Articles 
एका बेडकाच्या जन्माची गुंतागुंतीची गोष्ट !

एका बेडकाच्या जन्माची गुंतागुंतीची गोष्ट !

एका बेडकाच्या जन्माची गुंतागुंतीची गोष्ट !
(भवतालाच्या गोष्टी ४२)

 

“चार झाडं तोडली किंवा ओसाड पठारावर एखादा प्रकल्प येतोय म्हटलं की लगेच लागतात बोंबलायला…” पर्यावरण कार्यकर्त्यांना अशा प्रकारची टीका नेहमीच ऐकावी लागते. पण ही झाडं, पठारं, अगदी पावसाळ्यापुरती गढून पाणी साचणारी डबकीसुद्धा महत्त्वाची असतात.
किती महत्त्वाची??
हे पावसाच्या निमित्ताने समजून घेता यावे यासाठीच ही एका बेडकाच्या जन्माची गोष्ट. त्याच्या जन्मासाठी किती गोष्टी जुळून याव्या लागतात हे यावरून लक्षात येईल. मग विस्तीर्ण गवताळ माळराने, पावसाळ्यात फुलणारे सडे किंवा मुंबईजवळील आरे सारखा हिरवा पट्टा निघून जातो तेव्हा तो एकटा नष्ट होत नाही, तर त्याच्यासोबत काय काय निघून जाते, याचे भान यावे यासाठीच ही गोष्ट!
...
फेसाचे घरटे करणारा बेडूक
हा आहे हिरव्या रंगाचा 'मलबार ग्लायडिंग फ्रॉग'! तो केरळ, कर्नाटक, गोवा ही राज्ये आणि महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात आढळतो. तो सदाहरित व निम-सदाहरित जंगलांमध्ये राहतो. त्याच्या वास्तव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जैवविविधतेची संपन्नता अधोरेखित होते. हा जगात फक्त पश्चिम घाटांमध्येच आढळतो. त्यामुळे इथल्या जैवविविधतेत त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे नर आणि मादी मिळून झाडांच्या फांदीवर फेसाचे घरटे करतात. या घरट्याचे ठिकाण असते एखाद्या पाण्याच्या डबक्याच्या बरोब्बर वर!

पण हे घरटे करण्यापूर्वी बरेच नाट्य घडते. पावसाच्या सुरुवातीला सगळे नर अशा डबक्यांवरील झाडांवर रात्रभर मादीला आकर्षित करण्याकरिता आवाज काढत बसतात. ज्यावेळेला एखादी मादी त्या झाडावर येते, तेव्हा नरांमध्ये चढाओढ लागते. एखादाच नर तिच्या पाठीवर बसण्यात यशस्वी होतो. मग मादी घरटे करण्यास योग्य फांदीची निवड करते आणि घरटे बांधण्यास सुरवात होते. घरटे करताना मादी एक द्रव स्रवते आणि पायांच्या विशिष्ट सूत्रबद्ध हालचालींमुळे फेस तयार होतो. या फेसामध्ये मादी त्याचवेळी अंडी घालते आणि नर त्यावर शुक्राणू सोडतो. यामुळे त्या अंड्यांचे फलीकरण होते. घरटे करून झाले की नर मादीपासून वेगळा होतो. मादी त्या फेसाला आजूबाजूची पाने चिकटवते. यामुळे पावसाच्या माऱ्यापासून घरट्याचे संरक्षण होते. या फेसातील अंड्यांमधून डिंबके (बेडूकमासे) तयार होण्यासाठी चार-पाच दिवसांचा अवधी लागतो. या दरम्यान जर फेस पावसाच्या पाण्याने विरघळून गेला, तर सारे प्रयत्न वाया जातात.
पावसाला विलंब झाला तर?
चार-पाच दिवसांमध्ये डिंबके तयार होतात. घरट्यातील फेस जसजसा विरघळू लागतो, तसे एकेक डींबक खालच्या डबक्यातल्या पाण्यात पडते. पुढे दीड ते दोन महिने ते डबक्यातले शेवाळ, मेलेले प्राणी यावर वाढत राहते. या पिल्लांच्या वाढीसाठी लागणारा दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लक्षात घेतला तर ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा श्रावण सुरू होईपर्यंत यांना इथपर्यंत विकसित व्हावे लागते. यासाठीच हा बेडूक प्रजननासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीची निवड करतात. या दरम्यान पावसाला विलंब झाला तर ते पुढे फार अडचणीचे ठरू शकते. एकदा घरटे झाले आणि पावसाने ओढ दिली तरीसुद्धा घरटे खराब होऊ शकते. घरट्याखालच्या डबक्यातील पाणी संपले तरी या पिल्लांचा मूत्यू होऊ शकतो... म्हणजे बघा, बेडकाचा जन्म होण्यासाठी किती गोष्टी जुळून याव्या लागतात!

