Articles 
टप्प्याटप्प्याने आकसलेल्या माणदेशी पावसाची गोष्ट !

टप्प्याटप्प्याने आकसलेल्या माणदेशी पावसाची गोष्ट !

टप्प्याटप्प्याने आकसलेल्या माणदेशी पावसाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ४६)

 

ही भूमी मानवी वसाहतीसाठी योग्य नाही… माणदेशाबाबत कधी काळी इंग्रज साहेबाने हे वर्णन ‘सातारा गॅझेटीयर’ मध्ये लिहून ठेवले आहे. याचा अर्थ दुष्काळ हे माणदेशाचे ऐतिहासिक वास्तव होते आणि वर्तमानही त्याहून फारसे वेगळे नाही. कालानुरूप पडणारा, वाहून जाणारा आणि उपयोगी, अशी पावसाची परिमाणे बदलली. पूर्वी नियमितपणे पडणारा कमी-जास्त पाऊसही त्या जीवनशैलीनुरुप पुरेसा होता. किंबहुना, इथल्या लोकांनी त्यांच्या गरजा आणि अपेक्षा मर्यादित ठेवल्यामुळे तो पुरेसा होता, आणि उपशाची साधने नसल्यामुळे किंवा ती पारंपारिक असल्यामुळे जमिनीवरील आणि जमिनीखालील पाण्याची पातळी टिकून राहत होती. पन्नास वर्षांपूर्वी माणगंगा नदीची धार फेब्रुवारी मार्च महिन्यातही, अल्प प्रमाणात का होईना, पण वाहती राहत होती. मान्सून पूर्व वळिवाचा पाऊस हाच खरंतर या भूभागाच्या पाण्याचा मुख्य स्रोत असला तरी कोकणातल्या डोंगररांगांमधून येणारा मान्सून ६० वर्षांपूर्वीपर्यंत थेट माणदेशातील पिलीवपर्यंत बरसून जायचा. सातारा ते पिलीव तब्बल शंभर किलोमीटरचे अंतर त्या मान्सूनने चिंब भिजायचे. उत्तरोत्तर यामध्ये घट होत गेली, जी गेल्या साठ वर्षात आम्ही डोळ्यांनी पाहिली आणि अनुभवली.

दर दहा वर्षांनी होत गेलेला बदल

मान्सून, प्रत्येक दहा वर्षांत उतरत्या क्रमाने पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे पिलीवकडून साताऱ्याकडे १०-२० किलोमीटरने आकसत गेला म्हणजे पन्नास वर्षापूर्वी म्हसवडपर्यंत, चाळीस वर्षापर्यंत गोंदवल्यापर्यंत, तीस वर्षापूर्वी महिमान गडापर्यंत, वीस वर्षापासून तो पुसेगावच्या पुढे सरकत नाही. थोडक्यात, मान्सून आपला विस्तार आखडता घेत असल्याचे चित्र दिसत आहे. या मान्सूनच्या येणाऱ्या सरी हा खरंतर माणदेशासाठी बोनस होता. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे वळीव आणि परतीचा मान्सून हेच या विभागाचे मुख्य पर्जन्य स्रोत आहेत. १९६८ ते १९६९ सालापर्यंत म्हणजे वीज येईपर्यंत डिझेल इंजिन आणि मोट हीच पिकासाठी पाणी देण्याची साधने होती. डिझेलचा खर्च आणि मोटेचे श्रम या पाणी उपशाला पडणाऱ्या मर्यादा होत्या. साहजिकच कमी प्रमाणात का होईना उपलब्ध असणारे पाणी ठिकठिकाणी जमिनीवर रेंगाळत होते. परिणामी, विहिरीची पाणी पातळी दहा-वीस फुटांपर्यंत टिकून राहायची. आमच्या बालपणी विहीर खोदणारे मक्तेदार दोन ते तीन पुरुषच्या (७ फूट = १ पुरुष) पेक्षा अधिक खोल घेत नसत. कारण १० ते १५ फूट खोली ही भूगर्भातील सरासरी पाणी पातळी होती.

