Articles 
वऱ्हाडातील रंग पालटणाऱ्या पावसाची गोष्ट !

वऱ्हाडातील रंग पालटणाऱ्या पावसाची गोष्ट !

वऱ्हाडातील रंग पालटणाऱ्या पावसाची गोष्ट!
(भवतालाच्या गोष्टी ४८)

 

‘पाऊस कधी येणार अथवा तो कधी दांडी मारणार’ याची हमखास चर्चा आमचे मामा लोक करीत असत. ते सर्व जण शेतकरी कुटुंबातले. तेव्हा आम्हा भावंडांनाही त्याचे मोठे अप्रुप वाटे. गंमत म्हणजे त्यांचे बरेचसे ठोकताळे १९८०-९० च्या दशकातील हवामान खात्याच्या अंदाजापेक्षाही अधिक विश्वसनीय वाटू लागत! त्यांच्या या अंदाजांना, कधी कावळ्याने झाडावरील बांधलेल्या काटक्यांच्या घरट्याच्या उंचीचा आधार असे, तर कधी चरैवेती-चरैवेती म्हणणाऱ्या टिटवीचा आधार असे. अगदी रोजच्या पावसाचा त्यांचा अंदाजही आमच्या बालमनाची मोठी करमणूक करीत असे. कारण वातावरणातील दमटपणा, विजांचा कडकडाट, पावसाची रिपरिप, ढगाळ वातावरणातील पावसाचा निव्वळ अंदाज बांधून शाळेला बुट्टी मारण्याचा आमचा डाव मात्र पालक सहजपणे उधळून लावत.

अंधाऱ्या रात्री दिव्यांवर झडप घालणाऱ्या फकड्या आणि त्या पाठोपाठ हमखास टपकणारा वादळी पाऊस, शेतशिवारातील त्या लालचुटुक अशा गोसावी म्हणणाऱ्या, कीटकांची गांडुळांची, गोगलगाईंची विपुलता अशा कितीतरी बाबी, आता मात्र आशाळभुतपणे त्यांचा शोध घेत राहतात.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी यवतमाळ शहर आणि एकंदरितच जिल्ह्यात पडणारा सर्वव्यापी रिमझिम पाऊस - झडीचा पाऊस पडत असे. आता मात्र शहराच्या चार किलोमीटरच्या त्रिज्येत तरी तो सारखा पडावा ना, तर त्याची खात्री आता कुणालाही देता येत नाही. आता तर बाजार गावाच्या परिसरातील कास्तकार बांधव आपल्या आजूबाजूच्या गावाच्या शिवारातही पाऊस कसा हुलकावणी देऊन गेला अथवा बरसून गेला याची खात्री करून घेऊ लागलेत.

आपल्या गावावरच नव्हे तर त्याच गावशिवारातील एखाद्या कोपऱ्यात तो कसा रुसून बसलाय याच्याही चर्चा आता चौकाचौकात रंगू लागल्या आहेत. चाळीस वर्षांपूर्वी मात्र आमचीच आजी सततच्या आभाळामुळे तीन-तीन दिवस सूर्यदर्शन न झाल्याने जेवतही नसे. ‘सत्ताविस उणे नऊ बरोबर ‘शून्य’ अशी एक चमत्कारिक जुनी म्हण गावांत प्रचलित होती. पावसाची नऊ नक्षत्र वजा केलीत तर सारे कसे शून्यवत होते, हे शेती बहूल यवतमाळ जिल्हावासियांना चांगलंच उमगलंय. आप-आपली वैशिष्ट्य जपणारा मृग-हस्त-आद्रा या सारख्या नक्षत्रांमधील पाऊस, त्यासोबत शेतशिवारात येणारी तणकटं यांचेही गणित आजच्या पावसाने पार विस्कटून टाकलय. ‘मघा नि वरती मघा’ म्हणजे मघाचा पाऊस वाट पहायला लावणारा असायचा. तर श्रावणातल्या श्रावणसरींचा ऊन-पावसाचा खेळ श्रावण मासी हर्ष मानसीची गाणी गुणगुणत - इंद्रधनुष्याच्या विलोभनीय दृष्यांने मनाला अधिकच प्रफुल्लीत करीत असे.

बदललेले समीकरण

‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ असे समीकरणही अलिकडे बदलून गेलंय. सोबतच शेतीचे वेळापत्रकही पार विस्कळीत झालय. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाने दडी मारणे आणि शेंगा कापणीला आल्या रे आल्या की पावसात सापडून दाणा पुन्हा जमिनीतच माता मोल होणे अथवा झाडावर शेंगांना कोंब फुटणे हे तर सोयाबीनच्या बाबतीत नित्याचेच झाले आहे. त्यामुळेच सोयाबीनचा एकरी उतारा घसरू लागला आहे. पाऊसमानातील बदल हा बहुसंख्येने असलेल्या कोरडवाहू शेतीसाठी तर अधिकच आव्हानात्मक ठरू लागला आहे. कपाशीची आधुनिक वाणं तर एका फ्लॅशमध्येच संपतात आणि नेमक्या दिवाळीच्या आसपास टपकणारा हा पाऊसही कापसाला ओलाचिंब करून त्याचीही प्रतवारी खालावून टाकतोय.


बदलत्या पावसासोबत कृषी व्यवसायाचे स्वरूपच पार बदलून गेले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना आणि त्याची तीव्रता शेतकरी आत्महत्यांमध्ये भरच घालत आहे.
असा हा बदलता पाऊस सर्वसामान्यांच्या जीवनात प्रचंड उलथापालथ घडवणारा असाच असणार आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरच बदलत्या पाऊसमानाने विपरीत परिणाम होणार आहेत. जाता-जाता बालपणीची एक आठवण- आम्ही सर्व बालमित्र पावसाळी दिवसात खुपसणीचा, सनकाडीचा खेळ मोठ्या उत्साहाने खेळत असू. आता मात्र ‘जाने कहां गए वो दिन’ म्हणत बदलत्या पावसाचे सरड्याप्रमाणे बदलणारे रंग कसे कसे पालटतात हे बघणेच आता आपल्या हातात राहिले आहे !

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४८ वी गोष्ट.)

 

- प्राचार्य अविनाश शिर्के, यवतमाळ

[email protected]

(भवताल मासिकाच्या जून २०२१ अंकातून...)

फोटो=

१. पावसाने मोठी ओढ दिल्यास 'धोंडी धोंडी पाणी दे...' असे म्हणत पाऊस मगण्याची परंपरा वऱ्हाडात आहे. त्यासाठी कमरेभोवती व अंगावर कडूलिंबाच्या डहाळ्या गुडाळल्या जातात.

२. पैाऊस मागताना बेडकाला काठीला बाधले जाते.

३. पाऊस मागण्यासाठी फिरणारे तरूण.

 

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like