Articles 
मान्सूनच्या जन्माची दीड कोटी वर्षांपूर्वीची गोष्ट!

मान्सूनच्या जन्माची दीड कोटी वर्षांपूर्वीची गोष्ट!

मान्सूनच्या जन्माची, दीड कोटी वर्षांपूर्वीची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ४०)

 

आपण भारताचे वर्णन आसेतू हिमालय असे करतो. याचा अर्थ, समुद्रापासून हिमालयापर्यंत पसरलेला. तीन बाजूंना अथांग असा समुद्र आणि उत्तरेला हिमालय या आपल्या भारताच्या सीमा. त्यांनी आपले संरक्षण केले आहे आणि आपली हद्दसुद्धा घालून दिली. पण समुद्र आणि हिमालय या दोन घटकांचा एकेमेकांशी कुठल्या ना कुठल्या अर्थानी संबंध आहे का? हा संबंध आहे असे म्हटले तर कदाचित आश्चर्य वाटेल. तो मान्सूनच्या निर्मितीशी संबंधित आहे. किंबहुना, आपल्या मान्सूनच्या जन्माची गोष्टच मुळी या दोन्ही घटकांवर अवलंबून आहे. आज याच रंजक गोष्टीबद्दल...

हिमालयाचा मान्सूनचा जन्म

या गोष्टीतील एक वास्तव म्हणजे हिमालय आणि मान्सून या दोघांची निर्मिती एकाच सुमारास झाली. ती एकमेकांशी समांतर होत गेली. ज्यांना याबद्दल माहीत नसेल, त्यांच्यासाठी हे कोड ठरेल. तेच कोडे आज उलगडू या. त्यासाठी आपल्याला मान्सून अर्थात मोसमी वारे म्हणजे काय? त्यांची निर्मिती कशामुळे होते? हे समजून घ्यावे लागेल. त्यानंतर त्यांचा जन्म आणि त्याचा हिमालयाशी असलेला संबंध समजून घेता येईल.

पृथ्वीवर विविध प्रकारचे वारे आहेत. त्यातले असेही विशिष्ट वारे आहेत, जे एका हंगामात एका दिशेने येतात आणि हंगाम संपला की आल्या दिशेने निघून जातात. म्हणजे हे वारे एका हंगामात एका दिशेने येतात आणि दुसऱ्या हंगामात विरुद्ध दिशेने निघून जातात. हे वारे म्हणजेच मोसमी वारे किंवा मान्सून. ते जगाच्या अनेक भागात आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका असे जगाच्या विविध खंडांमध्ये हे वारे पाहायला मिळतात. पण सर्वात तीव्र वारे असतात ते भारतीय उपखंडात. ते का? याबाबत पुढच्या गोष्टीमध्ये समजून घेणारच आहोत.

मोसमी वारे तयार का होतात?

मोसमी वारे अर्थात मान्सून निर्माण व्हायला काय लागते? तर विषुववृत्ताच्या (इक्वेटर) दोन्ही बाजूला वेगवेगळी परिस्थिती लागते. एकीकडे अथांग महासागर हवेत आणि दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणात जमीन हवी. सूर्यामुळे जमीन आणि महासागर यांच्या तापण्याचा वेग वेगवेगळा असतो. त्यामुळे अशा ठिकाणी जमीन आणि समुद्र यांच्यातल्या तापमानामध्ये फरक निर्माण होतो. हा फरक निर्माण झाला की वारे तयार होतात. ते वेगवेगळ्या हंगामात  दिशा बदलून वाहतात. म्हणून जिथे विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला जमीन व समुद्र अशा विभागणी आहे मान्सूनची निर्मिती होऊ शकते. जगाच्या नकाशावर नजर टाकली तर अशी विभागणी कितीतरी ठिकाणी दिसते. तिथे तिथे मान्सूनची निर्मिती होत असते.

मान्सूनचे वय किती?

आता थोडे आपला मान्सूनबद्दल. आपल्याकडे दरवर्षी मोसमी वारे येतात, येताना पाऊसही आणतात. पण हे किती वर्षांपासून सुरू आहे- पृथ्वीच्या जन्मापासून, मागच्या काही लाख वर्षांपासून, हजारो वर्षांपासून की केवळ काहीशे वर्षांपासून? याचे उत्तर अवघड वाटेल, पण ते तितकेसे अवघड नाही. विषुववृत्ताच्या एकीकडे जमीन आणि दुसरीकडे समुद्र अशी विभागणी जेव्हा झाली, तेव्हा मान्सून अस्तित्त्वात आला. पण हे झाले कधी? हा कळीचा प्रश्न आहे. मान्सूनची निर्मिती होण्यासाठी आजपासून साधारणपणे दीड कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली. तेव्हापासून मान्सूनचे वारे आपल्याकडे यायला लागले.

