Articles 
त्या गूढ वनस्पतीची संपूर्ण कहाणी

त्या गूढ वनस्पतीची संपूर्ण कहाणी

त्या गूढ वनस्पतीची संपूर्ण कहाणी! 



वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणीच्या गिलाव्यात सापडलेल्या गूढ वनस्पतीबाबतच्या लेखाची त्रोटक माहिती नुकतीच शेअर केली होती. ती वाचून अनेक वाचकांनी संपूर्ण लेख वाचण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे संपूर्ण लेख शेअर करत आहोत.
(भवतालचा अधिवासी विशेषांक आणि फेब्रुवारी २०२२ च्या मासिक अंकातून; लेखक : डॉ. मिलिंद सरदेसाई)

भवताल मासिकाची विनामूल्य किंवा वर्गणीसह नावनोंदणी करण्यासाठी लिंक :
https://bit.ly/2X0jE2M
.....

मी पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत होतो. एक दिवस तेथील तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी दुपारी चारच्या सुमारास मला चहाला येण्यासाठी निरोप दिला. तिथे पोहोचलो, तर त्यांच्या कक्षात आधीपासूनच एक व्यक्ती बसली होती. चहा घेत असताना बसलेल्या व्यक्तीची ओळख करून दिली. ते होते डॉ. मॅनेजर सिंग. ते तेव्हा केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागात मोठ्या पदावर कार्यरत होते. ते ज्या कामासाठी आले होते, ते आगळेवेगळे होते.

बाराव्या गुहेमधील गिलावा 
मॅनेजर सिंग हे वेरूळच्या लेण्यांमधील १२ व्या गुहेमधील भित्तीचित्रांच्या गिलाव्याचा एक तुकडा घेऊन आले होते. तो गुहेत खाली पडलेला एक छोटासा नमुना होता. त्यांनी तो छोट्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणला होता. हा नमुना साधारणतः ५ व्या किंवा ६ व्या शतकातील होता. चहा घेतच त्यांनी ती पिशवी माझ्याकडे दिली. ती जवळून पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की त्या मातीमध्ये कोणत्या तरी वनस्पतीचे तुकडे आहेत. त्यांनी मला ती वनस्पती ओळखण्याबाबत विचारले. माझ्या मनात प्रश्न आला की ती वनस्पती कोणती आहे ओळखून उपयोग काय? हा प्रश्न मी त्यांना बोलून दाखवला. त्यांनी सांगितले की, एकदा का ही वनस्पती ओळखता आली की तिचा वापर करून वेरूळच्या गुहांमधील भित्तिचित्रांच्या संवर्धनाचे काम करणे सोपे होईल. त्यांनी सांगितलेली बाब महत्वाची होती. जाता जाता त्यांनी एक अटही घातली. ती अशी की त्यांनी मला दिलेल्या नमुन्यांची हाताळणी केवळ मीच करावी.

मी जवळपास गेली दोन दशके वनस्पती वर्गीकरणशास्त्राचा अभ्यास करत आलो होतो. असे असले तरीही मी या आधी अशा प्रकारचा नमुना कधीही अभ्यासला नव्हता. वनस्पती वर्गीकरणशास्त्रानुसार कोणत्याही वनस्पतीची ओळख अचूक होण्यासाठी पाने, फुले आणि शक्यतो फळे असणारी फांदी असावी लागते. तरच ओळख सोपी आणि अचूक होऊ शकते. मी म्हटले की हे थोडसे अवघड काम आहे आणि यासाठी वेळ लागू शकतो.

एक अवघड शोध मोहिमेची सुरुवात 
त्यानंतर अनेक महिने मी याच कामावर लागलो होतो. वेरूळ व इतर भागातील भौगोलिक परिस्थिती, तेथील तत्कालीन पीक - पाणी, गुहा कशी खोदली जाते, त्यामध्ये कोरली जाणारी लेणी आणि भित्तिचित्रांची निर्मिती, कोणत्याही बांधकामामध्ये गिलावा करताना त्यामध्ये कोणकोणत्या वनस्पतींचे मिश्रण घातले जात... याबाबतचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ मिळतात का, हे शोधण्याच्या मागे लागलो.

