त्याची विशिष्ट वाढ होईपर्यंत शेतकऱ्याला विशेष काम नसते. या काळातच वारकरी आपापल्या गावातून दिंड्यांमधून निघतात. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतात आणि माघारी येतात. त्या वेळी त्यांचे पीक पहिल्या खुरपणीला आलेले असते. मग ते शेतीच्या पुढच्या कामाला लागतात. पण हे झाले देशावरच्या शक्यतो जिरायती पिकांबाबत. कोकणात मात्र परिस्थिती वेगळी असते. तिथले मुख्य पीक भात. त्याला जास्त पाऊस लागतो, पावसात लागण करावी लागते. त्यामुळे कोकणी शेतकऱ्याला आषाढी वारी करता येत नाही, म्हणून तो कार्तिकी वारी करतो.”

आषाढी, कार्तिकी शिवाय आणखी चैत्र आणि माघी या दोन वाऱ्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्या त्या प्रदेशातील लोक, मुख्यत: शेतकरी आपापल्या भागातील पाऊस, शेतीची कामे यानुसार कोणती वारी करायचे हे ठरवतात.

खुरपणीनंतरच आराम

या वेळापत्रकाबाबत अनेकांच्या आठवणी सांगता येतील. ज्येष्ठ पत्रकार व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांची आठवण येथे देणे संयुक्तिक ठरेल. ते सांगतात, “आमचे वारकरी घर. वडील दरवर्षी वारी करायचे. मला लहानपण आठलते, वडील पेरण्या करून वारीला जायचे. त्या वेळी त्यांची पेरणीची आणि वारीला जाण्याच्या तयारीची यांची लगबग आसायची. ते महिन्याभरानी माघारी यायचे, तेव्हा वाटायचे आता हे थकून आलेत तर आराम करतील. प्रत्यक्षात ते शेतात खुरपणीच्या कामाला लागायचे. पिकात वाढलेले तण काढून शेत लख्ख करायचे. तेव्हाच शांत बसायचे.”

वारीचे पावसाशी असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी ही उदाहरणे पुरेशी आहेत. खरेतर आधीच्या पिढीतील लोकांच्या आठवणीनुसार, मोसमी पावसाचे वेळापत्रकही बऱ्यापैकी ठरलेले असायचे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन व्हायचे. त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रभर पाऊस पसरायचा. १५-२० जूनपर्यंत बऱ्याचशा भागातल्या पेरण्या उरकलेल्या असायच्या. मग ही मंडळी वारीमध्ये सहभागी व्हायची. (काही लोकांना कदाचित वाटत असेल हे बिनकामाचे म्हणून वारीला जातात, पण खरा वारकरी हा आपली कर्तव्यं सांभाळूनच पांडुरंगाच्या दर्शनाला जातो.) त्यांच्या व्यवसायाचा, शेतीचा पावसाशी-हवामानाशी असा हा घट्ट संबंध!

पालखी आणि पावसासंबंधी इतरही काही समजुती प्रचलित आहेत. पालख्यांच्या स्वागताला पाऊस येतोच, असे अनेक ठिकाणी मानले जाते. पुणे शहरात एकाच दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या येतात. तेव्हा हमखास पाऊस पडतो, ही अशीच एक धारणा. अलीकडे ती प्रत्यक्षात येताना दिसत नाही.

मुद्दा बदललेल्या पावसाचा

गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे गणित बदलले आहे असे सर्वसाधारणपणे बोलले जाते. त्यावर आता तज्ञांनीसुद्धा शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या दहा वर्षांमधील मान्सूनच्या पावसाचे आगमन आणि त्याचे वर्तन पाहिले तरीही याची प्रचिती येते. मोसमी पावसाचे वेळेवरच आगमन होत असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर केले जाते. मात्र, जून महिन्यात विशेष पाऊस पडत नाही. खरा पाऊस सुरू होतो तो जुलै महिन्यातच. आताचे वर्षसुद्धा त्याला अपवाद नाही. जून महिना संपत आला तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरी जेवढा पाऊस पडतो, त्याच्या जेमतेम निम्माच पाऊस झाला आहे. त्यातही काही भाग अगदीच कोरडा आले. त्यामुळे शेतीच्या नियोजनासाठी जूनच्या पावसावर किती भरवसा ठेवायचा, हा प्रश्नच निर्माण झाला आहे. शेतीची कामेच झाली नाहीत तर वारकरी आषाढीच्या वारीत कसा सहभागी होणार? त्यामुळे त्यांच्या संख्येवर परिणाम होत असल्याचे निश्चितपणे पाहायला मिळते.

या बदलत्या परिस्थितीत वारी आणि पाऊस यांचे गणित कसे जमणार हा प्रश्न आहेच. पाऊस पडण्याचा कालावधी मागे-पुढे करणे आपल्या हातात नाही, पण त्याच्यानुसार पेरणीचे आणि शेतीच्या इतर कामांचे वेळापत्रक बदलावे लागेल हे निश्चित. त्यात नेमके कसे बदल करायचे? हे मोठे आव्हान आज कृषिवैज्ञानिकांपुढे आहे.

वारी हा शेतकऱ्यांचा सोहळा असेल तर मग शेतीशी संबंधित या मोठ्या आव्हानाचा विचार या निमित्ताने करायला हवा. वारी आणि पाऊस यांचा संबंध पूर्वीचा उरणार नसेल, तर तो पुढे कसा असेल याची मांडणी करतानाच त्यातून शेतीला पुढे कसे न्यायचे याची कृतिसुद्धा ठरवावी लागेल आणि करावीसुद्धा लागेल!

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ३७ वी गोष्ट.)

 

- भवताल टीम

[email protected]

भवतालाविषयी दर्जेदार वाचनासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

1 Comments

swati Dixit

Never thought of it. The story is interesting & informative too.

Your Comment

Required fields are marked *

You may also like