Articles 
हाफकिन नावाचा माणूस की संस्था?.. याची गोष्ट

हाफकिन नावाचा माणूस की संस्था?.. याची गोष्ट

हाफकिन नावाचा माणूस की संस्था?.. याची गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी ५५)

 

सप्टेंबर १८९६ मध्ये प्लेगच्या पहिल्या रुग्णाची नोंद मुंबई प्रांतामध्ये झाली. त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने प्लेगची सर्वत्र लागण झाली. या प्लेगने सुमारे एक कोटी लोकांचा बळी घेतला. प्लेगवर कुठलाही खात्रीलायक औषधोपचार उपलब्ध नव्हता. संसर्ग टाळण्यासाठी ब्रिटिश सरकारने प्लेगचे रुग्ण व कुटुंबीयांवर गावाबाहेर मोकळ्या जागेवर विलगीकरण करून राहण्याची सक्ती केली. ह्याचे गंभीर परिणाम भारतामध्ये सामाजिक व राजकीय स्तरावर उमटले. चापेकर बंधूंनी २२ जून १८९७ रोजी केलेला ब्रिटिश अधिकारी रँडची हत्या ही त्याचीच परिणिती होती. परंतु, वैद्यकीय संशोधन क्षेत्रात मात्र प्लेगची साथ ही चांगल्या घटनेची नांदी ठरली.

मूळचे रशियन ज्यू असलेल्या डॉ. वाल्देमार मोर्डेकाय हाफकिन यांनी डॉ. लुई पाश्चर यांच्याबरोबर कॉलराची लस तयार केली होती. तिची १८९३ मध्ये कोलकाता येथे यशस्वी चाचणी झाली होती. ती पाहून १८९६ मध्ये मुंबई-पुण्यात आलेल्या महाभयंकर प्लेगच्या साथीचा सामना करण्यासाठी तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांनी डॉ. हाफकिन यांना मुंबईत पाचारण केले. हे आव्हान स्वीकारून डॉ. हाफकिन ऑक्टोबर १८९६ मध्ये मुंबईत दाखल झाले. इथेच भारतातील जीववैद्यकीय संशोधन आणि लसनिर्मिती क्षेत्रातील पहिल्या संस्थेचा, ‘हाफकिन संस्था’ हिचा पाया रचला गेला.

एका खोलीतून राज भवनापर्यंत

ऑक्टोबर १८९६ मध्ये मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधील फ्रेमजी दिनशॉ पेटिट प्रयोगशाळेच्या एका खोलीत, एक कारकून आणि तीन नोकर ह्यांच्यासमवेत डॉ. हाफकिन यांनी ‘प्लेग संशोधन प्रयोगशाळेत’ (Plague Research Laboratory) संशोधनाचा प्रारंभ केला. डॉ. हाफकिन यांनी अवघ्या तीन महिन्यात प्लेगपासून बचाव करण्यासाठी ‘प्लेग प्रतिबंधक’ लस तयार केली आणि त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला. प्राण्यांवर केलेल्या यशस्वी परीक्षणानंतर हाफकिन यांनी १० जानेवारी १८९७ रोजी मुंबईतील मान्यवरांसमोर प्रस्तावित डोसाच्या चारपट जास्त लस स्वतःला टोचून घेतली. त्याद्वारे लसीची सुरक्षितता आणि उपयुक्तता सिद्ध केली. भारतातील संशोधनावर आधारित तसेच भारतातच निर्माण केलेली ही पहिली लस! सर्वसामान्य जनतेच्या मनात लसीविषयी विश्वासार्हता निर्माण व्हावी म्हणून ४८ वे इस्माईली इमाम आगा खान - ३ (तिसरे), सर सुलतान महंमद शाह व अन्य मान्यवरांनीही सार्वजनिकरित्या लस टोचून घेतली. पहिल्या तीन महिन्यातच ११ हजार लोकांना प्लेगप्रतिबंधक लस दिली. डॉ. हाफकिन ह्यांच्या या कामगिरीमुळे इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाने जून १८९७ मध्ये डॉ. हाफकिन यांना सन्मानार्थ  Companion of the Order of Indian Empire हा किताब दिला.