वेरूळ हे एक छोटेसे गाव. ते औरंगाबादच्या उत्तरेला साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर एलगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. एलगंगा नदीवरूनच त्याचे मूळ नाव एलूर, तद्नंतर एल्लापुरा आणि सरतेशेवटी वेरूळ असे झाले. ब्रिटिश राजवटीनंतर ते एलोरा नावानेच जगभर ओळखले जाऊ लागले. तिथे अगदी गावानजिकच असलेल्या डोंगरांमध्ये अनेक मानवनिर्मित गुहा आहेत. सध्या सर्व लेणी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. त्यातील ४० लेणी पुरातत्व विभागाने सर्वसामान्यांसाठी खुली केली आहेत. यातील १ ते १२ लेणी भगवान गौतम बुद्ध, त्यांच्या जीवनातील प्रसंग, बौद्ध धर्म याबाबत आहेत. पुढे लेणी क्र. १३ ते २९ अशा एकूण १७ लेणी या हिंदू धर्माविषयी, तर लेणी क्र. ३० ते ३४ या जैन धर्मविषयक दर्शन घडवितात. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या तीन धर्मांची महती सांगणारे वेरूळ वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण ठरते. ही लेणी म्हणजे बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मगुरू, यात्रेकरू, वाटसरू व इतरांसाठी प्राचीन काळामध्ये व्यापारी मार्गावरील एक ठिकाणही होते. या लेण्यांच्या निर्मितीचा कालखंडही वेगवेगळा आहे. पहिल्या १२ बौद्ध लेणी साधारणतः ५ ते ७ व्या शतकात घडविल्या गेल्या. पुढील १ ते २९ ही हिंदू लेणी आठव्या व नवव्या शतकाच्या दरम्यान, तर शेवटच्या ५ जैन लेणींची निर्मिती नवव्या ते अकराव्या शतकादरम्यान झाली. सोळाव्या लेणीतील कैलास मंदिर हे केवळ एका दगडामध्ये कोरलेले असल्यामुळे ते शिल्पकलेतील जागतिक आश्चर्य मानले जाते. भारत सरकारने त्याला इसविसन १९५१ साली राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता दिली. त्यानंतर इसविसन १९८३ मध्ये युनेस्कोने त्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला.

डॉ. मॅनेजर सिंग यांनी १२ क्रमांकाच्या लेणीच्या भित्तिचित्राच्या गिलाव्याचे नमुना घेतले होते, ती तीन मजली आहे. ती बौद्ध भिक्कू, उपासक आणि अभ्यासक यांच्याकडून उपयोगात आणली जात असावी. या लेणींची निर्मिती तत्कालीन, स्थापत्यकलेतील तज्ज्ञ आणि कारागिरांनी वेरूळच्या डोंगरांमधील अग्निजन्य खडक फोडून केली आहे. तिची निर्मिती अतिशय उच्च पातळीची आहे. गुहेतील दगडी ओबडधोबड भिंतींवर स्थानिक चिकण माती आणि इतर घटक वापरून गिलावा करण्यात आला. या मातीच्या थरावर अजून दोन थर चुन्याचे देऊन त्यावर चित्रे काढली गेली. सुदैवाने किंवा दुर्दैवाने वेरूळची लेणी सुरुवातीपासूनच स्थानिक जनता, वाटसरू आणि इतरांच्याही दृष्टिपथात राहिला. विविध आक्रमणे, समाजकंटकांचा उपद्रव आणि काळाच्या ओघात अनेक मूर्ती आणि भित्तिचित्रांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

उलगडा होण्याच्या दिशेने 
हे सर्व पैलू समजून घेत दरम्यानच्या काळात रोज काही वेळ मातीचा एक एक कण सूक्ष्मदर्शकाखाली पाहत होतो. त्यात काही सापडतेय का हेही शोधत राहिलो. सुदैवाने मला त्यामध्ये काही धागे, पानांचे छोटे तुकडे आणि एक फूल मिळाले. पानांचा रंग बऱ्यापैकी हिरवा होता. पण फुलातील आतील सर्वच भाग गायब होते, पण त्याच्या पाच पाकळ्या मात्र बऱ्यापैकी सुस्थितीत होत्या. वनस्पतिशास्त्राच्या वर्गीकरण शास्त्राच्या नियमानुसार, झाडाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी इतके पुरावे पुरेसे होते. यासाठी वर्गीकरण अद्ययावत सिस्टिमचा मात्र काहीच उपयोग झाला नाही. याउलट साधारणतः दीडशे वर्षांहून जुनी असणारी जॉर्ज बेंथाम आणि जोसेफ हूकर यांनी शोधलेली सिस्टिम मात्र उपयोगात आली. त्यानुसार परीक्षण केल्यानंतर असे लक्षात आले की हे फूल द्विदल वनस्पतींच्या अपेटाली वर्गात बसत आहे. अपेटाली समूहातील वनस्पतींच्या फुलांमध्ये पाकळ्यांचे एकच दल असते.

