Articles 
कोकणातील उष्णतेच्या लाटांचे हेच ते रहस्य!

कोकणातील उष्णतेच्या लाटांचे हेच ते रहस्य!

महाराष्ट्रात सध्या उष्णतेच्या लाटांनी कहर केला आहे. राज्याच्या इतर भागाप्रमाणेच कोकणातही तापमान सातत्याने ४०° वर नोंदवले जात आहे. रायगड जिल्ह्यातील भिरा या ठिकाणाला तापमानाच्या उच्चांकाचा इतिहास आहे. तिथे उन्हाळ्याच्या सुरुवातीला अनेकदा देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. कोकणात असे घडणे अचंबित करणारे आहे. पण असे का घडते? याचा शोध घेतला तर अनेक रहस्ये उलगडतील. त्याविषयी “भवताल रिसर्च टीम” चा हा विशेष रिपोर्ट…

...

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील 'भिरा' हे एक निसर्गरम्य गाव. तीनही बाजूंनी सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेले. टाटा पावर हाऊसमुळे ते सगळ्यांच्या परिचयाचे बनले. काही अंतरावर एमआयडीसी आहे. डोंगर, दऱ्या व निसर्गाने नटलेले आणि सभोवताली उन्नैयी (भिरा) धरण, कुंडलिका नदी आणि कालव्याच्या मुबलक पाण्याने वेढलेला हा परिसर आहे. असे असताना देखील येथे तापमानाचा पारा मात्र चढलेला असतो. यंदाही या भागात उष्मतेची लाट उद्भवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, 'यलो अलर्ट' दिला आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीची सर्वाधिक नोंद

या गावात तसेच कोकण किनारपट्टी भागात गेली कित्येक वर्षे तापमानाची नोंद सातत्याने ४२ - ४३ अंश सेल्सिअसपर्यंत होत आहे. भिरा येथे २०१८ मध्ये तर ४६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ते तेव्हा उन्हाळ्याच्या सुरुवातीचे देशातील सर्वाधिक तापमान ठरले. 'भिरा' हे एक प्रातिनिधीक उदाहरण. यानिमित्ताने कोकणामधील तापमान ४२ ते ४३ अंशांवर जाणे हे अपवादात्मक आहे का? याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

समुद्रकिनारी भागात हवामान सामान्यतः सम असते, म्हणजेच दिवसाचे आणि रात्रीचे तापमान यामध्ये खूप तफावत नसते. म्हणून तिथे दिवसाचे कमाल तापमान खूप जास्त नोंदवले जात नाही. असे असतानाही कोकण किनारपट्टी भागात तापमान ४२ ते ४३ अंशांवर जाण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. 

कोकणातील तापमान वाढण्याचे कारण काय?

याविषयी “भवताल रिसर्च टीम” ने ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, उन्हाळ्यात वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. विशेषतः उन्हाळ्याच्या सुरवातीच्या काळात असे प्रवाह मोठ्या प्रमाणात आढळतात. हे वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडून खाली कोकणात उतरतात. त्यावेळी हे वारे कोकणात जाताना जवळजवळ ८०० मीटर ते एक किलोमीटर इतके खाली उतरतात.
हवा जसजशी वर जाते, तसतशी ती थंड होत जाते, तर वरून खाली येताना ती गरम होत जाते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वारे कोकणात उतरताना त्यांचे तापमान तब्बल १० अंश सेल्सिअसने वाढू शकते. त्याचाच परिणाम कोकणात जास्त तापमान नोंदवण्याच्या रूपाने पाहायला मिळतो. 

कोकणात इतरत्र का नाही?

असे असेल तर भिरा या ठिकाणाप्रमाणेच कोकणातल्या इतर भागात इतके जास्त तापमान का नोंदवले जात नाही? याबाबत डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, भिरा हे गाव पश्चिम किनारपट्टीवर आहे. तिथे टाटाचे जलविद्युत केंद्र (पावर हाऊस) आहे. त्यामुळे येथे तापमान व हवामानाचे विविध घटक मोजण्याची अद्ययावत व्यवस्था उपलब्ध आहे. भिरेच्या तापमानाच्या १०० वर्षांहून अधिक काळच्या नोंदी उपलब्ध आहेत. परिणामी 'भिरा' सातत्याने चर्चेत येते. मात्र, कोकणाच्या इतर भागात तापमान नोंदवणारी अद्ययावत यंत्रणा नसल्याने तिथे नेमके किती तापमान नोंदवले गेले हे समजत नाही. कोकणाच्या इतर भागातही तितकाच उष्मा असतो, मात्र त्याची आकडेवारी उपलब्ध होत नाही, इतकेच!

कोकणातील उष्मा जास्त त्रासदायक

कोकणात तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस असतानाही उकाडा असह्य करतो. मात्र, घाटमाथ्यावरील भागांमध्ये पारा ४२ ते ४३ अशांवर गेलेला असतानाही उकाड्याची झळ तुलनेने कमी जाणवते. असे का होते, हा प्रश्न देखील सातत्याने विचारला जातो. अनेकदा मुंबईचे तापमान कमी असताना देखील घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण होतात. याचे मुख्य कारण आहे, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण. वाढत्या तापमानानुसार हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमताही वाढते. आर्द्रता वाढली की जाणवणारा उष्मा हा कितीतरी जास्त असतो.

शरीरातील उष्णता वाढल्यावर आपल्याला घाम येतो. म्हणजेच शरीरातील उष्णता त्वचेतील छिद्रांमधून घामाच्या स्वरूपात बाहेर टाकली जात्ते. मात्र, हवेतील बाष्पाचे प्रमाण जास्त असल्यास ही क्रिया मंदावते. आर्द्रता वाढल्यानंतर शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे वास्तविक तापमानापेक्षाही उष्मा अधिक जाणवतो.

- भवताल रिसर्च टीम

...

भवताल
सकस, दर्जेदार वाचनासाठी उत्तम पर्याय

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like