लसनिर्मितीसाठी मोठ्या जागेची गरज भासू लागल्यामुळे ‘प्लेग संशोधन प्रयोगशाळा’ प्रथम मलबार हिलवरील क्लिफ बंगल्यात व नंतर नेपिअन सी रोडवरील एका बंगल्यात स्थलांतरित केली. त्यानंतर आगा खान- ३ यांनी दिलेल्या माझगाव येथील खुश्रू लॉज इथे ती हलविली. सरतेशेवटी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी परळ गावातील २०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेली जुन्या राज भवनाची अलिशान वास्तू १० ऑगस्ट १८९९ रोजी डॉ. हाफकिन यांना प्लेग संशोधन प्रयोगशाळे साठी उपलब्ध करून दिली. एकेकाळी परळी वैजनाथाचे मंदिर असलेली ही जागा पोर्तुगीजांनी चर्चमध्ये रुपांतरीत केली. तर ब्रिटिशांनी १८२९ – १८८५ या कालावधीत ती राजभवन म्हणून आणि नंतर सरकारी कागदपत्रे ठेवण्यासाठी वापरली. आज हाफकिन संस्था ह्या ३०० वर्षे पुरातन वास्तूमध्येच आहे. कालांतराने १९०६ मध्ये प्लेग संशोधन प्रयोगशाळेचे मुंबई जीवाणू प्रयोगशाळा (Bombay Bacteriology Laboratory) असे नामकरण करण्यात आले. पुढे 1925 साली तत्कालीन मुंबई जीवाणू प्रयोगशाळेचे संचालक जनरल मॅकी ह्यांच्या प्रस्तावानुसार डॉ. हाफकिन यांच्या सन्मानार्थ प्रयोगशाळेचे नाव हाफकिन संस्था असे ठेवले.

हाफकिनची लस जगभरात

संस्थेच्या सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने प्लेग निवारणासंबंधी विविध कामे करण्यात आली. रुग्णांच्या रक्तातून आणि प्लेगच्या गाठीमधून प्लेगचे जीवाणू वेगळे काढून सहा आठवडे द्रव माध्यमात त्यांना वाढविल्यानंतर त्यांना मारून त्यांच्यावर कार्बोनायझेशनची (Carbonisation) प्रक्रिया केल्यावर निर्जंतुक केलेल्या खास काचेच्या बाटल्यांमध्ये २० मिलिलीटर म्हणजेच पाच डोस भरून ते सर्वत्र वितरित केले. लसीकरणाविषयी माहिती देणारी दोन व्याख्याने स्वतः डॉ. हाफकिन यांनी दिली- एक लंडन रॉयल सोसायटी (१८९७) येथे तर दुसरे पुण्यामध्ये (१९०१). लसीकरण पद्धती शिकण्यासाठी बडोदे, म्हैसूर, भावनगर, काठियावाड आदी संस्थानिकांनी त्यांच्या डॉक्टरांना मुंबईला पाठविले. लसनिर्मिती व लसीकरणाची पद्धती शिकविणे ही कामे तत्कालीन भारतीय कर्मचाऱ्यांनी केली. ह्यामध्ये डी. ए. तुरखुड ह्यांनी महत्वाची भूमिका बजावली. संस्थेने संपूर्ण भारतात लसीचे वितरण केले. याशिवाय मस्कत, हॉन्गकॉन्ग, सायप्रस, फिलिपाईन्स, सिंगापूर, जपान, रशिया आणि ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेल्या दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, फिजी आदी देशांमध्ये ही लस पुरविली. १८९७ ते १९०७ ह्या काळात संस्थेने लसीचे ६० लाख डोस पुरविले.