ही घडामोड दीड कोटी वर्षांपूर्वीच का झाली? तर त्याचा संबंध हिमालयाच्या निर्मितीशी आहे. याच्यासाठी पृथ्वीचे जे भूखंड किंवा कॉन्टिनेन्ट्स आणि समुद्र आहेत याविषयी एक वास्तव आपल्याला समजून घ्यावे लागेल. हे जे भूखंड सतत फिरत असतात. यांचे स्थान कधीच स्थिर नसते. भारताचा आताचा भूभाग एकेकाळी दक्षिणेला होता आणि तो सरकत सरकत उत्तरेकडे आला. तो युरेशिया खंडाला जाऊन चिकटला. पूर्वी या दोन्ही खंडांच्या मध्ये समुद्र होता. त्याचे नाव टेथिस समुद्र! भारत व युरेशिया हे भूभाग एकमेकांकडे सरकल्याने या समुद्रातील गाळ, त्यांचे थर, तयार झालेले खडक हळू हळू वर उचलले गेले. तेव्हा आपल्या हिमालयाची निर्मिती झाली.

तापमानातील तफावत

फक्त हिमालयच नाही तर युरोपमधील आल्प्स पर्वताची निर्मिती तशीच झाली. हिमालयाची निर्मिती झाली आणि त्याची उंची वाढत गेली. ती अजूनही ती ऊंची वाढत आहे. हे निर्मिती सुरू झाल्यानंतर एक विशिष्ट गोष्ट घडली, ती म्हणजे आपल्याकडील जमिनीचे तापमान खूप जास्त राहू लागले. हिंदी महासागरावरील हवेचे तापमान आणि आपल्या प्रदेशावरील हवेचे तापमान यात जास्त फरक जाणवू लागला. हिमालय जसा वर उचलला गेला, तशी तिबेटच्या पठाराची निर्मिती झाली. तेव्हा हा तापमानातील फरक जास्त प्रकर्षाने जाणवू लागला. तेव्हापासून आपल्याकडील मोसमी वाऱ्यांची तीव्रता वाढली. ते चांगल्याप्रकारे तयार होऊ लागले. आणि आपल्याकडे दरवर्षी येऊ लागले. अभ्यासकांच्या मते ही स्थिती साधारणपणे दीड कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली. म्हणून मान्सूनचे वयसुद्धा तितके आहे.

वरवर पाहता, मान्सूनच्या निर्मितीचा हिमालयाशी संबंध लक्षात येणार नाही. पण या गोष्टीतली वस्तुस्थिती लक्षात घेतल्यावर त्याने किती प्रभाव टाकला आहे हे समजेल. म्हणूनच मान्सूनच्या निर्मितीमध्ये समुद्र हे प्रमुख पात्र आहे तसेच हिमालयसुद्धा आहे. भारताचे आसेतू हिमालय हे वर्णन किती योग्य आहे याची प्रचितीसुद्धा या निमित्ताने येते.

(भवताल बेवसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४० वी गोष्ट.)

-  अभिजित घोरपडे

[email protected]

(फोटो सौजन्य - गणेश कोरे + विकिमीडिया)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

5 Comments

PARAG KASHELKAR

Amazing information Abijeet, as always. Enjoying it, bookmarking and sharing it too. Looking forward to many more

Bhavatal Reply

Thank you. Yes of course, many more to come in this series :-)

PARAG KASHELKAR

Amazing information Abijeet, as always. Enjoying it, bookmarking and sharing it too. Looking forward to many more

M N Damle

सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या भाषेत शास्त्रीय माहिती चे सादरीकरण . खूप खूप छान,व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Bhavatal Reply

मनापासून धन्यवाद.

Darshana Pimpalnerkar

खूप सुंदर माहिती सांगितली sir

Bhavatal Reply

Thank you.

Gulab Sahane

अत्यंत सोप्या भाषेत मान्सून बाबत माहिती दिली.

Bhavatal Reply

धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like