Articles 
पूर्व विदर्भातल्या हरवलेल्या नक्षत्रं-पावसाची गोष्ट!

पूर्व विदर्भातल्या हरवलेल्या नक्षत्रं-पावसाची गोष्ट!

पूर्व विदर्भातल्या हरवलेल्या नक्षत्रं-पावसाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ४७)

 

माझा जन्म १९६२ सालचा, एका खेड्यातला. त्यामुळे पाऊस आणि हवामानाशी घट्ट नाते. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जंगलांच्या जिल्ह्यांवर फारच प्रेम आहे. माझे गावही या जिल्ह्यांच्या मध्ये. कडक, लाही-लाही करून सोडणारा उन्हाळा, शेकोटी धरून बसायला लावणारा हिवाळा आणि सतत रिप रिप बरसणारा पावसाळा... निसर्गाचे हे चक्र जणू जीवनाचा अविभाज्य भाग होता. पाऊस सुरू झाला की माझी आई मला, तो कोणत्या नक्षत्राचा आहे आणि त्याचे वाहन काय आहे, ते सांगत असे. खेड्यातील लोकांना संपूर्ण नक्षत्रं पाठ असत, प्रत्येक नक्षत्राला त्यांच्या लहरी स्वभावानुसार पशु-पक्ष्यांची नावे दिली जातात आणि सतत पावसाची चर्चा होत असत.

नक्षत्र आणि पावसाचे गणित

सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश झाला की गावगाड्यातील लोक सावध व्हायचे. वादळी वारे आणि पाऊस येणार म्हणून घरे मजबूत ठेवण्यासाठी धावपळ करीत. दर वर्षी कुठे ना कुठे खेड्यात घरांची छपरे हवेत उडायचीच. वादळे आली की फार मजा येत असे. आम्ही दर वर्षी नियमित येणाऱ्या रोहिणीच्या पावसाची वाट पाहत असू. ७ जून म्हणजे मृगाची सुरुवात. बहुदा दरवर्षी मृगाचा पाऊस १० ते १५ जून या तारखेपर्यंत येत असे. आणि आम्ही पावसात भिजण्यासाठी गावाबाहेर पडत असू.

मृग, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त अशा सत्तावीस नक्षत्रांपैकी लाभलेलं हे नऊ नक्षत्रांचं देणं पावसाची अनेक रूपे उलगडत जातात. यापैकी पहिले ‘मृग नक्षत्र.’ सूर्याचा ७/८ जून रोजीचा मृग नक्षत्रातील प्रवेश म्हणजे, अर्थातच पावसाला प्रारंभ. मृग नक्षत्र म्हणजे अगदी वचन निभावल्यासारखा दाखल होणारा पाऊस वेळीच आपल्यासमोर हजर होऊन जातो. आतुरतेने पावसाची वाट पाहणाऱ्या माणसाला, शेतकऱ्यांना आणि सजीव सृष्टीला हे मृग नक्षत्र संपूर्णपणे  समाधान देऊन जात असे. जणू पावसाने, माणूस व सृष्टीला येण्याचे वचन दिले असावे. म्हणून मृग नक्षत्र वचनाचे एक प्रतीक म्हणून मानले जाते असे. मृगाचा पाऊस अगदी न चुकता ठरल्यावेळी हजर असे आणि सोबत सृष्टीला जगण्याची नवी उमेद देत असे.

पावसाच्या नक्षत्रांमध्ये ८ जून रोजी सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश असतो आणि त्याचे वाहन मेंढा असते. आर्द्रा नक्षत्राचे वाहन बेडूक. पुष्य नक्षत्राचे वाहन गाढव, आश्लेषाचे वाहन घोडा, मघाचे उंदीर, पूर्वाचे हत्ती, उत्तराचे मेंढा, हस्ताचे म्हैस. याप्रमाणे जून ते सप्टेंबरपर्यंतची नक्षत्रे असून उर्वरित चित्रा व स्वाती नक्षत्रात देखील पाऊस आपली हजेरी हमखास लावताना दिसत जसे नक्षत्राचे वाहन, तशाच प्रकारचा पाऊस हे जणू समीकरणच होते, ते क्वचितच गडबडत असे.