१९०२ मध्ये प्लेगवर उपचार करण्यासाठी लस विकसित करण्याचे (Serum Therapy) प्रयत्न केले. तथापि योग्य वेळी रुग्णाला लस देण्यात व्यावहारिक अडचणी आल्यामुळे ही उपचार पद्धती वापरली नाही. परंतु नंतर १९३३ मध्ये ही पद्धत विकसित करून लस प्लेगच्या उपचारासाठी वापरली. प्लेगच्या प्रादुर्भावाचा साकल्याने अभ्यास करण्यासाठी संस्थेमध्येच प्लेग संशोधन कमिशन ही कार्यरत झाले. १९०२ मध्ये लसीकरणाच्या दरम्यान पंजाबमध्ये १९ नागरिकांना धनुर्वात झाला. त्यामुळे डॉ. हाफकिन ह्यांच्यावर दोषारोप करण्यात आले व संस्थेची धुरा डॉ. डब्ल्यू. बी. बॅनरमन ह्यांच्यावर सोपविण्यात आली. देशविदेशातील संशोधक व वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांनी डॉ. हाफकिन ह्यांना पाठिंबा दिला. यथावकाश १९०६ साली डॉ. हाफकिन यांचे निर्दोषत्व सिद्ध होऊन त्यांना दोषमुक्त करण्यात आले. कालांतराने संस्थेचेच हाफकिन संस्था नामकरण झाले हे खरे असले, तरी स्वतः डॉ. हाफकिन मात्र सदर संस्थेत परतू शकले नाहीत.

कार्यकक्षा विस्तारल्या

गरजेनुसार संस्थेने १९०५ साली आपल्या कार्यकक्षा रुंदावल्या व प्लेगबरोबरच हिवताप, घटसर्प, विषमज्वर, रेबीज इ. रोगनिदानास व प्रशिक्षणास सुरुवात केली. उदाहरणार्थ एम्. बी. सोपारकर ह्यांनी रक्तघटक असलेले माध्यम वापरून क्षयाचे जंतू प्रयोगशाळेत वाढविले, रोग्यांच्या थुंकीचे नमुने घेण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या सुरक्षित बाटल्या बनविल्या. रोगनिदान चाचण्यांबरोबरच पाण्याच्या दर्जाचे परीक्षणही सुरु केले. डी. ए. तुरखुड ह्यांनी नारूच्या अळ्या तर एस्. एन्. गोरे ह्यांनी कॉलरा व अन्य संसर्गजन्य जीवाणूंसाठी परीक्षण पद्धती शोधल्या. त्याच्या प्रसारासाठी देशातील बंगलोर, नागपूर, सुरत, लाहोर (स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने), लखनौ व अन्य शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण केंद्रे (Sanitory Inspection Centres) स्थापन केली. तसेच स्वच्छता सर्वेक्षकांना प्रशिक्षित केले. हाफकिन संस्थेच्या कार्यकक्षा संशोधन ते परीक्षण ते प्रशिक्षण अशा सहज रुंदावत गेल्या. मॅजिक लॅन्टर्न स्लाइड शो द्वारे प्लेग, हिवताप, क्षयरोग, नारू, रेबीज व अन्य प्राणीजन्य आजारांसंबंधी (Zoonotic Diseases) जन प्रबोधन केले आणि वैद्यकीय तसेच निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. १९०६ साली संस्थेने रुग्णालय सहाय्यकांसाठी औपचारिक प्रशिक्षण वर्गही सुरु केला. ह्यामध्ये प्राथमिक स्वरूपाच्या रोगनिदान चाचण्या, सूक्ष्मदर्शकाचा वापर, जंतुनाशकाचा उपयोग, लसीकरण इ. विषयांचा समावेश होता. प्रशिक्षणार्थींना गोकुळदास तेजपाल रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात प्रत्यक्ष रुग्णसेवेचे प्रशिक्षणही देण्यात आले. संस्थेने सेंट जॉर्ज रुग्णालय, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, कामा रुग्णालय अशा विविध रुग्णालयांच्या सहयोगाने संशोधन प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. तर प्राणीजन्य आजार व प्राण्यांचे आजार ह्यासंबंधी संशोधनामध्ये बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज, व्हिक्टोरिया झूओलॉजीकल गार्डन उर्फ राणीची बाग (सध्याचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान) ह्या संस्थांबरोबर काम केले.