पुरातत्वशास्त्राच्या नियमानुसार, ऐतिहासिक काळातील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कोणत्याही निर्माणकार्यात स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या वस्तू व साधनांचाच वापर केला जातो. म्हणजेच या लेणीत वेरूळ आणि आसपासच्या भागात ज्या वनस्पती उगवतात, त्यातलीच एखादी वापरली गेली होती. सुदैवाने स्व. वा. ना. नाईक आणि त्यांच्या विद्यार्थ्यानी लिहिलेला मराठवाड्याचा वनस्पती कोष आणि नोंदविलेल्या प्रत्येक वनस्पतींच्या जातीचे जतन केलेले शुष्क नमुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्राच्या संग्रहालयात उपलब्ध आहेत.

सांगता काय... गांजा?
मग मराठवाड्यात आढळणाऱ्या अपेटाली वर्गातील सर्व जातींची एक यादी केली. सोबत वेरूळच्या गुहेतील भित्तिचित्रात मिळालेल्या फुलाचा नमुना होताच. त्याची माजमापे आणि पाकळ्यांचा आकार इत्यादींचा वापर करून तयार केलेल्या यादीतील वनस्पतींशी तुलना केल्यावर केवळ तीनच जाती शिल्लक राहिल्या. या तीनही जातींचे शुष्क नमुने तपासले, त्यातही दोन जुळल्या नाहीत. शेवटी एकच शिल्लक राहिली, आणि तो होता गांजा. दुर्दैवाने तुलना करण्यासाठी गांजाचे नमुने मात्र संग्रहालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे तो गांजाच आहे हे पक्के व्हायचे बाकी होते. सहकारी आणि मित्रांना हे सांगितले. गांजा म्हटल्यावरच त्यांच्यासह अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण गांजाचे नमुने नसल्याने तुलना करायची तर कशी?

त्यातूनही मार्ग निघाला. दिल्लीसह उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये निसर्गतःच गांजा अगदी गाजर गवताच्या बरोबरीने तण म्हणून वाढतो. मग दिल्लीतून काही नमुने मागविले आणि त्याची तुलनात्मक चिकित्सा केली. मग असे लक्षात आले की गिलाव्यात वापरलेली वनस्पती गांजाच आहे. पुढे त्यातील बारकाव्यांचा शोध साध्या आणि इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली घेतला. तसेच, त्याचे रासायनिक परीक्षणही केले. त्यानंतर ती वनस्पती गांजा असण्यावर शिक्कामोर्तब झाले. पण त्यामुळे तिथे गांजाच का वापरला आणि किती प्रमाणात वापरला? त्याची लागवड केली जात होती की तो नशेसाठी वापरला जात होता? असे अनेक प्रश्न उभे राहिले.

वेगळ्याच कारणासाठी जगभर प्रसार 
ही वनस्पती होती, कॅनाबीस सॅटिवा (Cannabis sativa). ती भारतीय उपखंडात गांजा, भांग, चरस, हशीष इत्यादी नावांनी ओळखली जाते. गांजाची लागवड सर्वसाधारणतः दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी चीनच्या उत्तरेकडील भागामध्ये झाली. लागवडीचा मूळ उद्देश मात्र त्याच्यापासून मिळणारा धागा हा होता. प्राचीन काळी बहुतांश जहाजे, बोटी, किंवा इतरत्र वापरल्या जाणाऱ्या दोरखंडांमध्ये गांजापासून तयार केलेल्या दोरखंडांचे प्रमाणच सर्वांत मोठे होते. आणि त्यासाठीच त्याचा प्रसार जगभर झाला. भारतीय भूमीत गांजा साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमार्गे आला आणि प्राचीन व्यापारी मार्गांवरून तो दक्षिणेत पोहोचला.

