Articles 
मान्सूनच्या लांबलेल्या आगमनाची गोष्ट!

मान्सूनच्या लांबलेल्या आगमनाची गोष्ट!

मान्सूनच्या लांबलेल्या आगमनाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ३८)

.

गेल्याच वर्षाची, २०२१ सालची गोष्ट आहे. हवामान विभागाने अंदाज दिला होता की मान्सून १४ जून रोजी दिल्ली येथे पोहोचेल. विशेष म्हणजे हा अंदाज एक-दोन दिवस आधीच दिला होता. त्यामुळे तो बरोबर येणे अपेक्षित होते. पण कसलं काय? मान्सूनने या अंदाजाला गुंगारा दिला आणि तो त्यानंतर तब्बल एक महिन्याने, १३ जुलै रोजी दिल्लीत पोहोचला. आता बोला!

आपण मान्सूनच्या आगमनाचे वेळापत्रक तयार केले आहे ते आपल्या सोयीसाठी. पण ते पाळण्यासाठी मान्सून थोडीच बांधील आहे? मान्सूनचा विचार करताना ही गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे. कारण तो निसर्गातल्या इतर घटकांप्रमाणे परिवर्तनशील घटक आहे. तो कधीच स्थिर नसतो. म्हणजे सरासरी म्हणून त्याचे वेळापत्रक बनवले तरी त्याच्यामध्ये चढ - उतार असतातच. ते किती असतात? तर आपल्याला अंदाज येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतात. एका उदाहरणावरून हे नेमकेपणाने लक्षात येईल.

दोन महिन्यांची तफावत

मान्सून म्हणजेच मोसमी वारे केरळमार्गे भारतात येतात. त्यानंतर ते हळूहळू संपूर्ण भारत व्यापतात. सर्वसाधारणपणे तो ८ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापतो. पण त्यात दरवर्षी तफावत असते. प्रत्यक्षात त्याने कोणत्या तारखेला संपूर्ण भारत व्यापला, याच्या गेल्या ६०-६५ वर्षांच्या नोंदी हवामान विभागाकडे व्यवस्थित उपलब्ध आहेत. त्यावरून असे लक्षात येते की मान्सूनने सर्वात लवकर भारत व्यापला तो १६ जून या दिवशी. ते वर्ष होते २०१३. आणि त्याने सर्वात उशिरा भारत व्यापला तो २००२ या वर्षी आणि ती तारीख होती १५ ऑगस्ट. म्हणजे १६ जून आणि १५ ऑगस्ट या तारखांचा विचार करता यामध्ये दोन महिन्यांची तफावत आहे.

केरळ, दिल्लीमधील आगमन

मान्सून हा निसर्गातील परिवर्तनशील घटक असल्याने त्यात मुळातच काही बदल होत असतात. त्यामुळेच त्याच्या आगमनाच्या सरासरी तारखा काही काळानंतर अपडेट केल्या जातात. २०२० सालापर्यंत त्याचे सरासरी वेळापत्रक होते, त्यासाठी आधार म्हणून १९०१ ते १९४० या कालावधीतील नोंदी वापरल्या गेल्या होत्या. त्यानुसार मान्सूनचे केरळमधील आगमन १ जून रोजी व्हायचे. त्याचबरोबर १ जून याच दिवशी तो ईशान्य भारतातही प्रवेश करायचा. पण मान्सूनच्या आगमनाचे नवे सरासरी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी मान्सून आगमनाच्या १९६१ ते २०१९ या कालावधीतील प्रत्यक्ष तारखा आधार म्हणून वापरण्यात आल्या आहेत. या नव्या सरासरी वेळापत्रकानुसार, मान्सून हा १ जून रोजी केरळला पोहोचतो, पण त्या तारखेला ईशान्य भारतात मात्र पोहोचत नाही.

त्याचे दिल्लीतील आगमन, संपूर्ण भारत व्यापणे आणि महाराष्ट्रातील आगमनाच्या तारखा यामध्येही बदल झाला आहे. आधीच्या सरासरी वेळापत्रकानुसार मान्सून दिल्लीला २९ जून रोजी पोहोचत असे. आता नव्या सरासरी वेळापत्रकानुसार तो २ दिवस आधी म्हणजे २७ जून रोजी दिल्लीला पोहोचतो. त्याची संपूर्ण भारत व्यापण्याची पूर्वीची तारीख होती १५ जुलै. आता नव्या सरासरी वेळापत्रकानुसार ८ जुलै ही तारीख आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा आठवडाभर आधीच तो संपूर्ण भारत व्यापतो.

