Articles 
पावसाच्या अंदाजांच्या मृगजळाची गोष्ट!

पावसाच्या अंदाजांच्या मृगजळाची गोष्ट!

पावसाच्या अंदाजांच्या मृगजळाची गोष्ट!

- अंदाज अचूक आले तरी मला उपयोग किती?

(भवतालाच्या गोष्टी ३९)

 

भारतात या वर्षीच्या पावसाळ्यात १०३ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. जूनमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याचे आणि त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मान्सून महाराष्ट्रात पोहोचला, पण पाऊस कुठे आहे? महाराष्ट्रासारखीच परिस्थिती देशाच्या जवळजवळ ६० टक्के प्रदेशावर आहे. हवामानशास्त्रीय दृष्ट्या भारताची विभागणी ३६ उपविभागांमध्ये करण्यात आली आहे. त्यांच्यातील जून महिन्याच्या पावसाची स्थिती कशी आहे याची कल्पना पुढील आकड्यांवरून येईल. ३६ पैकी २१ उपविभागांमध्ये अपुरा किंवा अतिशय अपुरा पाऊस पडला आहे. एकूण देशाचा विचार करता, जून महिन्यातील सरासरीच्या १० टक्के कमी पाऊस झाला आहे. सध्या ईशान्य भारतात प्रचंड पाऊस सुरू आहे. तरीसुद्धा देशाच्या पावसाचा आकडा उणे १० इतका आहे. ईशान्य भारतातील पाऊस वगळला तर हा आकडा आणखी कितीतरी खाली येईल.

चिंतेस कारण की…

सरासरीच्या १०३ टक्के पावसाचा अंदाज असताना जून महिना जवळजवळ कोरडाच गेला. आता शेती असेल किंवा पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याबाबत चिंतेचे वातावरण आहे. या चिंतेमागे हवामानातील बदल हे कारण आहे, त्याचबरोबर दुसरेही कारण आहे. ते म्हणजे, आपले पावसाच्या अंदाजावरील वाढलेले अवलंबित्व. आपण या अंदाजांवर इतके विसंबून का राहतो? आणि या मृगजळामागे का धावतो? हा मूळ प्रश्न आहे. हवामानाचे अंदाज किती विस्तृत प्रदेशासाठी दिले जातात हे लक्षात घेतल्यावर त्यातील मर्यादा लक्षात येतील.

कारण हवामान विभागाचे अंदाज तंतोतंत बरोबर आले तरीसुद्धा ते आपल्याला उपयुक्त ठरतीलच असे नाही. हे अंदाज विस्तृत प्रदेशासाठी दिले जातात. हवामान विभागाकडून मान्सून काळातील पावसाचा अंदाज संपूर्ण देशासाठी दिला जातो. त्यानंतर देशाचे चार प्रमुख विभाग करण्यात आले आहेत= १. पूर्व व ईशान्य भारत, २. वायव्य भारत, ३. मध्य भारत, ४. दक्षिण द्वीपकल्पीय भारत. या चार प्रमुख विभागांमध्ये पावसाळ्यात किती पाऊस पडेल याचाही अंदाज दिला जातो.

भारतातील हवामानाचे ३६ उपविभाग आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ हे उपविभाग येतात, त्याच्यासाठी तसेच, जिल्ह्यासाठी सुद्धा पावसाचे अंदाज देण्याचा प्रयत्न केले जात आहेत. त्यात अजूनही पुरेसे यश आलेले नाही. आणि जरी त्यात यश आले तरीसुद्धा त्याचा आपल्याला उपयोग होईलच, असे अजिबात नाही. याच्या पुढे जाऊन पावसाचा अंदाज जिल्ह्यासाठी दिला तरी तो कितपत उपयुक्त ठरेल, याबाबत शंकाच आहेत. प्रत्येकच जिल्ह्याचा मोठा विस्तार आहे. त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पाऊस-हवामान कितीतरी वेगळे असते. त्यामुळे तो अंदाज एका भागासाठी बरोबर ठरला तरी दुसऱ्या भागासाठी बरोबर असेलच हे सांगता येत नाही. किंबहुना, तो तसा नसतोच.

 मग या दीर्घकालीन अंदाजावर वैयक्तिक शेतकरी, वैयक्तिक नागरिक म्हणून विसंबून राहून चालेल का? कारण पावसाळ्यात एकूण किती पाऊस पडेल या अंदाजावर शेतीचे, कोणत्याही पिकाचे नियोजन कसे करणार? शेतकरी किंवा पावसामुळे प्रभावित होणाऱ्या अंतिम घटकांना उपयुक्त ठरतील इतक्या स्थानिक पातळीवरील अंदाज देण्याची यंत्रणा विकसित होईपर्यंत ते योग्य ठरणार नाही. तोपर्यंत, दीर्घकालीन अंदाजांची उपयुक्तता एकूण देशपातळीवरील किंवा राज्यपातळीवरील नियोजनापुरती मर्यादित राहील.

मग काय करायचे?

हवामान विभाग ६० - ७० वर्षांपासून, विशेषत: गेल्या ४० वर्षांमध्ये अंदाज देत आहे. पण त्याच्या आधीसुद्धा शेती होतीच की. आपल्याकडे पिढ्यान् पिढ्यांचे परंपरागत ज्ञान आहे त्याच्यावरच तर शेती इथपर्यंत पोहोचली. तेव्हा कुठे अंदाज दिले जात होते? तरीसुद्धा शेती होत होती, चांगल्या प्रकारे होत होती. आता आपल्याला आणखी पुढे जाताना या अंदाजांचा उपयोग करून घ्यायचाच आहे. पण त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन आपले कौशल्य, अनुभव, नियोजन यावर भर द्यायला हवा.

एखाद्या वेळेस पावसाची उशिराने सुरुवात झाली, त्याने जास्त ओढ दिली किंवा कधी जास्त पाऊस पडला अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर काय करायचे हे सगळ्यांना आपापल्या भागानुसार, पिकानुसार माहिती आहे. त्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपले अंदाजांवर विसंबून राहणे तुलनेने कमी होईल.

कोणत्या देशाचे अंदाज अचूक?

यानिमित्ताने अजून एक विषयावर बोलले पाहिजे. आपल्याकडे सर्वसाधारण अशी भावना आहे की भारतातील पावसाचे अंदाज चुकतात आणि परदेशातले अंदाज बरोबर येतात. त्यासाठी युरोप, अमेरिका किंवा इतर विकसित देशांचे उदाहरण दिले जाते. पण वस्तुस्थिती तशी आहे का? मान्सून काळातील पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग देते तसेच, भारतातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी (आयआयटीएम) किंवा अशा विविध संस्था देतात.

तसेच, परदेशातील संस्थासुद्धा असा अंदाज देतात. त्यात अमेरिका, युके या देशांमधील संस्थाचाही समावेश आहे. जसे भारतीय संस्थांचे मान्सूनबाबतचे अंदाज चुकतात, तसेच त्यांचे सुद्धा अंदाज चुकतात. याचा अर्थ आपल्याकडे हवामानशास्त्र संबंधात प्रगती झालेली नाही, तंत्रज्ञान विकसित झालेले नाही, संशोधन झालेले नाही असे अजिबात नाही. अर्थात, त्यांचे अंदाज चुकतात याच्या आड आपण लपायचे कारण नाही. या तृटी भरून काढण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, कारण हे अंदाज चुकण्याची फळे आपल्याला भोगावी लागतात, त्यांना नाहीत.

(भवताल बेवसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ३९ वी गोष्ट.)

-  अभिजित घोरपडे

[email protected]

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like