Articles 
वनस्पतींच्या नावांच्या गोष्टी

वनस्पतींच्या नावांच्या गोष्टी

धनगराचं पागोटं

 

शास्त्रीय नाव - इरीओकाऊलॉन सेजविकी

 

वनस्पतींच्या नावात बरेच काही आहे. या नावात अस्तित्व आहे, इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि ज्याला नाव दिले गेले त्याची संपूर्ण ओळख आहे. अलीकडे काही मंडळी वनस्पतींना वेगळीच नावे देत आहेत. त्यामुळे मूळ नावे मागे पडून वनस्पतींची मूळ ओळखच पुसली जाण्याची शक्यता आहे. आता 'धनगराचं पागोटं' या फुलाचंच उदाहरण पहा... गवळी धनगरांची शरीरयष्टी जशी उंच आणि शिडशिडीत बांध्याची, रंग वर्णाने काळे-सावळे आणि डोक्यावर पांढऱ्या रंगाचं पागोटं. हे फूल सुद्धा अगदी तसच, उंच, शिडशिडीत आणि डोक्यावर धारण केलेले गवळी धनगरांसारखे फुलरूपी पागोटे म्हणून फुलाचे नाव 'धनगराचं पागोटं' किंवा धनगर!

 

स्थानिक नावांमध्ये दृश्यमान, परंतु अत्यंत सूक्ष्म पातळीवर जाऊन केलेल्या निरीक्षणातून ‘धनगर’ अथवा ‘धनगराचं पागोटं’ या वनस्पतीचे नामकरण झाल्याचे दिसून येते. धावडीबरोबरच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बहरात असणारी आणि जमिनीलगत वाढणारी ही छोटी सपुष्प वनस्पती. बहरादरम्यान सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटातील बहुतांश सर्व पठारे या पांढऱ्या रंगाच्या आच्छादनाने भरून जातात. प्राचीन काळापासून ते अगदी आज देखील या परिसरामध्ये पशुपालन करणाऱ्या गवळी धनगर समाजाचा रहिवास आहे. या धनगर समाजातील पुरूष पूर्वीपासून त्यांच्या डोक्यावर एक फेटा/ पागोटं धारण करीत असत. आज ते धारण करणे काहीसे मागे पडले आहे. परंतु, काही जुने जाणते लोक अजूनही डोक्यावर हे पागोटं घालतात. ते डोक्यावर व्यवस्थित बसावे म्हणून एका ठराविक साचेबद्ध पद्धतीने डोक्याभोवती गुंडाळले अथवा विणले जाते. त्यामुळे डोक्यावर त्या पागोट्याच्या आडव्या-उभ्या-तिरप्या अशा रेषा अथवा पेढे (उंचवटे) दिसून येतात. हा सर्व तपशील इथे नमूद करण्याचे कारण एवढेच की धनगराचं पागोटं अथवा धनगर नावाच्या छोट्याशा फुलाचे अगदी बारकाईने निरीक्षण केल्यास त्याची रचना देखील या पागोट्याच्या आडव्या-उभ्या-तिरप्या रेषांप्रमाणे अथवा पेढ्यांप्रमाणे दिसून येते.

या भागातील गवळी धनगरांची शरीरयष्टी देखील उंच आणि शिडशिडीत बांध्याची, रंग वर्णाने काळे-सावळे आणि डोक्यावर पांढऱ्या रंगाचं पागोटं. आमचे हे फूल सुद्धा अगदी तसेच, उंच शिडशिडीत आणि डोक्यावर धारण केलेले गवळी धनगरांसारखे फुलरूपी पागोटे म्हणून फुलाचे नाव काय? तर, धनगराचं पागोटं किंवा धनगर! फुलाला नाव देण्यामागचे हे निरीक्षण, साधर्म्य, त्यामागचे लोकज्ञान या बाबी कमालीच्या रंजक आहेत. पण या सर्व बाबींच्या अज्ञानातून असेल किंवा आणखी कशामुळे असेल, काही मंडळींनी या फुलाला ‘गेंद’ असे नाव दिले. हे दिलेले नाव अगदीच उपरे, कारण त्याचा स्थानिक परिस्थितीशी, लोकांशी काहीच संबंध नाही. उलट, त्याच्या मूळ नावातील समर्पकता, त्याच्याशी संबंधित स्थानिक लोकज्ञान हे सारे मागे पडत जाण्याचीच शक्यता जास्त! 

 

आता तुम्हीच सांगा, वनस्पतींचे विश्व पुढे नेताना आपण काय सोबत घेऊन जायला हवे? 

 

मूळ नाव- धनगराचं पागोटं/धनगर

नंतरचे नाव- गेंद

 

- सुनील भोईटे

9421997301 / [email protected]

 

(लेखक सातारा येथील निसर्ग अभ्यासक व मानद वन्यजीव रक्षक आहेत.)

 

वनस्पतींचे नाव किती महत्त्वाचे?
असे कोणी विचारेल, पण नावात बरेच काही आहे. नावात अस्तित्व आहे, इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि ज्याला नाव दिले गेले त्याची संपूर्ण ओळख आहे. म्हणून नाव महत्त्वाचे. ते पुसले गेले किंवा बदलले की जणू त्या गोष्टीची, त्याच्याशी संबंधित असलेल्या भवतालाची आणि समुदायाची ओळखच पुसली जाऊ शकते. अलीकडे काही मंडळी स्थानिक संदर्भांच्या अज्ञानातून किंवा इतर कारणांमुळे या वनस्पतींना वेगळीच नावे देत आहेत. त्यामुळे मूळ नावे मागे पडू शकतात. म्हणूनच पिढ्यान पिढ्या माहीत असलेल्या वनस्पतींच्या प्रजातींची मूळ नावे व त्यांचे स्थानिक संदर्भ उलगडून दाखवणारा हा उपक्रम ‘भवताल’ मंचावर राबवत आहोत. त्यात वनस्पतिविज्ञानाचे ख्यातनाम अभ्यासक डॉ. एस. आर. यादव, डॉ. मिलिंद सरदेसाई, डॉ. अपर्णा वाटवे, या विषयाचा कितीतरी दशके धांडोळा घेणारे कृतिशील निसर्ग अभ्यासक सुनील भोईटे यांच्यासारख्या मंडळींचा समावेश आहे.

 

(संवाद आणि प्रतिक्रियांसाठी: [email protected])
- संपादक
(भवताल मासिक- फेब्रुवारी २०२४ च्या अंकातून साभार)

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like