Articles 
एका आटलेल्या विहिरीची गोष्ट!

एका आटलेल्या विहिरीची गोष्ट!

एका आटलेल्या विहिरीची गोष्ट !

“साहेब, लवकर या! इरीतला पंप निसता हवेत फिरतुया...” मला आमच्या गड्याची भेदरलेल्या आवाजात हाक आली. याला नक्की काय सांगायचंय, हे पाहायला मी विहिरीकडं गेलो. तर, सबमर्सिबल पंपाच्या खाली पाण्याची पातळी गेली होती आणि विहिरीचा तळ दिसत होता.

स्थळ- ८९३, नूलकर वाडा, सदाशिव पेठ, पुणे. नागनाथ पाराजवळ असलेला हा सव्वाशे वर्षे जुना वाडा. आमची ही पाचवी पिढी. पण एकाही पिढीने या विहिरीचा तळ पाहिला नसेल, जो आज मला पाहावा लागत होता. माझ्या पणजोबांनी वाड्याच्या बांधकामाला सुरुवात करायच्या आधी ही विहीर बांधली. त्या दिवसापासून आज पर्यंत ही विहीर आमच्या कुटुंबाचा एक सदस्यच आहे. विहिरीच्या कृपेने सव्वाशे वर्ष नूलकर कुटुंबीयांना कधीही पाण्याच्या टंचाईची झळ पोहोचली नाही. आजोबा सांगतात की पानशेतच्या पुरानंतर पुण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तेव्हा आमच्या संपूर्ण गल्लीच्या रहिवाशांना महिनाभर या विहिरीनेच पाणी पुरविले. आजपर्यंत अनेक दुष्काळ तिने पाहिले, पण कधीही तिचे पाणी संपले नाही.

आज नेमके हे घडले?
मग आजच असे नेमके काय घडले? मी चक्रावून गेलो. गेला महिनाभर आमच्या शेजारच्या वाड्यात स्टोन ब्रेकरने खोदकाम चालू होते. याचा तर काही संबंध नसेल, अशी शंका मनात अली. अर्धा एकरचा तो वाडा. मालकाने नुकताच विकला होता. बिल्डरने चारी बाजूंनी निळे पत्रे ठोकले होते. त्यावर आठ मजली प्रस्तावित इमारतीचे चित्र लावले होते. मी तिथे पोहोचलो. तो भव्य वाडा पाडून तिथे सुमारे दोन मजले खोल खड्डा झाला होता आणि त्यात पाणी भरले होते. घडलेला प्रकार माझ्या लक्षात आला. आमच्या विहिरीला पुरवठा करणारे झरे या खड्ड्यात फुटले होते. विहिरीतून आमचा उपसा चालूच होता, पण तिचे नैसर्गिक पुनर्भरण मात्र बंद झाले होते. झऱ्याचे पाणी शेजारच्या वाड्यातल्या खड्ड्यात जात होते. ते बिल्डर तीन पंप लावून उपसून गटारात सोडत होता. आम्हाला जीव की प्राण असलेले पाणी त्याला डोकेदुखी होऊन बसली होती.

विहिरीच्या पाण्याचे पुढे काय?
भूजल-वैज्ञानिक आणि माझा मित्र डॉ. हिमांशु कुलकर्णी याला मी फोन लावला. हा अजब प्रकार सांगितल्यावर तो हसला. म्हणाला “अरे, पुण्याच्या नदीभोवतालच्या परिसरात सर्वत्र हीच शोकांतिका चालू आहे रे! नवीन बांधकामामुळे लाखो वर्ष पुरातन झरे आणि भूजल स्रोत नाहीसे होत आहेत. आणि खंत याची की शहर विकास धोरणांमध्ये यांच्या संवर्धनासाठी कोणतेही प्रयोजन नाही.” “म्हणजे आता आमच्या विहिरीला परत पाणी येणारच नाही?” माझा त्याला प्रश्न !

“कठीण आहे! तुम्ही फारच नशीबवान असाल तर कदाचित येईल, पण शक्यता फारच कमी,” हिमांशू बोलला.

पुढल्या काही दिवसातच मी मनपाकडून नवीन नळ कनेक्शन घेतले, २००० लिटरची टाकी विकत घेतली, पंप बसवला आणि प्लंबिंग करून घेतले. याला दीड लाख रुपये खर्च आला. सव्वाशे वर्ष ही विहीर निरपेक्षपणे आम्हाला पाणी देत होती. आपल्या हातून वस्तू गेली की मगच त्याचे खरे मूल्य कळते. विहिरीच्या बाबतीत आमचे हेच झाले.

इतरही दुष्परिणाम
अर्धा एकर जमीन दोन मजले खोल खणून त्यात काँक्रिटचे बांधकाम केले तर पावसाचे पाणी मुरण्याची एवढी मोठी जागाही आपण नष्ट करून टाकत आहोत. आता या क्षेत्रात पावसाचा निचरा कधीच होऊ शकणार नाही आणि ते पाणी पृष्ठभागावरच राहील. हल्ली जोराचा पाऊस आल्यावर रस्त्यांचे ओढे होतात, त्यास हीच हलगर्जी कारणीभूत आहे. बिल्डर जेव्हा नवीन इमारतीचे एन्व्हायर्न्मेंटल क्लियरन्स घेतात तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार होतो का? आणि नसेल होत तर हे तातडीने दुरुस्त केले पाहिजे. हा प्रश्न फक्त शासनाचाच नाही, तर तुमचा आमचा आहे. प्रश्न गहन आहे, प्रश्न अस्तित्वाचा आहे.

ओढे आटले, झरे संपले, नद्यांतून सांडपाणी वाहायला लागले आणि आता लवकरच भूजल स्रोतही नष्ट होतील. असा विनाशकारी विकास थांबविला नाही तर सर्वांच्याच तोंडचे पाणी पळेल आणि बाजारपेठेत पाण्याची किंमत पेट्रोललाही मागे टाकेल.

- डॉ. गुरुदास नूलकर
(इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे)

#भवताल#आटलेलीविहीर #भूजल#गुरुदास_नूलकर

1 Comments

radhika

भुजलांचे अनेक साठे अशा प्रकारे नष्ट झाले आहेत.

Your Comment

Required fields are marked *