पाण्याची मिरवणूक आणि परडी घालणे

यामध्ये आवर्जून लक्षात घेण्याची बाब म्हणजे माणदेशाचा भूगर्भ हा माण जातीच्या मातीचा किंवा खडकाचा आहे. त्याची जलधारण क्षमता अधिक असल्याने विहिरींना कमी खोलीवर पाणी लागत असे. २० फुटाखालील विहिरींच्या खुदाईवेळी २, प्रसंगी ३ इंजिनांनी पाणी उपसा केला जात असे. इंजिनाचा गोंगाट आणि कंकाऱ्यांची लगबग यामधून एक प्रकारचा दंगा सुरू असायचा. अशा कामाच्या ठिकाणचा दंगा बघण्यासाठी आम्ही तासन् तास विहिरीच्या काठावर बसून राहायचो. विहिरीत लागलेल्या पाण्याच्या नळाची चर्चा गावभर व्हायची. त्या पाण्याची मिरवणूक निघायची, गावातल्या सर्व मंदिरातील मूर्तींना त्याचा अभिषेक घातला जायचा. विहीर मालक त्या पाण्याच्या पूजे प्रित्यर्थ मोठ्या आनंदाने गोड जेवणाचा कार्यक्रम करायचा. गावाकडे त्याला ‘परडी घालणे’ असे म्हटले जाते. विहिरीवर काम करणारे सर्व मजूर परडीला उपस्थित असायचे. गोड जेवणाच्या आमिशाने आम्ही बिगर आमंत्रणाचे कित्येक परड्यांना जेवून आलो. तात्पर्य, पाऊसमान कमी असूनही पंधरा वीस फुटात पाणी लागायचे ही स्थिती ५० वर्षांपूर्वी होती, कारण पाणी उपशाचे साधन नव्हते.

एप्रिलपर्यंत वाहणारी माणगंगा

एप्रिल-मे महिन्यात माणगंगा नदीचा प्रवाह खंडित होत असे. त्यामुळे नदी पात्रातल्या खोलगट भागामध्ये डोह व्हायचे या डोहामध्ये मासे जमा झालेले असत. ते धरणाऱ्यांची वर्दळ नदीवर राहायची. काही हौशी मंडळी प्रसंगी इंजिन लावून डोहाचा उपसा करायची, तेव्हा पाट्या भरभरून मासे सापडायचे. परंतु, मासे कधीही तागड्याने तोलून विकले जात नसत. जादा झालेले मासे आपल्या जवळच्या संबंधितांना तसेच वाटले जायचे. कधी मध्ये त्याच्या बदल्यात मासे धरणारांना एखाद्या हातभट्टीच्या बाटलीचे पैसे दिले जायचे. बर्‍याच बाबतीत असा बिन पैशाचा व्यवहार बघणारी आमची शेवटचीच पिढी असावी. येणाऱ्या पिढीला यावर विश्वास बसणार नाही आणि समजणारही नाही.

नदीकाठ सोडून सारा शिवार उघडा बोडखा दिसायचा अधे मधे  क्वचित एखाद्या शेतकऱ्याची विहीर आणि तिच्यावर भिजणारा एक अर्ध्या एकराचा हिरवा ठिपका डोंगरावरून बघताना तो ठिपका गडद दिसायचा. खुरटलेले गवत मुळासकट उपटून खाण्यासाठी माणदेशी मेंढरांचे कळप पोटाची खळगी भरण्यासाठी मातीला दातांनी टकरा द्यायची. पशुपक्ष्यांसहित सर्वांना पावसाची ओढ लागायची.

१० ते १५ इंचांचा पाऊस

पाऊस मोजण्याची इंच आणि मिलिमीटर ही परिमाणे तेव्हा सामान्यांना माहीत नव्हती. पण हल्ली लक्षात येतं की पन्नास-साठ वर्षांपूर्वी पाऊस १० ते १५ इंच पडत असावा. परंतु कुठेही पाण्याची अडवणूक नसल्यामुळे पाऊस पडला, वाहून गेला अशी स्थिती होती, पण उपसा असल्याने गावाला वर्षभर झऱ्यातून पिण्याचे पाणी मिळायचे आणि ते पुरायचे. गावोगावी असे झरे, हेळ, आड पिण्याचे पाणी पुरवत होते. बहुदा ते गावात किंवा गावालगत असायचे. माणसांना, डोईवर किंवा रेड्याची पखाल, दोन डब्यांची लगड ,चार घागरींचा गाडा इत्यादी मार्गांनी पिण्याचे पाणी उपलब्ध होत असे. बघता बघता गेल्या तीस वर्षात पाऊस आठ-दहा इंचावर आला. हल्ली पाऊस सहा ते आठ इंच पाऊस पडतो. पण जलसंधारणाच्या अनेकानेक योजनांमुळे पडणारे बरेच पाणी मुरवले जाते.