टायगर टोड आणि सडे
दुसरे उदाहरण आहे टायगर टोडचे. पश्चिम घाटात बेडकांवर आजवर केरळ व कर्नाटक राज्यात बराच अभ्यास झालेला आहे. त्या तुलनेने महाराष्ट्रात झालेला नव्हता. म्हणूनच काही वैज्ञानिकांनी महाराष्ट्रात पसरलेल्या पश्चिम घाटावर लक्ष्य केंद्रित केले. त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात बेडकांच्या नवीन प्रजातींचे शोध लागले. त्यामधीलच एक आहे Zanthophryne tigerinus अर्थात 'टायगर टोड'.
याच्या अंगावर वाघासारखे पट्टे असतात, त्यामुळे त्याला हे नाव देण्यात आले. आजतागायत हा फक्त अंबोलीतच आढळून आला आहे. त्याचा शोध लागल्यानंतर मग त्याच्या अधिवासाचा आणि प्रजनन क्रियेचा वैज्ञानिक अभ्यास सुरू झाला. इतर बेडकांप्रमाणे याही बेडकाची मादी नरापेक्षा थोडी मोठी असते. प्रजननाच्या कालावधीत यांच्या नराचा रंग पिवळाधम्मक होतो. त्या तुलनेन मादी फिकट राखाडी रंगाची असते. बेडूक हे मुख्यतः रात्रीच्या वेळी सक्रिय असतात आणि त्यांचे समागनही रात्रीच्या वेळीच चालते.
पाऊस सुरू होताच
उन्हाळ्याच्या दिवसात रूक्ष आणि उजाड वाटणारे कातळ सडे पहिलय २ - ३ पावसांमध्ये आपले रूप पालटतात. आणि मग संपूर्ण उन्हाळाभर दगडांखाली कपारीत शीतनिद्रेत असलेले जीव बाहेर पडतात. हे बेडूक सड्यांवरील मोकळ्या जागेत येऊन टीरिक टीर्र्र्रर्रर्र्र्र टीर्र्रर्रर्र्र्र टीरिक अशा आवाजात मादीला आकर्षित करण्यासाठी इतर नरांशी स्पर्धा करू लागतात.

मोकळ्या सड्यांवर मोठाले खडक उघडे पडलेले असतात. दगडांवरील छोट्याशा खोलगट भागात साचलेल्या पाण्यात यांची अंडी असतात. या अंड्यांमधून आठवड्यात त्यांची डिंभके खडकावरील शेवाळ खाऊन विकसित होतात. या दरम्यान पावसाने उघडीप दिली तर मात्र यांच्या जीवावर बेतते. यातून यांचे जीवनचक्र किती नाजूक आहे हे लक्षात येते. पश्चिम घाट १६०० किलोमीटर लांबीचा आहे. तो गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधून पसरलेला आहे. त्यातील अंबोलीपासून काही किलोमीटर परिसरातील सड्यांवरच हा बेडूक आढळतो. यासारख्याच कित्येक दुर्मिळ किंवा दुर्मिळ नसणाऱ्या अनेक प्राण्याचे वसतिस्थान असणारे हे सडे वाचवणे खूप मोठे आव्हान आहे.
(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४२ वी गोष्ट.)


- डॉ. हेमंत ओगले, अंबोली
[email protected]
(भवतालच्या जुलै-ऑगस्ट २०१६ च्या पावसाचे सोबती या विशेषांकातून...)


फोटो सौजन्य-
1. Malabar gliding frog mating pair on foam nest= Grassjewel, Wikimedia Commons
2. Malabar gliding frog= Soumitra Inamdar, Wikimedia Commons
3. Amboli Tiger Toads mating= Sumeet Moghe, Wikimedia Commons


भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com
इतरांसोबत शेअरही करा.

4 Comments

Balkrishna Gavas(Aaba),

Excellent Scientific & Naisargik Information In this case necessary to educate the Local People & to take into confidence Array & adjoining National Park is continuously disturb by Authority or Civilian Atta Sahyadri la he Khup japawa lagel Thank You Very Much Sir

Bhavatal Reply

Very true. Thank you for your response.

UMAKANT DESHMUKHE

Thank you very much. शब्द अपुरे आहेत धन्यवाद दयायला. मी पुण्यात राहतो. मी वेळ देऊ शकतो. खूपच छान काम आहे.गरज असेल तर नक्की कॉल करा .9422011934.देशमुखे

Bhavatal Reply

जरूर. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

Rohit vaidya

नेहमीच खूप छान माहितीपूर्ण लेख लिहिले जातात. भवताल team आणि सर्व सभासदांचे आभार. 🙏💐. मी रोहीत चिंचवड येथे राहतो. 🤙: 9420864262

Bhavatal Reply

धन्यवाद रोहीत. आपल्या संपर्कात शेअर करत राहा, जेणेकरून हे लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील.

Dr. Swati Barpande

या खास बेडकांची खूपच रंजक माहिती आणि त्यांच्या संवर्धनासाठी भवतलचा निसर्ग टिकणे किती महत्त्वा चे आहे हे कळले.. खूप खूप धन्यवाद..

Bhavatal Reply

मन:पूर्वक आभार.

Your Comment

Required fields are marked *

You may also like