संशोधनात ब्रिटिश सरकारकडून अडथळे

पहिल्या जागतिक महायुद्धाला १९१४ मध्ये सुरुवात झाली. ह्या काळात संस्थेने लष्कराला प्लेग प्रतिबंधक लसीबरोबरच रक्तघटक, जंतुनाशक टिंक्चर आयोडिन, मलमपट्टीचे साहित्य ह्यांचे उत्पादन सुरु करून पुरवठा केला. युद्धकाळाच्या शेवटी जून 1918 मध्ये जगभर एन्फ़्लुएन्झाची साथ आली. त्यावेळी  एन्फ़्लुएन्झाच्या लसीचीही निर्मिती केली. हाफकिन संस्थेचे वैशिष्ट्य असणारे सर्पदंश, विंचूदंश ह्यासारख्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी संशोधन १९२० मध्ये सुरु झाले. १९२४ मध्ये संस्थेने औषधनिर्माण शास्त्र विभाग (Department of Pharmacology) सुरू केला. देशात प्रथमच स्थानिक औषधी वनस्पतींवर संशोधन सुरु झाले. फादर कायस आणि के. एस्. म्हसकर ह्यांनी कुटना (कुडा), पळस, कवली ( काळी करडोली/वकुंडी) ह्या वनस्पतींवर संशोधन सुरू केले. विंचू दंशावर उपाय शोधण्यासाठी १९५ वनस्पतींचे परीक्षण केले. परंतु, ह्या प्रयत्नांना यश आले नाही. देशातील पहिल्याच औषधनिर्माण शास्त्र विभागाच्या विविध प्रकल्पांची लॅन्सेट ह्या नामांकित वैज्ञानिक नियतकालिकाने दाखल घेऊन अभिनंदन केले. पण १९३३ साली आर्थिक टंचाईचे कारण दाखवून ब्रिटिश सरकारने हा विभाग बंद केला.

संस्थेच्या प्रारंभीच्या काळात, डॉ. हाफकिन यांचा अपवाद वगळता संचालक पदाची जबाबदारी कायम भारतीय वैद्यकीय सेवेतील (Indian Medical Services) ब्रिटिश अधिकाऱ्यांकडेच सोपविण्यात आली. 1932 मध्ये प्रथमच लेफ्टनंट कर्नल साहिब सिंग सोखे ह्या भारतीय वैद्यकीय सेवेतील भारतीयाकडे संस्थेच्या संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली. जीवरसायन क्षेत्रातील तज्ञ डॉ. सोखे ह्यांनी 17 वर्षांच्या दीर्घ कालावधीत (1932-1969) संस्थेच्या कार्यकक्षा अधिकच विस्तृत केल्या. 1930 मध्ये प्लेगच्या साथीची तीव्रता कमी झाल्यामुळे संस्थेचे काही विभाग बंद करण्यात आले होते. तथापि प्लेग प्रतिबंधक लसनिर्मिती हे संस्थेचे मुख्य काम सुरु होते. ब्रिटिश अंमलाखालील श्रीलंका, एडन, मलाया, कैरो, इ. विविध देशात ही लस पुरविली जात असे. 1930 मध्ये डॉ. हाफकिन ह्यांचे स्वित्झर्लंड येथे देहावसान झाले. तोपर्यंत संस्थेने प्लेग प्रतिबंधक लसीचे ३ कोटी ३३ लाख ९३ हजार ३३९ डोस पुरविले होते.

