Rainfall Observation For Date 09-07-2023
Participants Name : vaibhav
Title : मातीचं कोटं
Description : पावसाच्या पहिल्या काही सरी येऊन गेल्या की माती मस्त मऊ भुसभुशीत होते. या दिवसात काही शेतं कुळवून ठेवलेली असतात पण #पेरणी ला अजून सुरुवात झालेली नसते. अश्याच एखाद्या वावरात जागा बघून तिथली थोडी माती खणून काढायची. थोडा खड्डा करून तिथे आपला एक पाय व्यवस्थित रवायचा. मग हळू हळू पायावर माती टाकायला सुरुवात करायची. मातीचा थर चांगला चार बोटं जाड झाला की त्याला चपलेने थोपटायला सुरुवात करायची. आधी त्या पॅरागॉनच्या (वापरून वापरून तळभाग सपाट झालेल्या) स्लीपर्स असायच्या, ज्याने मातीचा ढीग मस्त कठीण होई पर्यंत आम्ही चोपायचो. दोन तीन जण मिळून एक कोट बांधत असतील तर एकाच मुलाचे दोन पाय वापरले जायचे. त्यामुळे #कोटं मोठं व्हायचं आणि त्याच्या दोन पायात अंतर ठेवून कोट्याला दोन दरवाजेही केले जायचे. एकदा का बाहेरील बाजू कडक झालीये याची खात्री पटली कि हळूच टाचेच्या मागची माती उकरायची आणि पाय अलगद बाहेर काढायचा. आतल्या बाजूची #माती व्यवस्थित बसलीये कि नाही हे बघायचं आणि मग कोट्याच्या आजूबाजूच्या सुशोभीकरणाला सुरवात करायची. कोणी कुंपण घालतं, कोणी कोट्यापर्यंत जायला वाट बनवतं तर कोणी त्यावर फुला-पानांची सजावट करतं. हे सगळं करताना आपण आपलं घरच बांधत आहोत अशी प्रत्येकाच्या मनात भावना असते. म्हणून सर्व मुलं अगदी जपून, मन लावून हि अशी कोटी तयार करतात. काहींची कोटी उंच होतात, कोणी आतून खोल बनवतं तर कोणाचं आकाराने मोठं आणि मजबूत बनतं. आपलं कोटं किती मजबूत बांधलंय हे दाखवण्यासाठी काहीजण त्यावर उभीपण राहतात. पुढे #पावसात कोणाचं कोट किती दिवस टिकतं यावर पैजाही लागतात. एकदा का पेरणीला सुरुवात झाली की ही सगळी कोटी पुन्हा जमीनदोस्त होतात. काही क्षणासाठी का होईना पण प्रत्येक पोर तेव्हा #आर्किटेक्ट, #इंजिनिअर आणि #इंटेरियर डिजाईनर होतो. दर वर्षी पावसाच्या आगमनाला आम्ही अशी मातीची कोटी बनवायचो, मातीत #खेळायचा आनंद घ्यायचो. तुमच्याकडे करतात का असं काही या दिवसात? वैभव जगताप, सातारा