कालांतराने घायपातासारख्या झाडांपासूनसुद्धा दोर बनविले जाऊ लागले आणि गांजाच्या दोराचे महत्व कमी होत गेले. परंतु, त्यानंतर मात्र गांजाचा उपयोग वेगळ्या कारणासाठी वाढला. त्याच्या नशा आणणाऱ्या गुणधर्मासाठी तो अधिक प्रमाणात वापरला जाऊ लागला. तो इतका वाढला की अगदी भारतीय संस्कृतीचा भागच होऊन गेला. ब्रिटिशांना इसविसन १८६० च्या दरम्यान गांजावर अगदी कर लावला. गांजामध्ये असणारा टेट्राहैड्रोकॅनाबिनॉल हा घटक असतो. तोच नशा आणण्यासाठी वापरला जातो. गांजाचे वैशिष्ट्य म्हणजे याची नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडे असतात. नर झाडामध्ये टेट्राहैड्रोकॅनाबिनॉल अतिशय कमी प्रमाणात असतो, तर तो मादी झाडामध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. याचाच अर्थ मादी झाड अधिक मादक असते. उत्तर भारतामध्ये गांजा तण म्हणून मुबलक प्रमाणात वाढतो. गांजामध्ये बुरशीरोधक तसेच कीडरोधक असे गुणधर्मही असतात. त्यामुळे त्याच्यापासून वापरलेल्या गोष्टी आर्द्रता असली तरी लवकर खराब होत नाहीत. त्यामुळेच कदाचित गांजा वेरूळ लेण्यांमधील भित्तिचित्रांच्या गिलाव्यात वापरला गेला असावा.

गांजाच्या धाग्याचे असेही उपयोग 
याची उदाहरणे जगाच्या इतर भागातही पाहायला मिळतात. विशेषत: इंग्लंडमधील जुन्या दगडी इमारतींच्या बांधकामांमध्येही गांजाचे धागे आढळतात. त्याचा वापर प्रामुख्याने उष्णता अवरोधक म्हणून होतो. युरोपमध्ये हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात असणाऱ्या तापमानामध्ये होणाऱ्या बदलांचा इमारतीच्या अंतर्गत भागात फारसा फरक पडत नाही. पण या इमारतींमध्ये वावरणाऱ्या लोकांच्या घामामुळे, श्वासोश्वासामुळे किंवा इतर कारणामुळे निर्माण होणारी आर्द्रता शोषून घेण्याचे कामही हे गांजाचे धागे करतात. त्यामुळे दमटपणामुळे भिंतींवर तयार होणारी बुरशी किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. कदाचित हेच तंत्र आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी वापरले असावे. वेरूळच्या या गुहांमध्ये शेकडो वर्षे इतकी माणसे वावरली असतील, त्याद्वारे तयार झालेली आर्द्रता भित्तिचित्रांच्या गिलाव्यामध्ये वापरलेल्या गांजाने शोषली असेल. गांजामध्ये असलेल्या बुरशी आणि कीडरोधक गुणधर्मामुळे आजही जवळपास १५०० ते १६०० वर्षानंतरही ही सर्व भित्तिचित्रे अजूनही शाबूत आहेत. मराठवाड्यातील तापमानात मोठी विषमता आहे. पण गांजाच्या उष्णतारोधक गुणधर्मामुळे या विषमतेचाही त्यावर फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही.

गांजाची नर झाडे प्रामुख्याने उष्ण आणि कोरड्या वातावरणात वाढतात, तर मादी झाडे विशेषत: थंड आणि जास्त आर्द्रता असणाऱ्या वातावरणात वाढतात. पाश्चिमात्य देशांमध्ये संप्रेरकांचा उपयोग करून किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरून, उगवणाऱ्या बिया नर किंवा मादी झाडांमध्ये रूपांतरित केल्या जातात. पुरातत्वशास्त्राच्या नियमानुसार, स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचाच वापर कोणत्याही निर्माणकार्यात केला जातो. म्हणजेच त्या काळात वेरूळच्या परिसरात गांजाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. पावसाळ्यात बांधकामासाठी उपलब्ध असणारे मुबलक पाणी वापरून हा गिलावा केला जात असावा. पावसाळ्यातील मोठ्या प्रमाणात असलेली आर्द्रता आणि कमी तापमान असूनही एकही फळ किंवा बी मिळाले नाही, याचा अर्थ असा होतो की आपल्या पूर्वजांना झाडांमधील लिंगबदलाचे तंत्र माहित होते का?

बौद्ध धर्माच्या पंचशील सूत्रानुसार, सद्विवेक बुद्धीचा तोल ढासळविणारा कोणताही पदार्थ सेवन करणे वर्ज्य आहे. त्यामुळे तत्कालीन निर्माणकर्ते गांजाचे सेवनच करत नसावेत. याचा उपयोग या धाग्यासाठीच केला जात असावा, असेही म्हणता येईल.
असा हा गूढ गांजाचा आगळा वेगळा शोध.. अगदी विस्मयकारक ठरलेला !!

- डॉ. मिलिंद सरदेसाई 
वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
(भवताल दिवाळी २०१९ च्या अधिवासी विशेषांकातून)

#Bhavatal #BhavatalMagazine #Ellora #भवतालमासिक

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like