पावसाचे कमी होणे

आपल्याप्रमाणेच पशु - पक्षीसुद्धा आतुरतेने वाट पाहतात. पक्षांची घरटी बांधण्याची धडपड, पिलांना जन्म देणे, त्यांचे पालन पोषण करणे हे सर्व पावसावरच अवलंबून असते. पावसाच्या आधीच अनेक पक्षी आपापली घरटी बांधून ठेवतात. त्यांची आणि मानवांची ही लगबग सारखीच असते. अनेक पशु-पक्षांना तर पाऊस येण्याची चाहूलसुद्धा लागते आणि ती घरटी बांधू लागतात. तेच शेतकऱ्यांना पावसाची सूचना देतात. पावसाच्या पूर्वी चातक, कोकिळा ह्या पक्षांची ओरड सुरु होते. शेतकरी पक्षाच्या आवाजाला ‘पेर्ते व्हां’ असे उच्चारीत असे. आम्ही लहान मुले आकाशात नजरा फिरवून पावसाची वाट पाहात असत आणि एकदाचा पाऊस आला की ओले होत पावसात अंघोळ करीत असत. आमच्या लहानपणी एक पक्षी मात्र आमचा आकर्षणाचा विषय असे, तो ढगांच्याही वर उडत असे आणि जिथे जनावरे मरून पडली तिथे हमखास येत असे. जसा जसा काळ पुढे गेला तस तसे हे गिधाड पक्षी सुद्धा कमी कमी होत गेले. पुढे पाऊस सुद्धा असाच कमी होत गेला आणि बदलत गेला.

मी ज्या ग्रामीण भागात राहत असे तो भाग माणिक गडाच्या पायथ्याशी जवळ होता. तिथे २५ वर्षापूर्वी जंगल आणि खूप वन्यजीव होते, लोक वाघांच्या अस्तित्वाच्या कथा सांगायचे. परंतु, शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर जंगल तोडल्या गेले आणि मग वन्यजीव दिसणे बंद झाले. आम्ही मुले झुडपी जंगलात फिरताना तडस, कोल्हे, लांडगे आणि ससे हेच प्राणी पाहात असू. वाघ आणि बिबट दिसेनासा झाला होता. हे केवळ २५ वर्षाच्या काळात घडले. कारण ह्याच काळात भद्रावती, माजरी, चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा ह्या तालुका परिसरात कोळसा खाणी आल्या आणि वाघांचे भ्रमण मार्ग बंद झाले.

१९७२ च्या दुष्काळानंतर...

पावसाच्या बदलण्याचा पहिला मोठा फटका महाराष्ट्राला बसला तो १९७२ दुष्काळ. ह्या वर्षी पावसाळा आलाच नाही आणि सरकारला अमेरिकेतून गव्हासारखा दिसणारा ‘जवू’ आणि लाल दिसणारा ‘ मिलो ‘ आयात करावा लागला आणि आमच्या सारख्या सर्व लोकांना तो खावा लागला. हा सर्वात मोठा दुष्काळ होता, परंतु हीच निसर्गाची वार्निंगसुद्धा असावी, कारण पुढे १९८० नंतर  पावसाची नक्षत्रे हळू हळू बदलायला लागल्याचे लक्षात येऊ लागले.

