Articles 
या अफलातून शोधाची कहाणी तुम्ही ऐकली नसेल !

या अफलातून शोधाची कहाणी तुम्ही ऐकली नसेल !

या अफलातून शोधाची कहाणी तुम्ही ऐकली नसेल !

- वाचकांच्या आग्रहास्तव ही संपूर्ण गोष्ट

मध्यरात्र उलटून गेली होती. एक-दीडचा सुमार असेल. मी कोल्हापूरच्या त्या फ्लॅटमध्ये एका छोट्या उभयचर प्राण्याचे शवविच्छेदन करत होतो. सोबत पाच-सहा जण होते. तो प्राणी व्यवस्थित जतन करून ठेवण्यासाठी ते आवश्यक होते. त्याचा डीएनए नमुना मिळवण्यासाठी यकृताचा छोटा तुकडा काढावा लागतो. त्यासाठी छेद केला तेव्हा आतून आतड्यासारखे काहीतरी बाहेर आले. अनेकदा असे होत असल्याचा माझा अनुभव होता. ते पुन्हा आतमध्ये सरकवले तेव्हा त्याची हालचाल जाणवली. कारण ते आतडे नव्हते तर त्या प्राण्याच्या पोटात असलेले पिल्लू होते. ते पाहून सोबत असलेला डेव्हिड इतका रोमांचित झाला की अक्षरश: मोठमोठ्याने आरोळ्या देऊ लागला. कारण नैसर्गिक इतिहासात ते काहीतरी अनोखे होते, अद्भुत होते. संपूर्ण आशिया खंडात कोणी वैज्ञानिकाने अशी घटना अनुभवली नव्हती! कारण तो प्राणी, अंडी घालण्याऐवजी थेट पिल्लांना जन्म देणारा आशियातील पहिलाच उभयचर प्राणी ठरणार होता.

यात ज्याचे शवविच्छेदन सुरू होते, तो होता उभयचर प्राण्यांचा विशिष्ट गट असलेल्या सिसिलियन अर्थात देवगांडूळ प्रकारातील एक प्राणी. आणि डेव्हिड म्हणजे सिसिलियन अर्थात देवगांडूळ या प्रकारच्या प्राण्यांचा जगप्रसिद्ध अभ्यासक डेव्हिड गॉवर. डेव्हिड इतका रोमांचित झाला म्हणजे आपण काहीतरी अफलातून शोधले आहे याची आम्हालाही कल्पना आली. या शोधाने आम्हाला प्रसिद्धी, उत्साह, आनंद, समाधान दिलेच, शिवाय विज्ञानात एक महत्त्वाची भरही टाकली गेली! ही अतिशय भन्नाट कहाणी. पण ती संपूर्णपणे उलगडण्यासाठी या घटनेच्या पुढच्या आणि मागच्या अनेक रोचक गोष्टींवर प्रकाश टाकावा लागेल.

उभयचर आणि सरीशृप प्राण्यांच्या ५८ नव्या प्रजाती शोधून काढणारे ख्यातनाम संशोधक डॉ. वरद गिरी व त्यांच्या टीमचा हा अफलातून शोध. वाचकांच्या आग्रहास्तव “भवताल मासिका”च्या अंकातील संपूर्ण लेख प्रसिद्ध करत आहोत.
भवताल मासिक वर्गणीसह किंवा विनामूल्य नावनोंदणी करण्यासाठी लिंक:

https://bit.ly/2X0jE2M

.....

मी मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस) या संस्थेत कार्यरत होतो. सिसिलियन नावाच्या उभयचर प्राण्यांवर अभ्यास करण्याचा मनोदय होता. सिसिलियनला आम्ही देवगांडूळ असं नाव ठेवलंय. तो पाय नसलेला उभयचर प्राणी, सापासारखा दिसणारा. पण अंगावर खवले नसल्याने तो साप नाही. त्याच्या शरीरावर गांडुळासारखी वाटणारी कडी असतात. तो जमिनीखाली राहतो. भारतात त्याच्या ४० प्रजाती सापडतात आणि महाराष्ट्रात ८ ते ९.

