Articles 
मोहाची दारू आणि आदिवासी विकास, यांची गुंतागुंतीची गोष्ट !

मोहाची दारू आणि आदिवासी विकास, यांची गुंतागुंतीची गोष्ट !

मोहाची दारू आणि आदिवासी विकास,

यांची गुंतागुंतीची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी १२)

सह्याद्रीच्या ऐन घाट माथ्यावरील एक खेडे. बहुतांशी ठाकर आदिवासींचीच कुटुंबे वर्षानुवर्षे जंगलाच्या व डोंगरकड्याच्या आधारे येथे मस्तीत जगतात. भर्राट वारा, हाडे गोठवणारी बोचरी थंडी, चार महिने धुवांधार पाऊस अशा वातावरणात आदिवासींच्या अनेक पिढ्या वाढल्या. डोंगर उतारावरची नागली, वरई, भादलीची शेती. लहान मोठे भाताचे खाचर व त्या जोडीला शेळ्या, कोंबड्या व डांगी जनावरे. जंगलातील मध गोळा करणे, हा त्यांचा छंद व परंपरा. वर्षातून ठराविक दिवशी रानडुकराच्या शिकारीला (पारध) जाणे, हा शिरस्ताच. कौलारू वा घोण्या गवताने शाकारलेल्या केंबळी छपराच्या आजूबाजूला निवडक भाजीपाला व जंगलातील नानाविध उपयुक्त वनस्पतींची जोपासना, असा हा मनस्वी समाज मोठ्या धिटाईने जगत असतो.

भावक्याची गोष्ट

ठाकरवाडीत भावका नावाचा एक गडी. भलताच नादी. शेतात कष्टताना मासे, खेकडे धरणार. गलोलीने पाखरू पाडणार. या भावक्याला तरुणपणापासून एक विलक्षण छंद जडलेला. मावळतीला सह्याद्रीचा थरारक शे-पाचशे फूट कडा उतरून घाट पालवातल्या खेड्यात गेले की तिथेही कोकणात ठाकर समाज राहतो. या गावात भावका भल्या पहाटे उठून तास दीड तासात पोहोचतो. जाण्याचे कारण एकच- मोहाच्या फुलाची पहिल्या धारेची दारू. ती ओळखीच्या सगेसोयर्‍याच्या घरी हमखास तयार असते. कारण कोकणात पानझडीचे जंगल असल्याने तिथे मोहाची झाडे विपुल मिळतात. आदिवासी व मोहाचे नाते भारतभर सर्वदूर आढळते, त्याला कोकणातील आदिवासी कसे अपवाद असणार? भावकाच्या दृष्टीने रोज येथे येणे जाणे केवळ हाताचा मळ. पहाटे पाच वाजता उठून कोकणात मोहाच्या मोहापायी गेलेला भावका सकाळी नऊ साडेनऊला घरी हजर होणार व शेती, गुरे सांभाळण्याच्या कामाला बिलगणार. भावकाची ही दिनचर्या अर्धा शतक चालली. पण एक दिवस परतताना, घाटातील निमुळत्या वाटेवर तोल जाऊन पडला आणि निसर्गात विलीन झाला. भावका ठाकराची ही कथा सांगण्याचे निमित्त एकच, मोहाच्या फुलांची नशा. भावका तुमच्या आमच्या दृष्टीने व्यसनी व वाया गेलेला आदिवासी असेल कदाचित. पण खरोखर त्याचे भावविश्व, प्रेरणा समजावून घेतल्या तर मोहाच्या उपयुक्तता आपणास समजेल.