१९७२ च्या दुष्काळानंतर शासन आणि शेतकरी सावध झाले. देशात मोठ मोठी कोठारे बांधण्यात आली आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आली. पुढील दशकात पावसाच्या नक्षत्रात थोडा बदल झाल्याचे लक्षात येते, नक्षत्रांची नियमितता हळूहळू कमी होत गेली. ह्या दशकात उष्ण लहरी वाढल्याचे आम्हाला आढळत होते तर रोहिणी नक्षत्रात येणारा मान्सून-पूर्व पाऊस हा वादळी पाऊस असायचा. मात्र, मान्सूनचा पाऊस सुरू होताच तो दरवर्षी सतत तीन चार दिवस येत असे. थोडी सवड मिळाली की पुन्हा सतत पाऊस यायचा. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झडी पाऊस असायचाच. एकदा पाऊस सुरु झाला तो कमीतकमी आठवडाभर तर राहायचाच. महिनाभर पावसाच्या तीन-चार झडी मी १९७५ पूर्वी पाहिल्या आहेत. त्या वेळेसच्या आणि आताच्या पावसात महत्वाचा फरक म्हणजे तेव्हा वादळी आणि विजांचा पाऊस फारसा येत नसे. आज मात्र पूर्ण पावसाळाभर वादळी आणि विजांचा पाऊस येतो. पूर्वीचा पाऊस इतका त्रासदायक असायचा की कपडे वाळत नसत. घरात सर्वत्र बुरशी लागलेली असे. घरी दारी सर्वत्र पाणीच पाणी. नद्या, नाले, तलाव तुडुंब भरून वाहात असत. जमिनीतून अनेक ठिकाणी झरे वाहायला लागत असत. हे असे चित्र जवळ जवळ दरवर्षी दिसत असे.

१९८०-९० च्या दशकातच पावसाचे प्रमाण थोडे कमी झाल्याची चिन्ह दिसू लागले. तेव्हा २ ते ३ वर्षात एकदा तरी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडत असे. ज्या विहिरींना वर्षभर पाणी राहत असे त्या विहिरी आटून जात. मी तेव्हा बैलगाडीवरून ५ किलोमीटर दूरवर जाऊन पिण्याचे पाणी आणत होतो. गावातील बहुतेक महिला-पुरुषसुद्धा दूरवरून पाणी आणत. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शेतीसाठी भूजल पाणी वापरात येऊ लागल्याने सुद्धा भूजल पातळी कमी होत गेली हे सुद्धा तितकेच खरे. १९९० ते २००० ह्या दशकात पाऊस हा नक्षत्राप्रमाणे येणे बंद झाले. परंतु, मोठ्या पावसाचे प्रमाण वाढलेले दिसले. ह्या काळात वर्धा, पैनगंगा, वैनगंगा नद्यांना महापूर येत असत. चंद्रपूर येथील किल्ल्यात अधून मधून पाणी शिरायचे, तर गडचिरोली जिल्ह्याचा दर वर्षी संपर्क तुटायचा. ह्या घटना आताही आहेत.

पाऊस लहरी आणखी अनियमित झाला

माझ्या निरीक्षणात २००० वर्ष हे खऱ्या अर्थाने अत्यंत हवामान बदलाच्या सुरुवातीचे वर्ष वाटायला लागले. पूर्वी मृगाला येणारा पाऊस दरवर्षी उशिराने येऊ लागला. २०१० पर्यंत मृगाचा पाऊस १५ जूनपर्यंत येऊ लागला. पुढील दशकात तो पुन्हा एका आठवड्याने पुढे गेला. परतीच्या पावसाबद्दल सुद्धा हेच घडत गेले, परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात परतू लागला. गडचिरोली जिल्ह्यात १६०० मिलिमीटर, तर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी १४०० मिलिमीटर पाऊस पडतो. जिथे जास्त वने तिथे जास्त पाऊस हे समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळते. माझे सुरुवातीचे वर्ष यवतमाळ जिल्ह्यात गेले तर १९९२ नंतर मी चंद्रपुरात राहायला आलो. भरपूर पाऊस पडणार्‍या चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची हुलकावणी, शिवाय कमी पाऊस - अति पाऊस हे पाहायला मिळाले. २००० ते २०१० ह्या दशकात पाऊस लहरी आणि अनियमित झालेला मी पाहत आलो आहे, नव्हे तर ह्याच दशकात सर्वाधिक हवामान बदलाला सुरवात झाली आणि ह्याचा थेट परिणाम पावसावर झाला. अनेक वर्षे ह्या जास्त पावसाच्या जिल्ह्यात १४०० मिलिमीटर ऐवजी ९००, १०००, ११०० मिलिमीटर पाऊस पडायला लागला, तर काही वर्षी तो खूप जास्त पडू लागला. हा बदल अगदी सहज डोळ्यात भरणारा आहे.