देशातील पहिले सर्पालय

संस्थेचा कारभार मुंबई सरकारच्या अखत्यारीत होता. संस्थेला संशोधनासाठी लागणारा निधी मुंबई सरकार आणि इंडियन रिसर्च फंड असोसिएशन (IRFA) तर विद्यावेतन लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट (LTMT) देत असे. सरकारने १९३३ मध्ये आर्थिक तंगीमुळे कर्मचारी कपात केली. संस्था बंद करण्याचा विचारही सुरु होता. तथापि तत्कालीन संचालक डॉ. सोखे ह्यांनी कार्यकक्षा विस्तारणे हाच आर्थिक टंचाईवर उपाय असल्याचे प्रतिपादन करत ते सिद्धही केले. प्रथमतः लसनिर्मितीच्या विविध प्रक्रियांचे प्रमाणीकरण करून लसीची कार्यक्षमता ३० पटींनी वाढविली. प्लेगच्या उपचारांसाठी १९३३ साली ही लस तयार केली. जागतिक आरोग्य संस्था, युनेस्को अशा आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहयोगाने नवीन प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. विविध वैद्यकीय व निम-वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरु झाले. १९३८ साली देशातील पहिले सर्पालय संस्थेने सुरु केले. विषारी सर्पदंशावरील देशातील पहिली लस इथेच १९४० साली तयार झाली. कालांतराने संस्थेने वैद्यकीय, आरोग्य, औषध तपासणी आदी क्षेत्रात परीक्षण सेवा सुरु केली. रसायनोपचार विभागाने (Dept. of Chemotheropy) १९३९ मध्ये प्लेगवर उपचार करण्यासाठी सल्फाथायाझोल आणि सल्फापायरिडिन ही तुलनेने स्वस्त आणि उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लसीपेक्षा अधिक प्रभावी व कमी घातक परिणाम असणारी औषधे शोधली.

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात (१९३९-१९४५) आर्थिक संकटाने अधिकच उग्र रूप धारण केले. साधनसंपत्तीचा तुटवडा वाढला. पण त्याचबरोबर विविध लसींची मागणीही वाढल्यामुळे संस्थेने लसनिर्मिती वाढविली. त्यासाठी पिंपरी (पुणे) येथे ३०० घोड्यांसाठी नवीन पागा तयार केल्या. दरम्यान रसायनोपचार विभागातील डॉ. गणपती व श्री. शिरसाट ह्यांनी लसीची पावडर करण्याची पद्धती विकसित केल्यामुळे अधिकच फायदा झाला. प्लेग, कॉलरा, रेबीज, विषमज्वर ह्या लसींबरोबरच धनुर्वात, संग्रहणी (Dysentry), गॅस-गँगरीन, घटसर्प, विंचूदंश, सर्पदंश यांवर उपचार करण्यासाठी व रोगप्रतिबंधक अशा विविध लसी आणि रक्तघटक यांची निर्मिती संस्थेमध्ये सुरु झाली. रक्तघटक विशेषतः प्लाझ्मा (Plasma) पुरविण्यासाठी 1942 साली रेडक्रॉसच्या सहाय्याने रक्तपेढी सुरु केली. लष्करासाठी ग्लुकोज सलाईन, वेदनाशामक मॉर्फिन, प्रतिजैवक - पेनिसिलीन,व्हिटॅमिन ‘ए’ ह्यांचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन केले. युद्धकाळातील महत्त्वाची संशोधने म्हणजे कॉडलिव्हर ऑईल आणि सल्फोनामाइड वापरून बनविलेली भारतातील पहिली जंतुनाशक मलमपट्टी ‘पेनोम’ आणि शस्त्रक्रियेच्यावेळी भूल देण्यासाठी ट्रायक्लोरोइथिलीन. ह्याच काळात डास मारण्यासाठी फवारा, क्विनाईनमधील भेसळीचे परीक्षण, निर्जंतुकतेची चाचणी, इ. नवीन उपक्रम सुरु झाले. युद्धकाळातच रेशनिंग आले. विविध अन्नधान्य, दूध-तूप आदींचे पोषणमूल्य व शुद्धता तपासण्याचे कामही संस्थेकडे आले.