मोहाची दारू आणि तिची गरज

उत्तर सह्याद्रीतील आदिवासींच्या जंगलात म्हणजे कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरात क्वचितच मोहाची झाडे आढळत असल्याने घाटमाथ्यावरील लोक तळकोकणातून मोहाची फुले आणतात. दर उन्हाळ्यात होळी झाली की चैत्रात दर्दी लोक खास महिना पंधरा दिवसासाठी वस्ती करून राहतात व फुले गोळा करून पुन्हा परततात. घरी आणल्यावर सुकत घालतात. निवडून चांगली फुले कोरड्या जागेत माळ्यावर उंच ठिकाणी ठेवतात. उर्वरीत फुले काही वाया जात नाही. जनावरांना खाण्यास उपयोग होतो. फक्त मोहाच्या फुलांपासून घरगुती वापरासाठी मद्य बनवले जाते. त्यात उंबर किंवा पायरीच्या लाकडाची ‘बाडगी’ तयार करतात. चुलीवरच्या आधणात दारू गाळण्यात त्याचा चांगला उपयोग होतो. काही लोक मोहासोबत जांभूळ व आवळा फळापासून उत्तम मद्य पेय बनवतात.

पुढे जून महिन्यात पावसाळा सुरू झाला की भाताची आवणी येते. त्यावेळी कोसळणार्‍या पावसात भात रोपे लावणार्‍याना मोहाचे मद्य मोठी ऊब देते. मोहाची दारू कोरीच व एका घोटातच घेण्याची सवय असल्याने आंबूस तोंडात बोंबलाचा तुकडा चघळला की दुसरा चकणा खायची गरज नाही. सर्वच कुटुंबे फुले गोळा करून दारू पाडत नाही. ठराविक लोक दारू तयार करून इतरांना विकण्याचा व्यवसाय पण करतात. विविध आजारावर माणसांना जसे हे पेय उत्तम औषध म्हणून उपयुक्त आहे, तसे पशुपालनात पण मोहाचे मद्य उपायकारक आहे. उन्हाळ्यात कृश झालेली डांगी जनावरे पावसाळ्यातील थंडीने आजारी पडतात. अशक्तपणा आल्यामुळे एका जागी बसतात. त्यांना तरतरी यावी व जनावरे उठून बसावी यासाठी मोहाची दारू उपयोगी ठरते. पोटदुखी, भूक न लागणे अशा वेळी मोहाची दारू औषधी म्हणून देतात.

शिरा, लाडू, सरबत, मनुके...

आकाराने विशाल व अल्पकाळ पानगळ होणारा हा वृक्ष आहे. पूर्ण वाढ झालेल्या वृक्षाची उंची सर्वसाधारण १२ ते १५ मीटर असते. उन्हाळ्यात झुपकेदार फुले येतात. त्यांच्या मादक सुगंधाने सारा शिवार मुग्ध होतो. फुलांपासून मद्याशिवाय इतर पदार्थ बनवतात. त्यात शिरा, लाडू, अलीकडे काहींनी सरबत व मनुके तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मोहाची फळे पिवळी, बोराच्या आकाराची असतात. त्याचे तेल पूर्वापार काढून वापरण्याची पद्धत आहे. तळ कोकणात ठाकर, कातकरी, महादेव कोळी यांच्या बरोबर राव, कुणबी या शेतकरी समाजात पण मोहाच्या झाडाला कल्पवृक्ष मानतात. एकत्र कुटुंबातील लेकीसुनांना मालकीची झाडे वाटून देत. त्यांनी त्या झाडांचे व्यवस्थापन करायचे. फुले गोळा करून वाळवून विक्री करायच्या. ते पैसे त्यांच्या मालकीचे, अशी परंपरा मागील २० ते २५ वर्षापर्यंत सुरू होती.