परंतु, १९६९-७० मध्ये वीज आली. शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना निघाल्या. पीव्हीसी पाईप लाईनमुळे कृषी जीवनात क्रांती झाली. विहिरी खोदण्याचे तंत्र वेगाने विकसित झाले. शेतकऱ्यांच्या आकांक्षा उंचावल्या. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे पाण्याचा उपसा वाढला. तो इतका की पाण्याचं इनकमिंग आणि आउटगोइंग मध्ये प्रचंड तफावत झाली. तीस वर्षापूर्वी शासनामार्फत खोदली जाणारी बोरवेल १२५ फूट खोलीची असे. गेल्या तीस वर्षात बोरवेल ची खोली माण तालुक्यामध्ये ५०० फुटांवर गेली. गेल्या चाळीस वर्षांपूर्वी आम्ही अभिमानाने सांगत असू, आमच्या गावात कोणत्याही दिशेने आले तरी पाय भिजल्या शिवाय येता येत नाही. बघता बघता गावाच्या चारी दिशेला लाखो रुपयांचे पूल बांधले गेले पण पुलाखालचे ओढे-नाले मात्र कोरडे पडले.

पन्नास वर्षांपूर्वीची कोकणातून आणि पश्चिम साताऱ्यातून पंढरपूरला जाणारी आषाढी वारी आजही आठवते. ही वारी आमच्या गोंदवले गावावरून जायची. दूरच्या पल्ल्यावरून आलेल्या एश्ट्या आमच्या गावी थांबायच्या. रस्त्यावरच्या थांब्यावर शेतकरी ओल्या भुईमुगाच्या शेंगा भाजून विकणारे स्टॉल लावायचे. पावसाच्या सरी ढगाळलेले आभाळ आणि हवेतला गारवा यामुळे भाजक्या शेंगा मक्याची कणसे यावर वारकऱ्यांची झुंबड उडायची. सोबतीला हल्ली जवळपास नष्ट झालेले काकडी प्रकारातली 'वाळूक' आणि शेंदाड याचे ढीगही असायचे. शेंदाड गोडीला कमी, गर जास्त त्यामुळे खाताना टोटरे बसायचे. हे अस्सल देशी वाण आता कुठे दिसत नाहीत.

दलदल आणि मरिआईचे गाडे

याच काळात गावच्या सीमेवर वरच्या गावाकडून आणून सोडलेले मरीआईचे गाडे येऊन थांबायचे. मग गावच्या बैते मंडळी आणि पोतराज यांची गाडा खालच्या गावच्या सीमेवर पोचवण्याची गडबड चालायची. खरंतर पावसाच्या दलदलीच्या कारणानं रोगराई पसरण्याची शक्यता असायची. मरिआईच्या गाड्याची मिरवणूक गावातून निघायची त्यानिमित्ताने परसदार, मोकळ्या जागा, रस्ते, गटारे साफ व्हायची. किंबहुना ते व्हावे म्हणूनच आपल्या पूर्वासुरींनी या रूढी प्रथा निर्माण केल्या असाव्यात.

त्यामुळे गावे अंशतः का होईना शेकडो वर्षे स्वच्छ झाली. आता त्या प्रथा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. स्वच्छतेबाबत सरकारी अभियानाचा लोकजागर सुरू झाला. हे पाऊस आणि पावसाळ्याचे चित्र आता दिसत नाही. कल्याणकारी राज्याची बरी वाईट फळ चाखण्यात जनता रमत चालली आहे. शेतीची ही परिस्थिती पूर्ण बदलली आहे. पावसाच्या भरोशावरील शेती आता इतिहासजमा झाली. पाऊस नेमका पडला तर ठीक; नाही पडला तरी पाजर तलाव, नदी, नाले, विहिरी, खोल खोल घेतलेल्या बोरवेल, पाच किलोमीटरच्या पाईप लाईन आणि या सर्वाच्या जोडीला उरमोडी जिहे-कठापूर या धरण आणि पाणी उपसा योजनांचे पाणी या सर्वांमुळे माणदेशाचा शेतकरी दिवसेंदिवस हायटेक बनत चालला आहे, सुबत्ता निश्चितच वाढली आहे.