मी या प्राण्याचा शोध घेत असताना मला २००० साली अंबोलीजवळ असा एक प्राणी मिळाला. त्याची ओळख पटवण्यासाठी मी भारतातील अनेक तज्ञांकडे पाठपुरावा केला, पण अनेकांनी मला उडवून लावले. त्यामुळे मी काहीसा निराश झालो. पण माझे काम सुरू ठेवले. २००१ साली मला अंबोलीजवळ आणखी एक देवगांडूळ सापडला. दरम्यानच्या काळात मला अशोक कॅप्टन व इतर काही सहकाऱ्यांचे मागदर्शन मिळाले होते. त्यामुळे मी त्याची ओळख पटवण्यासाठी इतरांकडे जाण्यापूर्वी स्वत: त्यावर काम केले. आतापर्यंत या प्रजाती केवळ लोणावळा, खंडाळा या भागातच असल्याचे ज्ञात होते. त्यामुळे नव्या ठिकाणी (अंबोली) अशी प्रजाती मिळणे ही बाब महत्त्वपूर्ण होती.

समांतर सुरू असलेली घडामोड

माझे हे काम सुरू असताना समांतर एक घडामोड घडत होती. सिसिलियनवर (देवगांडूळ) काम करणारे दोन जगप्रसिद्ध ब्रिटिश वैज्ञानिक- डेव्हिड गॉवर आणि मार्क बिल्किन्सन हे या विषयाच्या संशोधनासाठी भारतात येत असत. २००२ साली ते भारतात आले होते ते मुख्यत: महाराष्ट्रात फार पूर्वी सापडलेल्या एका देवगांडुळाच्या नमुन्याची तपासणी करण्यासाठी. हा देवगांडूळ १९६७ साली रत्नागिरी जिल्ह्यात डोरले (तालुका- लांजा) या गावी सापडला होता. बीएनएचएस संस्थेच्या एका संशोधकाने तो शोधला होता. त्यावेळी त्याची ओळख झूलॉजीकल सर्वे ऑफ इंडियामधील (झे.एस.आय.) तज्ञांनी पटवली होती. तो लोणावळा, खंडाळा परिसरात सापडणारी प्रजाती असल्याचे त्यांनी म्हटले होते. ती प्रजाती म्हणजे, ‘लोणावळा सिसिलियन’ किंवा ‘इंडोटिफलस’. त्या काळी (खरेतर अजूनसुद्धा!) या प्राण्याचा फारसा अभ्यास झालेला नव्हता. ब्रिटिश वैज्ञानिक डेव्हिड आणि त्याच्या सहकाऱ्याला तेच तपासायचे होते. कारण लोणावळा - खंडाळा आणि अंबोली यामध्ये अंतर खूपच जास्त होते. इतक्या अंतरात एकच प्रजाती कशी असेल, ही त्यांची शंका होता. ते शोधून काढण्याच्या जिज्ञासेपोटी त्यांनी कोलकाता गाठले. त्या ठिकाणी झे.एस.आय.चं संग्रहालय आहे. तिथे हा १९६७ सालातील नमुना जतन करून ठेवला होता.

त्यांनी सखोल परीक्षण केले. त्याच्या शरीरावरील कडी तपासल्यावर असे लक्षात आले की ती देवगांडुळाची नवी प्रजाती आहे. सामान्यत: देवगांडुळांच्या शरीरावर दोन प्रकारची कडी असतात- प्राथमिक आणि दुय्यम. या नमुन्याला दुय्यम प्रकारची कडीच नव्हती. यचा अर्थ १९६७ साली रत्नागिरीजवळ सापडलेल्या नमुन्याची खरी ओळख ३५ वर्षांनंतर म्हणजे २००२ साली पटली होती. त्याला बंगळुरू येथील एक वैज्ञानिक शेषाचारी यांच्या नावावरून ‘शेषाचर’ नाव देण्यात आले. याबाबतचा रीसर्च पेपर २००३ साली प्रसिद्ध झाला.

त्याच वर्षी माझासुद्धा रीसर्च पेपर झूटेक्सा या ख्यातनाम जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. अंबोलीजवळ मला सापडलेला देवगांडूळ हा वेगळ्या प्रजातीचा असल्याचे सिद्ध करणारा तो पेपर होता. हे करताना मला डेव्हिड आणि त्याच्या सहकाऱ्याकडून मार्गदर्शन मिळाले होते आणि प्रोत्साहनसुद्धा!