नशेसाठी, व्यसनासाठी मोहाचे नाव जोडून जाणीवपूर्वक बदनामी झाल्याने मोहाचे महत्व नाकारले जाऊ लागले. महाकवी कालिदासाच्या रघुवंश या काव्यात, इंदुमतीने मोहाच्या फुलांची स्वयंवरमाला वापरल्याचा उल्लेख आहे. वसंत ऋतूमध्ये फुले फुलतात म्हणून वेगळे महत्व आहे. मोह फुलात फ्रूक्टोज / फळशर्करा असते, त्यामुळे दारू लवकर तयार होते. मोहाच्या ताज्या व शुद्ध दारूला वास नसतो. चवही उत्तम असते. पुन्हा पुन्हा गाळून शुद्ध केलेली व अनेक वर्ष शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवलेली दारू औषधी असते, तिला आयुर्वेदात ‘अमृततुल्य’ मानले आहे. मोहाच्या फुलांचा काढा ताप-ज्वर व कफरोगात गुणकारी असतो. फळे, पाने व साल तसेच बियांची पेंड औषधात वापरतात. शंभर वर्षापूर्वी मुंबई प्रांताच्या वनस्पती संग्रह ग्रंथात थिओडोर कुक या शास्रज्ञाने ‘अ मोस्ट यूजफुल ट्री’ असे वर्णन करून ठेवले आहे. मोहाचे लाकूड घर बांधणी, फर्निचर, बैलगाड्या ते होड्या बनवण्यासाठी उपयोगात येत असे. दुष्काळाच्या काळात मोहाची फुले खाऊन जीव वाचल्याची उदाहरणे आहेत. ओल्या बियांपासून सहज रोपं तयार होत असल्याने झाडेही सर्वदूर विनासायास वाढतात.

पवित्र आणि बुढा देव

गेली हजारो वर्षे सह्याद्रीतील गिरिजनांनी विविध राजवटी अनुभवल्या. सातवाहन कालखंडात (इसवि सन पूर्व ५०० ते इसवी सन ५०० अशी किमान हजार वर्षे) भारताचा युरोपिअन देशांशी विविध मार्गांनी व्यापार सुरू होता. त्यात रोम देशात येथील रेशीम निर्यात व्हायचे व आयातीत इतर महत्वाच्या मालाबरोबर उंची मद्याचे कुंभ पण यायचे. पुरातत्वीय उत्खननात आकर्षक अशी मद्य कुंभ आजही सापडतात. वर्तमानातील शासकीय धोरण मोहाला प्रतिकूल आहे. ऊस व द्राक्षप्रमाणे मोहाला राजाश्रय मिळाला नाही.

सह्याद्रीतील ठाकर, महादेव कोळी आदी आदिवासी व पारंपरिक वननिवासी असो की मध्य भारतातील गोंड, माडिया, मुरिया, कोलाम असोत यांच्या दैनंदिन जीवनात मोह वृक्षाला जैव सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. गोंड आदिवासी तर मोहाला पवित्र मानतात, आमचा तो ‘बुढा देवच’ आहे, असे अभिमानाने सांगतात. मोह फुलापासून पारंपरिक पद्धतीने बनवलेले ‘राब’ उत्तम टॉनिक म्हणून बाळंत स्त्रियांना दिले जाते. मागच्या पिढीत महिला पण थकवा दूर करण्यासाठी मोहाचे मद्य घ्यायच्या. आता ती पद्धत मागे पडत आहे. व्यसन म्हणून नाही तर शरीराची गरज म्हणून वापर गरजेचे आहे. आज घडीला आदिवासी महिलांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी non-alcoholic उत्पादने तयार करून विकली जात आहेत. बहुगुणी मोहाचे झाड व त्यापासून मिळणारी फुले कायद्याच्या कचाट्यात अडकली आहेत. आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येत आहे. पण तो समाज मोहापासून दूर होत आहेत व तसे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात आहे. परिणामी आदिवासींची नवीन पिढी एक तर मोहाचा द्वेष करते, नाहीतर अती सेवनाने स्वत:चे व कुटुंबाचे सर्वांगीण नुकसान तरी करते.