बदल... सर्वच पातळ्यांवर

पूर्वी एखाद्याने आणलेल्या नवीन सायकलीची खबर वार्‍यासारखी पसरायची. सायकल दुसर्‍याची असूनही पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद, अभिमान दिसायचा. हल्ली गावात कोणाची नवी स्कॉर्पिओ आली तरी मान वाकडी करून कोणी बघायला तयार नाही. भौतिक समृद्धी आणि मानसिक दारिद्र्याच्या नव्या पर्वात आपण राहात आहोत याची पदोपदी अनेक प्रसंगी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. सुबत्तेच्या परिणामी गावोगाव परमिट रूम, धाबे, लॉटरी सेंटर, मटका केंद्र, पेट्रोल पंप, लॉज यांची संख्या भूमिती श्रेणीने वाढत चालली आहे. शाळा ‘फ्लर्टिंग केंद्र’ होत चालली, अध्यात्मिक आणि धार्मिक स्थळांचे रूपांतर पर्यटन स्थळांमध्ये झाले. गावचे पार, समाज मंदिरे जुगार केंद्रात रूपांतरित झाली. या व अशा सार्वजनिक रोगाची लागण माणदेशालाही झाली आहे. अंथरूण पाहून पाय पसरणारा, भविष्याबाबत आणि दुष्ट काळाबाबत सज्ज असणारा प्रतिकूलतेच्या माथ्यावर पाय देऊन उभा राहण्याची जिद्द असणारा माणदेशी माणूस आता बदलत चालला आहे.

अनेकानेक पक्ष आणि त्यांच्या पुढाऱ्याच्या खिरापती कडे डोळे लावून बसणारी युवकांची फौज आता गावोगाव दिसत आहे. जे पालक आणि पाल्य जमिनीवर आहेत ते या आधुनिक संघर्षातही यशाला गवसणी घालत आहेत. हे सर्व लेखन, वैज्ञानिक विश्लेषण नसून गेल्या पन्नास-साठ वर्षांत माणदेशाच्या सामाजिक स्थितीमध्ये झालेल्या बदलांचे वर्णन करण्याचा अल्पसा प्रयत्न आहे. सिंधू संस्कृतीपासून ते वर्तमान काळापर्यंत मानवी जीवनाची समृद्धता विकास, विनाश हे सारे पाऊस आणि पाणी या घटकांवर अवलंबून असल्याचे ऐतिहासिक चित्र आपण पाहतो. माणदेशाने पूर्वीपासून खूपच सोसले आहे. आता दिवस बरे येऊ पाहात आहेत. कृषी, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य याचे भान ठेवून येणारी पिढी वागली, तर भविष्य उज्वल असेल अन्यथा लवकरच पाण्यावरून संघर्ष उभे राहतील. पाण्यातून निर्माण झालेली समृद्धी, त्या संघर्षाचा दारूगोळा ठरू नये एवढीच अपेक्षा आहे!

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४६ वी गोष्ट.)

 

- धनाजी पाटील, गोंदवले (जि. सातारा)

[email protected]

(भवताल मासिकाच्या जून २०२१ अंकातून...)

फोटो १ - पावसाळ्यात हिरव्या गवतावर चरणारी मेंढरे

फोटो २ - कमी पावसाच्या माणदेशात

फोटो ३ - काही काळपुरतीच हिरवाई

फोटो ४ - मरिआईचा गाडा

(सर्व फोटो : अभिजित घोरपडे)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

6 Comments

Nihal kalal

Very nice Sir

Bhavatal Reply

Thank you.

Adhiraj kadam

खूप छान वर्णन केले आहे. धन्यवाद

Bhavatal Reply

धन्यवाद.

Jasmine Kalal

Nice information

Bhavatal Reply

Thank you.

Poonam Chavan

खूप छान माहिती, बऱयाच गोष्टी नव्याने समजल्या

Bhavatal Reply

धन्यवाद.

Prakash kalaskar

अतिशय सुंदर,वास्तववादी वर्णन

Bhavatal Reply

आभार.

Rustum Mulla

खूप छान लेख आहे हा. मी सुद्धा या माण देशाच्या मातीतला. आमची येरळा माई अणि माणगंगा आम्हाला चिंब भिजवायच्या.. पण आता मात्र कोरडे पात्र आणि माणसाच्या डोळ्यातलं कोरडे पाणी पाहून मनाला खूप यातना होतात पण आपणच यातून मार्ग काढू शकतो. धन्यवाद भवताल...

Bhavatal Reply

बदललेला पाऊस, काळ पाहून वेदना होणे स्वाभाविक आहे. पण मार्ग तर काढायलाच हवा. या आठवणी व बदल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like