Articles 
खरवर/माळकारवी (वनस्पतींच्या नावांच्या गोष्टी)

खरवर/माळकारवी (वनस्पतींच्या नावांच्या गोष्टी)

खरवर/माळकारवी 

 

शास्त्रीय नाव- प्लीओकाऊलस रीची

 

पश्चिम घाटातील बहुतांश पठारी प्रदेशांमध्ये कारवीचे अस्तित्व आढळते. वळीवाच्या १-२ पावसांबरोबरच हिचे कोवळे लालचुटूक धुमारे फुटून येतात. कारवीचा फुलण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव आहे. ही जात गुच्छ स्वरूपात पसरत जाते. तर काही ठिकाणी सरळ व उंच वाढलेली देखील दिसून येते. मूळ प्रदेशांत कारवीला माळ कारवी किंवा ‘खरवर’ किंवा ‘खरा’ या नावाने ओळखले जाते. कारण काय असावे? जाणून घ्यायचंय?...  
 
अकँथेसी या कारवीच्याच कुळातील जमिनीलगत १ ते ३ फूट वाढणारी ही बहुवर्षायू वनस्पती. पश्चिम घाटातील बहुतांश पठारी प्रदेशांमध्ये हिचे अस्तित्व दिसून येते. वळीवाच्या १-२ पावसांबरोबरच हिचे कोवळे लालचुटूक धुमारे फुटून येतात. या परिसरात कारवीच्या जवळपास ५-६ जाती आढळतात. या सर्व कारवीच्या जातींचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या दोन पुष्पबहरांमध्ये असलेले अंतर. काही जातींना दरवर्षी फुले येतात, काही जाती दोन ते तीन वर्षांनी फुलतात, तर काही जाती या जवळपास सात ते आठ वर्षांनी पुष्पसांभार मिरवतात. यांची फुले देखील फार चित्ताकर्षक असतात. यांच्यापासून अत्यंत उच्च औषधी गुणधर्म असलेला मध देखील प्राप्त होतो.

‘प्लीओकाऊलस रीची’ हिचा फुलण्याचा अथवा वाढण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव आहे. ही कारवीची जात गुच्छ स्वरूपात पसरत जाते. ती पूर्ण वाढ झाल्यानंतर जागोजागी गोलाकार गुच्छांच्या स्वरूपात दिसून येते. तर काही ठिकाणी सरळ व उंच वाढलेली देखील दिसून येते. व्यासाने देखील चांगलीच तीन-चार फूट असते. अशावेळी मग आमच्या काही तज्ज्ञांनी हिचे बारसे घालून टाकले आणि नाव दिले, ‘टोपली कारवी’. असे का? तर म्हणे, पालथ्या टोपलीसारखी दिसते म्हणून टोपली कारवी. परंतु, इथे एक बाब ध्यानात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे सर्वत्रच तिचा हा गोलाकार वाढण्याचा स्वभाव दिसून येत नाही. ती सरळ आणि वेडीवाकडी पण वाढते. त्यामधे विविधता आढळते. त्यामुळे ‘टोपली कारवी’ हे नाव समर्पक वाटत नाही.

खरं तर ही कारवी या मूळ प्रदेशांत माळ कारवी किंवा मग ‘खरवर’ किंवा ‘खरा’ या नावाने ओळखली जाते. कारण तरी काय असावे? तर, ही कारवीची जात या परिसरात सर्वदूर पसरलेल्या पठारांवर अर्थातच माळरानांवर दिसून येते. या भागातील उंचसखल डोंगरउतार, दऱ्या खोऱ्यांचा बाह्य प्रदेश येथे दिसून येत नाही. हा तिला माळरानांशी जोडणारा दुवा. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या कारवीची पाने ही स्पर्शास अत्यंत खरखरीत असतात. म्हणून स्थानिकांचे नाव काय? तर, खरवर किंवा खरा. ती या परिसरात पठारांवर/माळरानांवरच येणार. गोल वाढली, सरळ वाढली किंवा वेडीवाकडी वाढली तरी तिची पाने मात्र काही केल्या खरखरीतच असणार. हे या चपखल नावातील तिच्या गुण वैशिष्ट्यांशी जास्तीचे साधर्म्य आहे.
 
मूळ नाव- खरवर/माळकारवी/खरा
नंतरचे नाव- टोपली कारवी

 

सुनील भोईटे
9421997301/[email protected]
 
(लेखक सातारा येथील निसर्ग अभ्यासक व मानद वन्यजीव रक्षक आहेत.)
 

वनस्पतींचे नाव किती महत्त्वाचे?
 
असे कोणी विचारेल, पण नावात बरेच काही आहे. नावात अस्तित्व आहे, इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि ज्याला नाव दिले गेले त्याची संपूर्ण ओळख आहे. म्हणून नाव महत्त्वाचे. ते पुसले गेले किंवा बदलले की जणू त्या गोष्टीची, त्याच्याशी संबंधित असलेल्या भवतालाची आणि समुदायाची ओळखच पुसली जाऊ शकते. अलीकडे काही मंडळी स्थानिक संदर्भांच्या अज्ञानातून किंवा इतर कारणांमुळे या वनस्पतींना वेगळीच नावे देत आहेत. त्यामुळे मूळ नावे मागे पडू शकतात. म्हणूनच पिढ्यान पिढ्या माहीत असलेल्या वनस्पतींच्या प्रजातींची मूळ नावे व त्यांचे स्थानिक संदर्भ उलगडून दाखवणारा हा उपक्रम ‘भवताल’ मंचावर राबवत आहोत. त्यात वनस्पतिविज्ञानाचे ख्यातनाम अभ्यासक डॉ. एस. आर. यादव, डॉ. मिलिंद सरदेसाई, डॉ. अपर्णा वाटवे, या विषयाचा कितीतरी दशके धांडोळा घेणारे कृतिशील निसर्ग अभ्यासक श्री. सुनील भोईटे यांच्यासारख्या मंडळींचा समावेश आहे.
 
(संवाद आणि प्रतिक्रियांसाठी: [email protected])
- संपादक

(भवताल मासिक- फेब्रुवारी २०२४ च्या अंकातून साभार)

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like