मंदिरे, कर्मकांड, शाकाहाराचे अवडंबर 

विविध धार्मिक संप्रदायांचा प्रभाव आदिवासींवरही पडत आहे. रोजगारासाठी सातत्याने बिगर आदिवासी भागात जा-ये वाढल्याने तेथील राहणीमान, भाषा, खाद्य संस्कृतीचा प्रभाव आदिवासी समाजात सर्वत्र दिसतो. मुळात आदिवासी निसर्गपूजक. पण आता मोठी मंदिरे, सप्ते, कर्मकांड, गळ्यात माळा घालून शाकाहाराचे अवडंबर करणे, मोहाला न शिवणे, दारूबंदी सारखे शासकीय उपक्रम यामुळे बर्‍याच वेळा आदिवासींच्या आरोग्याचे प्रश्न जटील होत आहेत. मागच्या पिढीत महिला पण थकवा दूर करण्यासाठी मोहाचे मद्य घ्यायच्या. आता ती पद्धत मागे पडत आहे. व्यसन म्हणून नाही तर शरीराची गरज म्हणून वापर गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात, बेशिस्त पर्यटन, जत्रा, लग्न समारंभ व इतर निमित्त्याने अती मद्य सेवनाचे गंभीर परिणाम कुटुंबं, गाव समाज अशा सर्वांनाच भोगावे लागतात, हे सर्वश्रूत आहे. महिला, मुले यांचे प्रचंड शोषण होण्याचा पण धोका असतो. पण दुसर्‍या बाजूला मोहासारख्या उपयुक्त वनस्पतीचे दुर्गम प्रदेशातील आदिवासींच्या दृष्टीने असणारे महत्व पण नाकारून चालणार नाही. मोहाविषयी असलेले गैरसमज दूर केले पाहिजे. मोहाचा आधार तुटल्याने शरीर साथ देत नाही, असे पूर्वाश्रमी मोहाची विवेकी नशा (Responsible Drinking) करणारे व कालौघात माळकरी झालेले बुजूर्ग आवर्जून सांगतात.

ह्या लेखाचा उद्देश मोहाच्या वा इतर दारूचे उदात्तीकरण करणे हा नाही. वनाधारीत जीवनशैली हा आदिवासी संस्कृतीचा गाभा आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अनेक जण कार्यरत आहेत, पण ते अनेकदा स्थिरस्थावर मध्यमवर्गीय जीवनशैलीचा पुरस्कार करणारे असतात. त्यांच्या दृष्टीने मुख्य प्रवाहात आदिवासींना आणणे म्हणजे विकास. त्यातून ते आपल्या कल्पना आदिवासींवर लादतात. तसे करताना आदिवासीच्या शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक गरजा, त्यांचा आहार, जीवनशैली यांचा विचार केलेला नसतो. मग घडते काय तर आपल्या चांगल्या जगण्याच्या कल्पना आदिवासींच्या माथी मारल्या जातात. या प्रक्रियेत आदिवासींच्या भावविश्वाला स्थान नसते. ते भावविश्व वाईट व बदनाम मानूनच त्यांचा तथाकथित विकास केला जातो. हे सारे करताना त्याची मूलभूत कौशल्ये, क्षमता यांनाही कोणतेच स्थान नसते. मग तो आदिवासी जीवन आणि तथाकथित सुसंस्कृत समाज यांच्या मध्ये कुठेतरी अडकून पडतो. आदिवासी म्हणून असलेली मूलभूत कौशल्ये, उपजत प्रेरणा हरवून बसतो आणि त्याच्यावर लादलेल्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी, तिथे स्थिरावण्यासाठी आवश्यक अनुकूलन करू शकत नाही. परिणामी, हा समाज अशा अर्धवट स्थितीत येऊन ओळख हरवून बसतो. याला विकास म्हणता येईल का? यातून त्यांचा खरा विकास साधला जाईल का?

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील बारावी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय-   bhavatal.com

- विजय सांबरे

[email protected]

(भवताल मासिकाच्या फेब्रुवारी २०२१ अंकातून...)

फोटो सौजन्य : विजय सांबरे / विकिमीडिया 

6 Comments

Nice information.

अप्रतिम. माहितीपूर्ण लेख.

Exllent article! This type of dispassionate dessimation of information is welcome.

आदिवासी जीवन या फार मोठ्या विषयाला हात घातलाय तुम्ही.त्यांना पूर्वापार पद्धतीने जगू द्यावे कि जीवन सुधारू द्यावे हा प्रश्न आहे .कोणत्याच सरकारने हा प्रश्न तडीला लावलेला नाही

Bhavatal Reply

खरंय..

Very informative !!! Your writing always includes such a small small things.

Bhavatal Reply

Thank you.

खुप छान माहिती सर

Bhavatal Reply

Thank you.

Your Comment

Required fields are marked *

You may also like