डेव्हिडसोबत प्रत्यक्ष फिल्ड वर

देवगांडूळ प्रजातीवर माझे काम झपाट्याने सुरू होतेच. आमचे काम समांतर सुरू असल्याने डेव्हिड गॉवरसोबत संवाद वाढला. २००४ साली आम्ही, मला जिथे देवगांडूळ सापडले होते, तिथे म्हणजे अंबोलीला गेलो. तिथे हे प्राणी आढळले. मग १९६७ साली ज्या ठिकाणी देवगांडूळ मिळाला होता, त्या रत्नागिरी जिल्ह्यातील डोरले गावात जायचे ठरले. सप्टेंबर महिना होता, पाऊस जवळजवळ संपला होता. तिथे मुक्काम ठोकून ६ - ७ तास शोध घेल्यावर डोरले येथे एक देवगांडूळ मिळाला. १९६७ नंतर तब्बल ३७ वर्षांनंतर वैज्ञानिकांच्या टीमला तो पाहायला मिळाला होता. त्यानंतर आम्ही झपाटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी शोध सुरू केला. त्यात यशही आले. पन्हाळा, राधानगरी, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणी देवगांडूळ मिळाले. रस्त्यात कुठे चहा प्यायला थांबलो किंवा गाडी पंक्चर झाली म्हणून थांबलो तरी आम्ही त्यांचा शोध घ्यायचो आणि ते दिसायचेसुद्धा. मालवण येथे चिपी विमानतळाच्या जवळ सड्यावर एका तासात ११० देवगांडूळ दिसले. आम्ही भारावून जात होतो, अतिशय उत्साह संचारत होता.

२००६सालचा पावसाळा

डेव्हिड गॉवर आणि आमची गट्टी जमली होती. या विषयातला जगप्रसिद्ध वैज्ञानिक आमच्यासोबत फिरतो, आम्ही एकत्र काम करतो ही भावना उत्साह वाढवणारी होती. त्याच्यासोबत फिरण्याचा अनुभव, त्याचे मार्गदर्शन मोलाचे ठरत होते. इतका मोठा वैज्ञानिक असूनही तो आम्ही राहू तिथेच अगदी आमच्यासारखाच राहत होता. २००६ सालच्या पावसाळ्यात तो पुन्हा महाराष्ट्रात आला. आम्ही त्याला सोबत घेऊन देवगांडुळांच्या शोधात फिल्डवर गेलो. या वेळी कोल्हापूर - गगनबावडा रस्त्यावर बरकी गावाच्या सड्यावर गेलो होतो. सोबत स्वप्निल पवार, धनंजय जाधव, रवींद्र भांबुरे, हरीश कुलकर्णी हे मित्रसुद्धा होते. गावाच्या सड्यावर गेलो. तिथं सड्यावर एक छोटंसं टपरीवजा घर. तिथं उतरलो, चहा घेतला आणि बाहेर पडून दगड उचकायला सुरुवात केली. तिथं देवगांडूळ मिळाले, ते शेतात मिळाले, जंगलात मिळाले. याचा अर्थ ते सर्वत्र होते, मोठ्या संख्येने होते. त्यापैकी चार ठिकाणचे देवगांडूळ डीएनए तपासणी करण्यासाठी सोबत घेतले. तशी परवानगीही माझ्याकडे होती.

तो रोमांचित करणारा क्षण

ते घेऊन दिवस मावळताना कोल्हापूर गाठलं. त्या दिवशी आम्ही सहा जण असल्याने सर्वांना हॉटेलमध्ये राहणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे डेव्हिडला हॉटेलात मुक्कामासाठी सोडून कोल्हापुरात रमण कुलकर्णी (आताचा वाईल्डलाईफ वॉर्डन) याच्या फ्लॅटवर आम्ही राहणार होतो. पण डेव्हिडला एकटं हॉटेलात राहणं पटलं नाही, तोसुद्धा आमच्यासोबत तिथंच राहायला आला. ते आमच्यासाठी चांगलंच होतं, कारण नमुने जतन करताना तो सोबत असणार होता. हे संशोधन कार्य करत असताना काही शिस्त पाळावी लागते. एक बाब म्हणजे- जतन करण्याच्या नमुन्यांवर, ते गोळा केलेल्या दिवशीच काम करावं लागतं. त्यामुळे त्या रात्री जागून आम्ही नमुने जतन करण्याचं काम करत होतो. प्राणी जतन करताना त्याचे कमी हाल होतील अशा प्रकारे मारावे लागते. त्यासाठी ठराविक रसायन वापरतात. त्यानंतर प्राणी गाढ निद्रेत जातात व मरतात.