दर्जेदार उत्पादन परीक्षण

युद्धकाळात सुरू केलेली उत्पादने व परीक्षणे ह्यांची मागणी त्यांच्या उत्तम दर्जामुळे वाढतच राहिली. त्यामुळे स्वतःची उत्पादने तपासण्यासाठी, परीक्षण सेवा पुरविण्यासाठी संस्थेने नंतर विषविज्ञान विभाग (Dept. of Toxicology) सुरु केला. तर वैद्यकीय तथा रोगनिदान तपासण्या ह्या रोगनिदान शास्त्र (विकृती शास्त्र) विभागातून (Dept. of Pathology) होऊ लागल्या. संस्थेमध्ये १९४७ साली एकूण आठ विभाग होते आणि ह्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे भारतीय होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्था भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (Indian Council of Medical Research, पूर्वीचे नाव IRFA) तसेच, वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (Council of Scientific and Industrial Research) यांच्या सहाय्याने कार्यरत होती. नंतर ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली आली. विविध प्रकारच्या औषधांची आणि लसींची निर्मिती, परीक्षण, प्रशिक्षण आदी कामे सुरु होती. ह्या परीक्षणाच्या कामातूनच देशातील पहिल्या अन्न व औषध प्रशासनाची (Food and Drug Administration - FDA) निर्मिती झाली. आजही महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहयोगाने मद्यार्क परीक्षणाचे काम संस्था करीत आहे. 1951 साली संस्थेच्या विषाणूशास्त्र विभागात (Dept. of Virology) एन्फ़्लुएन्झा गट सुरु केला ज्याची परिणीती नंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या एन्फ़्लुएन्झा केंद्रामध्ये झाली. 1958 मध्ये डॉ. घारपुरे ह्यांनी पोलिओ प्रतिबंधक तोंडावाटे घेण्याच्या लसीचे संशोधन सुरु केले. आज जागतिक आरोग्य संघटनेसाठीही पोलिओ लसनिर्मिती करण्यात हाफकिन संस्थेतून स्थापन केलेल्या हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचा (मर्या.) मोठा वाटा आहे. 1964 साली म्हैसूरमध्ये फैलावलेल्या क्यासनूर फॉरेस्ट डिसीजच्या (Kyasanur Forest Disease) प्रतिबंधासाठीही संस्थेने लस तयार केली. संस्थेने 1959 मध्ये हिरक महोत्सवाच्या वेळी भारतात पहिल्यांदा वैद्यकीय प्रयोगशाळा सहाय्यकांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु केले. मुंबई विद्यापीठाने १९६५ मध्ये ह्या अभ्यासक्रमाला पदविका अभ्यासक्रम (Diploma in Medical Laboratory Technology) म्हणून मान्यता दिली.

अमृत महोत्सवी वर्षात स्वायत्तता

महाराष्ट्र शासनाने संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात, १९७४ साली संस्थेच्या उत्पादन विभागाचे रूपांतर हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्यादित) या शासकीय उपक्रमात केले. संशोधन आधारित उद्योग निर्मितीचा; ‘मेक इन इंडिया’चा जणू हा पहिला यशस्वी प्रयोगच! तर संस्थेचे ‘हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था’ ह्या स्वायत्त संस्थेत रुपांतर झाले. २० व्या शतकात संस्थेचे संशोधन डोंबिवली ताप, क्षयरोग, प्लेग, लेस्पयरोटीस अशा मुख्यतः संसर्गजन्य आजारांवर केंद्रित होते. संस्थेने या रोगांसाठी परीक्षण सेवाही पुरविल्या. १९९८ मध्ये कथित प्लेगच्या तसेच २१ व्या शतकातील ‘बर्ड फ्लू’ व स्वाईन फ्लू’ च्या साथीच्यावेळी रोग परीक्षणात संस्थेने दिलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने संस्थेला ‘फ्लू सर्वेक्षण केंद्र’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यासाठी संस्थेमध्ये मुंबईतील पहिली जैवसुरक्षा प्रयोगशाळा - ३ (Bio-safety Level 3 - BSL3) ही संसर्गजन्य रोगांवर काम करण्यासाठी विशेष प्रयोगशाळा तयार करण्यात आली.