महाराष्ट्रात मात्र विलंब

हे बदल देशाच्या सर्व प्रदेशांबद्दल झाले आहेत. तसेच, ते महाराष्ट्राबद्दलही झाले आहेत. मात्र, मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पूर्वीसुद्धा ५ जून रोजी पोहोचत होता, आताचे सुधारित वेळापत्रकसुद्धा ही तारीख दर्शवते. मात्र, विविध शहरांमध्ये पोहोचण्यास तो विलंब होत आहे. मुंबईत तो १० जून रोजी पोहोचायचा, आता तो एक दिवस उशिराने येऊ लागला आहे. पुण्याची तारीख ८ जून होती, ती आता १० जून झाली आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात त्याचे सरासरी आगमन पाच दिवसांनी पुढे गेले आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार तो औरंगाबादला १३ जून रोजी पोहोचत असे. नागपूरमध्येही त्याचे सरासरी आगमन आठवड्याने पुढे गेले आहे. पूर्वी ९ जून रोजी पोहोचणारा मान्सून आता १६ जून रोजी पोहोचू लागला आहे. अकोला-अमरावतीसह एकूणच विदर्भात असेच बदल झाले आहेत. जळगावला तर तो सर्वात शेवटी पोहोचतो. पूर्वी ही तारीख ११ जून होती, ती आता १८ जून अशी बदलली आहे.

हे सांगण्याचे कारण म्हणजे मान्सूनसारखे नैसर्गिक घटक सर्व काळ एक सारखे वागत नाहीत. किंवा सर्वकाळ जसेच्या तसे स्थिर राहत नाहीत. त्यांच्यामध्ये बदल होत असतात. आपण सुधारित वेळापत्रकातील तारखा पाहिल्या तरी त्या सरासरी आहेत. पुण्यामध्ये मान्सून १० जून रोजी पोहोचतो, याचा अर्थ तो दर वर्षी १० जूनलाच  पोहोचेल का? तर अजिबात नाही. कधी तो ४-५ दिवस लवकर येतो, कधी त्याच्या आगमनाला ४-५ दिवसांचा उशीर होतो. त्याच्या दरवर्षीच्या आगमनाची सरासरी काढली तर तो १० जून रोजी तिथे पोहोचतो. हे सर्वच ठिकाणांना लागू आहे.

नैसर्गिक घटकांमध्ये हे परिवर्तन होतच असते. म्हणून सातत्याने आपले हवामानाचे अंदाज चुकतातही. ते चुकण्यामध्ये आपली तंत्रज्ञानविषयक प्रगती कमी होणे किंवा आपल्याला मान्सूनचा अंदाज कमी येणे ही कारणे आहेतच, पण त्याच बरोबर हे सगळे घटक परिवर्तनशील आहेत. ते बदलत असतात, याचासुद्धा महत्वाचा वाटा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

पण असेही म्हणून चालणार नाही की हे घटक जर बदलत असतील तर आपण त्यांचे अंदाज कशासाठी द्यायचे? आपल्याला हे अंदाज द्यावेच लागतील. हे घटक बदलत असतील तर त्यांच्यामध्ये आपल्यालाही सातत्याने सुधारणा कराव्या लागतील. चेंज इज कॉन्स्टन्ट म्हणजे बदल सातत्याने घडत असतो. मान्सूनच्या निमित्ताने संपूर्ण निसर्गाबद्दल हे लक्षात घ्यायला हवे.

(भवताल बेवसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ३८ वी गोष्ट.)

-  अभिजित घोरपडे

[email protected]

फोटो सौजन्य- अभिजीत घोरपडे

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

3 Comments

Sangita hase

Very nice information

Ashwini

Very nice article. But you should have explained which factors contribute to the deviation of the monsoon. Which is this flower shown in the photographs?

Bhavatal Reply

Thank you for your comment. The flower is- Gulmohar. About deviation, climate scientists are studying on that. Most of them are naming climate change as a main cause. But Monsoon being a complex phenomenon it will take time to reveal more factors.

Shrikant

माझं एक निरीक्षण आहे. मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वी साधारणपणे 15 दिवस ते तीन आठवडे कावळे घरटी करायला सुरुवात करतात. या वर्षी अद्याप, पुण्यात कोठेही मी कावळ्यांना घरट्याची तयारी करताना पाहिले नाही.

Bhavatal Reply

ओके, धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like