एव्हाना रात्रीचे एक - दीड वाजले होते. आम्हाला डीएनए नमुना घेण्यासाठी यकृताचा (लिव्हर) छोटा तुकडा काढावा लागतो. त्यासाठी आम्ही छोटा तो काप घेतला. त्यातून आतड्यासारखे काहीतरी बाहेर आले. असे आतडे बाहेर येते याचा मला अनभव होता. त्यामुळे ते पुन्हा आत सरकवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते हलायला लागले. कारण ते आतडे नव्हते, तर त्या देवगांडुळाच्या पोटातले पिल्लू होते. ते पाहताच डेव्हिडने आरोळ्या द्यायला सुरुवात केली. हा देवगांडुळांवरचा जगप्रसिद्ध वैज्ञानिक. तो इतका रोमांचित झाला म्हणजे आम्हाला काहीतरी वेगळं सापडलं होतं. आहीसुद्धा दंगा केला. आमचा थकवा कुठल्या कुठं पळून गेला होता. तो नमुना काळजीपूर्वक जतन केला. ते फील्डवर्क संपवून आम्ही ८ दिवसांनी माघारी मुंबईला आलो. डेव्हिडने बीएनएचएसमध्ये त्या नमुन्याचे व्यवस्थित विच्छेदन केले. त्या वेळी त्या देवगांडुळाच्या पोटात ४ पिल्लं मिळाली.

प्राणिविज्ञानातील मोठा शोध

प्राणिविज्ञानाच्या दृष्टीने हा मोठा शोध होता. कारण देवगांडूळ हा उभयचर प्राणी. हे प्राणी सामान्यत: अंडी घालतात आणि त्यातून पिले जन्माला येतात. याला काही अपवाद आहेत. मात्र ते दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडात पाहायला मिळाले आहेत. तिथे काही देवगांडूळ आणि बेडूक थेट पिलांना जन्म देतात. पण आम्हाला सापडलेला देवगांडूळ हा संपूर्ण आशिया खंडातील उभयचर प्राण्यांची अशी एकमेव प्रजाती आहे. त्याबाबतचा रीसर्च पेपर २००८ मध्ये पेपर प्रसिद्ध झाला. आणि जगापुढे हे आगळेवेगळे वास्तव आले. हा इतका अफलातून जीव कोल्हापूर जिल्ह्यातल्या बरकी नावाच्या गावात सापडतो. हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातही फारसं कोणाला माहीत असायचं कारण नाही. पण या देवगांडुळाच्या शोधामुळं ते प्राणिविज्ञानात मात्र प्रसिद्ध झालं!

या प्राण्यावर यापुढेही अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आमच्या संशोधनापूर्वी तो केवळ लोणवळा, खंडाळा आणि डोरले या भागात सापडतो, एवढेच माहीत होते. मात्र, त्याची व्याप्ती लोणावळा - खंडाळा याच्या पलीकडे चिपळूण ते गोवा इतकी दूरपर्यंत असल्याचे आम्ही दाखवून दिले. पण ते कसे राहतात, त्यांचे जीवनमान किती, जमिनीखाली कसे वावरतात अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पडायचा आहे. पुढे त्याच्या विविध प्रजाती, त्यांचे निसर्गातील स्थान आणि अनेक अनोख्या बाबी जगापुढे येण्याची आवश्यकता आहे. ते काम कोणाला तरी करावे लागेल. निसर्गाचे ज्ञान असेच वाढत जाते... ते संवर्धनासाठी उपयुक्तही ठरू शकते!