विद्यमान घडामोडी

नवीन युगातील आरोग्य समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सध्या संस्थेमध्ये मधुमेह, कर्करोग, हिवताप, मूलपेशी तसेच औषधांना न जुमानणाऱ्या (drug resistant) क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारांवर संशोधन सुरु आहे. विज्ञानातील विविध कौशल्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी संस्था जीवतंत्रज्ञान, रासायनिक तंत्रज्ञान, विषाणूशास्त्र आदी विषयांचे प्रशिक्षण वर्ग नियमितपणे आयोजित करते. २०१८ मध्ये संस्थेला भारत सरकारने ‘कौशल भारत – कुशल भारत’ ह्या योजनेअंतर्गत जीवन विज्ञान (Life Science) विषयासाठी मानद मान्यता दिली आहे. रोगपरीक्षणाबरोबरच मद्यार्क परीक्षण, पाणी परीक्षण, विष विज्ञान चाचण्या इ. सेवाही संस्था पुरविते.

जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ मध्ये सर्पदंश हा अत्यंत दुर्लक्षित आजार म्हणून घोषित केला आहे. सर्पदंशाचे सर्वाधिक बळी भारतात आहेत. दर दहा मिनिटांनी भारतात सर्पदंशामुळे एक व्यक्ती जीव गमावते. या जटील समस्येची उकल करण्यासाठी संस्थेमध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाच्या माध्यमातून ‘राष्ट्रीय विष संशोधन केंद्र’ स्थापनेची मुहूर्तमेढ रोवण्यात मला यश आले. तसेच २०१९ मध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने संस्थेला ‘विभागीय प्राणीजन्य आजार केंद्र’ म्हणून मान्यता दिली असून या केंद्रात ‘रेबीज’वर काम केले जाईल. याखेरीज संस्थेत २०१९ मध्ये आय्. आय्. टी. – बीच्या सहकार्याने ‘बायो-इन्क्युबेटर’ची उभारणीदेखील सुरू आहे.

संस्थेच्या ग्रंथालयातील गेल्या सव्वाशे वर्षातील नियतकालिके, पुस्तके, प्रबंध, मायक्रोफिल्म अश्या विविध स्वरूपातील ज्ञानभांडार म्हणजे वैज्ञानिक इतिहासप्रेमींसाठी मोठा ठेवाच आहे. तर संस्थेचा इतिहास, संस्थापक संचालक डॉ. हाफकिन यांचे कार्य व विविध संशोधन या सर्वांची माहिती चित्ररूपाने तसेच चित्रफितींच्या माध्यमातून देणारे संस्थेचे संग्रहालय विज्ञानप्रेमींचे आकर्षण आहे. ‘रोगापहारी विज्ञानम् लोककल्याण साधनम्’ - समाजहित साधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्याधींवर विजय मिळविण्यासाठी विज्ञानाचा वापर, हे हाफकिन संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. ह्या ब्रीदानुसार संस्थेची वाटचाल सुरु आहे. साहजिकच दैदिप्यमान इतिहास असलेल्या हाफकिन संस्थेचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे.

 

- डॉ. निशिगंधा नाईक

माजी संचालक, हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, मुंबई

[email protected]

(‘भवताल’ २०२० च्या सूक्ष्मजीव विशेषांकातून...)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

5 Comments

digambar gadgil

dr naik has expressed bright future for halfkeen but as i learn from a long distance that it is quite neglected.in the shado9w of kovid it was expected that they shd b able to find out vaccine for prevention of kovid but nothingf was reported on their work

रजनीश जोशी

व्वा, अगदी महत्त्वाची आणि योग्य माहिती. धन्यवाद

Bhavatal Reply

आभार.

Hemant Jadhav

अतिशय दुर्मीळ माहिती . नविन पिढिला ज्ञात होणे अतिशय जरूरीचे. गरजच शोधाची जननी होते.

Bhavatal Reply

होय खरंच... धन्यवाद.

Dhanaji Sonaba Patil

Great information

Bhavatal Reply

Thank you.

Pushpa Vijay Jangam

अतिशय सुंदर महिती. आम्ही M.SC.Microbiology चे students १९८५ मध्ये हाफकिन institute ला भेट दिली होती. त्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद

Bhavatal Reply

ओके, आभार.

Your Comment

Required fields are marked *

You may also like