ढगफुटीचे प्रमाण वाढले

मला बालपणीपासूनच निसर्गाच्या विविध रूपांचा अभ्यास आणि निरीक्षणे करण्याचा छंद आहे, ह्यामुळे पावसाच्या बदललेल्या स्वरूपाची माहिती आजही डोळ्यासमोर उभी राहते. २०१० ते २०२० हे दशक हे पावसाच्या अत्यंत बदललेल्या स्वरूपात पाहायला मिळाले. मागील दशकात मृगाचा पाऊस एक आठवड्याने उशिरा येत होता. तो ह्या दशकात पुन्हा एक आठवड्याने पुढे गेला. परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतलेला असायचा, तो २०२० पर्यंत ऑक्टोबरच्या शेवटीपर्यंत उशिरा वापस जाऊ लागला. चंद्रपुरात २००१ पासून २०२० पर्यंत तीनदा ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. तसेच अति पावसाचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. चंद्रपूरला वादळी पाऊस पहाटे पडण्याच्या घटना दरवर्षी घडत आहेत. माझ्या बालपणी मी पहाटेचा वादळी पाऊस कधीच पाहिला नाही.

अतिपाऊस, झडी आणि महापूर तर प्राचीन काळातही येत असत. परंतु, अलीकडील दशकात महापुरांची वारंवारिता वाढली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीचा संपर्क काही वर्षे अपवाद वगळता दरवर्षीच तुटतो. पूर्वी झडीचा पाऊस दरवर्षी यायचा, आता मात्र दरवर्षी कमी काळात अति पाऊस, ढगफुटी सदृश्य पाऊस येऊ लागला आहे. ह्यामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

एक अतिशय महत्वाची घटना चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात घडत आहे, ती म्हणजे टोरनॅडो. गडचिरोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दोनदा टोरनॅडोची नोंद झाली आहे, याशिवाय घडलेल्या पण नोंद न झालेल्या घटना वेगळ्याच. गडचांदूरजवळ अशीच घटना ४ वर्षापूर्वी घडल्याची नोंद आहे.  उन्हाळ्यातील दुपारी धुळीच्या वावटळीच्या घटना आम्हाला दरवर्षीच पाहायला मिळत असत. परंतु, पावसाळ्यातील लघु वादळे मात्र बालपणीपासून ते २००० सालापर्यंतच्या ३५ वर्षात कधीच पाहिली नाहीत. आज अति पावसाच्या घटना आणि पावसाची अशी विविध विध्वंसक रूपे पाहावयास मिळत आहेत. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे सांगता येत नाही.

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४७ वी गोष्ट.)

 

- प्रा. सुरेश चोपणे, चंद्रपूर

[email protected]

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

3 Comments

Vikram Patre

फ़ार छान लेख लिहिला , निसर्गाचा बदल चिंता जनक आहें. मृग नक्षत्रा चा पावसच मी पण निरीक्षण केल लहान पनी पासुन आज पर्यंत , पाऊस पूढे ढकल्ला ग़ेला आणी अनियमित झाला. लगेच पावले उचल्ली पाहिजे. झाड़ लवाली पाहिजे

Bhavatal Reply

धन्यवाद.

Laxman Idde

फारच छान लेख सर,या निमीत्ताने बालपणीच्या पावसाळ्यातील प्रसंगाचा उजाळा मीळतो . पावसाचे बदलते रुप निश्चीतच चिंताजनक असुन यावर जागतीक स्तरावर ठोस उपाययोजनांची गरज आहे

Bhavatal Reply

आपली चिंता रास्त आहे. धन्यवाद.

Yogesh Balpande

अतिशय उत्तम लेख लिहिला

Bhavatal Reply

धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like