या कहाणीतून एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, एखाद्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरच वेगळे काहीतरी हाती लागू शकते. १९६७ साली सापडलेल्या देवगांडुळाची ओळख योग्य आहे का, याबाबत डेव्हिडला उत्सुकता होती. त्याने त्याचा पिच्छा पुरवला, तेव्हा ती वेगळी प्रजाती असल्याचे लक्षात आले. ती प्रजाती आजही अस्तित्वात आहे का, याबाबत आम्हाला कुतूहल होते आणि ती शोधण्यासाठी आम्ही धडपड केली. त्यातून या आगळ्यावेगळ्या गोष्टी हाती लागल्या. याचा अर्थ, केवळ एखाद्या नव्या प्रजातीचा शोध लागला म्हणून थांबून उपयोगाचे नाही, तर पुढेही त्याचा सातत्याने पाठपुरावा करायला हवा. वेगळे काहीतरी करून दाखवायचे असेल तर याची खूणगाठ बांधायला हवी.
(भवताल मासिकाच्या मार्च २०२२ अंकातून)

देवगांडूळ कसा असतो?

• देवगांडूळ दिसायला सापासारखे असतात, पण त्यांच्या अंगावर सापासारखे खवले नसतात.
• भारतातील सर्वांत लांब देवगांडूळ २.५ ते ३ फुटांचा, तर सर्वांत छोटा २० सेंटीमीटरचा.
• त्यांना साप समजून लोक मारून टाकतात.
• ते गांडूळासारखे जमिनीखाली राहतात.
• मेलेले - सडलेले प्राणी, गांडूळ हे त्यांचे खाद्य आहे.
• साप किंवा इतर प्राणी त्यांना खातात.
• त्यांची नजर कमी असते, ते ऐकू शकत नाहीत, आवाजही काढत नाहीत.
• मादी अंडी घालल्यावर त्यांच्याभोवती वेटोळे घालून बसते. पिले जन्मली की ती निघून जाते.
• पिले लहान असताना पाण्यात वाढतात. मोठी झाल्यावर जमिनीखाली राहतात.

देवगांडुळाचे महत्त्व!

• देवगांडूळ किंवा सर्वच उभयचर प्राणी हे चांगल्या वसतिस्थानांचे (प्रदूषण नसलेले) निदर्शक असतात. कारण त्वचा संवेदनशील असते. प्रदूषित वातावरणात ते फार तग धरू शकत नाहीत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी देवगांडूळ असणे म्हणजे तो परिसर प्रदूषणविरहित असण्यावर शिक्कामोर्तब.
• जमिनीखाली राहणारी सजीवसृष्टीतील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची संख्या इतकी मोठी आहे, त्यामुळे जीवसृष्टीत त्यांचे कार्य तितकेच महत्त्वाचे असणार आहे. त्याबाबत अधिक संशोधन / अभ्यासक करण्याची आवश्यकता आहे.
• जैवविविधतेचे ज्ञान चांगले असेल तर आपल्याला त्याच्या संवर्धन करता येते. त्या दृष्टीने हा प्राणी महत्त्वाचा ठरतो.

-  डॉ. वरद गिरी
(शब्दांकन - भवताल टीम)

#भवताल #भवतालमासिक #वरदगिरी #देवगांडूळ #सिसिलियन #Bhavatal #BhavatalMagazine #VaradGiri #Caecilian #Amphibian #उभयचरप्राणी #Reptiles

6 Comments

Sarnath Lone

Good article

Yadav Tarte Patil

खुप सुंदर लेख, प्रेरणादायी प्रवास व कार्य, डॉ वरद गिरी ही आपली संपत्ती आहे. ऐसें संशोधक दुर्मिळ ज्यांची मातीशी नाळ जुळलेली आहे. भवताल चमूचे अभिनंदन व शुभेच्छा

Jayvant Thakur

Speechless

Kishor Adate

Great Sir Ji

Dipti Dilip Kadam

Dr varad Giri. Ha devgandul, Chiplun la mazya ghari aala hota pan tyachi mahiti nahi 2004 la asel ha devgandul disala hota.

Bhavatal Reply

OK.

Gulab Khedkar

We recently sequenced whole genome of “Dev Gandul” it is also called blind snake. The genome related paper is accepted in nature : scientific data, in couple of days will share with you. We compared Indian species found in Ooty with South African and Japanese species. It was joint project between three countries. I am thankful for your nice article and information. I may join Dr. Vard.

Bhavatal Reply

OK, that is good news. Plz share it with us. Thank you for your comment.

Your Comment

Required fields are marked *

You may also like